(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 10 मे, 2011) तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराची मौजा कचेरी सावंगा, सर्व्हे नं.50 येथे एकूण आराजी 1.07 हे.आर. वर्ग—1 ही शेतजमिन आहे. या शेतजमिनीची हद्द कायम करण्याकरीता तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे कार्यालयात दिनांक 20/11/208 रोजी रुपये 500/- भरले. सदर साधारण मोजणी, रक्कम भरल्याचे तारखे पासून सहा महिन्यांचे आत करावयाची असून देखील गैरअर्जदार यांनी अद्यापपावेतो मोजणी करुन त्याचे सिमांकन करुन दिलेले नाही. सदर बाबीसंबंधी तक्रारदाराने दिनांक 26/2/2009 रोजी तहसिलदार कोंढाळी सर्कल तहसिल कचेरी यांना देखील अर्ज दिलेला होता. त्याचप्रमाणे दिनांक 1/3/2010 रोजी गैरअर्जदार यांनी पाठविलेल्या पत्रानुसार व त्याद्वारे कळविल्यानुसार तक्रारदार सदर शेतात सांगीतलेले साहित्य घेऊन उपस्थित होता, परंतू गैरअर्जदार यांनी सदर शेतजमिनीची मोजणी करुन त्याचे सिमांकन करुन दिले नाही, परंतू गैरअर्जदाराने को-या कागदावर तक्रारदाराच्या सह्या घेतल्या. सदर शेतजमिनीचे सिंमाकन करुन न दिल्यामुळे तक्रारदारास विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागला, ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता असल्यामुळे गैरअर्जदार यांनी सदर शेतजमिनीचे सिमांकन करुन द्यावे, मानसिक त्रासासाठी रुपये 70,000/- व दाव्याचे खर्चाबाबत रुपये 5,000/- मिळावेत, म्हणुन सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सदरची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत 7/12 चा उतारा, पावती, भूकरमापकाचे पत्र, तक्रारदाराचे पत्र, जिल्हाधिका-यांचे पत्र, नोटीस, सुधारीत मोजणी फीचे परीपत्रक, नागरिकांची सनद असे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे रजीस्टर्ड पोस्टाने नोटीस बजाविण्यात आली. त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 20/11/2008 रोजी तक्रारदाराने सदर शेतजमिनीचे साधारण हद्द कायम मोजणीचे फीपोटी रुपये 500/- गैरअर्जदार यांचेकडे भरल्याचे तक्रारदाराचे म्हणणे मान्य केलेले आहे. गैरअर्जदाराचे मते सदर तक्रार अर्जाला 67/8 मोजणी रजीस्टर्ड नंबर देण्यात आला. गैरअर्जदाराने दिनांक 11/3/2010 रोजी मोजणी नोटीस तयार करुन दिनांक 26/3/2010 रोजी सदर शेतजमिनीची मोजणी ठेवण्यात आली. सदर मौक्यावर गैरअर्जदाराने मोजणीची कार्यवाही केली त्यावेळेस तक्रारदार त्याठिकाणी हजर होते. त्यांनी दाखविलेल्या वहिवाटीनुसार श्री रामदास यादवराव वाघमारे व श्री जीवन शामराव मारबते यांचेसमक्ष मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्ष दाखविलेली वाहिवाट व नकाशा मेळात नसल्यामुळे हद्दी (सिमांकन) करुन देण्यात आली नाही. सदर शेतजमिनीचे सिमांकन करण्यास गैरअर्जदाराने तक्रारदार व लगत खातेदार यांना दिनांक 10/2/2011.रोजी आगाऊ नोटीसने कळवून दिनांक 18/2/2011 रोजी सिमांकन दाखविण्यासाठी तारीख कळविण्यात आली, परंतू तक्रारदार मौक्यावर गैरहजर होते, त्यामुळे त्यांना सिमांकन दाखविता आले नाही. मौक्यावर लगत खोतेदार उपस्थित होते व त्यांचेसमक्ष पंचनामा करण्यात आला. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदाराने मोजणी वेळेत पूर्ण केलेली आहे आणि सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी कुठलाही कसूर केला नाही. त्यामुळे योग्य निर्णयाद्वारे सदर प्रकरण निकाली काढावे अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. गैरअर्जदाराने त्यांचा जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केलेला असून, सोबत लगत धारकांना दिलेल्या नोटीस, अर्जदाराचे जबाब/प्रतिवेदन, नोटीस, पंचनामा, मोजणीची क प्रत असे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. // का र ण मि मां सा // प्रस्तूत प्रकरणातील वस्तूस्थिती व दाखल पुरावे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारदाराने त्याचे मौजा कचेरी सावंगा येथील गट क्र. 650 या शेतजमिनीची हद्द कायम मोजणीकरीता गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 20/11/08 रोजी रुपये 500/- भरले होते आणि ही बाब गैरअर्जदार यांनी देखील त्यांचे जबाबात मान्य केलेली आहे. कागदपत्र क्र.6 ते 14 वरील दस्तऐवजे व नोटीस लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी सदर शेतजमिनीचे मोजणीसंबंधी दिनांक 11/3/2010 रोजी तक्रारदार व लगत शेतजमिन धारकांना नोटीस पाठवून दिनांक 26/3/2010 रोजी सदर शेतजमिनीची मोजणी केली होती असे दिसून येते, परंतू 7/12 चा उतारा, नकाशा व वहिवाट मेळात नसल्यामुळे गैरअर्जदाराने सदर शेतजमिनीचे सिमांकन करुन दिले नाही ही बाब कागदपत्र क्र.33 वरील जबाब/प्रतिवेदनमध्ये तक्रारदाराने देखील मान्य केलेली आहे. तक्रारदाराचे मते गैरअर्जदाराने को-या कागदांवर तक्रारदाराच्या सह्या घेतल्या होत्या ही बाब पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही व ‘अ’ प्रतीवरुन देखील ह्या बाबीस पुष्टी मिळते. त्यानंतर गैरअर्जदाराने तक्रारदाराला सिमांकन दाखविण्याकरीता दिनांक 10/2/2011 रोजी नोटीस पाठवून दिनांक 18/2/2011 रोजी सदर शेतजमिनीच्या सिमांकनाची तारीख ठरविण्यात आलेली होती असे कागदपत्र क्र.34 व 35 वरील दस्तऐवजांवरुन निदर्शनास येते. कागदपत्र क्र.37 वरील पंचनाम्यावरुन सदर तारखेस तक्रारदार गैरहजर असल्यामुळे तक्रारदारास सदर शेतजमिनीचे सिमांकन दाखविता आले नाही व लगतचे खातेदार उपस्थित होते व त्यांचेसमक्ष पंचनामा करण्यात आल्याचे दिसून येते. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी मोबदला घेऊन सुध्दा तक्रारदाराचे सदर शेतजमिनीचे सिमांकन करुन दिलेले नाही ही तक्रारदाराची तक्रार या मंचाला मान्य करता येणार नाही, परंतू कागदपत्र क्र.63 वर दाखल केलेली महाराष्ट्र शासनाची ‘नागरिकांची सनद’ आणि गैरअर्जदार यांचा जबाब लक्षात घेता, तक्रारदाराने सदर शेतजमिनीचे सिमांकन करुन घेण्यासाठी गैरअर्जदार यांचे कार्यालयात दिनांक 20/11/2008 रोजी मोबदल्यापोटी रुपये 500/- भरले होते, परंतू कागदपत्र क्र.63 वर दाखल केलेली महाराष्ट्र शासनाची नागरिकांची सनद लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी सदर शेतजमिनीची साधारण कायम हद्द मोजणी सहा महिन्यांचे आत करुन द्यावयास हवी होती, परंतू सदरचे सिमांकनाची कारवाई गैरअर्जदाराने वेळेत न करता दिनांक 11/3/2010 रोजी नोटीस देऊन दिनांक 26/3/2010 रोजी म्हणजेच जवळपास एक वर्षे 3 महिन्यानंतर करुन देणे ही गैरअर्जदाराने तक्रारदाराला दिलेल्या सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- व दाव्याचे खर्चापोटी रुपये 300/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 1,300/- (रुपये एक हजर तिनशे फक्त) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |