न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. मनिषा कुलकर्णी, सदस्या)
1) प्रस्तुतची तक्रार तकारदाराने ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रार स्विकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले व ते या मंचासमोर हजर होवून त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदाराने त्यांचे मयत आईचे विमाधारक जाबदार विमा कंपनीकडे जीवन विमा पॉलिसी क्र. 184828234 उतरविली होती. त्याची रक्कम रु. 10,00,000/- इतकी होती तथापि तक्रारदार यांचे
आईचे मृत्यूनंतर तक्रारदाराने केलेल्या विमा पॉलिसीची रक्कम जाबदार विमा कंपनीने – त्यांनी विमा प्रपोजल फॉर्म भरणे अगोदर असणारा एच.आय.व्ही. +ve हा आजार विमा कंपनीपासून लपवून ठेवला व विमा कंपनीची फसवणूक केली या कारणास्तव विमा क्लेम नाकारला. सबब, तक्रारदाराने सदरचा विमा दावा मंजूर करणेचे आदेश होणेसाठी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
2) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हे इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असून मोल मजुरी करुन स्वत:चा व त्यांचे कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. यातील विमाधारक यांचा मुलगा श्री. मुकूंद बबन गागडे यांनी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे जीवन विमा पॉलिसी क्रमांक सी 184828234 उतरविली असून त्याची सम इन्शुरन्स रक्कम रु. 10,00,000/- होती. सदरच्या विमा पॉलिसीचे हप्ते विमाधारकाचे मुलगा यांनी ठरलेप्रमाणे वेळेवर अदा केले आहेत. तक्रारदार यांची आई चमेली बबन गागडे यांचे दि. 5-01-2012 रोजी हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी रितसर दावा फॉर्म भरुन देवून विमा रक्कम रु.10,00,000/- रक्कमेची मागणी केली. जाबदार नं. 1 यांनी दि. 6-06-2014 रोजी पत्र पाठवून चुकीचे कारण देवून तक्रारदार यांचा विम्याचा क्लेम नाकारला आहे. जाबदार क्र. 1 यांनी विमा दावा नाकारीत असताना चुकीचे कारण “ त्यांना विमा प्रपोजल फॉर्म भरणे अगोदर असणारा एच.आय.व्ही. पॉझीटिव्ह हा आजार विमा कंपनीपासून लपवून ठेवला व विमा कंपनीची फसवणूक केली. सबब, विमेधारकांच्या वतीने दाखल करणेत आलेला विम्याचा दावा नाकारण्यात येतो “ असे कारण दर्शवून विमा क्लेम नाकारला आहे. तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब तक्रारदारांनी जाबदार क. 1 व 2 यांचेकडून वैयक्तीक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना विमा क्लेम रक्कम रु. 10,00,000/- द.सा.द.शे. 12 % व्याजासह दयावेत. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 20,000/- मिळावा अशी तक्रारदाराने तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण चार(4) कागदपत्रे दाखल केली आहेत. क्लेम रद्द केलेबाबतचे वि.प. यांचे तक्रारदार यांना दिलेले पत्र, चमेली बबन गागडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, शहापुरे क्लिनीक यांची प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारदारांनी शपथपत्र, मे. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4) जाबदार यांना नोटीस आदेश होवून जाबदार या मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार तक्रारदाराचा तक्रार अर्जातील मजकूर खोटा आहे. तक्रारदारांनी त्यांची मयत आई चमेली हिचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असताना एच.आय.व्ही. ग्रस्त असताना योग्यरित्या वि.प. यांना अंधारात ठेवून आईचा विमा उतरविलेला आहे. तक्रारदार यांनी जाबदार कंपनीकडे कधीही ठरलेले वेळेत विमा हप्ता भरत नव्हते. तक्रारदार यांचे आईचा मृत्यू हार्ट अॅटकने झालेला असून सदर कामी डॉ. शहापुरे यांचा वैद्यकीय अहवाल आहे तो पुर्ण चुकीचा आहे. तक्रारदार यांनी जाबदार कडे विमा क्लेम वेळेत सादर केला हे म्हणणे चुकीचे आहे. जाबदार विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन क्लेम नाकारला हे खोटे आहे. जाबदार यांनी सदरचा क्लेम माहिती मिळवून व पॉलिसीच्या अटींच्या आधारे नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी एच.आय.व्ही. इनफेक्शन सारखी बाब जाबदार विमा कंपनीपासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम जाबदार यांनी नाकारला आहे. तक्रारदाराचा क्लेम नाकारताना कोणतेही कारण चुकीचे दिलेले नाही. तक्रारदारांनी त्यांची आई ही एच.आय.व्ही. ने बाधीत असताना विमा उतरुन त्याचा गैरफायदा घेणेचा तक्रारदारांचा प्रयत्न आहे. तक्रारदाराचे म्हणणेनुसार विमा एजंट यांनी फॉर्म भरला व को-या पेपरवर सहया घेतल्या व नंतर जाबदार यांनी विमा क्लेम नाकारला हे म्हणणे खोटे आहे.
जाबदार त्यांचे म्हणण्यात पुढे नमूद करतात की, विमा व्यवसाय हा एकमेकांचे विश्वासावर चालतो. अर्जदारानी विश्वास या तत्वाची प्रतारणा केलेली आहे. पुर्ण सत्य माहिती लपवून केवळ आई चमेलीच्या आजाराचा आर्थिक फायदा कसा करुन घ्यायचा याचा विचार करुन जाबदार यांचेकडे प्लॅन करुन विमा उतरुन घेतलेला आहे. तक्रारदाराची आई चमेली हया या आजारात वाचणार नाहीत याची कल्पना तक्रारदारांना होती. प्रस्तुत तक्रार अर्ज चालवणेचा मे. कोर्टाला कोणताही अधिकार नाही. तक्रारदारांनी विमा उतरवताना भरलेला फॉर्म पाहिला असता मयत चमेलीचा पत्ता शहापुर, कर्नाटक असा दिसून येतो. तसेच फॉर्मचे शेवटी हुबळी, कर्नाटक असे नमुद आहे. सदरचे तक्रारीस मे. कोर्टात कार्यक्षेत्र येत नाही. तक्रारदारांनी विमा हप्त्याची पहिली रक्कम अर्ज करताना दि. 23-04-2010 रोजी कर्नाटक येथुन भरलेली दिसून येते. विमा उतरविणेचा अर्ज करताना अर्जातील मुद्दा नं. 4 मधील क्लॉज 5 पाहिला असता विमा कंपनीने एडस चा मुद्दा स्पष्टपणे नमूद केलेला आहे. त्यामध्ये मयत चमली अगर तक्रारदार यांनी मयत चमेलीस एडस् नाही असे खोटे नमूद केले आहे. चौगुले हॉस्पीटलचे पेसर्सवर पाहिले असता एच.आय.व्ही. पॉझीटीव्ह असा शेरा आहे. तसेच अहवालावर एच.आय.व्ही. रिअॅक्टीव्ह असा रिपोर्ट आहे. सदरचे अहवाल हे दि. 31-03-2009, 10-04-2009 व 17-04-2009 रोजीचे आहेत. तक्रारदारांचा विमा अर्ज व पहिला हप्ता हा दि. 23-04-2010 रोजीचा आहे. म्हणजेच तक्रारदार अगर मयत चमेली यांना एच.आय.व्ही. झालतेची माहिती यापुर्वी होती. तक्रारदारांनी या परिस्थितीचा आर्थिक लाभ उठविणेचे दृष्टीने मयत आईचा विमा कोठेही संशय येऊ नये म्हणून कर्नाटक येथे उतरविला आहे व त्याबाबत खोटी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. चमेली हया मयत झालेनंतर ते इचलकरंजी राहतात असे दाखवून मे. कोर्टात अर्ज दाखल केला आहे. चौगुले हॉस्पीटल वरील पत्ता पाहिला असता ते कोल्हापूर येथे राहतात असे दिसून येते. विमा उतरविताना तक्रारदार यांनी पॉलिसी डाटा मधील पान नं. 3 वरील ZNCONTESTABZLITY हा मुद्दा पाहिला असता फसवुन अगर खोटे वय दाखवून विमा उतरविला असेल तो देता येणार नाही अशी अट आहे. विमा उतरविताना तक्रारदारांनी सदर अटी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे करारातील अटींचा भंग तक्रारदारांनी केलेला असलेमुळे विमा रक्कम तक्रारदारांना देता येणार नाही. तक्रारदारांनी बनावटे पत्ते दाखवून विमा पॉलिसी उतरविली आहे. तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार विमा कंपनीने दिले आहे.
