( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 16,नोव्हेंबर, 2010 ) तक्रारकर्ते श्री निलेश मारोतराव पारसे, राहणार बोरखेडी, कांती चौक, बुटीबोरी, नागपूर यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं. 1 टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड, लॅन्डमार्क बिल्डींग, वर्धारोड, नागपूर व विरुध्द पक्ष क्रं. 2 टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड, लोअर परेल,मुंबई यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत मंचात दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे विमाकृत वाहनाचा अपघात झाल्यामुळे आलेला दुरुस्ती खर्च देण्यात यावा व सदरचे रक्कमेवर 18 टक्के दराने व्याज द्यावे आणि ते न दिल्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 10,000/-मिळावे. तसेच वाहनाचा भविष्यातील मिळकतीबद्दलचे रुपये 1,00,000/- मिळावे असे आदेश व्हावे. अशी विनंती केली आहे. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष टाटा एआयजी जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमीटेडकडे वाहनाचे सुरक्षीततेकरिता सर्वसमावेशक (Comprehensive policy ) पॉलीसी खरेदी केली होती. आणि त्याकरित अर्ज करुन आवश्यक असलेले रुपये 11,760/- एवढी रक्कम प्रिमीयमचे हप्ता म्हणुन विरुध्द पक्षाला दिले आणि विरुध्द पक्षाने दिनांक 24.10.2008 ते 23.10.2009 या कालावधीकरिता वाहन जोखीमीविषयीची मोटार पॉलीसी निर्गमित केली.
- तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार वर नमुद पॉलीसी अस्तित्वात असतांना तक्रारदाराचे वाहनाचा दिनांक 29.5.2009 रोजी सकाळी 8.30 वाजता बुटीबोरी पोलीस स्टेशन, जिल्हा नागपुर यांचे अधिकार क्षेत्रात अपघात झाला आणि त्याबद्दलची सुचना संबंधीत पोलीस स्टेशनला आणि विरुध्दपक्षाला देण्यात आली. वाहनाच्या अपघाताबद्दलचे आवश्यक सर्व कारवाई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
- तक्रारदाराने वर नमुद अपघाताची माहिती गैरअर्जदार यांना दिली आणि संपुर्ण संबंधीत कागदपत्रे त्यांचेकडे सादर करुन वाहन दुरुस्तीचे रक्कम अंदाजपत्रकानुसार देण्याची मागणी केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला आश्वासित केले की, त्यांचा दावा दोन आठवडयांचे आंत निकाली काढण्यात येईल.
- दिनांक 27.8.2009 रोजी विरुध्द पक्षाने पत्राद्वारे तक्रारकर्तीचा दावा चालकाकडे योग्य परवाना नव्हता तो असणे खालील शर्ती प्रमाणे (Any person including insured provided that a person driving holds an effective driving license at the time of accident) गरजेचे आहे, या कारणास्त नामंजूर केला असे कळविले.
- तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे, विरुध्द पक्षाचे हे कृत्य अधिकाराशिवाय, अन्यायकारकरित्या असुन काहीही कारण नसतांना विरुध्द पक्षाने तक्रारदाराचा दावा नामंजूर केला म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या मंचात दाखल करुन वरील प्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारदाराने त्यांचे तक्रारीसोबत एकुण 8 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, टॅक्स पावती, फिटनेस प्रमाणपत्र, पॉलीसी कव्हर नोट, एफआयआर, टॅक्स इनव्हाईस, पेमेंट रसिद, दावा नाकारल्याचे पत्र, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
- तक्रार दाखल झाल्यावर मंचाने विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन विरुध्द पक्ष हजर झाले व त्यांनी दिनांक 4.10.2010 रोजी आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात तक्रारदाराने वाहनाचा कॉप्रीएन्सीव्ह विमा पॉलीसी काढली होते आणि त्याची प्रिमीयम रक्कम भरली होती ही बाब मान्य केली आहे.
- विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार अपघाताबद्दल सर्व्हेअरने निरिक्षण करुन तपशीवार सर्व्हेअर अहवाल सादर केला जो विरुध्द पक्षाने उत्तरासोबत दाखल केला आहे. सर्व्हेअर यांचे अहवालानुसार वादातील वाहन टाटा एस वाहन क्रमांक एमएच-40-एन-272 हे मालवाहु वाहन असुन अपघाताचे वेळेस ते चालविणारा वाहक श्री दिपक नाणे हा ते वाहन चालविण्यास पात्र नव्हता. कारण त्याचे जवळ गैरमालवाहू वाहन चालविण्याचा परवाना होता. सदरचा निष्कर्ष तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रावरुन काढयात आलेला आहे. तक्रारीसोबत तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे विषेशतः कागदपत्र क्रं.3 वरुन स्पष्ट होते की तक्रारदाराने वाहन हे मालवाहु होते. तसेच ते वाहन चालविणा-या वाहन चालकाचा परवाना पाहता श्री दिपक नाणे यांचा परवाना गैरमालवाहू वाहन चालविण्याचा होता. त्यामुळे विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे विरुध्द पक्षाने कोणतेही गैरकायदेशिर कृत्य केलेले नाही व कायद्याच्या चौकटीत राहुन तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणास्तव फेटाळला. तसेच गैरअर्जदाराच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्याने तक्रार खारीज करावी. अशी विनंती केली.
- विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरासोबत एकुण 2 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात पॉलीसीची कागदपत्रे व सर्व्हेअर अहवाल व इतर कागदपत्रे इत्यादींचा समावेश आहे.
- उभयपक्षकारांचे वकीलांचा दिनांक 25.10.2010 रोजी युक्तिवाद ऐकला व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
//-//-//- निरिक्षणे व निष्कर्ष -//-//-// - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन घेतलेला विमा वाहनाचा कॉप्रीएन्सीव्ह विमा पॉलीसी असुन वाहनाचा अपघात झाला हे कागदपत्रावरुन सिध्द होते. परंतु वाहन चालकाजवळ सदरचे वाहन चालविण्याचा कायदेशिर परवाना नव्हता. वाहन मालवाहक होते आणि वाहनचालकाजवळ गैरमालवाहु वाहन चालविण्याचा परवाना होता हे रेकॉर्डवरील कागदपत्रावरुन सिध्द होते. विरुध्द पक्षाने तक्रारदाराचा दावा विमा पॉलीसीच्या शर्ती व अटींनुसार नामंजूर केल्याचे स्पष्टपणे दिसुन येते. त्यामुळे विरुध्द पक्षाचे सेवेत कुठेही त्रुटी आढळुन येते नाही असे मंचाचे मत आहे. तसेच 2010 सीटीजे पान क्रं.1229 (NCDRC) येथे प्रकाशीत न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी लिमीटेड, विरुध्द बी. सत्यजित रेड्डी आणि इतर या निकालात मा.राष्ट्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे की, “ A driver having a licence to driver a light motor vehicle cannot ply transport vehicle without endorsement and if he so does, the insurance company cannot be asked to pay the claim ”. सबब आदेश
-// अं ति म आ दे श //- 1. तक्रार खारीज. 2. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही. (जयश्री येडे) (जयश्री यंगल) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |