::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 11/09/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने दि. 5/11/2012 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून टाटा अेस एचटीबीएस-3 या मॉडेलची नविन गाडी रु. 3,32,394/- टॅक्स इन्व्हाईस क्र. ए-1213-02102 अन्वये विकत घेतली, तिचा नोंदणी क्र. एमएच 30 एबी 1660 असा आहे. सदर गाडी त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे दि. 6/11/2012 ते 5/11/2013 या कालावधीकरिता एकूण विमा शुल्क रु. 15,708/- भरणा करुन बिमीत करण्यात आली त्याचा विमा पॉलिसी क्र. 064001/0140077669 आहे. दि. 10/6/2013 रोजी सदर गाडीचे नविन असलले टायर फुटून गाडी पलटली व अपघात झाला. यावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याला गाडी विकतांना त्यात उत्पादन दोष असलले टायर्स लावून दिले व उत्पादकिय दोष असलेले टायर लावून दिल्याने, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सेवेत न्युनता दर्शविली. सदर अपघातामुळे गाडीचे जबर नुकसान झाले व झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्याकरिता, तक्रारकर्ता याने विरुध्दपक्षाकडे सदर वाहन पाठविले व त्याची सुचना विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सुध्दा दिली. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दुरुस्तीकरिता रु. 49,008/- भरण्यास सांगीतले, त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 शी संपर्क साधला असता त्यांनी, सदर रकमेचा भरणा करण्यास सांगितले. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नुकसानीची पुर्ण रक्कम, बिलाप्रमाणे तक्रारकर्त्याला अदा करण्याचे आश्वासन दिले, सदर आश्वासनानुसार तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती बिल रक्कम रु. 49,008/- विरुध्दपक्ष क्र. 2 कडे भरली. सदर रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे वारंवार मागणी केली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कोणताही खुलासा न करता, तक्रारकर्त्याला रु. 22,427/- चा चेक पाठविला. तक्रारकर्त्यास सदर वाहन दुरुस्तीकरिता रु. 49,008/- चा खर्च आला, असे असतांनाही विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी बेकायदेशिरित्या, कोणताही खुलासा न करता, एकूण देय रक्कम रु. 22,427/- चेकद्वारे देवून, सेवेमध्ये न्युनता दर्शविली. तक्रारकर्त्याने दि. 5/8/2013 रोजी नोटीसद्वारे उर्वरित रक्कम रु. 26,581.88 व त्यावर 18 टक्के दराने व्याजाची मागणी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना केली. या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कोणताही जवाब दिला नाही, तर विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर नोटीसला खोटा जवाब दिला. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे रु. 26,581.88, वाहन दुरुस्तीचा खर्च व त्यावर दि. 5/8/2013 पासून 18 टक्के दराने व्याज, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व न्यायालयीन खर्च रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 13 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने अपघातानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 ला सदरहू वाहनाच्या अपघाताची सुचना न देता, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ची पुर्व परवानगी न घेता, सदरहू अपघातग्रस्त वाहन हे, वासन ऑटोमोटीव प्रा.लि., अकोला येथे आणले व त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सदरहू वाहनाचा अपघात घडल्याबद्दलची सुचना दिली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 ने परवानाधारक तज्ञ सर्व्हेअर श्री प्रविण मेहता यांची वादातील अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानाची आकारणी करण्याकरिता नेमणुक केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडील नुकसानी संबंधीचे इस्टीमेट सदरहू सर्व्हेअरला दिले. त्याप्रमाणे सदरहू सर्व्हेअरने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या गॅरेजमध्ये जावून, सदरहू वाहनाचे निरीक्षण केले व अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीसंबंधी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या प्रतिनिधीशी चर्चा करुन, सदरहू सर्व्हेअरने विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार, सदरहु वाहनाची नुकसानीची देय रक्कम रु. 29,903.11 इतकी निश्चित केली. तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहन, अपघाताच्या ठिकाणाहून विरुध्दपक्ष क्र. 1 ची पुर्व परवानगी न घेता, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे नेले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ला अपघातग्रस्त वाहनाचा अपघातस्थळावर स्पॉट सर्व्हे करता आला नाही, म्हणून देय रक्कम रु. 29,903/- मधून 25 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित निव्वळ रक्कम रु. 22,427/- तक्रारकर्त्याला चेकने दिली व त्यासंबंधी तक्रारकर्त्याने सदरहू चेक स्विकारुन फुल ॲन्ड फायनल सेटलमेंटचे व्हाऊचर विरुध्दपक्ष क्र. 1 ला सही करुन दिले. सदरहू रक्कम ही तक्रारकर्त्याने स्वखुशीने स्विकारली. पॉलिसीच्या अटी शर्तीच्या सेक्शन I मधील तक्त्यानुसार वाहनाच्या वयानुसार घसारा वजा होतो, त्याच प्रमाणे नुकसानीची आकारणी करतेवेळी IMT 23 नुसार तक्रारकर्त्यास फायदा देखील दिला आहे. सर्व्हेअरने वाहन नुकसानीची आकारणी ही बाजार भावाच्या आधारे केलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास देण्यात येणा-या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारची कमतरता किंवा न्युनता दर्शविली नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला असून त्याद्वारे त्यांनी तक्रारीतील विधाने अमान्य केली आहेत व पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 5/11/2012 रोजी सदर वाहन खरेदी केले. सदर वाहनाला नविन टायरच लागलेले होते. तक्रारकर्त्याने सदर वाहन बरेच महिने चालविलेले आहे. सदर वाहनाला टयुबलेस टायर लागलेले आहेत, त्यामुळे सदरहू वाहनाला कनिष्ठ दर्जाचे टायर लागले, हे म्हणणे चुकीचे आहे. गाडीचा अपघात हा तक्रारकर्त्याच्या ड्रायव्हरमुळे झालेला आहे. अपघाताच्या वेळेस सदरहू वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल होता, सदरहू वाहनाने झाडाला ठोस मारुन अपघात झालेला आहे. सदर वाहन हे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे विमाकृत आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 ची कोणतीही जवाबदारी नाही. तक्रारकर्त्याच्या दि. 3/2/2014 च्या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सेवेत कोणतीही न्युनता केलेली नाही व म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे
::: का र णे व नि ष्क र्ष :::
3. या प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, व उभयपक्षांचा युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे
याप्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 टाटा एआयजी जनरल इंशुरन्स कंपनी, यांना ही बाब कबुल आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन टाटा अेस एचटीबीएस-3 मॉडेलची गाडी क्र. एमएच 30 एबी 1660 हे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दि. 6/11/2012 ते 5/11/2013 पर्यंत इंशुरन्स पॉलिच्या शर्तीनुसार विमीत आहे. सदर वाहनाचा अपघात झाला होता व त्याची सुचना तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दिली होती, ही बाब देखील विरुध्दपक्ष क्र. 1 यांना कबुल आहे. तसेच सदर अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीची आकारणी करण्यासंबंधी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सर्व्हेअर नेमला होता व सर्व्हेअरने सदर वाहनाचा सर्व्हे केला होता, ही बाब देखील उभय पक्षात वादातीत नाही. मात्र सदर सर्व्हे रिपोर्ट मधील अहवालाबद्दल उभय पक्षात मत-भिन्नता आहे. या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2, वासन ऑटोमोटीव्ह प्रा.लि. यांनी ही बाब कबुल केली आहे की, तक्रारकर्त्याने वरील वाहन त्यांच्याकडून विकत घेतले होते व त्याचा अपघात झाल्यानंतर त्या वाहनाची दुरुस्ती विरुध्दपक्ष क्र. 2 कडे, त्यांनी केली असून त्यापोटी दुरुस्तीचे बिल रक्कम रु. 49008/- तक्रारकर्त्याकडून स्विकारले आहे व त्या प्रमाणे दाखल पावत्या तक्रारकर्त्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चा ग्राहक आहे, यात वाद नाही.
या प्रकरणात तक्रारकर्ते यांनी असा युक्तीवाद केला की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे वाहन दुरुस्ती रक्कम जमा करुन, वाहन ताब्यात घेतल्यावर, ही रक्कम विमा पॉलिसीनुसार मिळणेकरिता, विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दावा दाखल केला असता, त्यांनी कोणताही खुलासा न करता रु. 22,427/- चा चेक, तक्रारकर्त्याला पाठविला, ही रक्कम मान्य नाही, अशी नोटीस तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ला पाठविली होती, परंतु त्यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याला सदर वाहनाची दुरुस्ती करण्यास रु. 49008/- ईतकी रक्कम लागलेली आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सर्व्हेअरने वाहन दुरुस्ती बाबत दिलेल्या देयकातील ब-याच खर्चाचा विचार केलेला नाही, त्यामुळे उर्वरित रक्कम सव्याज नुकसान भरपाईसह मिळावी.
