निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 19/06/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 30/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 26/11/2010 कालावधी 05 महिने 26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. नर्मदा भ्र.सुनिल मुंढे. अर्जदार वय 35 वर्षे. धंदा.घरकाम./शेती. अड.पी.एन.कालानी. रा.सेलमोहा ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द 1) तहसीलदार साहेब. गैरअर्जदार. तहसील कार्यालय,गंगाखेड. स्वतः ता.गंगाखेड जि.परभणी. 2 कबाल ईन्श्युरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. स्वतः भास्करायन,एचडीएफसी होम लोन बिल्डींग,प्लॉट नं.7 सेक्टर ई—1 टाउन सेंटर,सिडको,औरंगाबाद. 3 मॅनेजर. अड.दोडीया. रिलायन्स जनरल ईन्श्युरन्स कं.लि.570. रेक्टीफायर हाउस,नायगम क्रॉस रोड,नेक्स्ट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,वडाळा वेस्ट,मुंबई – 400 031 ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघाती विम्याची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे बाबतीत त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे सेलमोहा ता.गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी आहे . महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्या पॉलीसीचा अर्जदाराचा मयत पती सुनिल ज्ञानोबा मुंढे हा देखील लाभार्थी होता तारीख 05.05.2008 रोजी अर्जदाराच्या पती मोटार सायकल वरुन राणीसावरगावकडे जात असतांना समोरुन येणा-या ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघातात अर्जदाराचा पती मयत झाला.अपघाताची खबर किनगाव पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर्ड करुन घटना स्थळाचा पंचनामा केला.व सरकारी दवाखाना आंबाजोगाई येथे प्रेताचे पोस्टमार्टम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे मयत पतीचे मृत्यू पश्चात तिला शेतकरी अपघाती विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह दिनांक 11.06.2008 रोजी क्लेम सादर केला.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 कडे तारीख 17/06/2008 रोजी कागदपत्रे व क्लेम पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पत्राव्दारे ड्रायव्हींग लायसेंन्स व आर.आर.सी.बुक या कागदपत्रांची मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे केली.त्याप्रमाणे तारीख 13/10/08 रोजी अर्जदाराने पुर्तता केली. त्याबाबत अर्जदाराचे म्हणणे असे की, शासनाच्या परिपत्रकात ड्रायव्हींग लायसेन्सची पुर्तता करणे बंधनकारक असल्याचे कोठेही नमुद केलेले नसतांना गैरअर्जदाराने जाणुन बूजुन अडवणुक करुन क्लेम मंजूर केलेला नाही म्हणून तारीख 13/03/2009 रोजी वकिला मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 ला नोटीस पाठविली होती त्यालाही दाद दिली नाही. अशा रितीने विमा कंपनीने सेवेत त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 1,00,000/-द.सा.द.शे 18 % व्याजासह मिळावेत याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 25 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी मंचाची नोटीस स्वीकारुनही नेमले तारखेस आपले लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द तारीख 24/08/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्टाव्दारे लेखी म्हणणे पाठविले ते दिनांक 10.08.2010 रोजी प्रकरणात ( नि.9) समाविष्ट केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी तारीख 18/09/2010 रोजी लेखी जबाब ( नि.19) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात नुकसान भरपाई दावा क्लेम मंजूरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता व छाननी करण्यासाठी व विमा कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किवा त्यांच्याकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत सुनिल ज्ञानोबा मुंढे याच्या क्लेमची कागदपत्रे तहसीलदार कडून तारीख 19/07/2008 रोजी प्राप्त झाली परंतु पाठविलेल्या कागदपत्रात ड्रायव्हींग लायसेंन्स व आर सी बुक नव्हते तसेच पाठविलेली काही कागदपत्रे सर्टिफाईड नव्हती त्याची पुर्तता करण्याबद्दल तारीख 30/07/2008, तारीख 10/11/2008, तारीख 20/03/2009 व तारीख 26/08/2009 ला वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवुनही तहसीलदार कडून कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे विमा कंपनीने तारीख 23/06/2010 रोजी अर्जदाराची क्लेम फाईल मंजुरी विना बंद केली.