निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराने मौजे बाकली ता. शिरुर अनंतपाळ येथील जमीन गट नं. 163 व 165 मोजनी करण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 कडे दि. 22/08/2008 रोजी रक्कम रु. 1,000/- फीस भरली व त्यासोबत मोजणी अर्ज व आवश्यक असणारी कागदपत्रे दिली. गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 15/05/2009 रोजी पत्राद्वारे अर्जदारास मोजनीची तारीख 28/05/2009 ते 30/05/2009 या कालावधीत गट क्र. 163, 164, 165 व 168 मोजनीची तारीख दिली. सदरील तारखेस गैरअर्जदाराने मोजनी केली व गट क्र; 168 याची हद्द कायम केली व गट क्र. 163,164,165 याची हद्द कायम केली नाही. सदरच्या गटाच्या हद्दी कायम करण्यासाठी गटाचे मुळ अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे कायम हद्द खुणा करता येत नसल्याचे गैरअर्जदाराच्या वरिष्ठ अधिका-यांनी अर्जदारास सांगितले. अर्जदाराच्या शेताची परत मोजणी दि. 10/08/2009 रोजी करण्यात आली. अर्जदारास मोजणी नकाशाची प्रत दि; 28/06/2009 रोजी दिली. अर्जदारास सदर नकाशात त्रुटी दिसुन आल्या गैरअर्जदाराने खोटा नकाशा करुन दिला. गैरअर्जदाराच्या जिल्हा स्तरावरील अधिका-यानी अर्जदाराच्या तक्रारीकडे लक्ष न देता अर्जदारास परत मोजनीची फिस भरुन गैरअर्जदार क्र. 1 कडुन मोजणी करुन घेण्यास सांगितले आहे. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे अर्जदाराच्या बांधावरील लिंबाची सहा झाडे तोडल्यामुळे रु. 15,000/- चे नुकसान झाले, जमीनीचे क्षेत्र कमी झाले, गट क्र.168 च्या शेजा-यांनी अर्जदाराच्या जमीनीत खोदकाम करुन खडक, व मुरुमाची विक्री केली त्यात रु. 50,000/- चे नुकसान झाले. अर्जदाराने तक्रारी अर्जात नुकसान भरपाई रु. 65,000/- व तक्रारी अर्जाचा खर्च रु. 10,000/-, मानसिक, शारिरीक, अर्थिक त्रासापोटी रु.25,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व एकुण - 11 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र; 1 व 2 यांचे विरुध्द दि. 18/01/2012 रोजी म्हणणे नाही, आदेश पारीत केला आहे.
अर्जदाराने दाखल केलेला तक्रारी अर्ज, पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र, व दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने दि; 22/08/2008 रोजी मोजणी फीस रु. 1,000/- भरली असल्याचे पावतीवरुन दिसुन येते. अर्जदारास गट क्र; 163 व 165 मध्ये अनुक्रमे 90 आर व 1 हेक्टर 86 आर शेतजमीन असल्याचे दाखल केलेल्या सातबाराच्या उता-यावरुन दिसुन येते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा गट क्र. 163 व 165 मोजणी करुन नकाशा दिला आहे. सदर नकाशा निशाणी क्र. 8/1, 8/2 व 8/3 दाखल आहे. भुमिअभिलेख कार्यालय शिरुर अनंतपाळ यांनी दि. 06/10/10 रोजी अर्जदारास पत्र दिले आहे, त्यात दि. 26/08/2009 रोजी मोजणीची प्रत अर्जदारास दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराच्या गट क्र. 163 व 165 चा मोजणी नकाशा गैरअर्जदाराने अर्जदारास दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराचा दि. 26/10/12 रोजी मृत्यू झाल्याचे दाखल केलेल्या मृत्यूपत्रावरुन सिध्द होते. अर्जदाराच्या वारसाने दि. 21/11/2013 रोजी सदर प्रकरणात वारस रेकॉर्डवर घेण्याचा अर्ज दिला आहे. सदरचा अर्ज मंजुर झाला आहे. अर्जदाराच्या वारसाने रेकॉर्डवर वारस घेतले नाही. गैरअर्जदाराविरुध्द दि. 18/01/2012 रोजी नो-से करण्यात आला आहे, यावरुन गैरअर्जदाराचा सदर तक्रारी बद्दल उजर असल्याचे दिसुन येत नाही. अर्जदार हा मयत झाल्यामुळे त्याचे वारस रेकॉर्डवर आले नसल्यामुळे सदरील गैरअर्जदारा बद्दल उजर असल्याचे समोर येत नसल्यामुळे सदरचे प्रकरण नामंजुर करण्यात येत आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.