नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 171/2010 नोंदणी तारीख – 22/07/2010 निकाल तारीख – 12/08/2011 निकाल कालावधी – 386 दिवस श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- श्रीमती. शहाबाई माधव शिंदे, रा. खातगुण, ता. खटाव, जि. सातारा. ----- अर्जदार (अभियोक्ता सी.ए.रेडेकर) विरुध्द 1 ताराबाई मानाबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., खातगुण तर्फे चेअरमन सौ. सुनिता अनिल झिरपे, 2. व्हाईस चेअरमन, सौ. कविता उमेश लावंड, 3. शाखा व्यवस्थापक, सौ. जोस्ना जालिंदर लावंड, 4. संचालक, सौ. सुलभा सुरेश लावंड, 5. संचालक, सौ छाया प्रकाश लावंड, सर्व रा. खातगुण, ता. खटाव, जि. सातारा ------ जाबदार क्र. 1 ते 5 ( एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे – 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा बचत खाते, पेन्शन ठेव व दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या काही ठेवींची मुदत संपलेली आहे व काही ठेवपावत्यांची मुदत संपलेली नाही. ज्या मुदत ठेव पावतींची मुदत संपली आहे त्या पावत्यांची देय होणा-या रकमेची तसेच ज्या मुदत ठेव पावत्यांची मुदत अजूनही संपलेली नाही अशा पावत्यांच्या रकमेची मुदतपूर्व मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.26/05/10 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 1,92,647/- व त्यावरील व्याज तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र. 1 ते 5 यांना जाहीर नोटीसीने करणेत आली. परंतु जाबदार क्र.1 ते 5 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्या 5/1 ते 5/2 कडील अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस व नि. 6 ते 9 कडील दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या व सेव्हींगखाते पासबुक पाहीले. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा बचत खाते, पेन्शन ठेव व दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस देऊनही रक्कम दिली नाही. तसेच वेळोवेळी मुदत पूर्व ठेवीचया रकमेबाबत तोंडी मागणी करूनही रक्कम दिली नाही. असे शपथपत्राने शाबीत केले आहे. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र. 1 ते 5 यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5 अर्जदार यांचा तक्रार अर्ज पाहता ठेव पावती क्र. 420 व 351 हया पावत्या तक्रारीत दाखल नाहीत. सबब त्या ठेव पावत्या बाबत आदेश करणे न्याय नाही. तसेच ठेव पावती क्र. 63 वरील मुदत संपणेची तारीख 28/02/2010 दिसते परंतू सदर तारीख संशयास्पद दिसते. तारखेत खाडाखोड आहे खाडाखोड केले बाबत सही नाही. सबब व्याज अर्जदारास देणे न्याय नाही. तसेच सेव्हीग खात्यातील रक्कम रू.6255/- ची अर्जदाराने मागणी केली आहे. तथापि मुद्दल पाहीली असता केवळ 255/- रू. रक्कम शिल्लक दिसते सबब तेवढीच रक्कम अर्जदार यास मिळणेस पात्र आहे. 6. सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ) पेन्शन योजनेअंतर्गत असलेली पावती क्र. 63 कडील रक्कम रु. 26,000/- (अक्षरी रक्कम रुपये सव्वीस हजार फक्त) द्यावी. ब) पेन्शन योजनेअंतर्गत असलेली ठेव पावती क्र. 157 कडील रक्कम रु.18,500/- (अक्षरी रक्कम रुपये अठरा हजार पाचशे फक्त) द्यावी व सदर रकमेवरती ज्या महिन्यापर्यंत व्याज दिले आहे तेथून पुढील महिन्यापासून दि.28/02/2010 पर्यंत पावतीवर नमूद व्याजदराने व्याज द्यावे व तेथून पुढे रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. क) पेन्शन योजनेअंतर्गत असलेली पावती क्र. 324 कडील रक्कम संस्थेच्या मुदतपूर्व ठेवीच्या नियमानुसार द्यावी. ड) सेव्हींग खाते क्र. 165 कडील रक्कम रु. 255/- (अक्षरी रक्कम रुपये दोनशे पंचावन्न फक्त) सेव्हींग खातेच्या व्याजाचे नियमानुसार द्यावी. इ) मानसिक त्रासापोटी तसेच या तक्रारअर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 3. जाबदार नं.1 ते 5 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 4. ठेव पावती क्र. 420 व 351 ची मागणी फेटाळण्यात येते. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 12/08/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (महेंद्र म. गोस्वामी) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |