जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 169/2012 तक्रार दाखल तारीख – 03/12/2012
निकाल तारीख – 15/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 05 म. 12 दिवस.
श्रीमती श्रध्दा राजेश्वर लासुणे,
वय – 28 वर्षे, धंदा – घरकाम व शेती,
रा. श्रीनगर कॉलनी, उदगीर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- मा. तालुका कृषी अधिकारी साहेब,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
जळकोट ता. जळकोट जि. लातुर.
- मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,
लातुर ता. व जि. लातुर.
- डेक्कन इन्शुरेन्स व रि इन्शुरेन्स ब्रोकर्स प्रा.लि.,
- , माऊंट व्हर्ट एव्हरेस्ट,
टेलीफोन एक्सचेंजच्या समोर,
बान्नर रोड, बान्नर पुणे-411 057.
- दि न्यु इंडिया अॅशुरेन्स कं.लि.,
शाखा कार्यालय : 153401, 23 बुधवार पेठ,
महालक्ष्मी चेंबर्स दुसरा मजला,
अप्पा बळवंत चौक, पुणे-411 002.
- दि न्यु इंडिया अॅशुरेन्स कं.लि.,
शाखा कार्यालय, गायत्री कृपा,
लातुर-413512 ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिता पी.मेखले.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 व 5 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार श्रीमती श्रध्दा राजेश्वर लासुणे ही मयत राजेश्वर पिता शंकरराव लासुणे रा. श्रीनगर कॉलनी उदगीर ता. उदगीर जि; लातुर यांची कायदेशीर वारसदार आहे. मयत राजेश्वर लासुणे यांनी गैरअर्जदार यांच्याकडे शेतकरी जनता अपघात विमा काढला होता. महाराष्ट्र शासनाकडे दि. 15 ऑगस्ट 2011 ते 14 ऑगस्ट 2012 पर्यंत जनता अपघात विमा उतरविलेला आहे; मयत राजेश्वर लासुणे यांच्या नावे मौजे कोळनुर ता. जळकोट जि; लातुर येथे जमीन गट क्र. 160 क्षेत्रफळ 00 हेक्टर 11 आर एवढी जमीन आहे. दि. 23/04/12 रोजी राजेश्वर लासुणे व अंतोष तोंडारे दोघेजण स्विप्ट कार नं. एम.एच. 24- व्ही - 2445 ने राजेश्वर लासुणेची पत्नी उदगीरहून चाकुरला दुपारी 1 वाजता निघाले होते दुपारी 2 वाजता चाकुरला सासरवाडीत पोहचले. सासरवाडीत त्यांच्या पत्नीस व लहान मुलीस सोडले व त्यानंतर दुपारी 4 वाजता अंतोष तोंडारेसह कारने लातुरला कामा निमित्त गेले होते. लातुरचे कामकाज आटोपून उदगीरला जाण्यासाठी दोघेजण कारने निघाले होते. सदरची कार राजेश्वर लासुणे चालवत असताना त्यांची कार नळेगाव मार्गे उदगीरकडे येत असताना बोळेगाव पाटीजवळ थोडया अंतरावर पुढे रात्री 9 वाजताचे सुमारास आली असता समोरुन भरधाव वेगात एक माल वाहू टेम्पो ज्याचा नं एम. एच. 04-बी.जी-7400 आला व स्विप्ट गाडीस जोराची धडक मारुन गेला. सदर अपघातामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजुला पल्टी झाली. त्यामुळे राजेश्वर लासुणे, अंतोष तोंडारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखाना उदगीर येथे दाखल केले डॉक्टरानी तपासुन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अंतोष तोंडारे यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा नोंद क्र. 97/12 भा.दं.वि 279, 304 (अ), 338, 427,मोटार वाहन कायदा 184 नुसार पोलीस स्टेशन चाकुर येथे नोंदविण्यात आला. त्यानंतर अर्जदाराने दि. 05/07/2012 रोजी गैरअर्जदाराकडे संचिका दाखल केली. दि. 27/08/12 रोजी अर्जदाराला कळविले की राजेश्वर लासुणे यांचा अपघात हा मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे घडलेला असल्यामुळे त्यांना हा दावा देता येणार नाही. विमा पॉलीसीमध्ये विमा धारकाने मादक पदार्थाचे सेवन केले असेलतर त्याला विमा दावा देता येत नाही. म्हणून अर्जदाराचा दावा फेटाळला ही गैरअर्जदार क्र. 4 ने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 4 यांनी 1,00,000/- 15 टक्के व्याजदराने दयावेत. अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत उपजिल्हा रुग्णालय उदगीर यांचे पत्र, उपजिल्हा रुग्णालय उदगीर यांचे पत्र, आकस्मित मृत्यूची खबर, जिल्हा शल्य चिकित्साकडे शवपरिक्षेसाठी पाठवावयाचा पोलीस अहवाल, मरणोत्तर पंचनामा, पोलीस स्टेशन उदगीर (श) यांनी वैदयकीय अधिकारी, उदगीर याने पाठविलेले पत्र, प्रोव्हीजनल कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलीस स्टेशन चाकुर यांनी व्हिसेरा नष्ट करणेबाबत दिलेले पत्र, मृत्यू प्रमाणपत्र राजेश्वर लासुणे, अंतोष तोंडारे यांचा पोलीस स्टेशन चाकुर येथे दिलेला जबाब,गुन्हयाच्या घटनेचा प्राथमिक अहवाल,एफ.आय.आर नं. 97/2012, अपघात रिपोर्ट फॉर्म, अपघात रिपोर्ट फॉर्म,दोषारोप पत्र,वैदयकीय अधिकारी उदगीर यांनी व्हिसेरा नष्ट केला म्हणून पोलीस स्टेशन चाकुर यांना पाठविलेले पत्र, दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि, पुणे यांनी शेतकरी जनता अपघात विमा नामंजुर केले म्हणून पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 च्या म्हणण्यानुसार दि. 26/12/12 रोजी त्यांचे पत्र क्र. 7788 अन्वये सदरची तक्रार विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठवलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 4 आणि 5 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा स्वत:ची गाडी चालवत असताना दारु पिलेला होता. त्यामुळे मादक द्रवाच्या सेवनामुळे सदरची पॉलीसी त्यास देता येत नाही. तसेच त्याच्याजवळ वैध वाहन परवाना नव्हता त्यामुळे सदरची केस ही शेतकरी जनता अपघात विमा अंतर्गत येणा-या अटी व शर्तीमध्ये लिहिलेले आहे की, जर एखादा व्यक्ती दारु किंवा मादक पदार्थाचे सेवन करुन चालवत असेल तर, त्याला अपघाती मृत्यू आल्यास त्याचा मोबदला मिळू शकत नाही. म्हणून सदर अर्जदाराचा अर्ज हा विम्याच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्यामुळे तो फेटाळावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदाराच्या पतीच्या नावे मौजे कोळनुर येथे गट क्र. 160 मध्ये क्षेत्रफळ 00 हेक्टर 11 आर एवढी जमीन आहे. म्हणून तो अपघाताच्या दिवशी शेतकरी होता ही बाब सिध्द होते व तो गैरअर्जदाराचा ग्राहक होतो.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराचे पती दि. 23/04/2012 रोजी अंतोष तोंडारे यांच्यासोबत स्विप्ट कार क्र. एम.एच. 24-व्ही-2445 ने राजेश लासुणेची पत्नी उदगीरहून आपल्या सासुरवाडीस चाकुरला पोहचली. त्यानंतर अंतोष तोंडारे व राजेश लासुणे हे दोघे लातुरहुन दुपारी 4 वाजता उदगीरला जाण्यासाठी निघाले होते नळेगाव मार्गे उदगीरला येत असताना भरधाव वेगात एक मालवाहू टेम्पो ज्याचा नं. 04-बी.जी-7400 आला व त्याने स्विप्ट कारला जोराची धडक दिली. त्यामुळे सदरची कार रस्त्याच्या बाजूला पल्टी खाल्ली त्यामुळे राजेश लासुणे व अंतोष तोंडारे गंभीररित्या जखमी झाले.व त्या अपघातात राजेश लासुणे मरण पावला. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार राजेश लासुणे हा मदयपान करुन वाहन चालवत होता. म्हणून त्यास पॉलीसीचा लाभ दिला जावू नये असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. सदर केस ही शेतकरी अपघात विम्यांतर्गत असून त्यात मयत राजेश्वर लासूणे यांने कोणाचाही अपघात केलेला नाही. व तो सदर अपघाताचा दोषी नाही व त्याच्या मरणास कारणीभूत टेम्पो क्र.04 बी.जी-7400 हा आहे. तसेच राजेश्वर लासुणे याचा शवविच्छेदन अहवाल पाहता त्याचा मृत्यू हा The cause of death of shri Rajeshwar shankarrao lasune is vasovagal shock due to subdural haemotoma due to head injury along c lung haemotoma due to fracture ribs यामुळे झालेला आहे. सदर गाडीचा चालक राजेश्वर लासुणे यांच्यामुळे जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू वा गाडीचा अपघात झाला असता तर सदरची अर्जदार ही शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणा-या रक्कमेस पात्र नव्हती मात्र या ठिकाणी अर्जदाराच्या पतीने कोणताही अपघात केलेला नाही. तो कोणाच्या मृत्यूस कारणीभूत नाही. व तो व्यथीत व्यक्ती असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- देण्यात यावेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम
रु. 1,00,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन
मुदतीत न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 3,000/- आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.