तक्रारदार : वकीलामार्फत हजर.
सामनेवाले : वकीलामार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही विमा कंपनी आहे. तर तक्रारदार ही केबल व्यवसाय करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनीकडून तक्रारदार कंपनीने विदेशात निर्यात केलेल्या मालाबद्दल विमा घेतला होता. व विम्याचा करार दिनांक 5.1.2007 ते 5.1.2008 या कालावधीमध्ये अस्तीत्वात होता.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांनी मुंबई येथील न्हावाशेवा बंदरातून दिनांक 6.8.2007 रोजी आपला माल (केबल्स) बेल्जीयम येथील कंपनीस निर्यात केला. तो माल बेल्जीयम मधील अॅटवर्प या बंदरात उतरणार होता. तक्रारदारांनी आपला माल कार्डबोर्डच्या खोक्यात व्यवस्थित आच्छादीत करुन लाकडी पेटयामध्ये ती कार्डबोर्डची खोकी ठेवली होती. व अशा रितीने अॅटवर्प, बेल्जीयम येथे पोहचती करणेकामी तो माल पाठविला होता. दिनांक 7.9.2007 रोजी तक्रारदारांचा माल अॅटवर्प बंदरात पोहोचल्यानंतर तक्रारदारांचे शिपींग एजंट स्नेकर इंडीया प्रा.लि. यांनी तक्रारदारांच्या मालाचे 9 खोके तपासून पाहीले असता ती खोकी ओली झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे काही लाकडी पेटयांच्या चौकटी खराब झाल्या होत्या. तक्रारदारांनी ही बाब सा.वाले यांना दूरध्वनीवर कळविली व दिनांक 10.9.2007 रोजी ई-मेलव्दारे देखील सा.वाले विमा कंपनीस मालाच्या नुकसानी बद्दल माहिती दिली. सा.वाले विमा कंपनीने मालाची तपासणी करणेकामी सर्वेक्षक नेमले व सर्वेक्षकांनी दिनांक 13.9.2007 रोजी तक्रारदारांचे शिपींग एजंट यांच्या उपस्थितीत मालाची तपासणी केली. विमा सर्वेक्षकांनी काही लाकडी पेटया खराब झाल्याने तसेच कार्डबोर्डच्या खोक्यांच्या धातुच्या पंटया गंजलेल्या दिसून आल्या. विमा सर्वेक्षकांनी लाकडी पेटया कंच्या लाकडाच्या असल्याने त्या लाकडाची ओल खोक्यामध्ये गेली व खोकी व आतील माल ओल व दमटपणा यामुळे खराब झाला असा निष्कर्ष नोंदविला.
3. विमा सर्वेक्षकांच्या वरील अहवालावरुन सा.वाले यांनी त्यांचा ई-मेल संदेश दिनांक 21.9.2007 व्दारे तक्रारदारांची विम्याच्या विमेची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे बराच पत्र व्यवहार केला व चर्चाही केली. त्यानंतरही सा.वाले यांनी त्यांचे ई-मेल पत्र दिनांक 14.11.2007 व्दारे तक्रारदारांची विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची मिळण्या बाबतची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 5.12.2007 रोजी एक निवेदन सा.वाले यांना दिले. परंतु त्या निवेदनाचा सा.वाले यांचे निर्णयामध्ये काही बदल झाला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या वकीलामार्फत सा.वाले विमा कंपनीस दिनांक 8.3.2008 रोजी कायदेशीर नोटीस दिली. व विमा करारान्वये नुकसान भरपाईची मागणी केली. सा.वाले यांनी नोटीसी प्रमाणे विमा करारा आधारे नुकसान भरपाई अदा केलेली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी विमा कराराचे आधारे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व निर्यात मालाची किंमत रु.9,48,838/- 18 टक्के व्याजासह मागणी केली.
