Final Order / Judgement | निकालपत्र (पारित दिनांक 30 जानेवारी 2017) (मा. श्रीमती स्मिता एन. चांदेकर यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, तक्रारकर्तीचे पती मयत रमेश आत्मारामजी वांदिले हे शेतकरी होते व त्याच्या नांवे मौजा जंगलापूर, ता. सेलू, जि.वर्धा येथे भूमापन क्रं.9 अंतर्गत शेतजमीन आहे.
- शासनाने राज्यातील 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतक-यांकरिता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्द पक्ष 1 कडे दि. 1 नोव्हेबंर 2013 ते 31 ऑक्टोंबर 2014 या कालावधीकरिता विमा उतरविला व विरुध्द पक्ष 1 ने सदर योजनेप्रमाणे शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याचे लाभार्थ्यांना रुपये 1 लाख देण्याची हमी घेतली होती.
- तक्रारकर्तीने पुढे असे कथन केले आहे की, तिचे पती रमेश आत्माराम वांदिले हे दि. 19.07.2014 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान श्री. अनिल गोपाळराव लोनकर याच्या मोटरसायकलवर मागे बसून धपकी ते कोटंबा रोडने जात असतांना पावसामुळे अचानक त्यांची गाडी स्लीप झाल्यामुळे चालत्या मोटर सायकलवरुन खाली पडल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्यामुळे त्यांना सरकारी दवाखाना सेलू येथे उपचारार्थ नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशाप्रकारे तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झालेला आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे तक्रारकर्ती ही मृतकाची विधवा पत्नी म्हणून अपघात विम्याचा लाभ मिळण्यास पात्र आहे असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व कागदपत्रासह सदर योजने अंतर्गत विमाचा लाभ मिळण्याकरिता विमा प्रस्ताव विरुध्द पक्ष 2 कडे दि. 18.10.2014 रोजी दाखल केला. सदर प्रस्ताव विरुध्द पक्ष 2 यांचे कार्यालया तर्फे दि. 20.10.2014 रोजी विरुध्द पक्ष 4 मार्फत विरुध्द पक्ष 1 कडे पाठवून विमा दाव्याच्या रक्कमेची मागणी केली.
- तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं. 2 कार्यालयातर्फे दि.19.11.2014 व दि.18.12.2014 रोजी त्रृटींची पूर्तता करण्यात आलेली असून देखील विरुध्द पक्ष 1 विमा कंपनी द्वारे दि. 24.12.2014 रोजी त.क.चा विमा प्रस्ताव बेकायदेशीरपणे नाकारण्यात आल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करुन शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम रुपये 1,00,000/- 18 टक्के दराने व्याजासह, तिला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5000/-रुपये मिळण्याची विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 13 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 ने आपल्या विशेष कथनात असे नमूद केले आहे की, शेतकरी विमा योजना त्रिपक्षीय करार मधील अट क्रं. II नुसार दि. 01.11.2013 रोजी ज्या शेतक-यांचे नांव शेतीच्या 7/12 मध्ये समाविष्ट आहे फक्त त्या शेतक-यालाच सदर विमा योजनाचा फायदा घेता येतो, त्या व्यतिरिक्त इतर व्यक्तिंना सदर विमा योजनाचा फायदा घेता येत नाही. विरुध्द पक्ष 1 ने पुढे असे नमूद केले की, त्यांनी शासन योजनेनुसार दि.01.11.2013 रोजी विमा उतरविला व सदर विम्याच्या अटी व शर्तीनुसार दि.01.11.2013 रोजी ज्या शेतक-यांचे नांव 7/12 च्या उता-यात समाविष्ट होते, त्या शेतक-यांचा विमा वि.प. 1 ने उतरविला होता. परंतु मयत रमेश आत्माराम वांदिले याचे नांव दि.01.11.2013 रोजी कुठल्याही प्रकारचे शेतजमीनचे 7/12 च्या उता-यात समाविष्ट नव्हते. उलट मयत रमेश वांदिले याचे नांव मौजा जंगलापुर, तह. सेलू, जि. वर्धा येथील भूमापन क्रं. 9 च्या 7/12 च्या उता-यात त्याचे मृत्युनंतर दि.16.08.2014 रोजी फेरफार क्रं. 481 नुसार चढविण्यात आले. त.क. ने मयत रमेश वांदिले यांच्या जीवंतकाळात मौजा.जंगलापूर, तह.सेलू,जि.वर्धा येथील भूमापन क्रं.9 वाहत होते किंवा सदर शेती पासून उत्पन्न घेत होते असे कुठलेही दस्ताऐवज दाखल केलेले नाही. तसेच वि.प. ने पुढे असे ही नमूद केले की, सदर तक्रारीमध्ये संबंधीत तलाठीने दि.16.08.2014 रोजी मयत आत्माराम वांदिले यांचे चिरंजीव मयत रमेश आत्माराम वांदिलेच्या मृत्युनंतर त्यांना नोटीस तामील करुन मयत रमेश आ. वांदिले यांचे नावाचा फेरफार घेतलेला आहे. तक्रारकर्तीचे पती मयत रमेश आ. वांदिले हे दि.01.11.2013 रोजी शेतकरी असल्याबाबतचा कुठल्याही प्रकारचा दस्ताऐवज मुख्यतः 7/12 उतारा, 6 क, 6 ड वर्तमान विरुध्द पक्षाकडे पुरविलेला नसल्याने मयत रमेश वांदिले शेतकरी या परिभाषेत मोडत नसल्याने तक्रारकर्तीची तक्रार अमान्य करण्यात आली. म्हणून सदर तक्रार अर्ज विरुध्द पक्ष 1 विरुध्द खारीज करावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 6 वर दाखल केला असून तक्रारकर्तीचे पती मयत रमेश आत्माराम वांदिले हयांचा दि. 19.07.2014 रोजी रस्ता अपघातात मृत्यु झाल्याचे मान्य केले असून तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रासह विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे दि. 16.10.2014 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करुन विरुध्द पक्ष क्रं. 2 मार्फत जा.क्र. 3411, दि. 20.10.2014 रोजी विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर विरुध्द पक्ष 3 यांनी जा.क्रं.8951, दिनांक 31.10.2014 रोजी विरुध्द पक्ष 1 यांनी विरुध्द पक्ष 4 कडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. वि.प. ने पुढे असे कथन केले की, तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव पाठविण्यास त्यांच्याकडून कुठलाही विलंब झालेला नसून सेवेत कुठलीही त्रृटी केलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर होण्यास वि.प. 2 व 3 जबाबदार नाही असे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
- विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 14 वर दाखल केला असून तक्रारकर्तीच्या पतीचा दि. 19.07.2014 रोजी अपघाती निधन झाले हे मान्य केले असून त्यात नमूद केले की, सदर कंपनी ही राज्य शासनाकडून कोणतेही विमा प्रिमियम स्विकारत नाही आणि ती शासनाला विनामूल्य मध्यस्थ सल्लागार म्हणून सेवा देत असल्यामुळे तक्रारकर्त्यांचा विमा दावा देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष 4 ची नाही असे म्हटले आहे. केवळ महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करते. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून आल्यावर विमा दावा अर्ज मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठविणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढेच काम आहे.
- विरुध्द पक्ष 4 ने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने शासनाद्वारे राबविण्यात येणा-या विमा योजने अंतर्गत मिळणा-या विमा रक्कमेकरिता अर्ज सादर कला होता व सदर अर्ज हा विरुध्द पक्ष 3 कडून विरुध्द पक्ष 4 ला प्राप्त झाला.सदर अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष 4 यांनी विरुध्द पक्ष 1 कडे त्वरित विचारार्थ पाठविली होती. विरुध्द पक्ष 4 यांनी त्यांच्यावरील जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष 4 यांना विनाकारण पक्षकार करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारकर्तीने तिच्या कथनाच्या पृष्ठयर्थ वर्णनयादी नि.क्रं. 2 नुसार एकूण 8 कागदपत्रे दाखल केली असून नि.क्रं. 15 सोबत दाखल वर्णनयादीनुसार एकूण 5 कागदपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीने नि.क्रं. 16 वर तक्रार अर्ज हेच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने तिचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 21 वर दाखल केला असून नि.क्रं. 22 वर लेखी युक्तिवाद हाच मौखिक युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली आहे. विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष 1 च्या वकिलाचा तोंडी तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. युक्तिवादाच्या वेळी इतर वि.प. गैरहजर.
- वरीलप्रमाणे तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय | 2 | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः होय | 3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर. |
-: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत , ः- तक्रारकर्तीचे पती मयत रमेश आत्माराम वांदिले यांचा दि. 19.07.2014 रोजी अपघाती मृत्यु झाला हे वादातीत नाही. तक्रारकर्तीने वर्णनयादी नि.क्रं. 2 नुसार एफ.आय.आर.ची प्रत, घटनास्थळ पंचनामा, व पोस्टमार्टम रिपोर्ट याची छायांकित प्रत दाखल केली आहे. त्यावरुन ही तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिने पतीच्या मृत्युनंतर विरुध्द पक्ष 2 ते 4 मार्फत विरुध्द पक्ष 1 यांना आवश्यक कागदपत्रे पुरवून विमा दाव्याच्या रक्कमेची मागणी केली. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रे पुरवून त्रृटीची पूर्तता देखील केली होती. परंतु विरुध्द पक्ष 1 विमा कंपनीने दि. 24.12.2014 रोजी बेकायदेशीरपणे विमा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे तक्रारकर्ती सदर विमा योजने अंतर्गत लाभार्थी या नात्याने विरुध्द पक्ष 1 कडून रुपये 1,00,000/- मिळण्यास हक्कदार आहे.
- या उलट विरुध्द पक्ष 1 ने असे कथन केले आहे की, विमा कराराच्या दिवशी मयत रमेश आत्माराम वांदिले यांच्या नांवे कुठल्याही प्रकारच्या शेतजमिनीच्या 7/12 वर नांव समाविष्ट नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव दि.24.12.2014 रोजी खारीज केला. विरुध्द पक्षाने पुढे असे ही नमूद केले की, ज्या दिवशी विरुध्द पक्षाकडे विमा पॉलिसी काढली होती, त्या दिवशी मयताचे नांव हे 7/12 वर नोंदविणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तिच्या नांवे 7/12 नोंदविलेले असेल अशाच व्यक्तिंना शेतकरी संबोधिले जाईल. म्हणून विरुध्द पक्ष 1 कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा मयतचे नांव 7/12 वर नसल्यामुळे विमा प्रस्ताव दि. 24.12.2014 रोजी खारीज केला आहे. अभिलेखावरील कागदपत्राचे अवलोकन केले असता नि.क्रं. 2(1) वर दाखल 7/12 मध्ये मयत रमेश आत्माराम वांदिले याच्या नांवे फेरफार क्रं. 481 नुसार वारस म्हणून दि.04.09.2014 रोजी चढविण्यात आल्याचे दिसून येते. नि.क्रं. 2(2) वर सदर फेरफार नोंदवहिची प्रत दाखल केली असून त्यामध्ये मयत रमेश आत्माराम वांदिले यांचे वडील आत्माराम दमडू वांदिले हे दि. 08.03.2000 रोजी मृत पावल्यामुळे त्यांचे वारसांचे नांवे नोंदविल्याचे नमूद केलेले आहे. म्हणजेच मयत रमेश आत्माराम वांदलिे हे वारसा हक्काने दि. 08.03.2000 पासून त्यांचे वडिल मृत्यु पावल्यावर वारस म्हणून त्यांच्या शेतजमीनीचा हक्कदार झालेला होता. सदर बाबीची नोंद मात्र संबंधित व्यक्तिंना दि. 16.08.2014 रोजी नोटीस तामिल करुन दि. 04.09.2014 रोजी घेण्यात आलेल्या फेरफार पत्राकावरुन दिसून येते.
