Maharashtra

Bhandara

CC/18/21

Bhagwan Motiram Bawankar. - Complainant(s)

Versus

Taluka Krushi Adhikari. Pawani - Opp.Party(s)

Adv.Kiran B. Yewale

17 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/21
( Date of Filing : 16 Apr 2018 )
 
1. Bhagwan Motiram Bawankar.
R/o BELARAM GRAMPANCHAYAT TOLA. PAWANI.
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krushi Adhikari. Pawani
Pawani.
BHANDARA
MAHARASHTRA
2. The Oriental Insurance Co. L.T.D.
Divisional Office No. 3 Pune
PUNE
MAHARASHTRA
3. Zilla Adhikshak Krushi Adhikari Karyalaya
Civil Lines. Bhandara.
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv.Kiran B. Yewale , Advocate
For the Opp. Party:
Dated : 17 Sep 2019
Final Order / Judgement

                      (पारीत व्‍दारा  श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                                                                   (पारीत दिनांक– 17 सप्‍टेंबर, 2019)   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं- 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, त्‍याची पत्‍नी मृतक आशा भगवान बावनकर (विवाहापूर्वीचे नाव बेबी जानबा बेलखोडे) ही  व्‍यवसायाने शेतकरी होती व तिचे मालकीची माहेरचे नावाने मौजा वलनी, तहसिल पवनी,जिल्‍हा भंडारा, तलाठी साझा क्रं 21 गट क्रं 126/1-अ, क्षेत्रफळ-0.13 हेक्‍टर आर आणि गट क्रं-127/1, क्षेत्रफळ-0.7 आर असे मिळून एकूण क्षेत्रफळ 0.20 हेक्‍टर आर एवढी  शेत जमीन होती.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याची पत्‍नी नामे आशा भगवान बावनकर ही दिनांक-17.04.2016 रोजी मौजा बेटाळा, तहसिल पवनी, जिल्‍हा भंडारा येथे कावळे यांच्‍या शेतीवर गवत आणीत असताना पाय घसरुन तिचे मानेच्‍या मणक्‍याला मार लागला आणि त्‍याच दिवशी वैद्यकीय उपचारा दरम्‍यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तिचा मृत्‍यू  झाला. यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-1) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने तो पती या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे. पत्‍नीचे मृत्‍यू नंतर त्‍याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी पवनी, जिल्‍हा भंडारा  यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयाने दिनांक-04.05.2018 रोजी तक्रारकर्त्‍याचे नावे पत्र देऊन त्‍याव्‍दारे दावा पत्र पॉलिसी संपल्‍या नंतर 90 दिवसा पेक्षा जास्‍त कालावधी नंतर सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केला असे कळविले. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याने विहित कालावधीत विमा दावा सादर केलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून त्‍याचा  विमा दावा नामंजूर केला आणि ही विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे तकारकर्त्‍याला  दिलेली दोषपूर्ण सेवा असून त्‍यामुळे त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून  शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- मागितली असून त्‍याला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-7000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍याची विनंती केली.

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी पवनी, तालुका पवनी जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 62 वर दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरात नमुद केले की, मृतक बेबी जानबा बेलखोडे (विवाहापूर्वीचे नाव) मौजा वलनी, तालुका पवनी, जिल्‍हा भंडारा हिचा अपघात दिनांक-06.04.2016 (सदर तारीख चुकीची असून ती 17.04.2016 अशी अभिलेखावरुन दिसून येते) रोजी झालेला असून तिचे मृत्‍यू नंतर विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयास दिनांक-05.08.2017 रोजी प्राप्‍त झाला, त्‍यांनी लगेच सदर विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह मा.जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक-07.08.2017 रोजी सादर केला. पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव पडताळणी करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविला असल्‍याचे नमुद केले.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने आपले लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 60 व 61 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, मृतक आशा भगवान बावनकर ही दिनांक-17.04.2016 रोजी मृत्‍यू पावली परंतु तिचे पती श्री भगवान मोतीराम बावनकर यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दिनांक-16.08.2018 रोजी दाखल केली त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे ती विहित मुदतीत दाखल केलेली नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याची पत्‍नी सौ.आशा भगवान बावनकर हिचे मृत्‍यू नंतर विमा दावा प्रस्‍ताव विमा पॉलिसी संपल्‍या नंतर 90 दिवसां पेक्षा जास्‍त कालावधी नंतर दाखल केलेला असल्‍याने सदर विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केलेली कृती ही कायदेशीर असून विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार केलेली आहे. सबब तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

