- निकाल पञ -
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्री सादीक मो. झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 28 ऑक्टोंबर 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हिचा पती श्री चित्त गणेश माझी यांच्या मालकीची मौजा पो.गौरीपूर, ता.चामोशी, जि. गडचिरोली येथे भुमापन क्र.21 ही शेतजमीन आहे. शेतीतील उत्पन्नावर अर्जदार हिचा पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. अर्जदार हिच्या पतीचा दि.11.7.2014 रोजी सायकल ने जात असता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन दि.7.8.2014 रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी आहे. शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत अर्जदार महिलेच्या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्या वतीने उतरविला होता. अर्जदार ही मय्यत चित्त गणेश माझी यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. अर्जदार हिने शेतकरी पतीचा अपघातात मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे दि.21.10.2014 रोजी रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांचे दस्तऐवजाची पुर्तता केली. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक दस्ताऐवज दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदार हिला एफ.आय.आर. व हॉस्पीटलचे उपचाराचे पेपर्स वारंवार मागीतले व अर्जदार हिने हॉस्पीटलचे प्रमाणपञ व पोलीस पाटील प्रमाणपञ दिले, परंतु गैरअर्जदाराने अर्जदार हिचा विमा दावा अद्याप मंजूर न केल्याने अर्जदार हिला तक्रार दाखल करावी लागली. गैरअर्जदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्यानेच करीत आहे व अर्जदार हिची फसवणूक केली. गैरअर्जदारांच्या कृतीमुळे अर्जदार हिला अतिशय मानसिक ञास झाला.
2. अर्जदार हिचा तक्रार अर्ज मंजूर व्हावा. गैरअर्जदार यांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.21.10.2014 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश द्यावे. तसेच गैरअर्जदारांनी मानसिक, शारिरीक, आर्थिक ञास, व तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई गैरअर्जदारांकडून अर्जदारास मिळण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
3. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 17 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.24 नुसार लेखीउत्तर, गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.19 नुसार लेखीउत्तर, व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.14 नुसार लेखीउत्तर व सोबत दस्ताऐवज दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.24 नुसार दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने आपल्या दस्ताऐवजा सोबत एफ.आय.आर.ची प्रत, हॉस्पीटलचे उपचाराचे पेपर्स व डिसचार्ज कार्ड दाखल केलेले नाही, तसेच अर्जदाराने मृतकाचे सर्व वारसदारां तर्फे विमा दाव्याची मागणी केलेली नाही म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने त्यांचा विमा क्लेमची मागणी प्रलंबीत ठेवली आहे.
5. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.19 नुसार दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी आहे, तसेच गैरअर्जदार क्र.2 ही विमा सल्लागार आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत दावे हे गैरअर्जदार क्र.3 स्विकारतात. गैरअर्जदार क्र.2 मार्फत दाव्याचे सर्व कागदपञ हे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे सादर केले जातात, तसेच प्रत्येक दाव्याची शहानिशा करुन मंजुर अथवा नामंजुर करणे हे गैरअर्जदार क्र.1 च्या अखत्यारीत असते, यामध्ये गैरअर्जदार क्र.2 चा काही सहभाग नसतो. गैरअर्जदार क्र.2 हे फक्त विमा कंपनी, अर्जदार आणि शासन यांच्यातील एक मध्यस्थी म्हणून काम करतात. अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.3 कडून गैरअर्जदार क्र.2 यांना प्राप्त झाला होता, तसेच हा अर्ज व त्यासोबत जोडलेले कागदपञ गैरअर्जदार क्र.2 यांनी त्वरीत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे विचाराकरीता पाठविले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचेवरील जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली. अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 कडे विचाराधीन आहे, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिला 13.3.2015 रोजी पञ पाठवून काही माहिती व कागदपञ मागीतले आहे. अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.1 यांनी मागितलेल्या माहिती व कागदपञांची पुर्तता केल्यावर त्याचा निर्णय घेतील. सदर तक्रार ही मुदतपूर्व आहे म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदार हिने सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.2 चा काही दोष नसतांना प्रकरणात ओढले आहे म्हणून सदर तक्रार त्यांच्या विरुध्द खारीज करावी, अशी विनंती केली.
6. गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.14 नुसार दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदार हिचा पती श्री चित्त गणेश माझी यांचा दि.7.8.2014 रोजी अपघाताने मृत्यु झाला, त्या संबंधाने अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 कडे दि.2.12.2014 रोजी विमा दाव्याबाबत रितसर अर्ज केला. या कार्यालयाचे पञ जा.क्र.ताकृअ/आस्था/1145/2014 दि.6.12.2014 अन्वये या कार्यालयाकडून मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडे व्दिप्रतीत सादर केला होता, त्याची प्रत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना देण्यात आली. मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांनी पञ दिनांक 15.12.2014 अन्वये विमा प्रस्तावात ञुटी असल्याने पुर्ततेकरीता प्रस्ताव कार्यालयास परत केला होता. या कार्यालयाचे पञ जा.क्र.ताकृअ/शेअवि/43/2014 दि.9.1.2015 अन्वये ञुटीची पुर्तता करण्याकरीता श्रीमती आलो चित्त माझी यांना प्रस्ताव परत केला. परंतु, तक्रारदारांनी अजुनही प्रस्तावाची पुर्तता करुन प्रस्ताव या कार्यालयास सादर केला नाही. त्यामुळे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर होऊ शकला नाही. सदर प्रकरणाबाबत या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दिरगांई झालेली नाही. गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषि अधिकारी चामोर्शी यांची काहीही चुक नसल्याने दोषमुक्त करावे, अशी विनंती केली.
7. अर्जदाराने शपथपञ, दस्ताऐवज व लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने पुरसीस, दस्ताऐवज व लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना संधी देवूनही शपथपञ व लेखी युक्तीवाद दाखल केले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द शपथपञ व लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचे आदेश नि.क्र.1 वर पारीत केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
- कारण मिमांसा –
8. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवज तसेच गैरअर्जदार पक्षाचे उत्तर व दस्ताऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदारास गैरअर्जदाराकडून विमा दाव्याच्या सेवेत न्युनता पूर्ण सेवा देण्यात आलेली आहे. कारण अर्जदाराने शासनातर्फे प्रायोजीत शेतकरी अपघात विम्याचा दावा तीचे पती अपघाती मृत्यु झाल्यामुळे दाखल केला असता, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचे नि.क्र.2 वरील दस्त क्र.1 नुसार मागणी केलेल्या कागदपञांची पुर्तता करुन सुध्दा गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारबाईचा विमा दावा निकाली काढलेला नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने मागीतलेले दस्ताऐवज एफ.आय.आर. व हॉस्पीटलचे पेपर्स व हॉस्पीटलचे डिसचार्ज कार्ड न दिल्याचे कारणाने विमा दावा प्रलंबीत ठेवलेला आहे. परंतु, विमा कंपनीने ज्या उपरोक्त कागदपञाची मागणी केलेली आहे त्या कागदपञाच्या ऐवजी अर्जदाराने दाखल केलेले कागदपञ नि.क्र.2 नुसार दस्त क्र.2, 3, 4, 5, 12, 13, व 14 या दस्ताऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज हे गैरअर्जदाराचे मागणीनुसार आहे. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचे मय्यत पतीचा अपघात मृत्यु झालेला आहे व अर्जदार बाई ही मय्यत पतीचे विमा दाव्याचे रक्कम मिळण्यासाठी पाञ आहे.
9. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे की, अर्जदार बाई मय्यताची एकलुती वारसान नाही हे गृहीत धरता येणार नाही, कारण गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराकडून दस्ताऐवज मागणी पञात कुठेही वारसान वादाबाबत नमूद केलेला नाही व तसे दस्ताऐवजाची मागणीही केलेली नाही, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीची तक्रार खारीज करण्याची मागणी या मुद्दावरुन गृहीत धरता येणार नाही.
10. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार :
II (2008) CPJ 371 (NC)
New India Insurance Co.Ltd. - Petitioner
Versus
State of Haryana & Ors. - Respondents
Consumer Protection Act, 1986 – Section 21(b) – Insurance – Scheme – Accidental death – Benefit under Government Scheme denied due to non-production of FIR and post-mortem report – Deceased treated in Government Medical College and Hospital – Documents in support produced on record – Insurer cannot discount and reject reports and statement of Government Hospital authorities, Gram Panchayat and other Government authorities, without evidence to contrary – Fraud, misrepresentation of material facts regarding death of insured not proved – Repudiation unjustified.
सदर प्रकरणात सुध्दा, जरी अर्जदाराने एफ.आय.आर. व पोष्टमार्टम रिपोर्ट विमा कंपनीला दिला नाही तरी त्या कारणास कोणताही ठोस पुरावा नसतांना अर्जदाराच्या विमा दाव्यावर कोणतीही दखल न घेणे ही गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते असे मंचाचे मत ठरले आहे.
11. अर्जदार बाईच्या पतीचा मृत्यु अपघातात झालेला आहे हे अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज पंचानामा रिपोर्ट, पोलीस पाटील प्रमाणपञ, हॉस्पीटलचे मृत्यु प्रमाणपञावरुन व दाखल दस्ताऐवजावरुन अर्जदार बाईचे पतीचा मृत्यु अपघातात झालेला आहे हे सिध्द होते व शासनाच्या परिपञकानुसार शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी आहे हे सिध्द होते. तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 ने वेळोवेळी अर्जदार बाई व विमा कंपनीमध्ये पञव्यवहार करुन सदर विमा दावा निकाली काढण्यासाठी अर्जदार बाईस व विमा कंपनीस मदत केलेली आहे व आपले कार्य व्यवस्थित पार पाडलेले आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी कुठलिही सेवेत न्युनता दिलेली नाही हे सिध्द होते.
12. एकंदरीत, वरील विवेचनावरुन अर्जदार बाईची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत असून या तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/10/2015