DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/20/2023 | ( Date of Filing : 11 Jan 2023 ) |
| | 1. SHRI. PRADIP NIRPATSINGH BAGHEL | R/O. PLOT NO.127, GALLI NO.3, NEAR SHITLA MATA MANDIR, CHANDMARI NAGAR, WATHODA LAYOUT, BHANDEWADI, PARDI, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER/ AUTHORISED SIGNATORY | BRANCH AT, 2ND FLOOR, PLOT NO.9, VISION, TRAFIC PARK, SBI ATM, DHARAMPETH, NAGPUR- 440010 ALSO OFF.AT, 15TH FLOOR, TOWER-A, PENINSULA, BUSINESS PARK, GANPATRAO KADAM MARG, LOWER PAREL, MUMBAI-400013 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER | |
|
PRESENT: | ADV. CHANDRABHAN D. BOKDE, Advocate for the Complainant 1 | | |
Dated : 21 Dec 2023 |
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्याने स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता जानेवारी 2019 मध्ये येस बॅंकेकडून कर्ज घेऊन ट्रक क्रं. MH-40, BL-1541 हा रुपये 31,36,912/- मध्ये विकत घेतला होता व सदरच्या ट्रकचा विरुध्द पक्षाकडून दि. 14.01.2021 ते 13.01.2022 या कालावधीकरिता विमा उतरविला होता.
- दि. 07.07.2021 रोजी रात्रीच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने ट्रक ड्रायव्हरने रस्त्याच्या बाजुला ट्रक उभा करुन व लॉक करुन मित्राच्या घरी निघून गेला. त्यानंतर दि. 08.07.2021 रोजी तक्रारकर्ता व ड्रायव्हर ज्या ठिकाणी वाहन उभे केले होते, त्या ठिकाणी पाहणीकरिता गेले असता वाहन जागेवर आढळून आले नाही. याकरिता ट्रक चोरीबाबत पोलिस स्टेशन येथे सुचना देण्याकरिता गेले असता पोलिसांनी 2-3 दिवस शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 10.07.2021 रोजी वाहन चोरी बाबत लेखी सुचना दिली होती आणि पोलिसांनी दि. 29.07.2021 रोजी एफ.आय.आर. नोंदविला होता. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीला दि. 12.07.2021 रोजी सुचना दिली असता विरुध्द पक्षाने क्लेम नं. 7210859460A असा दिला. विरुध्द पक्षाने मागणी केल्यानुसार अ-समरी रिपोर्ट सादर केला व सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील केली. तक्रारकर्त्याचे वाहन हे विमा कालावधीमध्ये चोरीला गेले असतांना सुध्दा तक्रारकर्त्याने वाहन चोरीला गेल्याची सूचना 4 दिवस विलंबाने कळविल्याच्या कारणावरुन दि. 07.11.2022 रोजी नाकारला, ही बाब सेवेतील कमतरता आहे. तक्रारकर्त्याने सदरचा ट्रक विकत घेण्याकरिता येस बॅंकेचे कर्ज घेतले असल्यामुळे त्याला दरमहा रुपये 67,352/- इतक्या रक्कमेचा हप्ता भरावा लागतो. विरुध्द पक्षाने विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. करिता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल करुन वाहनाचे विमा मुल्य रक्कम 28,10,000/- व्याजासह मिळण्याकरिता व शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्यानंतर सुध्दा विरुध्द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा दि. 30.05.2023 रोजी आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय.
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे विमा हप्ता अदा करुन ट्रक क्रं. MH-40, BL-1541 या वाहनाचे दि. 14.01.2021 ते 13.01.2022 या कालावधीकरिता पॉलिसी काढली असून वाहनाची विमामुल्य किंमत रुपये 28,10,000/- असल्याची बाब नि.क्रं. 2(1) वर दाखल पॉलिसीवरुन दिसून येते यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला गेल्यानंतर तक्रारकर्त्याने सुरुवातीला गाडीचा शोध घेतला व त्यानंतर पोलीस स्टेशनला दि. 10.07.2021 रोजी लेखी सुचना दिली असल्याची बाब नि.क्रं. 2 (4) वर दाखल पत्रावरुन स्पष्ट होते. तसेच पोलिस स्टेशनला एफ.आय.आर. नोंदविली असल्याची बाब व चोरीला गेलेले वाहन मिळून न आल्याबाबतचा पोलिसांचा समरी रिपोर्ट नि.क्रं. 2 (8) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते.
- तक्रारकर्त्याचे वाहन विमा पॉलिसी कालावधीमध्ये चोरीला गेले होते व विमा दावा मिळण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता विरुध्द पक्षाकडे केल्यानंतर देखील विरुध्द पक्षाने फिर्याद उशिरा दिली व विमा कंपनीस वाहन चोरीबाबतची सुचना देण्यास विलंब केला या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला आहे , मा. सर्वोच्च न्यायालयाने ओम प्रकाश विरुध्द रिलायन्स जनरल इन्श्युरन्स आणि इतर Civil Appeal No. 15611/2017 या प्रकरणातील न्यायनिवाडयानुसार फिर्याद देण्यास अथवा विमा कंपनीस सुचना देण्यास विलंब झाला या कारणास्तव विमा कंपनीला विमा दावा नाकारता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश दिलेले असतांना देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन सेवा देण्यात कमतरता केली आहे असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
- मुद्दा क्रमांक 3 बाबत - मुद्दा क्रमांक 1 व 2 वरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब स्पष्ट होते. नि.क्रं. 2(1) वर दाखल पॉलिसी मधील विमामुल्य रक्कम रुपये 28,10,000/- ची तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून मागणी केली आहे. सदरच्या वाहनाची विमामुल्य रक्कम विचारात घेता तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून वाहन विमामुल्य रक्कम रुपये 28,10,000/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख 07.11.2022 पासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. यास्तव मुद्दा क्रं. 3 चा निष्कर्षा पोटी आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या ट्रक क्रं. MH-40, BL-1541 या वाहनाची विमामुल्य किंमत रुपये 28,10,000/- व त्यावर विमा दावा नाकारल्याच्या दि. 07.11.2022 पासून ते प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावा.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. B.B. CHAUDHARI] | MEMBER
| | |