- निकाल पञ -
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्रीमती रोझा फु. खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 28 ऑक्टोंबर 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हिचा पती श्री कोलु बिरसु मन्नो यांच्या मालकीची मौजा मक्केपाली, ता.चामोशी, जि. गडचिरोली येथे भुमापन क्र.108 ही शेतजमीन होती. शेतीतील उत्पन्नावर अर्जदार हिचा पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. अर्जदार हिच्या पतीचा दि.19.1.2014 रोजी शेतात राखण करण्यास गेले असता राञी विहीरीवर पाणी पिण्यास गेले असता पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी आहे. शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत अर्जदार महिलेच्या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्या वतीने उतरविला होता. अर्जदार ही मय्यत कोलु बिरसु मन्नो यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. अर्जदार हिने शेतकरी पतीचा अपघातात मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे दि.21.10.2014 रोजी रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांचे दस्तऐवजाची पुर्तता केली. गैरअर्जदार क्र.1 ने दि.12.3.2015 रोजी सदर दावा अल्कोहोलच्या अंमलाखाली असतांना मृत्यु होणे या विमा योजनेच्या समाविष्ठ नसणा-या बाबीत सदर अपघात झाल्याचे नमूद करुन सदर अर्जदाराचा दावा नामंजूर केला. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदार हिचा विमा दावा कोणतेही स्वतंञ शहानिशा न करता व विना पुरावा नामंजूर केल्याने अर्जदार हिची फसवणूक केली. गैरअर्जदारांच्या कृतीमुळे अर्जदार हिला अतिशय मानसिक ञास झाला.
2. अर्जदार हिचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार यांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.21.10.2014 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश द्यावे. तसेच गैरअर्जदारांनी मानसिक, शारिरीक, आर्थिक ञास, व तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई गैरअर्जदारांकडून अर्जदारास मिळण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
3. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 10 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.24 नुसार लेखीउत्तर, गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.19 नुसार लेखीउत्तर, व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.14 नुसार लेखीउत्तर व सोबत दस्ताऐवज दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.24 नुसार दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदार बाईचे मय्यत पती हे अपघाताचे वेळी दारु पिऊन होते म्हणून अर्जदार बाई शेतकरी अपघात विम्याचा लाभ घेण्यास पाञ नाही.
5. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.19 नुसार दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी आहे, तसेच गैरअर्जदार क्र.2 ही विमा सल्लागार आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत दावे हे गैरअर्जदार क्र.3 स्विकारतात. गैरअर्जदार क्र.2 मार्फत दाव्याचे सर्व कागदपञ हे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे सादर केले जातात, तसेच प्रत्येक दाव्याची शहानिशा करुन मंजुर अथवा नामंजुर करणे हे गैरअर्जदार क्र.1 च्या अखत्यारीत असते, यामध्ये गैरअर्जदार क्र.2 चा काही सहभाग नसतो. गैरअर्जदार क्र.2 हे फक्त विमा कंपनी, अर्जदार आणि शासन यांच्यातील एक मध्यस्थी म्हणून काम करतात. अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.3 कडून गैरअर्जदार क्र.2 यांना प्राप्त झाला होता, तसेच हा अर्ज व त्यासोबत जोडलेले कागदपञ गैरअर्जदार क्र.2 यांनी त्वरीत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे विचाराकरीता पाठविले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचेवरील जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा विमा दावा दि.12.3.2015 च्या पञाव्दारे नामंजुर केला आहे. विमा दाव्याचा क्लेम देणे हे फक्त गैरअर्जदार क्र.1 च्या अखत्यारीत असून त्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 चा संबंध नाही. अर्जदार हिने सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.2 चा काही दोष नसतांना प्रकरणात खेचले आहे म्हणून सदर तक्रार त्यांच्या विरुध्द खारीज करावी, अशी विनंती केली.
6. गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.14 नुसार दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदार हिचा पती श्री कोलु बिरसु मन्नो हे दि.19.1.2014 रोजी शेत शिवारातील बोडीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला, त्या संबंधाने अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 कडे दि.21.10.2014 रोजी विमा दाव्याबाबत रितसर अर्ज केला. या कार्यालयाचे पञ जा.क्र.ताकृअ/शेअवि/997/2014 दि.1.11.2014 अन्वये ञुटीची पुर्तता करणेकरीता अर्जदार हिला प्रस्ताव परत करण्यात आला. सदर क्लेम ञुटी पूर्ण करुन वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आले. या कार्यालायाचे पञ क्र.ताकृअ/आस्था/1050/2014 दि.15.11.2014 अन्वये मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडे व्दिप्रतीत सादर केला होता. त्याची प्रत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना देण्यात आलेली आहे. मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांनी पञ क्र.तां./शेअवि/3262/2014 दि.12.12.2014 अन्वये विमा प्रस्तावात ञुटी असल्याने पुर्ततेकरीता प्रस्ताव कार्यालयास परत केला होता. सदर ञुटीची पुर्तता करुन प्रस्ताव मा.जि.अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली कार्यालयास पाठविण्यात आला. सदर प्रकरणाबाबत या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दिरगांई झालेली नाही. गैरअर्जदार क्र.3 तालुका कषि अधिकारी चामोर्शी यांची काहीही चुक नसल्याने दोषमुक्त करावे, अशी विनंती केली.
7. अर्जदाराने शपथपञ, दस्ताऐवज व लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने पुरसीस, दस्ताऐवज व लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना संधी देवूनही शपथपञ व लेखी युक्तीवाद दाखल केले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द शपथपञ व लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचे आदेश नि.क्र.1 वर पारीत केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
- कारण मिमांसा –
8. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवज तसेच गैरअर्जदार पक्षाचे उत्तर व दस्ताऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदारास गैरअर्जदाराकडून विमा दाव्याच्या सेवेत न्युनता पूर्ण सेवा देण्यात आलेली आहे. कारण अर्जदाराने शासनातर्फे प्रायोजीत शेतकरी अपघात विम्याचा दावा तीचे पती अपघाती मृत्यु झाल्यामुळे दाखल केला असता, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचे नि.क्र.2 वरील दस्त क्र.1 नुसार गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारबाईचा विमा दावा नाकारलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचे मय्यत पतीचा अपघात मृत्यु झालेला आहे व अर्जदार बाई ही मय्यत पतीचे विमा दाव्याचे रक्कम मिळण्यासाठी पाञ आहे.
9. अर्जदार बाईने दाखल केलेले नि.क्र.2 वरील दस्त क्र.7 पोष्ट-मार्टम रिपोर्ट वरुन सिध्द होते की, मय्यत हा अपघाताचे वेळी दारुचे सेवन केलेला नव्हता. कारण त्याच्या पोटाच्या चाचणीचे निष्कर्षामध्ये डॉक्टरांनी असे नमूद केले आहे की, पोष्ट मार्टमचे वेळी त्याचे पोट रिकामे होते, तसेच निष्कर्षामध्ये डॉक्टरांनी असे म्हटले आहे की ‘’Chemical analysis of Viscera is not necessary’’ यावरुन हे सिध्द होते की, मय्यत अपघाताचे वेळी दारुच्या नशेत नव्हता व त्याचे अपघाती मृत्यु झालेला आहे.
10. तसेच, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर., तसेच घटनास्थळी असलेले पंचाचे अहवालावरुन कुठेही हे सिध्द होत नाही की, मय्यत हा दारुचे नशेत होता.
11. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्र.33 दस्त क्र.6 नुसार सरपंच यांचे तोंडी बयानात कुठेही सदर मय्यत ईसम हा दारुचा व्यसनी होता हे नमूद केलेले नाही, जेंव्हा की, सरपंचानी त्याला सदर बयानात चांगल्या प्रकारे ओळखतो असे नमूद केले आहे. तसेच दस्त क्र.7 ते 16 हे दस्त शपथपञावर नसल्यामुळे व गैरअर्जदार कंपनीच्या प्रतिनीधीव्दारे घेतले असल्यामुळे ते गृहीत धरण्यासारखे नाही.
12. अर्जदार बाईच्या पतीचा मृत्यु अपघातात झालेला आहे हे अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवजावरुन सिध्द होते व शासनाच्या परिपञकानुसार शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी आहे हे सिध्द होते. तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 ने वेळोवेळी अर्जदार बाई व विमा कंपनीमध्ये पञव्यवहार करुन सदर विमा दावा निकाली काढण्यासाठी अर्जदार बाईस व विमा कंपनीस मदत केलेली आहे व आपले कार्य व्यवस्थित पार पाडलेले आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी कुठलिही सेवेत न्युनता दिलेली नाही हे सिध्द होते.
13. एकंदरीत, वरील विवेचनावरुन अर्जदार बाईची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत असून या तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/10/2015