( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 26, आक्टोबर, 2010 ) तक्रारकर्ते श्री लक्ष्मणराव उपासराव सोनकुसरे, रा.वार्ड नं.5, बारई मोहल्ला, पारशीवनी, ता.पारशिवनी,जि.नागपूर, यांची तक्रार विरुध्द पक्ष तालुका निरिक्षक भुमि अभिलेख कार्यालय, पारशिवनी, ता. पारशिवनी, जि.नागपूर. यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायद 1986 च्या कलम 12 अन्वये, विरुध्द पक्ष यांचे कार्यालयात शेतीच्या साधारण पोट हिस्सा मोजणी करीता आवश्यक ती फि भरल्यानंतरही आजपावेतो मोजणी करुन दिली नाही व त्यांच्या सेवेत त्रुटी आहे त्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी सदर तक्रार मंचामध्ये दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने मंचास विरुध्द पक्षाने अतितात्काळ पोटहिस्सा मोजणी त्वरीत करुन द्यावी. तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मिळावे. असा या मंचाने आदेश पारित करावे अशी मागणी या मंचास केलेली आहे. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे - तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दिनांक 26.6.2009 रोजी विरुध्द पक्षाकडे पोस्टाद्वारे अतितात्काळ पोटहिस्सा मोजणी करिता रुपये 2,000/- एवढी रक्कम भरली. त्यांची पोचपावती प्रकरणात दाखल आहे.
- तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे, नियमानुसार मोजणीकरिता रक्कम भरल्याचे दिनांकापासुन 2 महिन्याचे आत मोजणी करुन देणे बंधनकारक आहे. परंतु तक्रारकर्त्यांनी अर्ज करुन, दिनांक 10.5.2010 रोजी 11 महिन्यांचा कालावधी उलटुन देखील मोजणी करुन दिली नाही. त्यामुळे मंचात वर नमुद तक्रार दाखल केली.
- तक्रारकर्त्याने त्यांचे तक्रारीसोबत एकुण 9 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात अतितात्काळ पोटहिस्सा मोजणी अर्ज पोस्टाने पाठविल्याच्या पोचपावती प्रत, मोजणीच्या अर्जाची प्रत, विरुध्द पक्षाचे पत्र , वकीलाकडुन पाठविलेली नोटीस आणि पावत्या इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
- तक्रार दाखल झाल्यावर मंचाने विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन विरुध्द पक्ष हजर झाले व त्यांनी दिनांक 8.7.2010 रोजी आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात मंचास अधिकार क्षेत्र नसल्याचा प्राथमिक आक्षेप घेतलेला आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाचे कार्यालय हे सेवा देणारे कार्यालय नाही. त्यामुळे कुठलीही सेवेतील त्रुटी ठरत नाही. तसेच सिटी सर्व्हे व भुमी अभिलेख खाते हे ग्राहक सरंक्षण अधिनियमा अंतर्गत सेवा या सदरात मोडत नाही त्यामुळे सदर तक्रार ही मा.न्यायमंचाचे अधिकार क्षेत्राचे बाहेर आहे. विरुध्द पक्षाने नमुद केले आहे की, मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी एका अप्रकाशीत निवाडयात सिटी सर्व्हे, भुमी अभिलेख कार्यालये सेवा देणारे कार्यालय नसुन ती कार्यालये ग्राहक सरंक्षण कायद्या या सदरात मोडत नाही.
- विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वर नमुद तक्रार ही महा.राज्य जमीन महसुल अधिनियम, 1966 च्या प्रावधानिक तरतुदींचा वापर न करता व संबधीत महसुल अधिकारी यांचेकडे तक्रार न करता मा.मंचासमक्ष दाखल करुन फक्त मंचाकडुन अनुचित लाभ प्राप्त करण्याचे हेतुने दाखल केलेली आहे. सदर तक्रारकर्त्याने तथ्यहीन तक्रार दाखल केली आहे.
- विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने दिनांक 26.6.2009 रोजी मोजणी बाबतची फी मनिऑर्डरद्वारे भरणा केली ही बाब मान्य केली आहे. विरुध्द पक्षाने इतर विपरित विधाने अमान्य केली आहे. विरुध्द पक्षाने त्यांचे अतिरिक्त कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने मोजणी अर्ज ही अपुर्ण माहीती भरुन सादर केला आणि त्यांची पुर्तता तक्रारकर्त्याने सदर तक्रार अर्ज दाखल करेपर्यत पुर्ण केली नाही.
- विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने मोजणी अर्ज तक्रारीत दस्तऐवज क्रमांक 4 वर दाखल केला आहे. त्यास परिशिष्ट अ पान क्रमांक 2 वर लागणा-या माहिती आणि सहया/ पत्ते वगैरे अपुर्ण व त्रुटीपुर्ण अवस्थेत असुन, तसेच मोजणी कार्यालयात सादर केली आहे. विरुध्द पक्षाने मान्य केले आहे. जर तक्रारकर्त्याने त्यांचा मोजणी अर्जात असलेल्या त्रुटींची पुर्तता केली तर तक्रारकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे त्यांची मोजणी करुन देता येईल. त्यामुळे विरुध्द पक्षाचे सेवेत कुठलही त्रुटी नाही म्हणुन तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तराचे पु्ष्ठर्य्थ कुठलेही कागदपत्र/दस्तावेज दाखल केले नाही.
- तक्रारीत दाखल कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षण आणि निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- तक्रारकत्याने दिनांक 26.06.2009 रोजी मोजणीकरिता पैसे भरुन विरुध्द पक्षाकडे अर्ज केला होता ते दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते, आणि विरुध्द पक्षांनी आजपावेतो मोजणी करुन दिली नाही, मान्य केल्यामुळे वादातीत आहे.
- विरुध्द पक्षाचे म्हणणे की, तक्रारकर्त्याचा अर्ज त्रुटीपुर्ण असल्यामुळे विरुध्द पक्षाने मोजणी करुन दिली नाही. हया म्हणण्यात मंचाला तथ्य वाटत नाही. कारण हयाबद्दल तक्रारकत्याला विरुध्द पक्षाने कधीच कळविले नाही ही मंचाचे मते विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रुटी ठरते. सबब आदेश खालीलप्रमाणे.
-// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर. 2. विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 45 दिवसाचे आत तक्रारकर्त्याचे पोटहिस्स्याची मोजणी करुन द्यावी. 3. विरुध्द पक्षाने मानसिक त्रासापोटी रुपये 500/-( रुपये पाचशे फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 500/-(रुपये पाचशे फक्त) असे एकुण रुपये 1,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs. Jayshree Yende] MEMBER | |