निकाल
दिनांक- 24.07.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार ही मौजे पिंप्री (घु) ता.आष्टी येथील रहिवाशी आहे. तक्रारदाराचे पती कानिफनाथ रामभाऊ पांडुळे यांचा मृत्यू दि.14.07.2010 रोजी रस्ता अपघातात स्कुलबसने धडक दिल्यामुळे जागीच झाला आहे. तक्रारदाराचे नातेवाईकांनी घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन आष्टी येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दि.14.07.2010 रोजी चौकशी करुन मरणोत्तर पंचनामा करुन शव पोस्टमार्टम साठी संबंधीत अधिका-याकडे सुपूर्द केले. मयताचे नातेवाईकाचा जवाब नोंदवला व त्यानंतर साक्षीदाराच्या सहया घेतल्या.
तक्रारदारांचे पती कानिफनाथ हे शेतकरी होते, त्यांच्या नांवे मौजे पिंप्री (घु.) ता.आष्टी येथे सर्व्हे नं.90 व 158/अ/20 मध्ये शेत जमिन आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सर्व शेतक-यांचा विमा काढलेला आहे. महाराष्ट्र शासना मार्फत संबंधीत तालुक्याचे कृषी अधिकारी,कबाल ब्रोकींग इन्शुरन्स सर्व्हीस व विमा कंपनी यांनी संयूक्तीक कार्यवाही करायची आहे.तक्रारदाराने पतीच्या मृत्यूचा दावा सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे दाखल केला. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकडे पाठविला. विम्याचा कालावधी दि.14.08.2009 ते 13.08.2010 या वर्षासाठी होता. सामनेवाले क्र.1 यांनी पाठविला विमा दावा सामनेवाले क्र.2 व 3 यांनी आजपर्यत मंजूर केलेला नाही.दावा मंजूर न करुन सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराची मागणी आहे की, तक्रारदाराला विमा रक्कम रु.1,00,000/-व्याजसह दयावेत, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी व खर्चापोटी रक्कम देण्याचे आदेश व्हावेत.
सामनेवाले क्र.1 हे स्वतः दि.4.5.2012 रोजी हजर झाले.तक्रारदार यांचा दावा त्यांचेकडे दि.08.10.2010 रोजी प्राप्ता झाला. तो दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचे मार्फत कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर त्रुटीच्या कागदपत्रांचे पत्र कंपनीकडून दि.18.12.2010 रोजी प्राप्त झाले त्यानुसार घटनास्थळ पंचनामा पत्र क्र.25 दि.04.01.2011 रोजीच्या पत्राने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचे मार्फत कंपनीकडे पाठविण्यात आले. तसेच पत्र क्र.106 दि.10.01.2011 च्या पत्राने घटनास्थळ पंचनामा कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस औरंगाबाद यांच्या कार्यालयात दि.11.01.2011 रोजी जमा करण्यात आला म्हणून सामनेवाले क्र.1 याच्या सेवेत त्रुटी नाही. त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 यांचा लेखी जवाब पोस्टाने प्राप्त झाला. त्यांचे म्हणणे की,अपघात दि.17.07.2010 रोजी झाला व त्यांचा दावा अपूर्ण कागदपत्रासह दि.16.10.2010 रोजी प्राप्त झाला. त्यांत घटनास्थळ पंचनामा नव्हता त्याबाबत दि.2.11.2010 रोजी व परत पत्र दि.6.12.2010 रोजी पाठविण्यात आले. तक्रारदारांनी कागदपत्र न दिल्यामुळे अपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडे दि.21.12.2010 रोजी पाठविण्यात आला. अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे सामनेवाला क्र.3 यांनी पत्र दि.31.12.2010 रोजी दावा बंद केला.
सामनेवाला क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी त्यांचा लेखी जवाब दि.07.06.2012 रोजी दाखल केला. तक्रारदार यांनी हे सिध्द करावे की, मयत हे शेतकरी होते व मयताचा मृत्यू अपघाताने झाला आहे. मयत हा एकटा गाडी वर नव्हता तर त्यासोबत इतर दोन व्यक्ती मोटार सायकलवर होते. मोटार सायकलची क्षमता ही दोन व्यक्तीची होती. मयताने कलम 128 मोटार अपघात कायदयाचे उल्लंघन केले आहे. सामनेवाला यांना कोणताही दावा कंपनी कडून प्राप्त झालेला नाही. मयताने पॉलिसीच्या शर्ती व अटीचे उल्लंघन केले आहे. सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांचा व शेतकरी यांचा कोणताही सरळ करार झालेला नाही. तक्रारदाराने पॉलिसी कालावधी नंतर 90 दिवसांचे आंत दावा दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रासह दावा दाखल केलेला नाही.सामनेवाले हे कोणताही दावा हा करारातील शर्ती व अटीनुसार मंजर करतात. अपघाताचे वेळी मोटार सायकलवर तिन व्यक्ती असल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लघंन झाले आहे त्यामुळे दावा मंजूर करता येणार नाही.दावा नामंजूर करुन सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही.तक्रारदारांचा दावा खर्चासह नामंजूर करण्यात यावा.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा, क्लेम फॉर्म भाग 1 व 2, तक्रारदाराचे बँकेचे पासबूक ची प्रत, गावननुना 6-क ची प्रत, एफआयआर ची प्रत, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मयताचे ड्रायव्हींग लायसन्स इत्यादी कागदपत्राच्या छायाकिंत प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ गणेश विठठलराव गुजर यांचे शपथपत्र दाखल केले आहे
तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्या मध्ये त्रूटी केली आहे ? होय.
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे हे दर्शविण्यासाठी सामनेवाला यांचेकडे दाखल केलेले कागदपत्राच्या छायाकिंत प्रती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये मयताचे नांवे शेती असल्या बाबत 7/12 उतारा, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत भरावयाचा फॉर्म, भारतीय प्रक्रिया संकितेच्या कलम 154 अन्वये दाखल झालेली पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, मयताचे ड्रायव्हींग लायसन्स, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा दावा नामंजूर केल्याबाबतचे पत्र, इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहे.
सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी जवाब दाखल केला आहे. सामनेवाले क्र.2 यांनी लेखी जवाब व्यतिरिक्त तोंडी अगर कागदपत्र पुरावा दिलेला नाही. सामनेवाले क्र.3 यांनी गणेश विठठलराव गुजर शाखा व्यवस्थापक यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारदार यांचे पती कानिफनाथ पांडूळे हे हिरो होंडा मोटार सायकलवरुन रोडवरुन जात असताना मोटार सायकल हीस स्कूलबस एम.एच.-16-क्यू-8495 यांनी धडक दिली. त्या अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झाले. सदर बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिस स्टेशन आष्टी मध्ये दाखल झालेल्या गुन्हा नोंद झाली, त्यात बाबत कागदपत्र व मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. सामनेवाला यांनी सदरील कागदपत्रास हरकत घेतली नाही. मयत कानिफनाथ यांचे नांवे मौजे पिंप्री (घु) येथे शेत जमिन आहे. त्यामुळे तो शेतकरी आहे ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसते की,त्यांनी त्यांचे पतीचे मृत्यूनंतर सामनेवाले क्र.1 यांचेकडे सदरील विमा योजना अंतर्गत दावा मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह दावा दाखल केला होता. सामनेवाले क्र.1 यांनी सर्व कागदपत्र सामनेवाले क्र.2 यांचेमार्फत सामनेवाले क्र.3 यांचेकडे सुपूर्द केले. सदरील सर्व कागदपत्र सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविले. सामनेवाले क्र.3 यांचा बचाव की, तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे त्यांना नूकसान भरपाई देण्यात आली नाही.त्यासोबत तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 मार्फत कागदपत्राची पुर्तता करण्याकामी कळविले बाबतचे पत्र दाखल आहे. त्या पत्रामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनामा दाखल केला नाही अशी सुचना केली आहे. परंतु सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्हणणे पाहता असे आढळून येते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे त्रुटीची पुर्तता करणेकामी घटनास्थळ पंचनामा व इतर सर्व आवश्यक ती कागदपत्रे सुपूर्द केली आहे व सामनेवाले क्र.1 यांनी ते कागदपत्र सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठविली आहेत. त्यामुळे सामनेवाले क्र.3 यांचा बचाव की, तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता केली नाही ही बाब स्विकार्य नाही. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारण्यास कोणतेही योग्य व सबळ कारण नाही. तक्रारदार यांचे पती कानिफनाथ अपघातात मृत्यू झाले त्याबाबतचे सर्व कागदपत्र तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठविली आहेत. सामनेवाले क्र.3 इन्शुरन्स कंपनी यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता झाल्यानंतर सेवा देण्यास बंधनकारक असतानाही त्यांनी सेवा देण्यास टाळाटाळ केली आहे. सबब, तक्रारदार ही सामनेवाले क्र.3 यांचे ग्राहक असून तिचे पतीचे अपघाती मृत्यूमुळे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे. विमा दावा रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे. जबाबदारी असतानाही त्यांनी रक्कम न देऊन सेवत कसूर केला आहे.
वरील सर्व कागदपत्रांच्या विवेचनावरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रूटी केलेली आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व त्यावर तक्रार दाखल दि.15.0.2.2012 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावे.
3. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.