जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 131/2012 तक्रार दाखल तारीख – 13/09/2012
निकाल तारीख – 11/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 07 म. 28 दिवस.
श्रीमती गंगुबाई सुर्यभान कुरमे,
वय – 46 वर्षे, धंदा - घरकाम,
रा. धामनगाव, ता. शिरुर अनंतपाळ,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- मा.तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
शिरुर अनंतपाळ, ता. शिरुर अनंतपाळ,
जि. लातुर.
2. मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय,
ता.जि.लातुर.
3. डेक्कन इन्शुरन्स व रिइन्शरेन्स ब्रोकर्स प्रा.लि.,
एल स्क्वेअर ऑफीस नं. 13,
तिसरा मजला सांघवी नगर,
परिहार चौक, औंध, पुणे – 411 007.
4. दि न्यु इंडिया अॅशुरन्स कं. लि.,
मंडळ कार्यालय, 153400, पहिला मजला,
स्वातंत्र्यवीर सावरकर उदयोग भवन,
शिवाजी नगर, पुणे – 411 005.
5. दि न्यु इंडिया अॅशुरन्स कं. लि.
शाखा कार्यालय, गायत्री कृपा,
चंद्रनगर शाहु कॉलेज जवळ,
लातुर 413512. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिता पी. मेखले.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 व 5 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार श्रीमती गंगुबाई सुर्यभान कुरमे रा. धामनगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातुर येथील राहणारी असून मयत सुर्यभान गणपतराव कुरमे यांची कायदेशीर वारस पत्नी आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 5 च्या मयत सुर्यभान गणपतराव कुरमे हा महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विम्याचा पॉलीसीधारक असल्यामुळे त्यांचा ग्राहक होता. मयत सुर्यभान कुरमे यास मौजे धामनगाव ता. शिरुर अनंतपाळ येथे गट क्र. 36/1, 00 हेक्टर 32 आर गट क्र. 36/2, 00 हेक्टर 50 आर अशी असुन फेरफार क्र. 320 असा आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांच्याकडे दि. 15/08/2010 ते 14/08/2011 या कालावधी करीता विमा उतरविला होता. दि. 14/06/2011 रोजी सुर्यभान कुरमे सकाळी जेवण करुन घरुन नळेगावच्या बाजाराला गाय विक्री केलेले पैसे घेऊन येतो म्हणून गेला. सुर्यभान कुरमे हा रात्री घरी आला नाही. म्हणून त्याच्या मुलांनी दुस-या दिवशी बाजाराला नळेगाव येथे जावून चौकशी केली. परंतु त्याचा पत्ता मिळून आला नाही. दि. 17/06/2011 रोजी सकाळी 11.00 वाजता अर्जदार व त्याची मुले घरी असताना नळेगाव येथून फोन आला की सुर्यभान हा नळेगाव शिवारातील भानुदास तोंडारे यांच्या शेतालगत असलेल्या घरणी तळयात पडुन मरण पावला. त्यामुळे अर्जदार व त्याची मुले गावातील इतर लोक घटनास्थळी गेले व प्रेत पाहिले. सदर घटनेची फिर्याद 39/11 पोलीस स्टेशन चाकुर येथे नोंदवण्यात आली आहे. दि. 14/06/2011 रोजी सायंकाळी नळेगावहून धामनगावला पायी चालत असताना वाटेतील घरणी तळयाच्या पाण्यातुन रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून सुर्यभानचा मृत्यू झाला.
सदरचा मृत्यू हा अपघाती अर्जदाराला आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मोठा आघात झाला होता. व तिला शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत पैसे भेटतात याबाबत काहीच माहिती नव्हती त्यासंदर्भात मार्च 2012 मध्ये या संबंधी गावातील लोकाकडुन माहिती मिळाली की शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडुन पैसे भेटतात, त्यावरुन अर्जदाराने कागदपत्रे गोळा करुन दि. 30/03/2012 रोजी गैरअर्जदाराकडे संचिका दाखल केली आहे. व स्टँम्प पेपरवर रु. 100/- विलंब माफ करावा सदरचा विलंब हा हेतु पुरस्सर केलेला नाही. अर्जदार ही अशिक्षीत विधवा स्त्री आहे. पतीच्या मृत्यूनंतर तिला सहारा नाही. तसेच तिची आर्थीक परिस्थीती अत्यंत हलाखीची असुन ती अर्धपोटी जीवन जगत आहे. सदरचा प्रस्ताव गैरअर्जदाराकडे पाठवूनही त्या प्रस्तावाचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून दि. 20/07/2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास नोटीस वकिलामार्फत पाठवली. परंतु गैरअर्जदाराने सदरच्या नोटीसला काहीच उत्तर दिलेले नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन द.सा.द.शे 12 टक्के दराने व्याज अर्जदारास दयावे. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 1 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रस्ताव हा उशीरा सादर केलेला आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 17/06/2011 रोजी झालेला आहे. व प्रस्ताव हा दि. 30/03/2012 रोजी प्राप्त झाला असल्यामुळे तो सदर विमा योजनेचा लाभार्थी ठरु शकत नाही.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 च्या म्हणण्यानुसार सदरचा प्रस्ताव हा विमा पॉलीसी संपल्यानंतर 90 दिवसात आलेला नसल्यामुळे तो फेटाळलेला आहे. सदर केसमध्ये अर्जदाराने केलेला विलंब हा 150 दिवसा पेक्षा जास्त झालेला असल्यामुळे तो विमा कंपनीच्या अटी व शर्ती मध्ये बसत नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच अर्जदाराचे पती घटनेच्या दिवशी दारु पिलेले होते. व त्यामुळे आपण कुठुन चाललोत हे माहीत नसल्यामुळे पाण्याच्या तळयातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला यात विमा कंपनीच्या अटीमध्ये नमुद आहे की एखादया व्यक्तीने आपल्याला माहिती असुन देखील त्या कार्य करताना त्याचा मृत्यू झाल्यास त्यास विमा कंपनी जबाबदार राहणार नाही, ही बाब अर्जदारास माहिती होती समोरचे तळे हे पाण्याचे आहे तरी तो त्यातून चालत गेला व स्वत:च मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
डेक्कन विमा कंपनीच्या वतीने त्यांचे म्हणणे असे सदर दाव्यावर कार्यवाही करुन दि न्यु इंडिया एश्योरन्स कं. लि या विमा कंपनीने दि. 23/04/2012 रोजीच्या पत्राद्वारे दाव्याची कागदपत्रे ही दावेदारांकडुन लिमिटेशन पिरीयड (म्हणजे दि. 21/12/11) नंतर मिळालेले आहेत म्हणून परत पाठवून दिली आहेत सोबत विमा कंपनीचे पत्र जोडत आहोत.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व अर्जदाराचे पती हे शासनाच्या शेतकरी अपघात विम्यांतर्गत लाभधारक होते. त्यांचा कालावधी दि. 15/08/2010 ते 14/08/2011 असा होता. अर्जदाराच्या नावे गट क्र. 36/1 मध्ये 0 हेक्टर 32 आर व 36/2 मध्ये 0 हेक्टर 50 आर एवढी जमीन होती व अर्जदाराचे फेरफार क्र. 320 आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू तळयाच्या पाण्यात बुडुन झाला हा मृत्यू अपघाती आहे. असा पुरावा 174 crpc दिलेला आहे. सदर केसमध्ये पोलीस स्टेशनने दिलेल्या फिर्यादीवर दि. 14/06/2011 रोजी सकाळी 9.00 वाजता माझे वडील सुर्यभान गणपती कुरमे वय 56 वर्षे धंदा – शेती रा. धामणगाव हे नळेगाव येथे जनावराच्या बाजाराला जातो म्हणून घरुन गेले ते रात्री परत आले नाही. म्हणून आम्ही दुसरे दिवशी शोधा शोध केली असता मिळून आले नाहीत. नंतर आम्ही वडिलांचा शोध घेतला दि. 17/06/2011 रोजी घरणी तलावाकडे जावून शोध घेतला असता सकाळी 10 वाजणेच्या सुमारास माझे वडिलांचे प्रेत भानुदास शिवदास तोंडारे यांचे शेताजवळ पाण्यावर तरंगत असलेले दिसते. यावरुन पोलीस स्टेशन 174 crpc प्रमाणे मयताच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सदर केसमध्ये Inquest पंचनाम्यामध्ये पंचाचे मत मयत पाणी घेण्यास जाऊन त्यानंतर तळयात जाऊन दारुच्या नशेत रस्ता ओलांडत असताना जाऊन बुडुन मरण पावला असावा असे मत मांडलेले आहे.
तरीपण पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच सदरच्या शवविच्छेदन अहवालात असे नमूद आहे. In my opinion the probable cause of the death is Drowning leading in the par cardio respiratory arrest leading to Asphyxia सदर केसमध्ये अर्जदार व तिच्या मुलास देखील ही बाब माहिती नाही की त्याच्या मृत्यूचे कारण काय ? अर्जदार व तिच्या मुलाने किंवा पंचानी प्रत्यक्षात घटना काय घडली ? मयता सोबत काय घडले ? याची माहिती कोणासही नाही. अर्जदार व तिच्या मुलाने मयताला दि. 14/06/2011 रोजी अखेरचे पाहिले आहे. त्यामुळे मृत्यूच्या वेळी अर्जदारासोबत नेमके काय घडले होते हे सांगू शकणारा प्रत्यक्ष दर्शी पुरावा नाही. मृत्यू नंतर हा पुरावा आलेला दिसुन येतो. इन्क्वेस्ट पंचनाम्यात सुरुवातीस केवळ मयत हा पाणी घेण्यास गेला असावा असे नमुद आहे. तसेच मयत हा तळयात पाणी घेण्यास जाऊन अथवा तळयात जाऊन दारुचे नशेत रस्ता ओलांडण्यासाठी जाऊन बुडून मरण पावला असावा.
असे लिहिले आहे. यात विमा कंपनीनेही सदरच्या पंचनाम्यातील नमुद मजकुर उचलून त्याचा पाहिजे तसा अर्थ लावून आपल्या मरणास मयत स्वत:च कारणीभुत असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येतो. मात्र अर्जदाराचा पती हा पाण्यात तरंगत होता त्याने दारु पिला होता हे समजायला त्याच्या शवविच्छेदन अहवालात alcohol हा त्याच्या पोटात होते असा कुठेही नोंद नाही. तसेच कोणत्याही तज्ञाचे मत नाही की तो दारु पिवुन मयत झाला असा कागदोपत्री पुरावा ‘दारु’ यासाठीचा न्यायमंचात दाखल नाही. गैरअर्जदार वकिलांनी केवळ युक्तीवाद पंचाच्या Inquest पंचनाम्यातील मजकुरावरुन म्हटलेला आहे. तो ही अथवा या शब्दाने पुढील जोडलेले स्पष्ट दिसत आहे. म्हणून हे न्यायमंच या उजरास महत्व देत नाही. व ही बाब गैरअर्जदाराने सिध्द केलेली नाही की मयत दारु पित होता. दुसरी बाब अर्जदार ही विधवा स्त्री आहे. व ती अज्ञानी आहे तिला या शासनाच्या योजनेची माहिती नव्हती ही बाब निश्चीतच तिच्या झालेल्या विलंबावरुन वाटते. विमा कंपनीने 127 दिवस विलंब माफ करता येतो असे एक परिपत्रक दिलेले आहे. तर सदरचा विलंब हा 210 दिवसाचा उशीर झालेला आहे. व यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार अर्जदाराने हा विलंब माफ व्हावा म्हणून रु. 100/- च्या स्टँम्प पेपरवर विमा कंपनीस दिलेला आहे. तसेच अशा प्रकारचा विलंब माफ करता येवू शकतो असे शासनाचे परिपत्रकच सांगते. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- दयावेत. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन
मुदतीत न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.