(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 29 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वाहनास कर्ज पुरवठा करणारी कंपनी विरुध्द वाहनाचे झालेल्या नुकसानी संबधात प्रस्तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
या ठिकाणी प्रामुख्याने नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने जरी तक्रार ग्राहक मंचा समोर दिनांक-13/05/2014 रोजी दाखल केलेली असली तरी यातील विरुध्दपक्ष क्रं-2 कोटक महिन्द्रा बँक यांचे विरुध्द नोटीस बजावण्यासाठी विहित मुदतीत कार्यवाही त.क. व त्यांचे वकीलांनी केली नाही, दिनांक-18.11.2016 रोजी तक्रारकर्त्याचे वकीलांनी वि.प.क्रं 2 ची हमदस्त नोटीस ग्राहक मंचातून प्राप्त केली. त्यानंतर वि.प.क्रं 2 यांनी ग्राहक मंचा समोर दिनांक-07.04.2017 रोजी लेखी उत्तर दाखल केले. दरम्यानचे काळात वि.प.क्रं 1 चे वकील बदलविण्यात येऊन त्याऐवजी नव्याने वकील श्री हितेश वर्मा आणि वकील श्री जी.जे. दिपवाणी यांचे वकीलपत्र दिनांक-07.06.2019 रोजी ग्राहक मंचा समोर दाखल करण्यात आले आणि त्यामुळे या प्रकरणात निकालपत्र पारीत करण्यासाठी विलंब झालेला आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं 1 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी ही एक विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड ही वाहनास कर्ज पुरवठा करणारी बँक आहे. तक्रारकर्त्याने शेतोपयोगी कामासाठी लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज भोजापूर, भंडारा येथून दिनांक-02.04.2012 रोजी रुपये-5,01,000/- मध्ये ट्रॅक्टर विकत घेतला होता, ज्याचा नोंदणी क्रं-MH-36/L-2592 असा होता. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 बँके कडून रुपये-2,50,000/- एवढया रकमेचे कर्ज किस्तीने घेतले होते, कर्ज देते वेळी विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीतर्फे ट्रॅक्टरचा विमा काढला होता आणि त्याचा विमा पॉलिसी क्रं-015188220 असा होता. विम्याचा कालावधी हा दिनांक-26.04.2012 ते दिनांक-25.04.2013 चे मध्यरात्री पर्यंत होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विम्याचे वैध कालावधीत दिनांक-13.03.2013 रोजी तो स्वतः आणि विमाकृत ट्रॅक्टरवर काम करणारे मजूर श्री मधुकर रामचंद्र उरकुडे आणि प्रविण भाऊदास फेंडर यांचे सोबत स्वतःचे गावावरुन कन्हाळमोह येथील राईसमिल मध्ये 15 क्विंटल धान्याचे पोते आणि लाकडी पाटयासह विमाकृत ट्रॅक्टरमधून घेऊन जात होता, त्यावेळी ट्रॅक्टर तक्रारकर्ता स्वतः चालवित होता आणि ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये सदर दोन्ही मजूर बसलेले होते. तक्रारकर्ता हा कमी गतीने विमाकृत ट्रॅक्टर चालवित होता. दुपारी 2.30 वाजता राजेगाव एम.आय.डी.सी.फाटयावर विमाकृत ट्रॅक्टर पोहचला असता लाखनी कडून भंडा-याकडे जाणारा अन्य ट्रक क्रं-CG-04/J-6214 चे चालकाने सदर ट्रक निष्काळजीपणाने चालविल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने विमाकृत ट्रक्टरला धडक दिली. सदर अपघातामध्ये विमाकृत ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये बसलेला मजूर श्री रामचंद्र उरकुडे हा जागेवरच मरण पावला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर अपघाती घटनेचा रिपोर्ट तक्रारकर्त्याने स्वतः पोलीस स्टेशन भंडारा येथे दिला असता पोलीसानीं ट्रक चालका विरुध्द अपराध क्रं-117/2013 नोंदविला. तसेच तक्रारकर्त्याने सदर अपघाती घटनेची सुचना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिली असता विमा कंपनीने सर्व्हेअर यांना मोक्यावर पाठविले, त्यांचे पाहणी नंतर सदर ट्रॅक्टर क्रेनचे सहाय्याने लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज भोजापूर येथे नेण्यात आला, सदर क्रेनचा खर्च रुपये-1000/- तक्रारकर्त्याने स्वतः केला. सदर अपघातामध्ये विमाकृत ट्रकचे बरेच नुकसान झाले आणि लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्री तर्फे दुरुस्तीसाठी रुपये-5,10,307/- रकमेचे अंदाजपत्रक देण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीमध्ये सादर केला असता विमा कंपनीने दिनांक-27 ऑगस्ट, 2013 रोजीचे पत्रान्वये विमा दावा नामंजूर केला आणि त्यामध्ये विमा दावा नामंजूरीचे कारण असे नमुद केले की, अपघाती घटनेच्या वेळी विमाकृत ट्रॅक्टरमध्ये 3 ईसम बसले होते, त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-04.09.2013 रोजीचे पत्रान्वये दावा नामंजूरीचे पत्रासत उत्तर देऊन वस्तुस्थिती कथन करुन विमा