-/// आ दे श ///- (पारीत दिनांक 25 जानेवारी, 2011) 1. तक्रारदार श्री भिक्षू मिलींद रथविर, राहणार सकरला, पोस्ट दहेगाव (जोशी) ता. पारशिवनी, जि.नागपूर यांनी सदर तक्रार विरुध्द पक्ष नं.1 तालुका निरीक्षक अधिकारी, भूमि अभिलेख कार्यालय, पारशिवनी, ता. पारशिवनी, जि.नागपूर यांनी तक्रारदारास मोजणी, सिमांकन व ‘क’ प्रत न दिल्यामुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे नुकसान भरपाई मिळण्याबाबत तसेच गैरअर्जदार नं.2 व 3 यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 10,000/- द्यावेत म्हणुन ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. 2. तक्रारदाराच्या तक्रारीतील तपशिल थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. 3. तक्रारदार भूमी क्र.128, मौजा सकरला, प.ह.नं.8, आराजी 1.03 हे.आर. या जमिनीचे मालक आहेत आणि त्यांनी दिनांक 15/9/2009 रोजी अतितात्काळ मोजणीकरीता रुपये 1,500/- एवढी रक्कम विरुध्द पक्ष नं.1 यांचेकडे भरली. तसेच तक्रारदाराने दिनांक 23/3/2010 रोजी पुनर्भेट मोजणी फी म्हणुन रुपये 750/- एवढी रक्कम सुध्दा भरली. परंतू विरुध्द नं.1 यांनी वर विवरणातील जमिनीचे मोजणी व सिमांकन अद्यापी करुन दिले नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे आणि त्यामुळे तक्रारदाराने मंचास विनंती केली आहे की, विरुध्द पक्ष नं.1 ने तक्रारदाराला मोजणी, सिमांकन करावे आणि त्याबद्दलची ‘क’ प्रत तक्रारदाराला देण्यात यावी आणि तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 30,000/- आणि पिक नष्ट झाल्याबाबत रुपये 40,000/- अशी एकूण रुपये 70,000/- एवढी नुकसान भरपाई विरुध्द पक्ष नं.1 ते 3 यांनी तक्रारदाराला द्यावी. 4. तक्रारदाराने आपले तक्रारीसोबत एकूण 20 कागदपत्रे दाखल केली असून, त्यामध्ये 7/12 चा उतारा, फोटो, नकाशा, आममुख्तयारपत्र, पावती महाराष्ट्र शासन राजपत्र इत्यादी दस्तऐवजांचा समावेश आहे. 5. विरुध्द पक्षाला मंचातर्फे पंजीकृत डाकेद्वारे नोटीस बजाविली व ते मंचात उपस्थित राहून त्यांनी दिनांक 22/10/2010 ला आपले लेखी उत्तर दाखल केले. आणि विरुध्द पक्ष नं.2 व 3 यांनी दिनांक 22/11/2010 रोजी मंचात हजर होऊन त्यांचे लेखी उत्तर दाखल केले. 6. विरुध्द पक्ष नं.1 यांनी त्यांचे उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारदाराने दिनांक 15/9/2009 रोजी भूमी क्रमांक 128 चे अतितात्काळ मोजणीकरीता त्यांचे कार्यालयात रक्कम भरणा केल्याची बाब मान्य केली. त्या अनुषंगाने मोजणी मामला क्रमांक 497/09 अन्वये इकडील कार्यालयाने अर्जदार व लगतधारकांना आगाऊ पूर्व नोटीस तामील करण्यात आली आणि मोजणीची तारीख दिनांक 22/12/2009 ला ठरली होती. दिनांक 21/12/2009 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्ष नं.1 यांचे कार्यालयात दिनांक 22/12/2009 ची मोजणी तारीख पुढे वाढविण्यात यावी असा अर्ज सादर केला, त्यामुळे विरुध्द पक्ष नं.1 यांनी मोजणी प्रकरण नस्ती नोटीस पारीत केली. 7. तक्रारदाराने दिनांक 22/3/2010 ला मोजणी प्रकरणा पुनर्भेट फी रुपये 750/- एवढ्या रकमेचा भरणा करुन मोजणी मामला क्रमांक 551/10 अन्वये इकडील कार्यालयाने सदर भूमी क्रमांक 128 ची मोजणी प्रकरणात तक्रारदार व लगतधारकांना आगाऊ पूर्व नोटीस तामील करण्यात आली आणि दिनांक 19/5/2010 रोजी प्रत्यक्ष मोजणी करुन भूमी क्रमांक 128 ची मोजणी करण्यात आली. दिनांक 20/3/2010 च्या मोजणीत हद्दीच्या खुणा कायम करण्यात आलेल्या नकाशाप्रमाणे संबंधित, धारकांना समजावून सांगीतले आणि तसे पंचनामा/जबाब नोंदवून सदरच्या मोजणी प्रकरणात संलग्न करण्यात आले. 8. विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात हेही नमूद केले आहे की, भूमी क्रमांक 128 बद्दलची मोजणी तक्रारदाराला मान्य नसल्याचे मोजणी शिटवर व जबाबात नमूद आहे आणि सदरहू मोजणीची ‘क’ प्रत इकडील कार्यालयाचे जावक क्रमांक 1237 अन्वये पोस्टाद्वारे तक्रारदाराला पाठविण्यात आले आहेत. 9. विरुध्द पक्ष नं.1 यांनी त्यांचे उत्तरासोबत एकूण 8 कागदपत्र दाखल केले असून, त्यामध्ये राजपत्रिक आदेशाची प्रत, 7/12 चा उतारा, तक्रारदार आणि इतर भूमिधारकांना पाठविलेली नोटीस, जबाबाची प्रत आणि तक्रारदाराला पाठविलेली क प्रत इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. 10. विरुध्द पक्ष नं.2 जानबा देवराव वासनिक आणि विरुध्द पक्ष नं. 3 श्रीमती कोमरुबाई नरसया बयन्ना यांनी त्यांचे उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारदाराची तक्रार त्यांचेविरुध्द प्रत्यक्ष नाही. फक्त त्यांना मानसिक त्रास देण्याचे हेतूने सदर तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार रुपये 10,000/- दंडासह खारीज करण्यात यावी अशी गैरअर्जदार यांची विनंती आहे. 11. विरुध्द पक्ष नं.3 यांनी त्यांचे उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारदाराने स्वतः विरुध्द पक्ष नं.3 चे जमिनीवर अतिक्रमन केले आहे आणि त्या वादाबद्दल विरुध्द पक्ष नं.3 यांनी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे आणि जे आजही प्रलंबित आहे. त्यामुळे सदर वाद हा ग्राहकवाद नसून दिवाणी स्वरुपाचा आहे. म्हणुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. 12. विरुध्द पक्ष नं.3 यांनी त्यांचे उत्तरासोबत 11 कागदपत्रे दाखल केली असून, त्यामध्ये दिवाणी वाद क्र.37/10 ची प्रत, नकाशा, क प्रत, 7/12 चा उतारा, कब्जापत्र, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचे आदेशाची प्रत, पोलीस स्टेशन यांना केलेल्या तक्रारीची प्रत आणि इतर कागदपत्रांचा त्यामध्ये समावेश आहे. 13. दिनांक 13/1/2011 रोजी मंचाने तक्रारदाराचे वकीलाचा युक्तीवाद ऐकला. विरुध्द पक्ष नं.1 यांनी त्यांचे उत्तरच युक्तीवाद समजण्यात यावा अशी विनंती केली. 14. रेकॉर्डवरील सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, मंचाचे निरीक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. 15. तक्रारदाराने मोजणी आणि सिमांकन करण्याकरीता विरुध्द पक्ष नं.1 यांचे कार्यालयात दिनांक 15/9/2009 रोजी रुपये 1,500/- आणि दिनांक 23/3/2010 रोजी रुपये 750/- एवढी रक्कम भरणा केलेली आहे ही बाब रेकॉर्डवरील पावत्या यावरुन सिध्द होते. परंतू विरुध्द पक्ष नं.1 यांची सेवेतील त्रुटी सिध्द करण्याकरीता तक्रारदार असमर्थ आहे असे आमचे मत आहे. कारण विरुध्द पक्ष नं.1 यांनी त्यांचे उत्तरात नमूद बाबींच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे दाखल केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे आढळून येते की, विरुध्द पक्ष नं.1 यांनी मोजणी मामला दाखल करुन शासकीय नियमाप्रमाणे तक्रारदार आणि इतर भूमीधारकांना नोटीस बजावून भूमी क्र. 128 ची मोजणी आणि सिमांकन केलेले आहे आणि तक्रारदारास ‘क’ प्रत सुध्दा पाठविलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष नं.1 यांचे सेवेत त्रुटी सिध्द झाली नाही. 16. विरुध्द पक्ष नं.2 व 3 यांचेविरुध्द तक्रारीत कुठलाही आक्षेप नाही. तक्रारदार यांनी फक्त विरुध्द पक्ष नं.2 व 3 यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्याकरीता तक्रार दाखल केली आहे ह्या विरुध्द पक्षाच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मंचाचे मत आहे. 17. विरुध्द पक्ष नं.3 आणि तक्रारदार यांचेमध्ये दिवाणी दावा प्रलंबित आहे हे रेकॉर्डवरील कागदपत्रांवरुन आढळून येते आणि त्यामुळे हातातील तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 18. सबब हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार विरुध्द पक्ष नं.1 विरुध्द खारीज करण्यात येते. 2) तक्रारदाराने विरुध्द पक्ष नं.2 आणि 3 यांना रुपये 1,000/- प्रत्येकी द्यावेत. 3) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |