निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 07/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 20/12/2013
कालावधी 07 महिने. 13 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योती भ्र. कैलास अंभुरे. अर्जदार
वय 32 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.,एस.बी.चौधरी.
रा. चांदज ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड रिइन्शुरन्स ब्रेाकर प्रा.लि.
6, फरकडे भवन,भानुदास नगर,बीग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक,जालना रोड,औरंगाबाद.
3 मा.शाखा व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडिया अॅशुरन्स कं. लि.
यशोदिप बिल्डींग,नानलपेठ,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा तिच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीस नामे कैलास आप्पाराव अंभुरे यांचे नावे मौजे चांदज ता.जिंतूर येथे गट नं. 140 व 143 मध्ये अनुक्रमे 48 आर व 17 आर शेत जमीन होती व ते या शेताचे मालक व कब्जेदार होते, या बद्दलची नोंद 7/12 उतरा, 8 अ, 6 (ड), 6 (क) प्रमाणपत्रा मध्ये आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 12/06/2011 रोजी तिचे मयत पती नामे कैलास आप्पाराव अंभुरे हे जिप क्रमांक एम.एच.-22-इ 1225 ने प्रवास करत असताना सदर जीप झरी शिवारात आली असता सदर जिप पलटी झाली व त्यात अर्जदाराचे पती गंभीर जखमी झाले व दवाखान्यातील उपचारासाठी यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे अॅडमिट केले, उपचार चालू असांना त्यांचा मृत्यू झाला सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन परभणीला दिली, त्यानंतर संबंधीत पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा व मयताचा मरणोत्तर पंचनामा करुन मयताचे गुरुगोविंदसिंग मेमोरियल हॉस्पीटल नांदेड येथे पी.एम. झाले. अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रंसह शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे नुकसान भरपाई दावा दाखल केला.
सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 ने तो गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला व गैरअर्जदार क्रमांक 2 ने तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 3 ने दिनांक 29/09/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 या पत्र पाठवुन कळविले की, अर्जदाराचा विमादावा सादर करण्यास 90 दिवसाचा उशीर झाला, त्यामुळे अर्जदाराचा विमादावा नाकारला बद्दल पत्र दिले. व सदर पत्रची प्रत गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास पत्राव्दारे कळविले. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा चुकीचे कारण दाखवुन फेटाळला व सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार अर्जदारास दाखल करणे भाग पडले. म्हणून मंचास विनंती केली की, अर्जदाराचा अर्जमंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने अर्जदाराला 1 लाख रु. तिचे पती मृत्यू झाल्या तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावे, व तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रसापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चा पोटी 5000/- अर्जदारास देण्याचा आदेश करावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 4 वर 3 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार विमा कंपनीचे पत्र, गैरअर्जदार क्रमांक 2 चे पत्र, गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे पत्र, व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 13 वर 10 कागदपत्रे दाखल केले आहेत, ज्यामध्ये क्लेमफॉर्म, गट क्रमांक 140 चा 7/12 उतारा, गट क्रमांक 143 चा 7/12 उतारा, फेरफारची नक्कल, गाव नमुना सहा क, ओळखपत्र, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुन ही
(नि.क्रमांक 8 वर ) मंचासमोर हजर नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 7 वर त्याने आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांची संस्था ही विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशीलास विमासेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच काम आहे. व या कामासाठी आम्ही फी अथवा आर्थिक मदत आम्ही शासनास मागीतलेली नाही. आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, त्यामुळे आम्हांस दाव्यातून मुक्त करावे असे म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे, व तसेच अर्जदार हा आमचा ग्राहक नाही वा त्याने विमा कंपनीकडे हप्त्यापोटी रक्कम अदा केली नाही व तो विमा कंपनीचा ग्राहक नाही या कारणाने सदरची तक्रार मंचास चालवण्याचा अधिकार नाही व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच ट्रायपार्टी करारा प्रमाणे शेतकरी विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करुन शकत नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, त्यांच्या परभणी शाखेने विमा पॉलिसी जारी केलेली नाही व ती पूणे येथील मुख्य शाखेने केलेली आहे.त्याने पुणे येथील शाखेस संपर्क करुन माहिती मिळवली असता अशी माहिती मिळाली की, अर्जदाराने त्यांचेकडे कोणतही विमादावा दाखल केलेला नाही, त्यामुळे विमादावा निकाली काढण्याचा व सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत
पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा
नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती कै.कैलास आप्पाराव अंभुरे हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभार्थी होते, ही बाब नि. क्रमांक 13/2 वरील व 13/3 सात बारा उता-या वरुन व तसेच नि.क्रमांक 13/4 वरील फेरफार प्रतवरुन व नि.क्रमांक 13/5 वरील गाव नमुना नं. 6 क वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पती कैलास आप्पाराव अंभुरे यांचा दिनांक 12/06/2011 रोजी जिप नं. एम.एच.-22-इ 1225 ने प्रवास करत असतांना सदर जिप पलटी झाली व त्यात ते गंभीर जखमी होवुन उपचारा दरम्यान सदर दिवशी मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 13/7 वरील गुन्हा र.नं. 58/11 पोलीस स्टेशन परभणीच्या एफ.आय.आर. कॉपी वरुन, नि.क्रमांक 13/8 वरील घटनास्थळ पंचनाम्यावरुन व नि.क्रमांक 13/10 वरील पोस्ट मार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 सादर केला होता ही बाब नि. क्रमांक 4/3 वरील कागद पत्रावरुन व नि.क्रमांक 13/1 वरील क्लेमफॉर्म भाग -1 या कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 23/04/2012 रोजी 90 दिवसांच्या दाखल न केल्यामुळे नामंजूर केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या विमा कंपनीने गैरअर्जदार क्रमांक 2 यास लिहिलेल्या पत्रावरुन सिध्द होते व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/2 वरील गैरअर्जदार क्रमांक 2 याने कृषी अधिक्षक परभणी यांना दिनांक 29 सप्टेंबर 2012 रोजी लिहिलेल्या पत्रावरुन सिध्द होते.गैरअर्जदार विमा कंपनीचे लेखी जबाबात म्हणणे की, त्यांनी पूणे येथील गैरअर्जदार विमा कंपनीच्या मुख्य शाखेत अर्जदाराच्या विमादाव्या बाबत चौकशी केली असता त्याना असे कळले की, अर्जदाराने कोणताही विमादावा दाखल केला नाही हे म्हणणे मंचास वरील कारणास्तव योग्य वाटत नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीने 90 दिवसाचे कारण दाखवून अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन निश्चितच अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाबातून घेतलेल्या बचावात पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत दाखल केला नाही, म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमी प्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे
मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील
प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
अर्जदारास तिच्या मयत पतीच्या नुकसान भरपाई विमा दाव्यापोटी शेतकरी
अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- फक्त(अक्षरी रु.एकलाख फक्त )
द्यावेत.
3 गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारीचा खर्च म्हणून अर्जदारास रु.1,000/-
फक्त (अक्षरी रु.एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.