दाव्याच्या रकमेची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून ट्रॅक्टरचे नुकसानीपोटी रुपये-5,00,000/- एवढी विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विमाकृत ट्रॅक्टरचे अपघातामुळे त्याचे उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे तो पुढील कर्जाच्या किस्ती भरु शकला नसल्याने विमाकृत ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेने दिनांक-01.10.2013 रोजी आपल्या ताब्यात घेतला. तक्रारकर्त्याला सदर विमाकृत ट्रॅक्टर पासून प्रतीमाह रुपये-15,000/- प्रमाणे नफा मिळत होता परंतु अपघातामुळे त्याचे उत्पन्नाचे साधन बंद झाले. कर्जाच्या किस्ती प्रलंबित राहिल्याने व्याज वाढत गेले. विरुध्दपक्ष क्रं-2 बँकेनी दिनांक-06.01.2014 रोजीचे नोटीसव्दारे कर्जाची रक्कम रुपये-2,64,919/- प्रलंबित दर्शविली. पुन्हा दिनांक-17.01.2014 रोजीचे पत्रामध्ये ट्रॅक्टरची विक्री किम्मत रुपये-35,000/- दर्शवून रुपये-2,64,919/- ची थकबाकी दर्शविली. त्यानंतर लगेच अकरा दिवसांनी कर्ज थकबाकीची रक्कम रुपये-2,74,662/- दर्शविली. यावरुन विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेने काढलेला थकबाकीचा हिशोब हा चुकीचा दिसून येतो. अशाप्रकारे दोन्ही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तक्रारकर्ता हा दोन्ही विरुध्दपक्षांचा ग्राहक असल्याने तो विरुध्दपक्षांकडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी ट्रॅक्टर कर्जा संबधात चुकीचा हिशोब दर्शवून अतिरिक्त रकमेची मागणी केलेली असल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी कर्जाचा योग्य तो हिशोब तक्रारकर्त्याला द्दावा असे आदेशित करण्यात यावे.
(2) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला विमाकृत ट्रकचे नुकसानीपोटी नुकसानभरपाई म्हणून रुपये-5,00,000/- विमा रक्कम देण्याचे आदेशित व्हावे.
(3) तक्रारकर्त्याचे विमाकृत ट्रॅक्टरची नुकसान भरपाई संबधाने विमा रक्कम विहित मुदतीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न दिल्यामुळे त्याचे विमाकृत कर्जाचे हप्ते थकीत राहिल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला, परिणामी तक्रारकर्त्याचे जवळपास रुपये-1,80,000/- उत्पन्नाचे नुकसान झालेले असल्याने सदर नुकसानीची रक्कम दोन्ही विरुध्दपक्षांकडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
(4) विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला द्दावेत असे आदेशित करण्यात यावे.
(5) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने देण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी तर्फे ग्राहक मंचा समक्ष पान क्रं 73 ते 77 वर लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कपंनी तर्फे दाखल केलेल्या लेखी उत्तरात त्यांचा पत्र पत्ता हा टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तिसरा माळा, दि ओरीयन-5, कोरेगाव पार्क रोड, पुणे-411001 असा असल्याचे नमुद करण्यात आले. तक्रारकर्त्याचे मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक, विमा पॉलिसी आणि विमा पॉलिसीचा कालावधी या बाबी मान्य केल्यात. विमा पॉलिसी प्रमाणे वाहनाची Insured Declared Value (I.D.V.) रुपये-4,27,500/- असल्याची बाब नमुद केली. तक्रारकर्त्याने शेतोपयोगी कामासाठी ट्रॅक्टर विकत घेतल्याची बाब नाकबुल केली. अपघाताचे वेळी सदर विमाकृत ट्रॅक्टरचा उपयोग हा व्यवसायिक हेतूसाठी करण्यात येत होता आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्दाचे तरतुदी प्रमाणे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होत नाही. विमा पॉलिसी ही अटी व शर्ती प्रमाणे आणि मोटर वाहन कायद्दा नुसार निर्गमित करण्यात आली होती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला स्वतः लेखी दिले की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरमध्ये दोन व्यक्ती बसून होते, ट्रॉली मध्ये नाही आणि पोलीस दस्तऐवजामध्ये सुध्दा असेच नमुद आहे. वाहनाचे आर.सी.बुक मध्ये ट्रॅक्टर मध्ये बसण्याची क्षमता वाहनचालकासहीत फक्त एक आहे. तक्रारकर्त्याचा भाऊ श्री गंगाधर राघोर्ते याने दिलेल्या बयाना मध्ये दोन्ही मृत्यू पावलेले श्री रामचंद्र उरकुडे आणि श्री प्रविण फेंडरहे अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरचे मडगार्डवर बसले होते, टॉलिमध्ये बसले नव्हते. यावरुन स्पष्ट होते की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरमध्ये एकूण तीन व्यक्ती बसलेले होते आणि त्यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा दिनांक-27 ऑगस्ट, 2013 रोजीचे पत्रान्वये नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्त्याचे विमाकृत ट्रॅक्टरचे झालेले नुकसान हा एक रेकॉर्डचा भाग असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केला होता हा सुध्दा एक रेकॉर्डचा भाग आहे. तक्रारकर्त्याचे नोटीसला दिनांक-13.12.2013 रोजी उत्तर देऊन विमा दावा नाकारण्याचे कारण नमुद केले होते. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही तक्रारकर्त्याला रुपये-5,00,000/- विमा रक्कम तसेच नुकसानी बाबत रुपये-1,80,000/- अशा रकमा देण्यास जबाबदार नाही. विशेष कथनात असे नमुद केले की, अपघाताचे वेळी ट्रॅक्टरमध्ये एकूण 03 व्यक्ती बसलेले होते. आर.सी.बुक आणि पॉलिसी प्रमाणे ट्रॅक्टर चालकासह एक व्यक्ती बसण्याची क्षमता आहे. तक्रारकर्ता आणि त्याचे भाऊ यांनी अपघाताचे वेळी तक्रारकर्त्यासह अन्य दोन असे मिळून एकूण 03 व्यक्ती ट्रॅक्टरमध्ये बसून होते असे बयान दिलेले आहे. तक्रारकर्त्याने लेखी बयान दिनांक-17.07.2013 रोजी दिलेले आहे. अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरचे मडगार्डवर दोन व्यक्ती बसून होते ते ट्रॉलीत बसलेले नव्हते. त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला असल्याने विमा राशी देय नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा बँके तर्फे लेखी उत्तर पान क्रं 140 ते 144 वर ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 2 बँके तर्फे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने शेतापयोगी कामासाठी ट्रॅक्टर रुपये-5,01,000/- एवढया किमतीत लक्ष्मी अॅग्रो स्टील इंडस्ट्री भंडारा यांचे कडून विकत घेतला होता, त्यापैकी रुपये-2,50,000/- रकमेचे कर्ज विरुध्दपक्ष क्रं 2 बँके कडून घेतले होते. परंतु सदर ट्रॅक्टरचा उपयोग हा व्यवसायीक कामासाठी करण्यात येत होता ही बाब तक्रारकर्त्याचे बयाना वरुन दिसून येते त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहकसंरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याला दिनांक-30.04.2012 रोजी कर्ज मंजूर करण्यात आले होते आणि ते समान हप्त्यांमध्ये दिनांक-10.07.2012 ते दिनांक-10.04.2016 या कालावधी मध्ये परतफेड करावयाच होते. तक्रारकर्त्याने परतफेडीचे दोन हप्ते व्यवस्थितपणे भरलेत, त्यापैकी पहिला हप्ता रुपये-20,000/- बँकेला दिनांक-16.07.2012 रोजी प्राप्त झाला आणि दुसरा हप्ता रुपये-55,000/- दिनांक-11.01.2013 रोजी बँकेला प्राप्त झाला. त्यानंतर ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तक्रारकर्ता सतत थकबाकीदार झाला. विरुध्दपक्ष क्रं 2 बँक ही एक नोंदणीकृत वित्तीय कंपनी असून कर्जाचे वसुलीसाठी वाहन कंपनीकडे गहाण ठेवावा लागतो, त्यानुसार त्यांनी कायदेशीर नियमानुसार तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर तयांचेकडे गहाण ठेवला होता. तक्रारकर्ता हा सतत थकबाकीदार राहिल्याने त्याला दिनांक-06.01.2014 आणि दिनांक-17.01.2014 रोजी नोटीशीव्दारे प्रलंबित रकमा भरण्या बाबत कळविण्यात आले होते, जी बाब तक्रारकर्त्याला सुध्दा मान्य आहे. तक्रारकर्त्याचे ट्रॅक्टरला अपघात झालेला असल्याने त्याने मोटर वाहन अपघात प्राधिकरण भंडारा येथे दावा दाखल करावयास हवा होता. ट्रॅक्टरला अपघात झालेला असल्याने तक्रारकर्त्याचे उत्पन्नाचे साधन बंद झाले हे जरी खरे असले तरी तो प्रलंबित कर्जाची रक्कम थकवू शकत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेव्दारे करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याने पान क्रं 25 वरील दस्तऐवज यादी नुसार अक्रं 1 ते 14 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने त.क.ने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे इन्व्हाईसची प्रत, वि.प.क्रं 2 बॅंके कडून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतल्या बाबतचा दस्तऐवज, रिपेमेन्ट शेडयुल, वाहनाचे विम्याची प्रत, ट्रॅक्टर नोंदणीचा दस्तऐवज, एफ.आय.आर.प्रत, स्पॉट पंचनामा, तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीला दिलेले पत्र, ट्रॅक्टरचे इस्टीमेट, विमा दाव्या संबधात वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूरी संबधी त.क.ला दिलेले पत्र, त.क.ने वकीलांचे मार्फतीने वि.प.क्रं 1 विमा कंपनीला पाठविलेले पत्र, वि.प.क्रं 2 बॅंकेनी त.क.चा ट्रॅक्टर ताब्यात घेतल्या बाबतचे पत्र, वि.प.