सबब प्रस्तुत प्रकरणातून रु.2,000/- कॉस्टसह गैरअर्जदार क्रमांक 2 ला वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.19) त्यांचे विरुध्द तक्रार अर्जामध्ये केलेल्या विधानांचा इनकार केला आहे. व प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द चालणेस पात्र नाही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.असे त्यांचे म्हणणे आहे.कारण कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हिसेस यांच्याकडून आजपर्यंत मयत सुनिल मुंढे याच्या डेथक्लेमची कागदपत्रे कंपनीला मिळालेली नाही त्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. शेतकरी विम्यासंबंधी लिहिलेला मजकूर त्यांनी नाकारलेला नाही मात्र अर्जदाराच्या पतीचे अपघातात निधन झालेसंबंधीचा मजकूर वैयक्तिक माहिती अभावी नाकारलेला आहे.अतिरिक्त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, शेतकरी विम्यासंबंधी महाराष्ट्र सरकार व विमा कंपनी यांचे दरम्यान झालेल्या लेखी करारानुसार तहसीलदार यांचे मार्फत कबाल इंन्शुरंन्स ब्रोकरला क्लेमची कागदपत्रे पाठविल्यानंतर कबाल इंन्शुरन्स यांनी त्याची छाननी करुन अपु-या कागदपत्रांचवी पुर्तता करुन घेवुन क्लेम सर्व कागदपत्रांसह विमा कंपनीकडे पाठवावा लागतो मयत सुनिल मुंढे यांच्या अपघाती निधनाची कोणतीही कागदपत्रे कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस कडून आजतागायत विमा कंपनीला मिळालेली नसल्यामुळे अर्जदसाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उदभवत नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि.20 दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदार तर्फे अड कालानी व गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड दोडीया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्दे उत्तर 1 गैरअर्जदार यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती 2 निधनाची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? होय. 3 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत पती सुनिल ज्ञानोबा मुंढे हा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि. 4/5 वरील शेत जमिनीचा 7/12 उतारा, नि. 4/3 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र, नि.4/6 वरील होल्डींग प्रमाणपत्र, नि.5/7 वरील नमुना नंबर 6-क चा उतारा यामधील नोंदीवरुन शाबीत झाले आहे. दिनांक 05.05.2008 रोजी मयत सुनिल मुंढे किनगाव ते आंबाजोगाई रोडवरुन रात्री दहा ते सव्वादहाच्या सुमारास स्वतःची मोटार सायकल नंबर एम व्ही व्ही / 2490 वरुन राणीसावरगाव येथे जात असतांना समोरुन येणारा ट्रॅक्टर नंबर एम एच 44 / डी 970 च्या चालकाने मोटार सायकलला धडक दिल्याने अपघातात अर्जदारच्या पतीचा मृत्यू झाला होता. ही वस्तूस्थिती पुराव्यातील पोलीस स्टेशन किनगाव जि.लातूर अ.मृ.रजि.क्रमांक 40/08 मधील खबरी जबाब ( नि.4/11), घटनास्थळ पंचनामा (नि.4/12) मरणोत्तर पंचनामा (नि.4/13) आणि सरकारी हॉस्पिटल आंबाजोगाई यांचेकडील मयताचा पी.एम.रिपोर्ट (नि4/14) या कागदोपत्री पुराव्यातून शाबीत झाले आहे. मयत सुनिल मुंढें हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती हे पुराव्यात नि.4/1 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म व त्यासोबत दिलेल्या कागदपत्रांच्या तपशिलावरुन दिसते.त्यामध्ये कसलीही अपुर्णता दिसून येत नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकर यांच्याकडे सदर क्लेम व कागदपत्रे पाठविल्यावर मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स व आर सी बुक पाठविणे बाबत गैरअर्जदार क्रमांक 2 यानी तारीख 30/07/2008 चे पत्र पाठवुन ( नि.4/23) त्याची पुर्तता करणेबाबत तहसीलदारला कळवले होते.त्याचीही पुर्तता अर्जदारने केलेली होती हे पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/24 वरील तहसीलदारच्या पत्रावरुन दिसते असे असतांनाही अर्जदारकडून पुन्हा ड्रायव्हींग लायसेन्स व आर सी बुक या कागदपत्रांची मागणी संबंधी वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवुनही अर्जदाराकडून त्याची पुर्तता न झाल्यामुळे विमा कंपनीने तारीख 23/06/2010 रोजी क्लेम फाईल बंद केली असे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबात केलेले कथन चुकीचे असल्याचे पुराव्यातील वस्तुस्थितीवरुन स्पष्ट होते गैरअर्जदारक क्रमांक 3 विमा कंपनीने देखील त्यांच्या लेखी जबाबातून त्यांच्याकाडे कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज कडून अर्जदाराच्या पतीच्या डेथक्लेमची कागदपत्रे आजतागायत त्यांच्याकडे मिळालेलीच नाही असा बचाव ब घेतलेला आहे परंतु त्याच लेखी जबाबातील परिच्छेद क्रमांक 18 मधील मजकुरामध्ये कबाल ब्रोकरेज कडून विमा कंपनीला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये मयताचे ड्रायव्हीग लायसेंस व मोटार सायकलचे आर सी बुक या कागदपत्रांची त्यांना आवश्यकता होती असा त्यांना उल्लेख केलेला असल्यामुळे कबाल इंन्शुरन्स ब्रोकरेजकडून मयत सुनिल मुंढेच्या डेथक्लेमची कागदपत्रे त्यांना मिळाली होती हे स्पष्ट होते.त्यामुळे लेखी जबाबामध्ये त्याबाबत घेतलेला बचाव निव्वळ पोकळ असून अर्जदारास नुकसान भरपाई देण्याची कायदेशिर जबाबदारी टाळण्यासाठीच तो बचाव र्घेतला आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. युक्तिवादाचे वेळी अर्जदारातर्फे अड.कालानी यानी पुराव्यात नि.22/4 वर दाखल केलेल्या शेतकरी विम्यासंबंधीचे शासनाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकाकडे मंचाचे लक्ष वेधले व असे दाखवुन दिले की, परिपत्रकातील पान क्रमांक 3 वरील निर्णय क्रमांक 10 मध्ये असे नमुद केले आहे की, शासनाने विहीत केलेली प्रपत्रे / कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतक-याने सादर करण्याची आवश्यकता नाही.अर्जदाराने परिपत्रकातील “प्रपत्र ड” मध्ये नमुद केलेली आवश्यक ती कागदपत्रे दिली असतांनाही नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठी गैरअर्जदारातर्फे पुन्हा पुन्हा अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे असे मंचासमोर निवेदन केले. गैरअर्जदाराकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रतीही ( नि. 4) लगत दाखल करुन ते पुराव्यातून शाबीत केले आहे. परिपत्रकातील तपशीलाप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे पाठविलेल्या कागदपत्रात क्लेम मंजूर होण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असतांनाही कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यानी दिनांक 20.03.2009 च्या पत्रातून अपघातातील वाहनाचे आर.सी.बुक व ड्रायव्हींग लायसन्सची मागणी केली आहे परंतू ती गैरलागू आहे शेतक-यास विम्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी लाभार्थिचा मृत्यू अपघाती झाला पाहिजे.एवढा एकच निकष ठरवण्यात आला आहे.त्यामध्ये मयताचा निष्काळजीपणा मुळीच विचारात घेतलेला नाही हे गैरअर्जदार सोयीस्करपणे विसरलेले दिसातात? अर्जदारच्या पतीचा मृत्यू स्वतःच्या मोटारसायकल वरुन जात असतांना झालेला होता ही वस्तुस्थिती असली तरी क्लेम मंजूर होण्यासाठी मयताचे ड्रायव्हींग लायसेंन्स अथवा त्या वाहानाचे आर सी बुक क्लेम मंजुरीसाठी मुळीच आवश्यक नाही. तसे परिपत्रकातही नमुद केलेले नाही. त्यामुळे त्याची पूर्तता करण्याचे अर्जदारावर बंधनकारक नाही.शासनाने निसर्गावर अवलंबून असणा-या राज्यातील शेतकरी कुटूंबातील शेतक-याचे अपघाती निधन अथवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर कुटूंबाला अर्थिक हातभार देण्यासाठी शासनाने स्वतः विम्याचे हप्ते भरुन शेतक-याला रुपये 1,00,000/- ची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली आहे. या कल्याणकारी विमा योजनेव्दारे विमा कंपनीकडून ही नुकसान भरपाई मंजूर होण्यसाठी मध्यस्थ सल्लागार म्हणून महसूल खाते व कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यानाही नेमलेले आहे. अपघातात मरण पावलेल्या लाभार्थी शेतक-यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी परिपत्रकात जी आवश्यक कागदपत्रू नमूद केलेली आहे ती किंवा त्याला पर्यायी असलेली इतर कागदपत्रे क्लेमट कडून मिळाली आसतील तर कोणत्याही तांत्रीक कारणास्तव अडवणुक न करता तो क्लेम मंजूर केला पाहीजे.अर्जदाराच्या प्रस्तूत प्रकरणाच्या बाबतीत हीच वस्तूस्थिती दिसते? क्लेम मंजूर होण्याच्या दृष्टीने अर्जदाराने आवश्यक ती कागदपत्रे दिली असतांनाही गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यानी अर्जदाराची विनाकारण आडवणूक करुन तिला मानसिक त्रास दिलेला आहे व सेवा त्रूटी केलेली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे परत पाठविले असल्यास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत मागवुन घेवुन अर्जदारला विमा क्लेम नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- तक्रार अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 % दराने व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 500/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |