आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्तीचे पती दयालचंद हेतराम टेंभरे यांच्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई रू.1,00,000/- विरूध्द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 12 अन्वये सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती श्रीमती सुनिताबाई दयालचंद टेंभरे हिचे पती मृतक दयालचंद हेतराम टेंभरे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा डोंगरगांव, तालुका व जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 107 क्षेत्रफळ 0.74 हे.आर. या वर्णनाची शेतजमीन होती.
3. महाराष्ट्र शासनाने नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विरूध्द पक्ष टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विमा उतरविलेला होता व तक्रारकर्तीचे मृतक पती दयालचंद हेतराम टेंभरे हे शेतकरी असल्याचे सदर विमा योजनेचे लाभार्थी होते.
4. तक्रारकर्तीचे पती दयालचंद हेतराम टेंभरे यांचा दिनांक 14/12/2013 रोजी रेल्वे अपघाताने मृत्यू झाला. तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह विमा दावा प्रस्ताव दिनांक 09/10/2014 रोजी रितसर सादर केला. परंतु विरूध्द पक्षाने त्यांच्या दिनांक 19/02/2015 रोजीच्या पत्राद्वारे ‘मयत दयालचंद हेतराम टेंभरे याने दारूच्या नशेत स्वतःच रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे अशी विधाने मृतकाचे नातेवाईकांनी आणि साक्षीदारांनी दिलेली असून अकस्मात मृत्यू समरीत सुध्दा नमूद करण्यांत आलेले असल्यामुळे सदर विमा दावा दारूच्या नशेच्या अंमलाखाली असतांना मृत्यू होणे या संज्ञेमध्ये मोडत असल्याने व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे सदर दावा प्रकरण नामंजूर करण्यांत येत आहे’ असे कारण देऊन नामंजूर केला. विरूध्द पक्षाची सदरची कृती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारकर्तीने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- मृतकाचे मृत्यू दिनांकापासून म्हणजेच दिनांक 14/12/2013 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 24% व्याजासह मिळावी.
(2) विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याने नुकसानभरपाई रू.20,000/- मिळावी.
(3) शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.10,000/- मिळावी.
(4) तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळावा.
5. तक्रारकर्तीने तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्षाने दावा नामंजूर केल्याचे पत्र, शेतीचा 7/12 उतारा, गांव नमुना आठ-अ, मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, मृतकाचे आधार कार्ड इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
6. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी दिनांक 20/10/2016 रोजी त्यांचा लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, अकस्मात मृत्यू समरी बुकमध्ये मृतक दयालचंद हेतराम टेंभरे याने दारूच्या नशेत स्वतःच रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली असल्याबाबतची विधाने मृतकाचे नातेवाईकांनी आणि साक्षीदारांनी दिलेली आहेत. म्हणून शेतकरी जनता अपघात विमा योजना प्रपत्र ‘क’ विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नसणा-या बाबी (4) अनुसार अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात व मृतकाने स्वतः रेल्वेखाली उडी मारून केलेली आत्महत्या यामुळे विमा दावा नामंजूर करण्यांची विरूध्द पक्षाची कृती ही सेवेतील न्यूनता ठरत नाही. वरील कारणामुळे तक्रारकर्ती सदर योजनेअंतर्गत विमा लाभ मिळण्यास अपात्र आहे म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यांत यावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केली आहे.
7. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणांत तक्रारकर्तीने तिचे पती दयालचंद हेतराम टेंभरे यांच्या नांवाने मौजा डोंगरगांव, तालुका जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 107 क्षेत्रफळ 0.74 हे.आर. ही शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा दाखल केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मयत दयालचंद हेतराम टेंभरे हे शेतकरी होते व त्यांच्या मालकीची तक्रारीत नमूद शेतजमीन होती.
सदरहू प्रकरणात दाखल घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र या दस्तावेजांवरून मृतक दयालचंद हेतराम टेंभरे हे दिनांक 14/12/2013 रोजी रेल्वे अपघातात मरण पावले असून पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये As per my opinion probably cause of death is due to multiple injuries all over the body due to Railway accident असे नमूद आहे.
विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती सुचिता देहाडराय यांनी असा युक्तिवाद केला की, मृतकाने नशेच्या अंमलाखाली स्वतःच रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केलेली आहे असे अकस्मात मृत्यू समरी बुक मध्ये नमूद असून नशेच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात व आत्महत्या यांना शेतकरी जनता अपघात विम्याअंतर्गत विमा संरक्षणातून वगळण्यांत आले आहे.
त्यांनी आपल्या युक्तिवादाच्या पुष्ठ्यर्थ पॉलीसी शेड्यूल व शेतकरी जनता अपघात विमा योजना 2013-14 आणि विरूध्द पक्षासोबत झालेल्या कराराची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलीसी शेड्यूलच्या Part B: GENERAL EXCLUSIONS मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहेः-
Part B: GENERAL EXCLUSIONS
This entire Policy does not provide benefits for any loss resulting in whole or in part from, or expenses incurred, directly or indirectly in respect of;
1. …….
2. suicide, attempted suicide (whether sane or insane) or intentionally self-inflicted Injury or illness, or sexually transmitted conditions, mental or nervous disorder, anxiety, stress or depression, Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS), Human Immune-deficiency Virus (HIV) infection; or
3. ……..
4. being under the influence of drugs, alcohol, or other intoxicants or hallucinogens unless properly prescribed by a Physician and taken as prescribed; or
मृतकाचा मृत्यू मद्याच्या अंमलाखाली असतांना त्याने आत्महत्या केल्याने झाला असून अशा मृत्यूस विमा संरक्षण देण्यांत आले नसल्याने सदर विमा दावा नामंजूर करण्याची कृती सेवेतील न्यूनता ठरत नाही आणि म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यांत यावी.
तक्रारकर्तीचे अधिवक्ता सी. जे. गजभिये यांनी सदर प्रकरणात (1) श्री. प्रभुदयाल ब्रिजलाल ठाकरे, वय 37 व (2) श्री. चंदनलाल ईशोबा रिनायत वय 60 या दोन साक्षीदारांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यांनी शपथपत्रात शपथेवर सांगितले आहे की, मृतक दिनांक 14/12/2013 रोजी शेतीचे कामासाठी गोंदीया येथे गेला होता व रेल्वेने डोंगरगांवला परत येत असतांना अचानक रेल्वेतून पडला व मरण पावला. मृतकाचा मृत्यू हा रेल्वे अपघाताने झालेला आहे.
मृतकाचे पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण Multiple injuries all over the body due to railway accident असे नमूद आहे. तसेच मृतक दारूच्या नशेत होता याबाबत पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. पोलीसांनी मृतकाच्या नातेवाईकांचे व साक्षीदारांचे बयान नोंदविले. त्यापैकी कोणीही अपघात पाहिला नाही त्यामुळे त्यांचे बयान मृतकाने रेल्वेखाली आत्महत्या केली हे सिध्द करणारा पुरावा ठरू शकत नाही. तसेच असे कोणतेही बयान विरूध्द पक्षाने मंचासमोर दाखल केले नाही. यावरून तक्रारकर्तीचे पती दयालचंद हेतराम टेंभरे यांचा मृत्यू रेल्वे अपघाताने झाल्याचे स्पष्ट होते. म्हणून विरूध्द पक्षाने मृतकाने मद्याच्या अंमलाखाली आत्महत्या केल्याचे खोटे कारण देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरतो. वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
9. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 19/02/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून खालील आदेश पारित करण्यांत येत आहे.
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
1. विरूध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 19/02/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
2. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रू.10,000/- व या तक्रारीचा खर्च म्हणून रू.5,000/- असे एकूण रू.15,000/- तक्रारकर्तीस द्यावे.
3. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
5. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीस परत करावी.