तक्रारदार स्वत:
जाबदेणारांतर्फे श्री. पाटील, प्रतिनिधी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. एस. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 24/मे/2013
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार यांच्या कथनानुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सांगवी शाखेत बचत खाते क्र 23/420 उघडले. तक्रारदारांनी सांगवी शाखेत एकूण रुपये 1,00,368/- एवढया रकमेच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. सांगवी शाखेच्या सांगण्यानुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या कोथरुड शाखेत बचत खाते क्र 23/1582 उघडले. सर्व ठेव पावत्या कोथरुड शाखेत दिनांक 5/8/2010 रोजी जमा केल्या. जाबदेणार यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करुनही जाबदेणार यांनी दिनांक 5/8/2007 पासूनचे व्याज जमा केले नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून ठेवीची रक्कम रुपये 1,00,368/-, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मागतात.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांची कथने नाकारली. महाराष्ट्र को.ऑप. सोसायटी अॅक्ट 1960 कलम 91 नुसार प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही. खान्देशातील ब-याच खातेधारकांनी ठेवींच्या रकमा काढून घेतल्यामुळे कॅश रिझर्व्ह रेशो ठेवणे जाबदेणार यांना शक्य झाले नाही. जाबदेणार यांच्याकडे पुरेशी रक्कम शिल्लक नाही. पुरेशी रक्कम जमा झाल्यावर ठेवीची रक्कम परत करण्यात येईल. सबब तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, खातेपुस्तिका, जाबदेणार यांचे माहितीपत्रक, ठेव पावत्या यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबूल केल्याप्रमाणे निर्धारित वेळेत ठेव पावत्यांची रक्कम व्याजासह न देऊन सदोष सेवा दिली आहे काय | होय |
2 | जाबदेणार विलंबापोटी व्याज व नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत काय | होय |
3 | अंतिम आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
जाबदेणार यांच्या लेखी जबाबातील कथनानुसार प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार या मंचास नाही. परंतू ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 3 नुसार हा कायदा अन्य कायद्याच्या विरोधी नाही. या कायद्यातील तरतुदी हया अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या विरोधी नसून त्याला पुरक अशा आहेत. सबब प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे या मंचास अधिकार आहेत असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सांगवी शाखेत ठेवलेल्या मुदतठेवींचा तपशिल खालीलप्रमाणे-
पावती क्र | पावती दिनांक | ठेव दिनांक | देय दिनांक | व्याज दर% | रक्कम | देय रक्कम |
2708 | 18/12/06 | 18/12/06 | 2/2/07 | 11 | 10000/- | 10139/- |
25784 | 28/7/07 | 28/7/07 | 12/9/07 | 10.5 | 40000/- | 40529/- |
25639 | 09/6/07 | 09/6/07 | 25/7/07 | 10.5 | 3600/- | 3648/- |
25949 | 30/11/07 | 4/11/07 | 20/12/07 | 10.5 | 17,863/- | 18,099/- |
25995 | 18/2/08 | 15/1/08 | 1/3/08 | 10 | 8000/- | 8101/- |
2064 | 12/1/07 | 12/1/07 | 27/2/07 | 11 | 11,500/- | 11,659/- |
सदर ठेवपावत्यांच्या छायांकीत प्रती तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. मुदतीअंती देय रक्कम तक्रारदारांनी वारंवार मागूनही जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही ही बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिनांक 23/2/2008, 8/4/2008, 9/9/2010 व 16/9/2010 रोजीच्या मागणी पत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारदारांच्या दिनांक 10/5/2013 रोजीच्या अर्जातील कथनानुसार जाबदेणार पतसंस्थेची तरलता संपल्याने पुणे शहरातील सर्व शाखा बंद केल्यामुळे जाबदेणार यांच्या कोथरुड शाखेत ठेव पावत्यातील रक्कम रुपये 95,911/-दिनांक 27/8/2010 रोजी तक्रारदारांचे खाते क्रमांक 23/1582 मध्ये जमा केली. या रकमेमध्ये दिनांक 27/8/2010 पासूनचे व्याज व मुद्यल यांचा समावेश आहे. मात्र ठेव पावत्या जमा करण्यापुर्वी दिनांक 12/9/2007 ते 27/8/2010 या कालावधीतील द.सा.द.शे 10 टक्के दराने व्याज रक्कम रुपये 28,771/- जाबदेणार यांनी अदा केलेली नाही एवढीच तक्रारदारांची मुळ तक्रार मंचाच्या विचारार्थ शिल्लक रहाते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या बचत खाते क्र 23/1582 छायांकीत प्रती वरुन दिनांक 27/8/2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या खात्यात फक्त एकूण रुपये 95,911/- जमा केल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबूल केल्याप्रमाणे, माहितीपत्राप्रमाणे, निर्धारित वेळेत मुदतीअंती ठेव पावत्यांची रक्कम व्याजासह न देऊन सदोष सेवा दिलेली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना देय असलेली रक्कम
ठेवीच्या मुदतीअंती जवळजवळ 2 ½ वर्षांच्या कालावधीनंतरही दिली नाही, ही रक्कम जाबदेणार यांनी वापरलेली आहे. सबब जाबदेणार दिनांक 12/9/2007 ते 27/8/2010 या कालावधीसाठी द.सा.द.शे 10 टक्के दराने व्याजापोटी रुपये 28,771/- तक्रारदारांना देण्यास जबाबदार आहेत. तसेच तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- देण्यास जबाबदार आहेत.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्या व सामुदायिकरित्या
तक्रारदारांना रक्कम रुपये 28,771/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्या व सामुदायिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व
तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.