क्रं 2 बॅंकेनी थकीत कर्जाची रक्कमेची मागणी केल्या बाबतचे पत्र अशा दसतऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं 127 ते 135 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तर पान क्रं 73 ते 77 वर दाखल केले. तसेच पान क्रं 79 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवज क्रं 1 ते 13 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीचे PL OD CLAIM NOTE पान क्रं 80 व 81 तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने रजिस्टर पोस्टाने त.क.ला पाठविलेले नोटीसचे उत्तर, तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीला रजिस्टर पोस्टाने पाठविलेले प्रतीउत्तर, तक्रारकर्त्याला विमा दावा नामंजूर केल्या बाबत दिनांक 27 ऑगस्ट, 2013 रोजीचे दिलेले पत्र, तक्रारकर्त्याने विमा कंपनीला पाठविलेले पत्र, पान क्रं 88 व 89 वर विमा पॉलिसीची प्रत, तक्रारकर्त्याचे बयान, क्लेम फॉर्म, पान क्रं 94 वर ट्रॅक्टरचे नोंदणी प्रमाणपत्र, पान क्रं 95 व 96 वर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री सरबजीत सिंग तुली यांचा सर्व्हे अहवाल, सर्व्हेअरचे फीचे देयक, पान क्रं 101 ते 104 वर सर्व्हेअर यांचा स्पॉट सर्व्हे रिपोर्ट, पान क्रं 105 ते 119 वर विमाकृत ट्रॅक्टर आणि ट्रक यांचे अपघाता नंतरची छायाचित्रे अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. पान क्रं 121 ते 123 वर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लिगल एक्झिकेटीव्ह यांचे शपथपत्र, पान क्रं 124 ते 126 वर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पान क्रं 155 वरील दस्तऐवज यादी नुसार अक्रं 1 ते 4 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विमा पॉलिसीची प्रत, गुडस कॅरेज परमीट दिनांक-10.03.2008 ते 09.03.2013, पान क्रं 159 ते 162 वर एफआयआर, गंगाधर राघोर्ते त.क.चे भाऊ यांनी विमा कंपनीला दिलेले पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं 2 कोटक महिन्द्रा बॅंकेनी पान क्रं 140 ते 144 वर लेखी उत्तर दाखल केले. तसेच पान क्रें 145 व 146 वर शपथेवरील पुरावा दाखल केला.
08. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथेवरील पुरावा, दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे उत्तर, शपथेवरील पुरावा व दाखल केलेले दस्तऐवज व लेखी युक्तीवाद आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे लेखी उत्तर, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद तसेच दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती इत्यादीचे ग्राहक मंचातर्फे अवलोकन करण्यात आले, तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री पी.एच.आठवले आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वकील श्री हितेश वर्मा यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
09. अभिलेखावरील दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं 1 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड ही तक्रारकर्त्याचे ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणारी बँक आहे. तक्रारकर्त्याने लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज भोजापूर,अॅग्रो इंडस्ट्रीज भंडारा येथून दिनांक-02.04.2012 रोजी रुपये-5,01,000/- मध्ये ट्रॅक्टर विकत घेतला होता ही बाब पान क्रं 26 वरील टॅक्स इन्व्हाईसच्या प्रती वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचा नोंदणी क्रं-MH-36/L-2592 असा होता ही बाब पान क्रं 31 वरील सर्टीफीकेट ऑफ रजिस्ट्रेशन वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 बँके कडून रुपये-2,50,000/- एवढया रकमेचे कर्ज किस्तीने घेतले होते ही बाब पान क्रं 27 वरील दस्तऐवजा वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज हे दिनाक-10 जुलै, 2012 ते दिनांक-10 एप्रिल, 2016 चे कालावधीत परतफेड करावयाचे होते ही बाब पान क्रं 29 वर दाखल वि.प.क्रं 2 बँकेच्या रिपेमेन्ट शेडयुल वरुन सिध्द होते, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीतर्फे ट्रॅक्टरचा विमा काढला होता आणि त्याचा विमा पॉलिसी क्रं-015188220 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-26.04.2012 ते दिनांक-25.04.2013 चे मध्यरात्री पर्यंत होता. विमा पॉलिसी प्रमाणे वाहनाची Insured Declared Value (I.D.V.) रुपये-4,27,500/- एवढी होती ही बाब पान क्रं 30 वर दाखल विम्याचे कव्हरनोट वरुन सिध्द होते. या बाबी दस्तऐवजांवरुन सिध्द होतात आणि त्याबद्दल सर्व पक्षांमध्ये कोणताही विवाद नाही.
10. विम्याचे वैध कालावधीत दिनांक-13.03.2013 रोजी दुपारी 2.30 वाजता राजेगाव एम.आय.डी.सी.फाटयावर विमाकृत ट्रॅक्टर पोहचला असता लाखनी कडून भंडा-याकडे जाणारा अन्य ट्रक क्रं-CG-04/J-6214 चे चालकाने सदर ट्रक अतिशयक वेगाने निष्काळजीपणाने चालविल्याने ट्रकने विमाकृत ट्रक्टरला धडक दिली. सदर अपघाती घटनेचा रिपोर्ट तक्रारकर्त्याने स्वतः पोलीस स्टेशन भंडारा येथे दिला असता पोलीसानीं ट्रक चालका विरुध्द अपराध क्रं-117/2013 नोंदविला या बाबी पान क्रं 32 ते 35 दाखल एफ.आय.आर. प्रतीवरुन सिध्द होतात. सदर एफ.आय.आर.मध्ये पोलीसांनी सुध्दा अन्य ट्रक क्रं-CG-04/J-6214 चे चालकाने सदर ट्रक वेगाने निषकाळजीपणाने चालविल्याने विमाकृत ट्रक्टरला धडक दिल्याचे नमुद केलेले आहे. सदर अपघातामध्ये विमाकृत ट्रॅक्टरचे मध्ये बसलेला मजूर श्री रामचंद्र उरकुडे हा जागेवरच मरण पावल्याचे नमुद केलेले आहे. सदर एफ.आय.आर.मध्ये पुढे असे नमुद आहे की, अपघाती घटनेच्या वेळी तक्रारकर्ता ट्रॅक्टर चालवित होता
11. पान क्रं 36 ते 39 वर दाखल पोलीस स्टेशन भंडारा यांनी केलेला घटनास्थ्ळ पंचनामा दाखल आहे, त्यामध्ये घटनेचे ठिकाण मोजा राजेगाव सरहद्द लाखनी ते भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 असे नमुद आहे. सदर घटनास्थळ पंचनाम्या मध्ये असेही नमुद आहे की, अपघाती घटनेच्या वेळी ट्रॅक्टर तक्रारकर्ता स्वतः चालविता होता आणि ट्रॅक्टरचे इंजिनवर बाजूला मजूर नामे मधुकर रामचंद्र उरकुडे आणि प्रविण भानुदास फेंडर असे टॅक्टरने जात असताना अन्य ट्रक क्रं-CG-04/J-6214 चे चालकाने सदर ट्रक अतिशयक वेगाने निष्काळजीपणाने चालविल्याने विमाकृत ट्रक्टरला धडक दिल्याचे नमुद केलेले आहे.
12. पान क्रं 40 वर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27.07.2014 रोजी दिलेल्या पत्राची प्रत दाखल आहे त्यामध्ये असे नमुद आहे की, तक्रारकर्ता हा विमाकृत ट्रॅक्टर व ट्राली क्रं-एम.एच.-36/9736 मध्ये घराचे धानाचे पोते व लाकडी सेंट्रीग (पाटया) वाहून नेत असताना अन्य ट्रक क्रं- CG-04/J-6214 चे चालकाने सदर ट्रक अतिशयक वेगाने चालवून विमाकृत ट्रक्टरला धडक दिल्याचे तसेच अपघाताचे वेळी त्याचे सोबत दोन मजूर नामे मधुकर रामचंद्र उरकुडे व प्रविण भानुदास फेंडर हे ट्रॅक्टरला लावलेल्या ट्रालीमध्ये बसलेले होते, त्यापैकी श्री मधुकर रामचंद्र उरकुडे हा जागीच मरण पावल्याचे नमुद केले. पान क्रं 43 वर लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्री तर्फे विमाकृत क्षतीग्रस्त ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी रुपये-5,10,307/- रकमेचे अंदाजपत्रक दाखल केलेले आहे.
13. विमाकृत ट्रॅक्टरचे अपघातामुळे तक्रारकर्ता पुढील कर्जाच्या किस्ती भरु शकला नसल्याने विमाकृत ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेने दिनांक-01.10.2013 रोजी आपल्या ताब्यात घेतल्याची बाब पान क्रं 49 वर दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाच्या किस्ती न भरल्या गेल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 बँकेनी दिनांक-17 जानेवारी,2014 रोजीचे पत्रामध्ये विमाकृत क्षतीग्रस्त जप्त केलेल्या ट्रॅक्टरची विक्री करुन आलेली रक्कम रुपये-35,000/- तक्रारकर्त्याचे कर्ज खात्यात समायोजित करुन तक्रारकर्त्याकडे थकबाकीची रक्कम रुपये-2,74,624/- दर्शविली, सदर पत्राची प्रत अभिलेखावर पान क्रं 52 वर दाखल आहे.
14. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा आक्षेप-
अपघाताची घटना घडल्या नंतर तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीमध्ये सादर केला असता विमा कंपनीने दिनांक-27 ऑगस्ट, 2013 रोजीचे पत्रान्वये विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाला असल्याने विमा दावा नामंजूर केला सदर नामंजूर पत्राची प्रत पान क्रं 46 वर दाखल असून त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद केलेले आहे- “As per policy Maximum Licensed Capacity including Driver, Cleaner is one” विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, विमा पॉलिसी प्रमाणे विमाकृत ट्रॅक्टर मध्ये चालकासह फक्त एक बसण्याची क्षमता होती , आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पान क्रं 156 व 157 वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली त्यामध्ये “Maximum Licensed Capacity Including Driver, Cleaner” असे नमुद केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमाकृत ट्रॅक्टरचे Goods Carriage Permit ची प्रत पान क्रं 158 वर दाखल केली. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे युक्तीवादा प्रमाणे विमाकृत ट्रॅक्टरचे नोंदणी प्रमाणपत्र जे पान क्रं 31 वर दाखल केलेले आहे, त्यामध्ये अक्रं 20 मध्ये Seating Capacity (Including Driver) One असे नमुद केलेले आहे.
विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे भाऊ श्री गंगाधर राघोर्ते यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीपुढे दिनांक-17.07.2013 रोजी दिलेल्या बयानाची प्रत पान क्रं 163 वर दाखल केली, ज्यामध्ये असे नमुद आहे की, मी श्री पुरुषोत्तम हिरामनजी राघोर्ते माझा ट्रक्टर क्रं-MH-36/L-2596 (मंचा तर्फे असे नमुद करण्यात येते की, विमाकृत ट्रॅक्टरचा क्रं-MH-36/L-2596 असा नसून तो क्रं-MH-36/L-2592 असल्याचे नोंदणी प्रमाणपत्रात नमुद आहे) व ट्राली क्रं-MH-36/9736 मध्ये घराचे धानाचे पोते व लाकडी सेंट्रींग वाहून नेत असताना अन्य ट्रक क्रं- CG-04/J-6214 चे चालकाने ट्रक अतिवेगाने चालविल्याने विमाकृत ट्रॅक्टर व ट्रालीला जोरदार धडक दिली व माझया सोबत मधुकर रामचंद्र उरकुडे व प्रविण भानुदास फेंडर इंजिनच्या साईडच्या मडगार्डवर बसलेले होते त्यापैकी मधुकर रामचंद्र उरकुडे हा जागेवरच मरण पावला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे श्री गंगाधर राघोर्ते तक्रारकर्त्याचे भाऊ यांनी दिलेल्या बयानावर असे म्हणणे आहे की, अपघाती घटनेच्या वेळी विमाकृत ट्रॅक्टरमध्ये चालकासहित फक्त एकाची बसण्याची क्षमता असताना अन्य दोघे मजूर सर्वश्री मधुकर रामचंद्र उरकुडे व प्रविण भानुदास फेंडर हे मडगार्डवर बसलेले होते आणि त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे.
ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, सदरचे बयान हे तक्रारकर्त्याचे भाऊ श्री गंगाधर राघोर्ते यांनी दिलेले आहे व ते घटनेच्या वेळी तेथे उपस्थित नव्हते आणि ते विमाकृत ट्रॅक्टर सुध्दा चालवित नव्हते तर विमाकृत ट्रॅक्टर तक्रारकर्ता चालवित होता. तसेच पोलीस दस्तऐवज एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा यामध्ये तक्रारकर्ता स्वतः अपघाती घटनेच्या वेळी ट्रॅक्टर चालवित होता असे नमुद आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा असाही आक्षेप आहे की, अपघाती घटनेच्या वेळी तक्रारकर्ता ट्रॅक्टर चालवित होता आणि ट्रॅक्टरचे मडगार्डवर अन्य दोन मजूर सर्वश्री मधुकर रामचंद्र उरकुडे (जो अपघातात मृत्यू पावलेला आहे) आणि प्रविण भानुदास फेंडर हे मडगार्डवर बसलेले होते त्यामुळे विमा अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. कारण ट्रॅक्टरचे आर.सी.बुक आणि पॉलिसी प्रमाणे ट्रॅक्टर मध्ये बसण्याची क्षमता चालकासह फक्त एक आहे. या संदर्भात ग्राहक मंचाव्दारे पुढील दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले, जे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे PL OD Claim Note असून ते अभिलेखावर Page No. 48 & 49 दाखल असून त्यामध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की-Two laborer were present in the vehicle at the time of accident One laborer Mr. Madhukar Urkade expired in Accident, another labour Mr. Pravin Feder & Driver suffered Bl. IV Was driven by Mr. Purshottam H. Raghorte (Insured himself) & trolley was also attached bearing Reg.No.-MH-36 9732. यावरुन असे दिसून येते की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरला ट्रॉली लावलेली होती. ट्रॉली असताना मडगार्डवर बसण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तसेच अपघाताचे वेळी तक्रारकर्त्या सोबत मडगार्डवर अन्य दोन मजूर बसलेले होते ही बाब कोणीही पाहिलेली नाही वा या घटने बाबत कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye Witness) नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने जर वरील आक्षेप घेतलेला आहे तर त्या संबधी योग्य तो पुरावा दाखल करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची आहे परंतु त्या संबधाने त्यांनी कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा (Eye Witness) दाखल केलेला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे उपरोक्त नमुद आक्षेपा मध्ये ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही सबब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने घेतलेले आक्षेप फेटाळण्यात येतात.
15. तक्रारकर्त्याचे विमा दाव्याचे संदर्भात प्रस्तुत ग्राहक मंच खालील नमुद मा.सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे-
Petitioner-B.V.NAGARAJU -VERSUS- M/S ORIENTAL INSURANCE CO.LTED.DIVISIONAL OFFICE, HASSAN.-Date of Judgement-20/05/1996
CITATION -1996 AIR 205 1996 SCC (4) 647
सदर प्रकरणात वाहनचालका शिवाय वाहना मध्ये बसण्याची क्षमता 06 व्यक्तींची होती आणि अपघाताचे वेळी विमाकृत वाहनामध्ये एकूण 09 व्यक्ती बसलेले होते. मोटर वाहन कायदा 1988 चे तरतुदी प्रमाणे सदर वाहन हे मालवाहतुकीसाठीचे होते आणि विमा पॉलिसी प्रमाणे फक्त वाहनचालका शिवाय 06 व्यक्ती वाहून नेण्याची परवानगी होती परंतु अपघाताचे वेळी एकूण 09 व्यक्ती वाहनात बसलेले असल्यामुळे विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला होता. त्यावर मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी विमा दावा व्याजासह तसेच खर्चासह मंजूर केला होता. मा राज्य ग्राहक आयोगाचे निवाडया नंतर सदरचा मा.राज्य ग्राहक आयोगाचा निवाडा विमा पॉलिसीतील Exclusion Clause कडे लक्ष वेधून मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रद्द ठरविला होता. त्यावर मा.सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यात आले असता मा.सर्वोच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे मत नोंदवून तक्रारकर्ता विमाधारकाचा विमा दावा मंजूर केला होता-The National Commission went for the strict construction of the exclusion clause. The reasoning that the extra passengers being carried in the goods vehicle could not have contributed, in any manner, to the occurring of the accident, was barely noticed and rejected sans any plausible account, even when the claim confining the damages to the vehicle only was limited in nature. We , thus, are of the view that in accord with the Skandia’s case, the aforesaid exclusion term of the insurance policy must be read down so as to serve the main purpose of the policy that is indemnify the damage caused to the vehicle, which we hereby do. For the view above taken, this appeal is allowed, the judgment and order of the National Consumer Disputes Redressal Commission New Delhi is set aside and that of the State Commission is restored in its entirety, but without any order as to costs.
उपरोक्त नमुद मा.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आमचे हातातील प्रकरणात अंशतः लागू होतो याचे कारण असे आहे की, हातातील प्रकरणात सुध्दा माल वाहतुकीचा परवाना होता परंतु विमाकृत ट्रॅक्टरचे मडगार्डवर ड्रॉयव्हर शिवाय अन्य दोन मजूर बसलेले होते ही बाब पुराव्यानिशी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सिध्द केलेली नाही. क्षणभरासाठी असेही गृहीत धरले की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्हणण्या प्रमाणे अपघाताचे वेळी दोन मजूर ड्रॉयव्हर सोबत मडगार्डवर बसले होते तरी सुध्दा या सर्वांचे बसण्यामुळे अपघात झाला असे म्हणता येणार नाही कारण हातातील प्रकरणात पोलीस दस्तऐवजा मध्ये सुध्दा अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टरवर अन्य ट्रकचे चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे तो ट्रक विमाकृत ट्रॅक्टरवर आदळल्याने अपघात झाला असेच नमुद आहे.
16. विरुध्दपक्ष क्रं 2 कोटक महिन्द्रा बॅंक यांचे उत्तरा प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या उत्तरा प्रमाणे तक्रारकतर्याने बॅंके कडून रुपये-2,50,000/- रकमेचे कर्ज घेतले होते आणि ते समान हप्त्यांमध्ये दिनांक-10.07.2012 ते दिनांक-10.04.2016 या कालावधी मध्ये परतफेड करावयाचे होते. तक्रारकर्त्याने परतफेडीचे दोन हप्ते व्यवस्थितपणे भरलेत, त्यापैकी पहिला हप्ता रुपये-20,000/- बँकेला दिनांक-16.07.2012 रोजी प्राप्त झाला आणि दुसरा हप्ता रुपये-55,000/- दिनांक-11.01.2013 रोजी बँकेला प्राप्त झाला. त्यानंतर ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तक्रारकर्ता सतत थकबाकीदार झाला. या संदर्भात वि.प.क्रं 2 कोटक महिन्द्रा बॅंकेनी तक्रारकर्त्याला दिलेले दिनांक-17 जानेवारी, 2014 रोजीचे पत्र पान क्रं 52 वर दाखल आहे त्यात त्यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त ट्रॅक्टर त्यांनी विक्री केलेला असून त्यामधून त्यांना रुपये-35,000/- प्राप्त झालेले असून त्याची रक्क्म तक्रारकर्त्याचे कर्ज खात्यात समायोजित केलेली असून तक्रारकर्त्या कडून त्यांना अद्दापही रुपये-2,74,624/- एवढी रक्कम घेणे आहे. या संदर्भात ग्राहक मंचातर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात नमुद तक्रारकर्त्याकडून कर्जापोटी घेणे असलेली रक्कम रुपये-2,74,624/- तक्रारकर्त्याकडून कोणतेतही अतिरिक्त व्याज न आकारता स्विकारावी व त्यांचे कर्ज खाते बंद करावे. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्याचे कर्ज खाते बंद झाल्याबाबतचे NO DUE CERTIFICATE (ना-देय प्रमाणपत्र) द्यावे.
17. विमाकृत ट्रॅक्टरचे नुकसानी बाबत विमा राशी निश्चीत करण्या बाबत-
विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे विमाकृत ट्रॅक्टरचे नुकसानी बाबत सर्व्हेअर श्री सरबजीतसिंग तुली यांची नियुक्ती केली होती, त्यांचा सर्व्हे अहवाल पान क्रं 63 ते 66 वर दाखल आहे, त्यानुसार विमाकृत ट्रॅक्टरची आय.डी.व्ही. रुपये-4,27,500/- एवढी असून त्यांनी नुकसानीचे निर्धारण खालील प्रमाणे केलेले आहे-
Insurer’s Liability-
Total Amount | 4,52,943.15 |
Add Towing Charges | 1500.00 |
Less Voluntary Excess | 38443 |
Loess Compulsory Excess | 1000.00 |
Net Liability | 4,15,000/- |
. Final Tata AIG Liability-4,15,000/ ग्राहक मंचाचे मते विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांचे अंतिम अहवाला प्रमाणे तक्रारकर्ता हा विमाकृत ट्रॅक्टरचे नुकसानी बाबत रुपये-4,15,000/- एवढी रक्कम मंजूर करणे न्यायोचित आहे आणि सदर रकमेवर विमा क्लेम नाकारल्याचा दिनांक-27 ऑगस्ट, 2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कोणत्याही सक्षम पुराव्या शिवाय तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असल्याने त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
18. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंचा व्दारे खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्यवस्थापक, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत ट्रॅक्टरचे नुकसान भरपाई संबधात सवर्हेअर यांचे अहवाला प्रमाणे विमा रक्कम रुपये-4,15,000/- (अक्षरी रुपये चार लक्ष पंधरा हजार फक्त) द्दावेत आणि सदर रकमेवर विमा दावा नामंजूर केल्याचा दिनांक-27 ऑगस्ट, 2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याज द्दावे.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(2) कोटक महिन्द्रा बॅंक लिमिटेड, मुंबई यांनी तक्रारकर्त्याकडून कर्जापोटी घेणे असलेली रक्कम रुपये-2,74,624/- तक्रारकर्त्याकडून कोणतेही अतिरिक्त व्याज न आकारता स्विकारावी व त्यांचे कर्ज खाते बंद करावे. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्याचे कर्ज खाते बंद झाल्याबाबतचे NO DUE CERTIFICATE (ना-देय प्रमाणपत्र) द्यावे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष -(2) कोटक महिन्द्रा बॅंक लिमिटेड, मुंबई यांचेकडे रुपये-2,74,624/- विरुध्द पक्ष क्रं. 1 विमा कंपनी यांचेकडून विमित रक्कम प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाचे आत जमा करावी.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील अ.क्रं -(02) मध्ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.