ग्राहक तक्रार क्र. 106/2014
दाखल तारीख : 13/05/2014
निकाल तारीख : 04/07/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. दत्तात्रय निवृत्ती देशमूख,
वय - 40 वर्ष, धंदा – शेती,
रा.मुरुम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. टाटा ए.आय.जी.इन्शुरन्स कंपनी लि.
ढेल्फी बी.विंग, दुसरा मजला,
ऑरचॉर्ड अॅव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क,
शिवाजी चौक, पोवई, मुंबई-400076
2. इंडिया इन्फोलाईन इन्शुरन्स ब्रोकर्स लि.
75, निरलोन कॉम्प्लेक्स ऑफ डब्लू. ई.
हाईवे, गोरेगांव (पुर्व) मुंबई-40063. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जे.व्ही.भोसले
विरुध्द पक्षकार क्र. 1 तर्फे विधिज्ञ : श्री.एस.बी.शिंदे.
विरुध्द पक्षकार क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1. अर्जदार हे मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून ते शेतीचा व्यवसाय करतात. विप क्र.1 यांचेकडे तक यांनी दि.08/11/2010 रोजी टाटा ए.आय.जी.महालाईफ गोल्ड या प्रकारची पॉलिसी घेतली. अर्जदार यांनी दि.07/10/2010 रोजी पहिला हप्ता रु.9,892/- पोटी रु.10,000/- म्हणजेच 108 जास्त विप क्र.1 यांचे शिवाजी चौक उस्मानाबाद येथील ऑफीसमध्ये विप क्र. 2 यांचेकडे जमा केले. विप यांनी त्याची पावती दिली व त्या पॉलिसीचा क्र.सी243503089 दिली. त्यानंतर अर्जदार यांनी दि.20/11/2011 रोजी दुस-या हप्त्यापोटी रक्कम रु.9,950/- जे की, विप क्र. 2 यांनी विप क्र. 1 यांचे वतीने व त्याची छापील पावती क्र.0258527 विप क्र.2 यांनी दिली. दि.11/11/2011 ची हप्ते भरण्याची नोटीस पाठविली तसेच दि.26/03/2012 रोजी रु.10,000/- भरणा केले त्याची पावती क्र.0040230 मीळाली तसेच सर्व हप्ते नियमीत भरले असतांना दि.13/07/2012 रोजी विप क्र.1 यांनी पत्र पाठवून अर्जदाराने हप्ते न भरल्यामुळे पॉलिसी रद्द करण्यात आल्याचे कळविले. तसेच unutilized premium म्हणून रु.108/- दि.28/06/2012 रोजी अर्जदारास पाठविले. तसेच दि.13/07/2012 रोजी विप यांचेकडे चौकशीकरीता गेले असता विप क्र.1 यांनी शाखा बंद केली आहे असे कळाले. तसेच फोनवर संपर्क केला असता हप्त्यापोटी भरलेली रक्कम रु.30,000/- परत मिळणार नसल्याचे सांगितले. म्हणून तक यांनी विनंती करुन विधिज्ञांमार्फत दि.23/01/2014 व 31/01/2014 रोजी नोटीस पाठविली असता विप यांनी कसलेही उत्तर दिले नाही. म्हणून तक यांनी सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून अर्जदार यांना विप 1 व 2 यांनी संयुक्तिक व एकत्रितरित्या हप्त्यापोटी भरलेली रु.30,000/- त्यांचे व्याजासह, अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
2. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पॉलिसी अॅकनॉलेजमेंटची पावती, प्रिमीयम भरल्याच्या तीन पावत्या, पॉलिसी बाबतची माहीतीपत्रक, विप यांची पॉलिसी हप्ता भरण्याबाबतच्या दोन नोटीस, चेक सोबतचे पत्र, नोटीसची ऑफीस प्रत, नोटीस, विनंती पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) सदर तक्रारीसंदर्भात मंचाने विप क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविली असता त्यांनी अनेकदा संधी मिळूनही आपले म्हणणे दाखल न केल्याने विप क्र.1 यांचे विरुध्द नो से चे आदेश करण्यात आले व विप क्र.2 शेवटपर्यंत हजर न झाल्यामुळे त्यांच्य विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
क) तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. लेखी युक्तिवाद वाचला तोंडि युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 :
1. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत TATA AIG LIFE असे वर नमूद असलेली पॉलिसबाबतची कागदपत्रे तसेच हप्ते भरल्याच्या पावत्या ज्यात TATA AIG LIFE वर नमूद असलेली पावती क्र.1D1179180 दि.07/10/2010 रोजीची रु.10,000/-ची, दि.20/12/2011 रोजीची IIFL (विप क्र.2 चे नाव) वर नमूद असलेली पावती क्र.0258527, रु.9,950/- ची व दि.26/03/2012 रोजीची Indiainfoline वर नमूद असलेली पावती क्र.0040230 ची रु.10,000/- ची असे एकुण रु.20,950/- भरल्याच्या पावत्या सादर केल्या असून पैकी रु.108/- विप ने तक ला परत दिल्याचे केल्याचे विप च्या पत्रावरुन दिसुन येते. म्हणजेच एकूण रु.29,842/- तक ने विप कडे भरल्याचे वरील पावत्यांवरुन दिसते व या पावत्या विप क्र. 2 च्या शिवाजी चौक उस्मानाबाद येथील कार्यालयात भरल्याचे तक ने नमूद केल्याने तक व विप क्र.1 व 2 यांच्या दरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असल्याचे दिसून येते म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र.2 व 3 :
2. तक्रारदाराने सदर तक्रार ही विप यांनी तक यांची काढलेली पॉलिसीबाबत असून सदर पॉलिसीचे हप्ते तक यांनी नियमीत भरलेले असतांना विप यांनी तक यांना हप्ते भरण्याबाबत नोटीसा पाठविल्या होत्या. तसेच पॉलिसी बंद केल्याची नोटीस पाठवून आपली शाखा बंद करुन तक्रारदार यांना सेवा देण्याचे बंद केले व आपल्या भविष्यातील सेवा देण्याच्या कर्तव्यातून काढता पाय घेऊन सेवेत त्रुटी केली अशी तक्रार असून सदर तक्रारीबाबत विप यांना मा.मंचाने नोटीस पाठवली असता त्यांनी हजर होऊन वकीलपत्र दाखल केले तसेच कागदपत्रे दाखल करण्यास वेळ मागीतला असता मा. मंचाने तो अनेकदा देऊ केला मात्र विप क्र.1 यांना अनेकदा संधी मिळून देखील आपले म्हणणे दाखल न केल्याने मा. मंचाने त्यांच्या विरुध्द दि.17/10/2014 रोजी नो से चा आदेश पारीत केले व पुढे दि.31/01/2015 रोजी विप क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केले.
3. वरील तक्रारदाराची तक्रार व त्याने दाखल केलेली कागदपत्रावरुन तसेच वरील घटनाक्रमावरुन आम्हास असे वाटते की तक्रारदार यास विप यांनी पॉलिसीच्या महत्वाबाबत माहीती देऊन आपली पॉलिसी घेण्यास भाग पाडले केले असावे मात्र काही कारणाने विप क्र. 1 व 2 मधील व्यावसायीक संबंधामध्ये सातत्य व सुरळीतपणा राहीला नसावा व त्यांनी आपली सेवा देणे केले असावे म्हणून विप क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केल्याचे उघडच होत असल्याने व त्याअनुषंगाने विप यांच्याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्याइतपत पुरेसे पुरावे नसल्याने विप क्र.1 यांनी हजर होऊन मौन बाळगले. म्हणून आम्ही मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन पुढीलप्रमाणे आदेश पारीत करातो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिक व एकत्रितरित्या तक्रारदारास पॉलिसी हप्ता
भरलेले एकूण रक्कम रु. रु.29,842/- (रुपये एकोणतीस हजार आठशे बेचाळीस फक्त) 30
दिवसात द.सा.द.शे.9 व्याजासह दि.13/05/2015 रोजी पासून द्यावेत.
3) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिक व एकत्रितरित्या तक्रारदारास झालेल्या
मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..