05.    तक्रारकर्त्‍याने  तक्रारीचे पृष्‍टयर्थ पृष्‍ठ क्रं- 20 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण-22 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये क्‍लेम फॉर्म भाग अ व ब , क्‍लेम फॉर्म भाग 1 ते 3, मृतक हिचे आधारकॉर्ड, जन्‍म प्रमाणपत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र शेतीचे 7/12 उतारे, फेरफारपत्रक, गाव नमुने, वारसान प्रमाणपत्र, गावनमुना आठ-अ, दावा नामंजूरीचे पत्र, पोलीस दस्‍तऐवज अश्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 63 ते 67 वर तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचा शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पृष्‍ट क्रं-73 ते 77 वर त.क.ने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

06.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 69 वर दाखल केले.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 60 व 61 वर दाखल केले. तसेच  पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 70  वर दाखल केले. पृष्‍ट क्रं-71 वर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

08.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी यांचे उत्‍तर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर इत्‍यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. त.क. तर्फे वकील श्री येवले तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री विनय भोयर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला,त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

   

                                               :: निष्‍कर्ष ::

09.   सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याची पत्‍नी ही व्‍यवसायाने शेतकरी होती, तिचा विम्‍याचे वैध कालावधीत दिनांक-17.04.2016 रोजी अपघाताने मृत्‍यू झाला होता या बाबी उभय  पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्त्‍याने विमा योजनेच्‍या अटी व शर्ती प्रमाणे विमा योजनेच्‍या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केला असे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-04.05.2018 रोजीचे तक्रारकर्त्‍याचे नावे  दिलेले दावा नामंजूरीचे पत्र पान क्रं 52 वर दाखल केले, त्‍यामध्‍ये दावा पत्र पॉलिसी नंतर 90 दिवसां पेक्षा जास्‍त कालावधी नंतर सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर करण्‍यात आलेला आहे असे नमुद आहे त्‍यामुळे या एकाच विमा दावा नामंजूरीचे कारणावर विचार होणे आवश्‍यक आहे.

10.    तक्रारकर्त्‍याने  विमा दावा प्रस्‍तावा सोबत शेतीचे आवश्‍यक दस्‍तऐवज जोडले असल्‍याची बाब दाखल विमा दावा प्रस्‍तावाचे प्रती वरुन सिध्‍द होते. शेतीचे दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी ही अपघाताचे वेळी शेतकरी होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू नंतर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली असून त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह त्‍यांचे कार्यालयास दिनांक-05.08.2017 रोजी प्राप्‍त झाला आणि त्‍यांनी पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्‍हणजे दिनांक-07.08.2017 रोजी सादर केल्‍याचे नमुद आहे. त.क.चे पत्‍नीचा दिनांक-17.04.2016 रोजी अपघाताने मृत्‍यू झाला होता व त्‍याने सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-05.08.2017 रोजी  दाखल केला.

11.  महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 परिपत्रका अनुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2015-2016 या वर्षा करीता राबविली होती आणि त्‍यामध्‍ये अपघाती मृत्‍यू आल्‍यास संबधित शेतक-याला रुपये-2,00,000/- विमा संरक्षण देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने स्विकारलेली होती. 

12.   तक्रारकर्त्‍याचे  पत्‍नीचा अपघाताने दिनांक-17.04.2016 रोजी मृत्‍यू झाला होता आणि विमा योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसांच्‍या आत विमा दावा दाखल करणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्त्‍याने सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयात दिनांक-05.08.2017  रोजी दाखल केला आणि त्‍यांनी पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्‍हणजे दिनांक-07.08.2017 रोजी सादर केल्‍याचे नमुद आहे. महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 चे परिपत्रकातील परिच्‍छेद क्र 5 प्रमाणे विमा दावा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखरेच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी, योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपलया नंतर 90 दिवसा पर्यंत, तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल. शिवाय समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव  सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्‍तव विमा कंपनीला विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने पॉलिसी पिरेडच्‍या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्‍यामुळे दावा नामंजूर करण्‍यात आलेला आहे असे जे दिनांक-04.05.2018 रोजीचे दावा नामंजूरीचे पत्रात दिलेले कारण हे उपरोक्‍त शासन निर्णयावरुन चुकीचे दिसून येते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्त्‍याचा  अस्‍सल विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शारिरीक मानसिक त्रास होणे स्‍वाभाविक आहे.

13.   या मंचा तर्फे विमा दावा मुदती संबधात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते.

