पारीत दिनांकः- 27/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार हे निवृत्त ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी जाबदेणार सहकारी पतपेढीमध्ये भविष्याची तरतुद म्हणून सन 2007 ते 2009 या कालावधीमध्ये अनेक मुदत ठेवी व आवर्त ठेवी ठेवलेल्या होत्या. त्या रकमेची मुदत संपूनही जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यांच्याकडून मुदत ठेवींपोटी रक्कम रु. 2,90,000/- + आवर्त ठेवी पोटी रक्कम रु. 1,51,118/- असे एकुण रक्कम रु. 4,41,118/- ची, नुकसान भरपाईची व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले, त्यामध्ये मुदत ठेवींच्या पावत्या व पासबुकच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचासमोर उपस्थित राहिले व त्यांचा लेखी जबाब, शपथपत्र व प्राथमिक मुद्दे उपस्थित करणारा अर्ज दाखल केला.
4] जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदारास योग्य त्या व्याजासहित दि. 6/2/2012 रोजी एकुण रक्कम रु. 4,78,228/- (रु. चार लाख अठ्यात्तर हजार दोनशे अठ्ठाविस फक्त) दिलेले आहेत, तसेच दि. 1/7/2009 ते 6/2/2012 या कालावधीसाठी द.सा.द.शे. 3% तक्रारदारांच्या इच्छेनुसार मुदत ठेवीतून बचत खात्यामध्ये वर्ग करुन दिले आहे, असे नमुद केले आहे. सदरच्या अर्जाद्वारे जाबदेणार, त्यांनी तक्रारदारांची ठेव योग्य त्या व्याजासहित परत केली आहे, म्हणून तक्रार निकाली काढावी अशी मागणी करतात. जाबदेणारांनी सदरच्या अर्जाबरोबर रकमेचे खाते उतारे दाखल केलेले आहेत.
5] तोंडी युक्तीवादाच्या वेळी तक्रारदारांनी त्यांना रक्कम मिळाल्याचे मान्य केले परंतु, त्यांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे त्यांना ते नुकसान भरपाईची मागणी करतात. मंचाच्या मते जाबदेणारांनी जरी तक्रारदारास त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली असेल, तरीही विलंबाने दिल्यामुळे तक्रारदारांना नक्कीच मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल, त्यामुळेच त्यांना मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली व त्या अनुषंगे प्रत्येक तारखेस मंचामध्ये उपस्थित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे रक्कम रु. 1,500/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी मिळण्यास पात्र ठरतात, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 1,500/-
(रु. एक हजार पाचशे फक्त) नुकसान भरपाई व
तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.