तक्रार दाखल ता.12/08/2016
तक्रार निकाल ता.28/12/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे:-
तक्रारदार हे खाटांगळे, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प.ही विमा कंपनी आहे. तक्रारदाराचे पती-विश्वनाथ विठ्ठल पाटील यांची महाराष्ट्र शासनामार्फत “शेतकरी जनता अपघात विमा योजना” या योजनेअंतर्गत वि.प.यांचेकडे विमा पॉलीसी उतरवली आहे. सदर पॉलीसीचा क्र.जीपीएल 00067/5 असा असून विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.01.11.2013 ते दि.31.10.2014 असा होता.
3. तक्रारदाराचे पती विश्वनाथ विठ्ठल पाटील यांचा दि.15.06.2014 रोजी पॉलीसी कालावधीतच शेतातील टुल इलेक्ट्रिक मोटरीची सुटलेली पाईप बसवत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून अपघात झाला. त्यांना उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पीटल, कोल्हापूर येथे आणले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त्याचदिवशी तक्रारदाराचे पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. यांचा विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यु-असा अहवाल प्राप्त झाला. तदनंतर तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी, करवीर यांचेकडे रितसर दि.09.01.2015 रोजी “शेतकरी जनता अपघात विमा योजना” अंतर्गत विमा क्लेम सादर करणेस तक्रारदार गेले असता, संबंधीत अधिका-यांनी कागदपत्रांची पुर्तता करुन पुन्हा क्लेम सादर करावा असे तक्रारदाराला सांगितले. तदनंतर दि.09.03.2015 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह तक्रारदाराने विमा क्लेम सादर केला. तथापि वि.प.विमा कंपनीने प्रस्तुत विमा दाव्याची कोणतीही पार्श्वभूमी लक्षात न घेता, दि.24.03.2015 रोजीचे पत्राने प्रस्तुत विमा क्लेम दाव्याची कागदपत्रे अपघात विमा योजना दि.31.10.2014 ला संपलेनंतर 90 दिवस उलटून गेलेनंतर मिळाली आहेत असे तांत्रिक कारण देऊन तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम फेटाळलेला आहे व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी, तक्रारदारचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर व्हावा, तक्रारदाराला वि.प.विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-, दि.09.03.2015 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18टक्के व्याजाने वसुल होऊन मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.कडून तक्रारदाराला वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
5. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, निशाणी-5 चे कागद यादीसोबत नि.5/1 ते नि.5/20 कडे अनुक्रमे क्लेम नाकारलेचे कृषी अधिका-यांचे तक्रारदाराला पत्र, क्लेम प्राप्त झालेनंतर वि.प.ने तक्रारदाराला दिलेले पत्र, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांनी वि.प.यांना क्लेम मंजूर करणेबाबत पाठवलेले पत्र, तक्रारदाराने क्लेम मंजूर करणेबाबत वि.प.ला दिलेले पत्र, तालुका कृषी अधिकारी यांनी विमा क्लेम मंजूर करणेबाबत वि.प.ला दिलेले पत्र, विमा क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे पतीच्या नावचा 7/12 उतारा, 8-अ उतारा, फेरफार उतारा-(वारस नोंद), वारस नोंद-8-अ उतारा, फेरुारपत्रक, गांव नमुना-6-क (वारस नोंदवही), गाव नमुना-6 मधील नोंद क्र.2058 पुरता उतारा, क्लेम फॉर्मसोबतचे तक्रारदाराचे अॅफीडेव्हीट, डॉ.सचिन भंडारी-सी.पी.आर.हॉस्पीटल यांनी तक्रारदाराचे पतीच्या मृत्युची पो.स्टे.ला दिलेली वर्दी, तपास टिपण, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यु कारणाचे प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, पुराव्याचे शपथपत्राबाबत पुरशिस असे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
6. प्रस्तुत कामी वि.प.यांना नोटीस लागू होऊनही वि.प. या कामी मे.मंचात हजर झाले नाहीत तसेच त्यांनी म्हणणेही दिले नाही. सबब, वि.प.यांचे विरुध्द निशाणी-1 वर “एकतर्फा” आदेश पारीत करणेत आला आहे, म्हणजेच वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
7. वर नमुद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला क्लेम नाकारुन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण वि.प.यांचेकडे तक्रारदाराचे पतीने “शेतकरी जनता अपघात विमा योजना” या योजनेअंतर्गत विमा पॉलीसी उतरवली होती व अपघात काळात ती चालू होती, या बाबीं तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांवरुन सिध्द झाल्या आहेत. सबब, तक्रारदार हे वि.प.चे ग्राहक असून वि.प.ही सेवा पुरवठादार आहे हे सिध्द झाले आहे.
9. तसेच तक्रारदाराचे पती यांचा पॉलीसी कालावधीतच म्हणजे दि.15.06.2014 रोजी शेतातील व टूल इलेक्ट्रीक मोटरची सुटलेली पाईप बसवत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून अपघात झाला व या अपघातात तक्रारदाराचे पतीचे सी.पी.आर.हॉस्पीटल येथे उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांचे शवविच्छेदन केले, त्यामध्येही वीजेचा शॉक लागून मृत्यु असे मृत्युचे कारण नमुद आहे. तसेच तक्रारदाराने तदनंतर सर्व कागदपत्रांची जमवाजमव करुन वि.प.विमा कंपनीकडे विमा क्लेम दाखल केला. परंतु वि.प.विमा कंपनीने सदर अपघातातील विमा क्लेमचे कागदपत्रे प्रस्तुत विमा योजना दि.31.10.2014 ला संपल्यानंतर 90 दिवसांनी उशिरा कृषी अधिकारी कार्यालयात सादर केली आहेत या कारणास्तव तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे व तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे हे तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेले कोणतेही कथन वि.प.ने खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराचे कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सबब, प्रस्तुत कामी तक्रारदार हे प्रस्तुत विमा क्लेम व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.ने तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) अदा करावी.
3 प्रस्तुत रक्कमेवर क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत 9टक्के व्याज वि.प.ने तक्रारदाराला अदा करावे.
4 मानसिक व शारिरीक त्रासापोटी वि.प.ने तक्रारदाराला रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्र) तसेच अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावी.
5 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
7 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.