  1. Hon’ble Maharashtra State Disputes Redressal Commission, Mumbai-Appeal No.- A/15/580, Decided on- 25th April, 2018- “Futere Generali India Insurance Co.Ltd.-Versus- Mrs. Kalpana Rajendra Rajpure”​                                                                 मंचा तर्फे सदर न्‍यायनिवाडयाचे वाचन केले असता आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांनी असे नमुद केले की, मृतकाचे कायदेशीर वारसदारांनी विमा दावा दाखल करण्‍यास 05 महिन्‍याचा उशिर  केला परंतु अशिक्षीत कुटूंबातील सदस्‍य असल्‍याने त्‍यांना विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे ज्ञान नसते. त्‍याच प्रमाणे सदर शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या अटी व शर्ती मध्‍ये नमुद केलेले आहे उशिरा प्राप्‍त झालेल्‍या विमा दाव्‍यांची योग्‍य ती शहानिशा करुन विमा दावा मंजूर करावेत असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.

*****

  1. Addl.D.C.D.R.F.Nagpur C.C. No.17/3 Decided on-18th August 2018 “Shri Ratiram Ramchandra Ukey and others-Versus-New India Assurance Company Ltd. And others.

    सदर न्‍यायानिवाडया मध्‍ये सुध्‍दा समर्थनीय कारणास्‍तव 90 दिवसा नंतर सुध्‍दा विमा दावे स्विकारावेत अशी सुचना विमा कंपनीला शासन निर्णयात केलेली आहे.

*****

  1. Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

    उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. हातातील प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला विमा दावा नाकारल्‍याचे पत्र ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्‍या नंतर म्‍हणजे दिनांक-04.05.2018 रोजी दिलेले आहे आणि  तक्रारकर्त्‍याने त्‍यापूर्वीच प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंच भंडारा यांचे  समोर दिनांक-16.04.2018 रोजी दाखल केलेली आहे.

*****

  1. Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-3216 of 2016 Decided on-01st August, 2018-“National Insurance Company-Versus-Hukam Bai Meena and others.

    उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात विमा कंपनीने विमा दावा दाखल करण्‍यास का उशिर झाला? याचे स्‍पष्‍टीकरण संबधितां कडून मागविण्‍यासाठी संधी देणे आवश्‍यक असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.

*****

(5).   मंचाव्‍दारे मा. राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी विम्‍याच्‍या संदर्भात दिलेल्‍या Landmark न्‍यायनिवाडयावर आपली भिस्‍त ठेवली आहे. त्‍याचा तपशिल असा आहे.

      REVISION PETTTION NO. 3118-3144 OF 2010  Lakshmi Bai & Ors. ICICI Lombard General Insurance   Dated 05 August, 2011

   या न्‍यायनिवाडयामधील परिच्‍छेद क्रं. 13 मधील अनुक्रंमांक 2) Cases where claim is made to nodal officer or nodal officer has forwarded the claim to Insurance Company or claim has been directly filed with Insurance Company within 2 years of the death and the claim has remained undecided. In such a case the cause of action will continue till the day the Respondent/insurance Company pays or rejects the claim.

       मंचा तर्फे आणखी स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, वस्‍तुतः विमा योजनेचा कालावधी संपल्‍याचे दिनांका पासून 90 दिवसांचे आत विमा दावा दाखल करावा ही अट मार्गदर्शक (Directory) असून बंधनकारक (Mandatory) नाही तसेच 90 दिवसांची मुदत संपल्‍यावरही विलंबा नंतर समर्थनीय कारणांसह प्रस्‍ताव स्विकारावा असे शासन निर्णयात नमुद आहे.

14.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- त्‍याने सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचा दिनांक-05.08.2017 रोजी नंतर महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपत्रकाप्रमाणे सर्वप्रथम विमा दावा दाखल केल्‍या नंतर विमा कंपनीला विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्‍हणजे दिनांक-05/10/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहे. या ठिकाणी विशेषत्‍वाने नमुद करावेसे वाटते की, तक्रारकर्त्‍याने आपले तक्रारीचे मागणी मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून त्‍याला झालेल्‍या शारिरीक मानसिक त्रासा बद्यल तसेच तक्रारीचे खर्चा बद्यल एकूण रुपये-7000/- ची मागणी केलेली आहे. तसेच अशीही मागणी केलेली आहे की, ग्राहक मंचाला वाटल्‍यास तक्रारकर्त्‍याचे बाजूने योग्‍य ती दाद मंजूर करावी त्‍यामुळे या प्रकरणातील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍याला  विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

15.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                :: आदेश ::

(01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी, नागपूर यांचे विरुध्‍द मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) दिनांक-05/10/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(1) तालुका कृषी अधिकारी, पवनी,जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.