पारीत दिनांकः- 27/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी तापी सहकारी पतपेढीच्या नवी सांगवी येथील शाखेमध्ये, म्हणजे जाबदेणार क्र. 3 यांच्याकडे चांगल्या पद्धतीने व्याजदर असल्याने मुलाच्या शिक्षणासाठी मुदत ठेव ठेवलेली होती. त्याची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 3 यांच्याकडे रकमेची मागणी केली मात्र जाबदेणारांनी ती देण्यास टाळाटाळ केली व जेव्हा तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे तक्रार केली तेव्हा सदरच्या मुदत ठेवीची रक्कम तक्रारदारांच्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा करु असे सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी सदर डिपॉझिटची रक्कम तक्रारदारांच्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा केली, परंतु जेव्हा तक्रारदार त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरीता ती रक्कम काढण्यासाठी गेले तेव्हा योग्य भरणा झाला नसल्याचे सांगून रक्कम दोन-चार दिवसांत देतो असे आश्वासन दिले. परंतु अनेक वेळा मागूनही जाबदेणारांनी ही रक्कम तक्रारदारास दिली नाही, म्हणून तक्रारदारांनी दि. 1/7/2010 रोजी जाबदेणारांना कायदेशिर नोटीस पाठविली, परंतु नोटीस मिळूनही जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम दिली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून त्यांच्या सेव्हिंग खात्यातील रक्कम रु. 55,856/- द.सा.द.शे. 12% व्याजदराने, रक्कम रु. 10,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी, रक्कम रु. 5,000/- तक्रारीच्या खर्चाच्या पोटी व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचासमोर उपस्थित राहिले व त्यांचा लेखी जबाब, शपथपत्र व प्राथमिक मुद्दे उपस्थित करणारा अर्ज दाखल केला.
4] जाबदेणारांनी आज रोजी अर्ज दाखल केला व त्यामध्ये त्यांनी तक्रारदारास दि. 8/4/2011 रक्कम रु. 55,856/- व उर्वरीत रक्कम 4,722/- परत केली आहे, तसेच दि. 1/4/2010 ते 30/9/2010 या कालावधीचे द.सा.द.शे. 3% दराने व्याज तक्रारदारांच्या इच्छेनुसार मुदत ठेवीतून बचत खात्यामध्ये वर्ग करुन दिले आहे, असे नमुद केले आहे. सदरच्या अर्जाद्वारे जाबदेणार, त्यांनी तक्रारदारांची ठेव योग्य त्या व्याजासहित परत केली आहे, म्हणून तक्रार निकाली काढावी अशी मागणी करतात. जाबदेणारांनी सदरच्या अर्जाबरोबर रकमेचे खाते उतारे दाखल केलेले आहेत.
5] तोंडी युक्तीवादाच्या वेळी तक्रारदारांनी त्यांना रक्कम मिळाल्याचे मान्य केले परंतु, त्यांच्या म्हणण्यानुसार, रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे ते नुकसान भरपाईची मागणी करतात. मंचाच्या मते जाबदेणारांनी तक्रारदारास त्यांच्या ठेवीची रक्कम विलंबाने परत केली त्यामुळे त्यांना नक्कीच मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल, त्यामुळेच त्यांना मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली व त्या अनुषंगे प्रत्येक तारखेस मंचामध्ये उपस्थित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे रक्कम रु. 1,500/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी मिळण्यास पात्र ठरतात, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 1,500/-
(रु. एक हजार पाचशे फक्त) नुकसान भरपाई व
तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.