तक्रार क्र. CC/ 15/ 17 दाखल दि. 06.10.2015
आदेश दि. 12.05.2016
तक्रारकर्ता :- 1. श्रीमती आशा गुणवंत कोचे
वय – 46 वर्षे, धंदा – घरकाम
रा. अडयाळ, ता.पवनी जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स
कंपनी लिमीटेड, तर्फे
डिव्हीजनल मॅनेजर,
ए 501, पाचवा माळा, इमारत क्र.4
इर्न्फीनिटी पार्क, दिंडोशी, मालाड (पुर्व)
मुंबई – 400097
2. मे.जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लिमी. तर्फे मॅनेजर,
दुसरा मजला, जायका बिल्डींग
कमर्शियल रोड, सिवील लाईन्स,
नागपुर
3. तालुका कृषी अधिकारी,
पवनी ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.उदय क्षिरसागर.
वि.प.1 व 2 तर्फे अॅड.सुचिता डेहाडराय.
वि.प.3 तर्फे अॅड.तालुका कृषी अधिकारी
(आदेश पारित द्वारा मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 12 मे 2016)
1. तक्रारकर्तीचे पती गुणवंत शिवाजी कोचे यांच्या अपघाताची विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्द पक्षांनी न दिल्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
तक्रारकर्तीचे पती मौजा अडयाळ ता.पवनी जि.भंडारा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन भुमापन क्र.1140 असून ते व्यवसायाने शेतकरी होती.
तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 12/09/2014 रोजी जनावरांना धुण्यासाठी विहीरीवर गेले असता विहीरीत पाय घसरुन बुडून झाला.
तक्रारकर्ती ही मृतकाची पत्नी असल्यामुळे त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत दिनांक 13/11/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे रितसर अर्ज केला.
परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 5/2/2015 नुसार वरील अपघात विमा योजना दिनांक 1/11/2013 ला कार्यान्वित झालेली आहे आणि वरील अपघात विमा योजनेच्या अटीनुसार ही योजना 1/11/2013 ला कार्यान्वित झाली तेव्हा श्री गुणवंत शिवाजी कोचे हे शेतकरी नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर केला. त्यामुळे सदरहू प्रकरणात विमा दाव्याची रक्कम तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी मंचासमोर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ठर्थ्य एकुण दस्तऐवज यादीप्रमाणे -1 ते 11 दस्तऐवज दाखल केले आहेत. ते पान क्र. 13 ते 45 वर दाखल आहेत. टाटा ए.आय.जी जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबईचे ने विमा दावा नामंजुर केल्याबद्दलचे पत्र पान क्र.13 वर दाखल केले आहे. शेतकरी जनता अपघात विमा क्लेम फॉर्म भाग 1,2 व 3 पान क्र.14 ते 16 वर दाखल केले आहे. 7/12 उतारा पान क्र.20 वर, अकस्मात मृत्यु सुचना पान क्र.28 वर, मरणान्वेष प्रतिवृत्त पान क्र.30 वर, घटनास्थळ पंचनामा पान क्र.32 वर, तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट पान क्र. 36 वर दाखल केले आहे.
3. तक्रारकर्तीची तक्रार मंचात दाखल होवून विरुध्द पक्षास दिनांक 07/5/2015 ला नोटीस पाठविण्यात आली.
4. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांचे लेखी उत्तर दिनांक 08/7/2015 रोजी दाखल केले आहे. ते पान क्र.59 वर दाखल केलेले आहे.
5. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबामध्ये असे म्हटले आहे की ‘ As per the terms and condition of the policy and as per the eligibility criteria laid down in the scheme, the name of the deceased Shri Gunwanta Shivaji Koche was not recorded in the extract of 7/12 on or before 1/11/2013 i.e. at the time of commencement of policy and so the deceased was not eligible farmer for the benefits arising out of the policy and so the claim of the applicants was rejected by the opposite party and thus the application is without any cause of action and on this count the application is liable to be dismissed and it be dismissed with cost.
6. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी जबाबामध्ये म्हटले आहे की विरुध्द पक्ष क्र.2 हे विमा सल्लागार आहेत. तसेच सदर दावा विरुध्द पक्ष क्र.3 कडून विरुध्द पक्ष क्र.2 यांना प्राप्त झाला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सदर दाव्यासोबत जोडलेले कागदपत्र आवश्यक असल्याची शहानिशा करुन ते त्वरीत विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे पाठविले होते. विमा दावा मंजुर करणे हे फक्त विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या अखत्यारीत आहेत. म्हणून सदरची तक्रार विरुध्द पक्ष क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी.
7. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी उत्तर दिनांक 16/06/2015 रोजी दाखल केले ते पान क्र. 53 वर दाखल आहे.
8. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी जबाबामध्ये असे म्हटले आहे की दिनांक 13/11/2014 रोजी तक्रारकर्ती कडून प्राप्त झालेला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा प्रस्ताव पाहणी करुन दिनांक 14/11/2014 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे सादर करण्यात आला आणि सदर विमा योजनेचा प्रस्ताव दिनांक 17/11/2014 रोजी जायका इन्शुरन्स कंपनी, नागपुर येथे पाठविण्यात आला. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 यांचे सेवेतील कोणतीही त्रृटी नाही. सबब विरुध्द पक्ष क्र.3 विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, लेखी बयाण तसेच विरुध्द पक्षाचे लेखी उत्तरे, दस्तऐवज व दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
1) तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाती मृत्यु आहे काय? – होय
2) तक्रारकर्तीची तक्रार मंजुर होण्यास पात्र आहे का? - होय.
3) अंतीम आदेश काय – कारणमिमांसेनुसार
कारणमिमांसा
10. पोलीस अधिकारी अडयाळ यांनी C.R.P.C. Section 174 नुसार घटनास्थळ पंचनामा व पोस्टमार्टम रिर्पोट नुसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 12/9/2014 रोजी बोडीचे पाण्यात बुडून झाला. तक्रारकर्तीने दाखल केलेली पोलीस स्टेशनची कागदपत्रे यावरुन निश्चितच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाताने झालेला आहे हे म्हणणे स्पष्ट होते.
विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सुध्दा मान्य केले की गुणवंत शिवाजी कोचे यांचा अपघाती मृत्यु दिनांक 12/9/2014 रोजी झाला.
विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी व तोंडी युक्तीवादामध्ये म्हटले आहे की तक्रारकर्तीचा पती पॉलीसी सुरु व्हायच्या वेळेस शेतकरी नव्हता म्हणून विमा दावा नामंजुर केला आहे.
तक्रारकर्तीने लेखी व तोंडी युक्तीवादामध्ये म्हटले आहे की सदर शेतकरी जनता अपघात योजना ही नांवाने नसते व पॉलीसी काढायच्या वेळेस शेतक-यांची संख्या अंदाजाने घेतलेली आहे.
तक्रारकर्तीच्या पतीचे वडील शिवा तानबा कोचे यांचा मृत्यु दिनांक 27/4/2014 रोजी झाला. फेरफार दिनांक 26/8/2014 असलेली नोंदवही प्रमाणे शिवा तानबा यांचे पश्चात त्यांचे एकुण 7 वारसांपैकी एक वारस गुणवंत शिवाजी कोचे आहेत, हे सिध्द् होते.
राज्यात शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2013-14 मध्ये 1/11/2013 ते दिनांक 31/10/2014 या कालावधीकरीता चालु ठेवण्यास दिनांक 31/10/2013 च्या शासननिर्णयाप्रमाणे शासनाची मान्यता आहे. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने दिनांक 31/10/2013 च्या शासन निर्णयान्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे.
योजना कालावधीत संपुर्ण दिवसासाठी म्हणजेच विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी ही योजना लागु राहील. या कालावधीत शेतक-याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ही तो या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहील.
तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 12/9/2014 रोजी झाला. म्हणजेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 1/11/2013 ते 31/10/2014 या कालावधीत अपघाती झाला आहे हे सिध्द् होते. जमिनीची फेरफार दिनांक 10/9/2014 ला झाली या वरुन स्पष्ट होते की मृतक शेतकरी होता, हे सिध्द् होते.
त्यामुळे खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर.
-
- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी जनता व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/-(एक लाख) तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच दिनांक 06/10/2015 पासुन ते तक्रारकर्त्यांच्या हातात पडेपर्यंत 9% व्याजासह दयावी.
- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान रुपये 5,000/-(पाच हजार) दयावे.
- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-(पाच हजार) दयावेत.
- विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आदेशाची अंमलबजावणी प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
- प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.