- विरुध्द पक्षाने आपल्या लेखी उत्तरात पुढे असे ही नमूद केले की, मयत रमेश आत्माराम वांदिले हे मृत्यु पावल्याचे सदर फेरफार बाबीची नोंद घेण्याकरिता त्यांच्यावर नोटीस तामिल करण्यात आली व त्यानंतर मृतकाच्या नांवे 7/12 वर नोंद घेण्यात आली. कागदपत्रावर सदरची नोंद ही मृतक रमेश वांदिले हयाच्या मृत्युनंतर जरी घेण्यात आली असली तरी ही मयताचे वडिलाच्या मृत्युनंतर म्हणजेच दि. 08.03.2000 पासूनच वारसा हक्काने मौजा नं. 9 या शेतजमीनीचा मयताला अधिकार प्राप्त झाला होता. त्यामुळे केवळ तांत्रिक दृष्टीने मयताचे नांव विमा पॉलिसी काढली त्या दिवशी 7/12 वर नांव नोंदविल्या गेले नसल्यामुळे तक्रारकर्ती विमा दाव्याची रक्कम मिळण्यास लाभार्थी होऊ शकत नाही हे विरुध्द पक्ष 1 चे म्हणणे तथ्यहिन आहे. त्यामुळे सदर कारणावरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करणे ही विरुध्द पक्ष 1 यांच्या सेवेतील त्रृटी आहे.
- त.क.ने त्याच्या तक्रारीचा पृष्ठयर्थ मा. राज्य आयोगाने REVISION PETITION NO. 1664 OF 2011, RELIANCE GENERAL INSURANCE CO. LTD. VS. SAKORBAA HETUBHA JADEJA & ORS मध्ये न्यायनिवाडयाची प्रत दाखल केली असून त्यातील तथ्य हे हातातील प्रकरणाशी तंतोतंत जुळते. त्यामुळे वि.प. 1 कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा ज्या कारणावरुन नाकारला तो असमर्थनीय आहे. म्हणून तक्रारकर्ती ही मयत रमेश आत्माराम वांदिले याची विधवा पत्नी या नात्याने लाभार्थी म्हणून विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून व्याज विरुध्द पक्ष 1 विमा कंपनीकडून मिळण्यास हक्कदार आहे या निष्कर्षा प्रत मंच येते.
- शारीरिक मानसिक त्रासाबद्दल विचार करावयाचा झाल्यास वि.प. 1 ने चुकिच्या कारणावरुन त.क.चा विमा दावा नाकारला त्यामुळे त.क.ला मंचासमोर यावे लागले. यात निश्चितच तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्याचे स्वरुप पाहता या सदराखाली रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 3000/-रुपये मंजूर करणे मंचाला योग्य वाटते. व्याजाबद्दल विचार करावयाचा झाल्यास विरुध्द पक्ष 1 कंपनीने कुठल्याही संयुक्तिक कारणा शिवाय तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्ती ही तक्रार दाखल तारखेपासून सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास हकदार आहे.
- विरुध्द पक्ष क्रं.2,3 व 4 यांच्याकडे तक्रारकर्तीचा प्रस्ताव मिळाल्याबरोबर त्यांनी विरुध्द पक्ष 1 कंपनीकडे पाठविला आहे. त्यामुळे वि.प.2 3 व 4 यांच्याकडून सेवेत कुठलीही त्रृटीपूर्ण व्यवहार झाला नाही. म्हणून वि.प. 2 3 व 4 यांना विमा दाव्याची रक्कम तक्रारकर्तीला देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 विरुध्द पक्ष क्रं. 1 न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारकर्तीला तिचे पती मृतक रमेश आत्माराम वांदिले यांच्या मृत्युबाबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी. 3 विरुध्द पक्ष क्रं.1 ने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत. 4 विरुध्द पक्ष क्रं. 2, 3 व 4 यांना रक्कम देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत वि.प.क्रं. 1 ने करावी. 5 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |