निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 31/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 04/01/2014
कालावधी 02वर्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सविता भ्र.प्रदिप नाईकवाडे. अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.अरुण डी.खापरे.
रा.बाभळगांव ता. पाथरी जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
पाथरी ता. पाथरी जि. परभणी. स्वतः
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि,
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठी मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशोरन्स कं.लि.
अॅड.बन्शीलाल शर्मा यांचा वरचा मजला,
नानलपेठ,परभणी.
4 विभागीय व्यवस्थापक.
न्यु इंडीया अॅशुरन्स कंपनी लि.विभागीय कार्यालय क्र. 153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाउस रोड, पुणे 422005.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पती शेतकरी होते व ते हयात असतांना त्यांच्या मालकीची जमीन मौजे बाभळगांव ता.पाथरी जि. परभणी येथील गट क्रमांक 41 कसून खात होते. वा या बाबत तिच्या मयत पतीचे नाव 8 अ, 6 ड, 6 क, प्रमाणपत्रा मध्ये आलेले आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 07/11/2010 रोजी तिचे मयत पती त्यांचे मित्र नामे दिनकर तुकाराम महिपाल सोबत नांदेड ते बाभळगांवकडे जात असतांना वसमत टोल नाक्याजवळ जिपने धडक देवुन तिच्या पतीस व मित्रास गंभीर जखमी केले व त्यांना नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व उपचारा दरम्यान अर्जदाराचा पतीचा दिनांक 16/11/2010 रोजी मृत्यू झाला व या घटनेबद्दल बसमत पोलीस स्टेशनला माहिती दिली व त्यानुसार गुन्हा नं. 183/10 असा नोंद करण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की, पतीच्या मृत्यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 01/02/2011 रोजी तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रांसह दाखल केला. त्यानंतर तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 21/02/2011 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे सादर केला, व त्यांनी तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला.
अर्जदाराचे म्हणणे की, विमादाव्या बाबत त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 ला चौकशी केली असता त्याने तुमचा विमादावा मंजूर झाल्यानंतर आम्ही कळवु असे सांगीतले व टाळाटाळ केली. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी संगणमत करुन विमादावा प्रलंबीत ठेवलेला आहे. जी की सेवेत त्रुटी आहे. व ते बेकायदेशिर आहे. म्हणून सदरची तक्रार दारखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना असा आदेश करावा की, त्याने अर्जदाराला 1 लाख रु.मृत्यू तारखे पासून 18 टक्के (द.सा.द.शे.) प्रमाण शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 15 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये क्लेमफॉर्म भाग -3 ची प्रत, क्लेमफॉर्म भाग -1 ची प्रत, क्लेमफॉर्म भाग 1 चे सहपत्र, क्लेमफॉर्म भाग -2 चे प्रत, 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, फेरचा उतारा, सहा क प्रमाणपत्र, शपथपत्र, प्रपत्र ग, टी.सी.ची प्रत, बँक पासबुकची प्रत, गुन्हाचे कागदपत्र, एफ.आय.आर.ची प्रत, मरणोत्तर पंचनाम्याची प्रत, पोस्टमार्टेम रिपोर्टची प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारारना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने तिच्या मयत पतीचा विमादावा दिनांक 01/02/2011 रोजी त्यांचेकडे सादर केला व सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिलेल्या त्रुटी नुसार सदर प्रस्तावा मध्ये एफ.आय.आर.ची प्रत, ड्रायव्हींग लायसेंन्सची मागणी केली होती, त्यानुसार दिनांक 13/06/2011 रोजी एफ.आय.आर.ची प्रत विमा कंपनीस आमच्या वरिष्ठ कार्यालया मार्फत पाठविण्यात आली, परंतु अर्जदाराकडून वैध वाहन परवाना ( Valid Deriving License ) प्राप्त झाला नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्रुटीची प़ुर्तता करणेसाठी पाठवलेला मुळ प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारीनी पत्र क्रमांक 3683 दिनांक 02/08/2011 अन्वये आम्हांस परत पाठवला. सदर मुळ प्रस्ताव आम्ही ता.कृ.अ/शेतअवियो/761 दिनांक 04/08/2011 रोजी अर्जदारास परत केला व त्याच वेळी आम्ही अर्जदारास ड्रायव्हींग लायसेंन्ससह पूर्ण प्रस्ताव आमच्याकडे दाखल करावा असे कळविले. व तसेच या बाबत आम्ही अर्जदारास परत एकदा दिनांक 06/09/2011 रोजी पूर्ण कागदपत्रांसह मुळ प्रस्ताव सादर करावा असे कळविले, परंतु अद्याप पर्यंत अर्जदाराने पूर्ण प्रस्ताव आमच्याकडे सादर केलेला नाही. व सदर कामात आम्ही कोणतेही त्रुटी अर्जदारास दिलेली नाही. असे म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 24 वर आपले म्हणणे दाखल केले व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विमा सेवा देणारी संस्था आहे. आमचा आशिलास विमा सेवा पुरविणे व विमा कंपनी व अशील यांच्या मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते. अर्जदाराने आमच्या विरुध्द केलेली तक्रार अपु-या माहितीवर गैरसमजाने आणि चुकीने केलेली आहे. या नेमणुकीसाठी आमच्या संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही. आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून सदर दाव्यातून आम्हाला मुक्त करावे, असे म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि. क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार आमचा ग्राहक नाही व त्याने हप्त्या स्वरुपात कोणतेही रक्कम आमच्याकडे भरलेली नाही व तो ग्राहक होवु शकत नसले कारणाने सदरचा तक्रार अर्ज मंचासमोर चालू शकत नाही, आम्ही विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही.
अर्जदाराने तिच्या मयत पतीचा विमादावा आम्हा विमा कंपनीकडे दाखलच केलेला नाही, त्यामुळे सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून सदरची तक्रार फेटाण्यात यावी, असे म्हंटले आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा तिच्या मयत पतीचा शेतकरी
अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे
प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे मयत पती नामे प्रदीप बाबुअप्पा नाईकवाडे हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभार्थी होते ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील 7/12 उता-यावरुन व नि.क्रमांक 4/6 वरील होल्डींग प्रमाणपत्रावरुन, नि.क्रमांक 4/8 वरील गाव नमुना नं. 6 क वरुन रेव्हेन्यु रेकॉर्ड वरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 07/11/2010 रोजी त्यांच्या मित्रासोबत नांदेडहुन बाभळगांवकडे मोटार सायकलने जात असतांना जिप क्रमांक एम.एच. 26- 0971 ने धडक देवुन गंभीर जखमी होवुन उपचारा दरम्यान दिनांक 16/11/2010 रोजी मृत्यू झाला. ही बाब नि.क्रमांक 4/12 वरील पोलीस कागदपत्रावरुन व नि.क्रमांक 4/13 वरील वसमत पोलीस स्टेशनचे 183/10 च्या एफ.आय.आर.ची प्रत वरुन, व तसेच नि.क्रमांक 4/14 वरील मरणोत्तर पंचनाम्यावरुन व नि.क्रमांक 4/15 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील क्लेमफॉर्म भाग -3 वरुन सिध्द होते. व तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला होता हे देखील वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 चे लेखी जबाबात म्हणणे की, अपु-या कागदपत्रांमुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने सदर प्रस्ताव परत पाठवला व तो अपुरा विमा दावा प्रस्ताव अर्जदारास आम्ही दिनांक 04/08/2011 रोजी प्रस्तावाची त्रुटी पूर्ण करण्यासाठी परत केला. सदर अपु-या कागदपत्रामध्ये एफ.आय.आर.ची प्रत व Valid Driving License ची मागणी केली होती. व परत आम्ही अर्जदारास दिनांक 06/09/2011 रोजी पूर्ण कागदपत्रांसह कार्यालयात लवकर सादर करावा, म्हणून कळविले होते व ते अद्याप पर्यंत अर्जदाराने प्रस्ताव दाखल केला नाही. या बद्दल अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाब सादर केल्यानंतर त्याने तो प्रस्ताव सर्व त्या आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही व पुर्तता केल्याबद्दल अर्जदाराने आपले शपथपत्र मंचासमोर दाखल केला नाही, यावरुन असा अर्थ निघतो की, अर्जदाराने आपला पूर्ण प्रस्ताव दाखल केला नाही व गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, “ अर्जदाराचा कोणताही विमादावा त्यांच्याकडे आला नाही ” हे मंचास योग्यच वाटते. निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच येत नाही वा सिध्द होत नाही, म्हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देते.
राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. म्हणून केवळ तांत्रीक कारणास्तव अर्जदाराचा सदरचा तक्रार अर्ज खारीज करुन त्याच्यावर अन्याय करणे योग्य ठरणार नाही, व परत एकदा अर्जदारास संपूर्ण कागदपत्रांसह विमादावा दाखल करण्याची नैसर्गिक न्यायतत्वा प्रमाणे संधी देणे योग्य होईल. असे मंचाचे ठाम मत आहे. व मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने तिच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत संपूर्ण
आवश्यक त्या कागदपत्रांसह ( Valid Driving License ) परत एकदा आदेश
तारखे पासून 30 दिवसांच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल करावा.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव तात्काळ
गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावा व गैरअर्जदार क्रमांक 2 याने सदर प्रस्ताव
प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव तात्काळ गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवावा व
गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व गोष्टींची शहानिशा करुन तो विमादावा प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसांच्या आत निकाली काढावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.