4. सा.वाले विमा कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारीत विमा कंपनीकडे विमा करारा अंतर्गत केलेली नुकसान भरपाईची मागणी ही निर्यात केलेल्या मालाबद्दल म्हणजे वाणीज्य व्यवसायाकामी केलेला व्यवहारा बद्दल असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1)(डी) चे परंतुकाप्रमाणे तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक नाहीत असे कथन केले. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी ऑगस्ट, 2007 मध्ये न्हावाशेवा बंदरातून बोटीने आपला माला अॅटवर्प बेल्जीयम येथे पाठविला. परंतु त्या मालाची खोकी ज्या लाकडी पेटयांमध्ये ठेवली होती त्या पेटयांच्या चौकडीची लाकडे ओली असल्याने कार्डबोर्ड खोक्याचे आवरण ओले झाले व ओलीमुळे व दमटपणामुळे आतील मालास इजा पोहचली. या प्रमाणे तक्रारदारांनी निर्यात माल ज्या लाकडी पेटयांमध्ये ठेवून पाठविला त्या लाकडी पेटयांची लाकडे व्यवस्थित नसल्याने म्हणजे थोडक्यात पेकेजिंग मटेरीयल चांगल्या दर्जाचे वापरले नसल्याने कार्डबोर्ड खोक्यातील मालास नुकसान पोहचले असे कथन केले. या प्रमाणे सा.वाले यांच्या कथना प्रमाणे निर्यात केलेल्या मालाच्या नुकसानीस स्वतः तकारदारांचा निष्काळजीपणा कारणीभुत आहे असे कथन केले.
5. सा.वाले यांनी असे कथन केले की, लाकडी खोक्यामधील कार्डबोर्डचे खोके यावर थोडीफार ओल दिसून आलीतरी आतील वस्तु/केबल खराब झाल्या नव्हता व या प्रमाणे तक्रारदारांना कुठलेही नुकसान पोहचले नाही.
6. सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ विमा सर्वेक्षकांचा अहवालाची प्रत दाखल केली आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले आहे की, केवळ तक्रारदारांची 9 कार्डबोर्ड खोके ओले झाले नव्हते तर अन्य निर्यातदारांचा माल देखील ओला झाला होता. या वरुन बोटी मधील प्रवासा दरम्यान लाकडी खोक्यामध्ये ओल शिरल्याने निर्यात मालाचे नुकसान झाले असे कथन केले. त्याचप्रमाणे माल खरेदीदाराने केबल निकृष्ट झाल्याने माल स्विकारण्यास नकार दिला असेही कथन केले. तक्रारदारांनी सा.वाले यांचे बरोबर केलेला विमा करार व सा.वाले यांचेकडून प्राप्त झालेला ई-मेल पत्र व्यवहार यांच्या प्रती हजर केल्या. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रे, ई-मेल व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे रक्कम अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय.(परंतु रु.9,48,838 /-9 टक्के व्याजासह ) |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्यान विमा करार झाला होता व प्रस्तुतची घटणा घडली तेव्हा तो करारनामा अस्तित्वात होता या बद्दल उभयपक्षी वाद नाही. सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांनी बेल्जीयम मध्ये निर्यात केलेला माल हा त्यांच्या वाणीज्य व्यवसायाकामी निर्यात केलेला असल्याने व वाणीज्य व्यवसायाकामी एखादी सेवा सुविधा स्विकारली असल्यास ती सेवा स्विकारणारी व्यक्त्ी ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक होत नसल्याने प्रस्तुतच्या मंचास ग्राहक तक्रारीमध्ये दाद देण्याचा अधिकार नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तसेच लेखी युक्तीवादामध्ये उपस्थित केलेला हया स्वरुपाचा मुद्दा अजीबात टिकू शक्त नाही. कारण मा.राष्ट्रीय आयोगाचा हर्सोलिया मोटर्स विरुध्द नॅशनल इंनश्युरन्स कंपनी लिमिटेड I (2005) CPJ 27 (NC) या प्रकरणात असा निष्कर्ष नोंदविला आहे की, विमा करारचे संदर्भात जर सेवा सुविधा स्विकारली असेल तर त्या व्यवहारास वाणीज्य व्यवसायाकामी केलेल्या व्यवहाराची बाधा येऊ शकत नाही. मा.राष्ट्रीय आयोगाचा हर्सोलिया मोटर्स विरुध्द नॅशनल इंनश्युरन्स कंपनी लिमिटेड या प्रकरणातील निकालावरुन सा.वाले यांचा या स्वरुपाचा तांत्रिक आक्षेप फेटाळण्यात येतो.
9. सा.वाले यांनी लेखी युक्तीवादासोबत सर्वेक्षकाच्या अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदारांना देखील सा.वाले यांच्या सर्वेक्षकांनी खोक्याचे निरीक्षण केले ही बाब मान्य ओह. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.9 मध्ये त्या स्वरुपाचे कथन केलेले आहे. यावरुन सर्वेक्षकांचा अहवाल अभिलेखात दाखल करुन घेण्यात आला. सर्वेक्षकांचे अहवालावरुन असे दिसते की, दिनांक 23.9.2007 रोजी सर्वेक्षकांनी केलेल्या पहाणीमध्ये तक्रारदारांचे शिपींग एजंटचे प्रतिनिधी हजर होते. तर दिनांक दिनांक 24.10.2007 रोजी झालेल्या पहाणीमध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. सर्वेक्षकांनी आपल्या अहवालामध्ये असे नमुद केले आहे की, कार्डबोर्डची खोकी ही लाकडी पेटयामध्ये ठेवण्यात आलेली होती. व कार्डबोर्डच्या खोक्यामध्ये प्लास्टीक पिशव्यामध्ये धातुच्या केबल ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या कार्ड बोर्डच्या खोक्यांना 2 X 2 च्या प्लास्टीकच्या पंटयांनी गुंटाळण्यात आल्या होत्या. सर्वेक्षकांनी असे निरीक्षण नोंदविले की, काही लाकडी पेटयांच्या उभ्या पंटया वाकल्या होत्या व कार्ड बोर्डची खोकी सुरक्षीत होती होती परंतु काही खोली दबली होती. कार्ड बोर्ड खोक्यांना गुंटाळलेल्या पंटया गंजल्या होत्या. विमा निरीक्षकांनी आतल्या केबल संबंधात असे निरीक्षण नोंदविले की, आतील केबलला काही प्रमाणात ओल व किंचीत गंज चढली होती. विमा सर्वेक्षकांच्या अहवालावरुन सा.वाले यांनी निरीक्षण नोंदविले की, तक्रारदारांनी कार्डबोर्डची खोटी ज्या लाकडी खोक्यात ठेवली हेाती त्या लाकडी खोक्यांची लाकडे ओली असल्याने त्या लाकडांची ओल कार्डबोर्डच्या खोक्यांना लागली असेल व त्याचा परीणाम आतील केबलवर झाला.
10. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, लाकडी पेटयांपैकी काही पेटयांची उभ्या चौकडीची लाकडे वाकली होती. परंतु सर्व चौकडीची लाकडे वाकली नव्हती. तक्रारदार असे कथन करतात की, लाकडी पेटयांची लाकडे जर ओली असती तर न्हावा शेरा बंदरामध्ये बोटीमध्ये माल चढवित असतांना बंदरावरील अधिकारी यांनी लाकडाच्या पेटया पोटीमध्ये चढविण्यास नकार दिला असता किंवा आक्षेप घेतला असता. तथापी विना आक्षेप लाकडी पेटया बोटीत चढविण्यात आल्या हया वरुन न्हावा शेवा बंदरामध्ये माल चढवित असताना खोकी ओली नव्हती असा निष्कर्ष काढावा लागतो.
11. त्यातही त्या पेटयांच्या म्हणजे चौकटीच्या फळया बाहेरच्या बाजूने ओल्या असणे शक्य नाही व त्या प्रकारच्या पॅकींगचे साहीत्य तक्रारदारांनी वापरले नसते. तक्रारदार असे कथन करतात की, या व्यवसायामध्ये ते बरेच वर्षापासून कार्यरत असून त्यांनी अनेक वेळा आपला माल निर्यात केलेला आहे. म्हणजे केबल पाठविण्याचा त्यांचा पहीला प्रसंग नव्हता. लाकडी खोक्यांच्या फळयांचे लाकूड नुकतेच कापण्यात आले असेल तर त्या फळया आतमधून ओल्या असणे शक्य असते. परंतु त्यामुळे हया स्वरुपाची ओल पोहचेल असे शक्य वाटत नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत खोक्यांची व लाकडी पेटयांची एकत्रित असे 5 रंगीत छायाचित्रे दाखल केलेली आहेत. प्रस्तुत मंचाने त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. त्यावरुन सर्वच कार्डबोर्डची खोकी ओली झाली होती असे दिसून येते. लाकडी पेटयांच्या फळया नुकत्याच काडलेल्या लाकडाच्या तंयार करण्यात आलेल्या होत्या असे गृहीत धरले तरीही त्या पेटयांचे परीणाम कार्डबोर्डच्या खोक्यावरील काही मर्यादित भागापर्यत दिसून येतील. तक्रारदार असे कथन करतात की, कार्डबोर्डच्या खोक्यांची जाडी चांगलीच होती. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये तसेच सा.वाले यांनी दिलेल्या नोटीस दिनांक 8.3.2008 या मध्ये असे कथन केलेले आहे की, कार्ड बोर्ड हे 9 प्लाय कार्ड बोर्ड चे कार्टुन बनविलेले होते. म्हणजे त्याची जाडी चांगली होती. केवळ ओल्या लाकडाच्या पंटयामुळे कार्ड बोर्डच्या खोक्यामधून आतमध्ये ओल पसरेल ही शक्यता दिसून येत नाही.
12. सा.वाले यांनी तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्याचे जे पत्र दिनांक 21.9.2007 रोजी ई-मेल संदेशाव्दारे दिले होते, त्या पत्रातील परिच्छेद क्र.2 मध्ये सा.वाले असे म्हणतात की, कार्डबोर्डचे बॉक्स हे बाहेरुन चांगल्या अवस्थेत होते. तथापी सा.वाले यांनी आपल्या सर्व पत्रामध्ये मात्र असे कथन केले आहे की, लाकडी पेटयांच्या फळयांची लाकडे ओली/कच्ची असल्याने तसेच ओल कार्ड बोर्डच्या खोक्यामध्ये पसरली व आतील केबलला गंज चढली. न्याय निर्णयाचे वरील भागात चर्चा केल्याप्रमाणे लाकडी खोक्यांच्या पेटयांना आलेल्या ओलेपणामुळे किंवा दमटपणामुळे कार्ड बोर्डच्या खोक्यामधील वस्तुंना नुकसान पोहचेल अशी शक्यता दिसत नाही. या व्यतिरिक्त तक्रारदारांनी प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये असे कथन केले आहे की, त्या बोटीव्दारे पाठविण्यात आलेली केवळ त्यांचीच खोकी नव्हे तर इतरही काही खोकी ओली झाली होती व त्यांना नुकसान पोहचले होते. तक्रारदारांनी त्या कंपनीपैकी हायटेक अॅलनॉर या कंपनीच्या नावाचा संदर्भ आपल्या लेखी युक्तीवादात परिच्छेद क्र.12 मध्ये दिलेला आहे. तक्रारदारांनी आपल्या प्रतिउत्तराचे शपथपत्रासोबत अन्य 9 कंपनीच्या नावांची यादी व त्यांनी निर्यात केलेल्या मालाचे वर्णन नमुद केलेले आहे. यावरुन केवळ तक्रारदारांनी चांगल्या दर्जाचे पॅकींग पटेरीयल वापरले नसल्याने कार्ड बोर्डच्या खोक्यामधील मालाचे नुकसान झाले या सा.वाले यांच्या कथनामध्ये तथ्य नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
13. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, कार्ड बोर्डच्या खोक्यामधील केबल नाममात्र गंजलेली होती परंतु ही वापरण्या योग्य नव्हती असे नव्हते. या उलट देखील तक्रारदारांनी त्यांचे शिपींग एजंट क्वायझर यांचेकडून आलेला ई-मेल दाखल केला आहे. व त्यामध्ये असे कथन केले आहे की, केवळ केबलला गंज चढल्यामुळे खरेदीदार कंपनी ही नियोजित उद्देशाकामीकेबल वापरु शकत नाही व मालाची पोच घेण्यास खरेदीदाराने नकार दिला. सा.वाले यांनी असा पुरावा दाखल केलेला नाही की, तक्रारदारांनी पाठविलेल्या 9 कार्डबोर्डच्या खोक्यामधील केबल खरेदीदार कंपनीने बेल्जीयममध्ये स्विकारली व तक्रारदारांना नुकसान झाले नाही. सा.वाले यांनी नेमलेल्या सर्वेक्षकांनी आपल्या अहवालामध्ये असे नमुद केलेले आहे की, केबलला काहीअंशी गंज चढली होती. त्या वापरण्या योग्य होत्या किंवा नव्हत्या हे ठरविण्याचा अधिकार खरेदीदार कंपनीचा होता व सा.वाले यांच्या विमा सर्वेक्षकांचा नव्हता. सबब तक्रारदारांनी निर्यात केलेली केबल खरेदीदार कंपनीने स्विकारली असा निष्कर्ष काढता येत नाही.
14. वर चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले कंपनीने तक्रारदारांनी ज्या लाकडी खोक्यामध्ये जी कार्डबोर्डची खोकी ठेवली होती त्या लाकडी खोक्यांच्या फळया ओल्या/कंच्या असल्याने कार्डबोर्डमधील खोक्यामधील वस्तुंना गंज चढला असा चुकीचा निष्कर्ष काढला व या चुकीच्या निष्कर्षावर आधारीत सा.वाले यांनी निष्कर्ष काढला की, तक्रारदारांनी पॅकेजींग मटेरीयल निकृष्ट दर्जाचे वापरले व मालाच्या नुकसानीस स्वतः तक्रारदार जबाबदार आहेत. या.वाले यांचा या प्रकारचा निष्कर्ष चुकीचा असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे आधारे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
15. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये तसेच लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले आहे की, पाठविण्यात आलेल्या मालाची किंमत रु.9,48,838/- होती. ती किंमत चुकीची दाखविली आहे व विमा करार अस्तीत्वात नव्हता असे सा.वाले यांचे कथन नाही. सबब विमा कराराप्रमाणे सा.वाले हे तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु.9,48,838/-अदा करावयास जबाबदार आहेत.
16. तक्रारदारांनी नुकसान भरपाईच्या रक्कमेवर 18 टक्के व्याज मागीतले आहे. त्या व्यतिरिक्त रु.2 लाख नुकसान भरपाई मागीतलेली आहे. तथापी मुळ रक्कमेवर 9 टक्के व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येत असल्याने वेगळया नुकसान भरपाईच्या रक्कमेबद्दल आदेश करण्याची आवश्यकता नाही असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
17. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 319/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेंवाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईबद्दल रु.9,48,838/- दिनांक 31.10.2007 पासून 9 टक्के व्याज अदा करावे असा आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त खर्चाबद्दल सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु.5000/- अदा करावेत.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.