श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 28 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार क्र.1 व 2 डॉक्टर असून मेडिकल ट्रॅन्स्क्रिप्शन चा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी जाबदेणार यांची इंटरनेट सेवा व्यवसायासाठी आवश्यक असल्याने दिनांक 16/3/2008 रोजी घेतलेली आहे. तक्रारदार पुर्वी सदाशिव पेठ, पुणे येथे रहावयास होते. नंतर चंद्रमा, डी.एस.के.विश्व, धायरी येथे रहावयास गेले. नवीन पत्त्यावर इंटरनेट सेवा सेवा स्थलांतरीत करुन मिळणेबाबत दिनांक 2/10/2010 कळविले. जाबदेणार यांनी दिनांक 4/10/2010 च्या मेलद्वारे तक्रार नं 2081654 असून इंटरनेट सेवा 24 तासात मिळेल असे सांगितले. जाबदेणार यांनी दिनांक 7/10/2010 रोजी प्रोसेसिंग चालू आहे असे कळविले व दिनांक 8/10/2010 रोजीच्या ई-मेल द्वारे इंटरनेट सेवा 7 दिवसात स्थलांतरीत करुन देण्यात येईल असे तक्रारदारांना कळविले होते. दिनांक 15/10/2010 च्या ई-मेल द्वारे जाबदेणार यांनी तक्रारदारांना इंटरनेट कनेक्शन स्थलांतरीत करुन देतो असे कळविले. दिनांक 19/10/2010 च्या ई-मेल द्वारे इंटरनेट कनेक्शन ट्रान्सफर होऊ शकत नाही असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना कळविले व काही कालावधीनंतर इंटरनेट सेवा उपलब्ध करुन दिली. दिनांक 25/10/2010 रोजी ई-मेल द्वारे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतू त्यास जाबदेणार यांनी उत्तर दिले नाही. प्रत्यक्षात इंटरनेट सेवा उपलब्ध नसतांना जाबदेणार यांनी 23 दिवसांचा इंटरनेट सेवेचा चार्ज 602/- रुपये आकारला. तक्रारदारांचा मेडिकल ट्रॅन्स्क्रिप्शन चा व्यवसाय दिनांक 2/10/2010 ते 28/10/2010 कालावधीत इंटरनेट सेवेअभावी बंद पडला. तक्रारदार क्र.1 व 2 यांचे दिवसाचे प्रत्येकी उत्पन्न रुपये 1,000/- आहे. 15 दिवस इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे एकूण रुपये 30,000/- चे नुकसान झाले. तक्रारदार व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार झालेल्या नुकसानी बद्दल रुपये 30,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 60,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणारांतर्फे जी.के.असोसिएट्स मंचापुढे दिनांक 28/2/2011 रोजी हजर झाले व वकालतनामा दाखल केला. लेखी जबाब दाखल करण्यासाठी मुदत देऊनही लेखी जबाब दाखल करण्यात आला नाही म्हणून दिनांक 27/5/2011 रोजी मंचाने जाबदेणार यांच्याविरुध्द “No w.s.” आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांची इंटरनेट सेवा घेतलेली होती. जाबदेणार यांच्या दिनांक 4/10/2010 च्या मेलचे अवलोकन केले असता तक्रारदारांची इंटरनेट सेवा स्थलांतरीत करुन मिळणेबाबतची मागणी मिळाली असल्याचे व इनक्वायरी नं 2081654 व नवीन पत्त्यावरील फिजीबिलीटी चेक अप 24 तासात करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे. दिनांक 7/10/2010 रोजीच्या मेलद्वारे प्रोसेसिंग चालू असल्याचे जाबदेणार यांनी तक्रारदारांना कळविल्याचे मेलवरुन निदर्शनास येते. दिनांक 8/10/2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना “shift of location will complete within 7 Days.” कळविल्याचे ई-मेल वरुन दिसून येते. जाबदेणार यांच्या दिनांक 15/10/2010 रोजीच्या ई-मेल चे अवलोकन केले असता “shift of connection has been resolved on 15th Oct 2010” नमूद केले असल्याचे निदर्शनास येते. तर दिनांक 19/10/2010 रोजीच्या मेलद्वारे “new Address is not feasible we can’t shift the connection” तक्रारदारांना कळविल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार तोंडी, लेखी पाठपुरावा करुनही, जाबदेणार यांनी दिनांक 8/10/2010 च्या मेलद्वारे सात दिवसात उपलब्ध करुन देऊ असे कळवूनही प्रत्यक्षात दिनांक 19/10/2010 पर्यन्त तसे केले नसल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील ही त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार क्र.1 व 2 डॉक्टर असून मेडिकल ट्रॅन्स्क्रिप्शन चा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी त्यांचे आयकर रिटर्न च्या प्रती व पगारपत्रक मंचापुढे दाखल केलेले आहे. इंटरनेट सेवे अभावी तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले या तक्रारदारांच्या म्हणण्यास यावरुन पुष्टी मिळते. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सेवेतील त्रुटी पोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी मा. गोवा राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचा निकाल 2009 (2) CPR 154 टेलिकॉम गोवा डिस्ट्रीक्ट विरुध्द सरोजिनी दा कोस्टा दाखल केलेला आहे. हा निवाडा प्रस्तूत प्रकरण लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रार अर्ज खर्चापोटी रक्कम रुपये 30,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.