यावर, विरुध्दपक्ष क्र.1 यांचा मुख्य युक्तीवाद असा आहे की, त्यांच्या सर्व्हेअरने गॅरेज मध्ये जाऊन निरीक्षण केले व अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीसंबंधी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या प्रतिनिधीशी चर्चा करुन, सदर पॉलिसीच्या शर्ती-अटीनुसार वाहनाच्या नुकसानीची देय रक्कम रु. 29,903.11 इतकी असेस केली, परंतु सदर वाहन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या पुर्व परवानगीशिवाय विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीला नेले, त्यामुळे अपघातस्थळावर स्पॉट सर्व्हे करता आला नाही, जे पॉलिसीतील अटी-शर्तीनुसार करणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व्हेअरच्या देय रकमेतून 25 टक्के रक्कम वजा करुन, उर्वरित निव्वळ रक्कम रु. 22,427/- ही तक्रारकर्त्याला चेकद्वारे दिली व तो चेक स्विकारुन फुल ॲन्ड फायनल सेटलमेंटचे व्हाऊचर तक्रारकर्त्याने सही करुन दिल्यामुळे आता ही तक्रार प्रतिपालनिय नाही.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकुन व उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्त काळजीपुर्वक तपासले असता, मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीपोटी विरुध्दपक्ष क्र. 2 ला त्यांच्या बिलानुसार रक्कम रु. 49008/- अदा केलेली आहे व सर्व्हेअरचा दाखल सर्व्हे रिपोर्ट व प्रतिज्ञालेख असे दर्शवितात की, सर्व्हेअरने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या रु. 68527/- या रकमेच्या इस्टीमेटवरुन त्यांच्या रकमेचे बिलींग केले, परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 चे दुरुस्तीचे अंतीम बिल हे रु. 49,008/- रकमेचे होते. त्यामुळे सर्व्हे रिपोर्ट मध्ये, सर्व्हेअरने विरुध्दपक्ष क्र. 2 ने दिलेल्या बिलातील नमुद ब-याच खर्चाचा विचार केला नाही, असे दिसते. तसेच वाहनाच्या पॉलिसीमधील अट क्र.5 Rate of Depreciation for Painting या बाबतही सर्व्हेअरच्या रकमेचे बिलींग बरोबर आढळत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 चा सर्व्हे रिपेार्ट न स्विकारता, तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीपोटी प्रत्यक्ष जी रक्क्म विरुध्दपक्ष क्र. 2 कडे जमा करुन, वाहन ताब्यात घेतले, ती रक्कम मंचाने देखील, वाहन नुकसान भरपाईपोटी गृहीत धरली आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 चा दुसरा आक्षेप, जसे की, पॉलिसी अटी-शर्तींचा भंग तक्रारकर्त्याकडून झाला आहे, हे तपासण्यासाठी सदर वाहनाच्या पॉलिसी प्रतीचे अवलोकन केल्यास त्यात स्पष्ट अशी अट नमुद आहे की, “ In case of an accident to your vehicle please intimate us immediately for spot survey failing which claim could be prejudiced” तक्रारकर्त्याने जरी सदर वाहन अपघाताची सुचना विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दिली होती, तरी वाहन हे घटनास्थळावरुन, त्यात मुल्यवान साहीत्य असल्याने, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीकरिता, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या पुर्व परवानगीशिवाय जमा केले होते, हा निष्कर्ष दाखल दस्तांवरुन निघत आहे, त्यमुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ला तात्काळ स्पॉट सर्व्हे करता आला नाही, म्हणून ही बाब पॉलिसीच्या अटी-शर्तीचे उल्लंघन, यामध्ये मोडते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडील बिलानुसार देय रक्कम रु. 49008/- मधुन 25 टक्के रक्कम वजा करुन, तसेच तक्रारकर्त्याला चेकने दिलेली रक्कम रु. 22427/- देखील वजा करुन, उर्वरित रक्कम रु. 14,329/- अदा केल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
म्हणून अशा परिस्थीतीत तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 1 कडून या रकमेवर कोणतेही व्याज अथवा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 चा फुल ॲन्ड फायनल सेटलमेंट बद्दलचा युक्तीवाद ग्राह्य धरता येणार नाही, कारण तक्रारकर्त्याने सदर रकमेचा चेक प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम मान्य नसल्याने, तो चेक त्याच्या अधिकाराला बाधा न येता, बँकेत लावून वटवून घेतल्याची सुचना वजा नोटीस तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना पाठविली होती. तसेच या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 वर कोणतीही जबाबदारी अशा परिस्थितीत येत नाही, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे..
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कं.लि., यांनी तक्रारकर्त्यास वाहन विमा रकमेपोटी उर्वरित रक्कम रु. 14329/- ( रुपये चौदा हजार तिनशे एकोणतिस ) अदा करावी. विरुध्दपक्ष क्र. 1 या रकमेवर कोणतेही व्याज, नुकसान भरपाई देण्यास बाध्य नाहीत.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.