5) जाबदार यांनी एकूण 20 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये विमा अर्ज, व प्रथम हप्ता भरलेली पावती, पॉलिसी डाटा, तक्रारदाराचा अर्ज, डेथ क्लेम ची माहिती, इलेक्ट्रॉनिक पेआऊट रिसीट, चमेली यांचा मृत्यू दाखला, चमेली व तक्रारदार यांचे पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, लाईट बिल व निवडणूक यादी, तक्रारदाराचे डिक्लरेशन, पॉलिसी गहाळचे डिक्लरेशन, जाबदारानी तक्रारदारास पाठविलेले पत्र, चौगुले हॉस्पीटलचे केस पेपर्स, प्रयोगशाळेचे रिपोर्ट, मायक्रोबायालोजी विभागाचे रिपोर्टस, जाबदाराचे तक्रारदारास पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच जाबदारांनी मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले आहेत.
6) तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे, व युक्तीवाद तसेच जाबदार यांचे कथन, दाखल पुरावे व युक्तीवाद यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1. | तक्रारदार जाबदार यांचे ग्राहक होतो काय ? | होय |
2. | जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हा त्याने मागितलेल्या मागण्या मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
4. | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न -
7) मुद्दा क्र. 1 -
तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा पॉलिसी क्र. 184828234 ही विमा पॉलिसी उतरविलेली होती. त्याची Sum Assured रक्कम रु. 10,00,000/- इतकी होती. याबद्दल उभय पक्षांमध्ये वाद नाही व तसे कागदपत्रेही तक्रारदार यांनी दाखल केलेले आहेत. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झालेले आहे. सबब तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2 (1) डी खाली “ग्राहक” होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8) मुद्दा क्र. 2 ते 4 -
तक्रारदाराचे मयत आई यांनी जाबदार विमा कंपनीकडे “जीवन विमा “ पालिसी क्र. सी- 184828234 ही पॉलिसी उतरविलेली होती व आहे व त्याची विमा रक्कम रु. 10,00,000/- इतकी आहे. पालिसीचे हप्तेही तक्रारदार (विमाधारक यांचा मुलगा ) वेळेवत अदा करीत असे. विमाधारक चमेली बबन गागडे यांचे दि. 5-01-2012 रोजी हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. तदनंतर विमाधारक यांचे मृत्यूमपश्चात तक्रारदार यांनी रितसर विमा दाव्याची मागणी जाबदार विमा कंपनीकडे केली असता दि. 6-06-2014 रोजी “विमा फॉर्म भरणे अगोदर असणारा एच.आय.व्ही. पॉझीटिव्ह हा आजार विमा कंपनीपासून लपवून ठेवला व विमा कंपनीची फसवणूक केली” या कारणास्तव विमा दावा नाकारणेत आला. सबब, विमा दाव्याशी याचा काहीही संबंध नाही असा विमा दावा नाकारुन जाबदार यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे.
9) जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांची अर्जातील बरीचशी कथने नाकारलेली आहेत. त्यांचे कथनाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कमही तक्रारदार वेळेवर देत नसत व सदरचा विमाधारक हा HIV या रोगाने ग्रस्त होता व प्रपोझल फॉर्म भरण्यापुर्वीच सदरची व्याधी असतानाही तक्रारदाराचे आई (विमाधारक) यांनी सदर बाब लपवून ठेवली व प्रपोझल फॉर्ममधील Step 4 मधील Q-5- (a)(b) यांची उत्तरे नकारार्थी देवून सदरची बाब विमा कंपनीपासून लपवून ठेवलेली आहे. So it has been established that the life insured was suffering from Retroviral disease pior to the application for Insurance सबब, या कारणास्तव विमा दावा नाकारुन जाबदार विमा कंपनीने कुठेही सेवेत त्रुटी केलेली नाही असे जाबदार विमा कंपनीचे कथन आहे व या एकाच मुद्दयावर जाबादार विमा कंपनीने सदरचा विमा दावा नाकारलेला आहे.
10) तथापि वर नमूद कथनांचा विचार करता जाबदार यांनी प्रपोझल फॉर्ममधील Step 4 मधील प्रश्न क्र. Q-5- (a)(b) यांची उत्तरे विमाधारकाने नकारार्थी दिलेली आहेत व सदरची व्याधी ही यापुर्वीच तक्रारदार यांना होती मात्र ती जाबदार विमा कंपनीपासून लपवून ठेवली असे कथन जारी केले असले तरीसुध्दा जाबदार विमा कंपनीने जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये दि. 17-04-2009 चा रिपोर्ट दाखल केला आहे तो जरी HIV + असा असला तरी यावरुन तो कोणत्या व्यक्तीचा आहे हे सिध्द होत नाही व सदरची शाबीतीची जबाबदारी ही निश्चितच जाबदार विमा कंपनीची आहे सबब, .सदरची बाब शाबीत करणेस विमा कंपनी असमर्थ ठरलेली आहे असे मंचाचे ठाम मत आहे. व जी बाब जाबदार विमा कंपनी शाबीतच करु शकलेली नाही त्याच कारणास्तव विमा दावा नाकारणे ही निश्चितच वि.प. विमा कंपनी यांचे सेवेतील त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, जाबदार विमा कंपनीने घेतलेला हा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
11) जाबदार विमा कंपनीने सदरचा विमाधारक हा हप्तेही वेळेवर भरत नव्हता असे कथन केले आहे. मात्र जाबदार यांनी विमा दावा हा फक्त वर नमूद कारणास्तव नाकारला असलेने त्याला त्याचे बाहेर जाता येणार नाही. सबब, सदरचे आक्षेपाविषयी ही हे मंच काहीही भाष्य करीत नाही. तसेच जरी वादाकरिता सदरची वस्तुस्थिती असली की त्याने पॉलिसीचे हप्तेही वेळेवर भरले नाहीत मात्र जाबदारने तसाही कोणता पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, हे मंच जाबदारने तक्रारदाराचे विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे यावर ठाम आहे. सबब, तक्रारदार त्याने मागितलेल्या मागण्या मिळणेस निश्चितच पात्र आहे. सबब, तक्रारदार यांनी मागितलेली विमाधारक यांची विमा रक्कम रु. 10,00,000/- ही जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना अदा करावी. तसेच सदची रक्कम ही जाबदार विमा कंपनीने विमा दावा नाकारलेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % दराने अदा करावी. तसेच त्यांनी मागितलेली रक्कम मानसिक त्रासापोटीची तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटीची अनुक्रमे रक्कम रु. 5,00,000/- व रु.द20,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- देणेचे निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना विमा देय रक्कम रु. 10,00,000/- (रक्कम रुपये दहा लाख मात्र) अदा करावी.
3) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना विमा दावा नाकारलेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत सदरची रक्कम द.सा.द.शे. 9 % व्याज दराने अदा करावी.
4) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/-(रक्कम रुपये दहा हजार मात्र) अदा करावेत.
5) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
6) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे जाबदार नं. 1 व 2 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
8) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.