जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 37/2012.
तक्रार दाखल दिनांक : 28/02/2012.
तक्रार आदेश दिनांक : 28/01/2014. निकाल कालावधी: 01 वर्षे 11 महिने 01 दिवस
सौ. जयश्री ज्ञानदेव यादव, वय 28 वर्षे,
रा. कदमवस्ती, घाटणे, पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
(1) व्यवस्थापक, टाटा ए आय जी जनरल इन्शुरन्स कं. लिमिटेड,
ए 501, पाचवा माळा, बिल्डींग नं. 4, इन्फीनिटी पार्क,
दिंडोशी मालाड पश्चिम, मुंबई – 400 097.
(2) व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया
संघ मर्या., सोलापूर, प्रधान कार्यालय : 241 अ, मुरारजी पेठ,
सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एन. कदम
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : जी.एच. कुलकर्णी
विरुध्द पक्ष क्र.2 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्यस यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून कर्ज घेऊन दि.4/10/2010 रोजी खरेदी केलेल्या गाईचा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पॉलिसी क्र.00146852 अन्वये विमा उतरविण्यात आलेला आहे आणि टॅग नं. TAIG/D-5129 आहे. दि.6/3/2011 रोजी तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि वैद्यकीय उपचार करुनही दि.16/3/2011 रोजी मृत्यू पावली. मयत गाईचे शवविच्छेदन करण्यात आले आणि विमा नुकसान भरपाई मिळण्याकरिता विमा दावा दाखल केला असता गाईच्या फोटोमध्ये फरक असल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.40,000/- विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.3,000/- नुकसान भरपाई विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावी, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथने अमान्य केली आहे. त्यांचे म्हणण्यानुसार तक्रारदार हे ‘ग्राहक’ नाहीत किंवा त्यांच्यामध्ये ‘ग्राहक विवाद’ नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि तक्रारीमध्ये सखोल पुरावा येणे असल्यामुळे दिवाणी न्यायालयापुढे तक्रार चालू शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचे नांवे विशिष्ट अटी व शर्तीस अधीन राहून कॅटल इन्शुरन्स पॉलिसी निर्गमित केलेली असून पॉलिसी अटी उभय पक्षकारांवर बंधनकारक आहेत. गाईच्या मृत्यू झाल्यानंतर तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेण्यात आली. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी स्वतंत्रपणे चौकशी केली असता जिवंत गाय व मृत गाईच्या फोटोमध्ये विसंगती निदर्शनास आली. तक्रारदार यांनी पॉलिसी अट क्र.1 चा भंग केल्यामुळे विमा रक्कम देय नाही. त्याप्रमाणे दि.6/6/2011 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर करण्यात आला आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते मंचासमोर अनुपस्थित आहेत आणि लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात येऊन सुनावणी पूर्ण केली.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, तसेच लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा दावा सादर केला असता तो नामंजूर करण्यात आल्याबाबत विवाद नाही.
5. प्रामुख्याने, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या कथनाप्रमाणे त्यांनी स्वतंत्रपणे चौकशी केली असता जिवंत गाय व मृत गाईच्या फोटोमध्ये विसंगती निदर्शनास आली आणि तक्रारदार यांनी पॉलिसी अट क्र.1 चा भंग केल्यामुळे विमा रक्कम देय नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या कथनापृष्ठयर्थ अभिलेखावर मृत व जिवंत गाईचे फोटो दाखल केलेले आहेत. फोटोमध्ये मृत व जिवंत गाईच्या रंगामध्ये फरक दिसतो. परंतु ज्यावेळी मृत गाईचे फोटो सत्य व खरे आहेत, हे मान्य केल्यानंतर जिवंत गाईचे फोटो कोणी काढले ? आणि विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे कधी व कसे प्राप्त झाले ? हे सिध्द होण्याकरिता कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल नाही. जिवंत गाईचे फोटो काढणा-या छायाचित्रकाराचे शपथपत्र अभिलेखावर दाखल नाही. त्यामुळे मृत गाय ही विमा संरक्षीत गाय नव्हती, हे सिध्द होणे अत्यंत कठीण आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सर्व्हेअरकडून इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतल्याचे नमूद केलेले असताना त्याप्रमाणे अहवाल अभिलेखावर दाखल नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा, पोस्टमार्टेम रिपोर्ट, मेडीकल पेपर्स, ईअर टॅग इ. दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून देण्यात आलेले नाही. आमच्या मते, तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत पावल्याचे सिध्द होण्याकरिता सदर कागदपत्रे पुरेशी आहेत. तक्रारदार हे विमा रक्कम मिळविण्यास पात्र असतानाही छायाचित्रांमध्ये फरक असल्याच्या तांत्रिक कारणास्तव तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आल्याचे सिध्द होते.
6. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विमा रक्कम रु.40,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब, आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.40,000/- (अक्षरी रुपये चाळीस हजार फक्त) व त्यावर दि.6/6/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने संपूर्ण विमा रक्कम फेड होईपर्यंत व्याज द्यावे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावयाची आहे.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष