अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव तक्रार क्रमांक 1029/2010 तक्रार दाखल तारीखः- 10/08/2010
तक्रार निकाल तारीखः- 26/03/2014
कालावधी 03 वर्ष 07 महिने 16 दिवस
निशाणी – 28
यमुनाबाई विठठल कोळी, तक्रारदार
उ.व. 40 वर्षे, धंदा - घरकाम, (अॅड. सतिष तु.पवार)
मु. पाडसे, पो. चौबारी,
ता. अमळनेर, जि. जळगांव.
विरुध्द
1. तालुका कृषी अधिकारी, एकतर्फा
तालुका कृषी कार्यालय,
ता. अमळनेर, जि. जळगाव.
2. व्यवस्थापक, (स्वतः डाकेने)
कबाल इन्शुरन्स कं.लि.
श्रीरंग नगर, पंपीग रोड, नाशिक,
ता.जि. नाशिक,
3. व्यवस्थापक (अॅड.एस.व्ही.देशमुख)
नॅशनल इन्शुरन्स कं.लि.
साईबाबा मार्केट, केळकर मार्केट जवळ,
बळीराम पेठ, जळगांव,जि. जळगांव
(निकालपत्र सदस्य श्री.मिलींद सा. सोनवणे यांनी पारित केले)
नि का ल प त्र
तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सेवेत कमतरता झाली म्हणून दाखल केलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, विठठल रघुनाथ कोळी हे तक्रारदारचे पती होते. दि. 08/09/2006 रोजी, त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे नावे मौजे पाडसे, ता.अमळनेर, जि. जळगांव येथे शेतजमीन होती व ते शेती करत होते.
03. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, शासन निर्णयाअन्वये महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली जाते. सदर योजनेत रस्त्यावरील अपघात, विज पडून मुत्यू किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांचा मुत्यू झाल्यास रू 1 लाख देण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. शासनाशी केलेल्या करारा अंतर्गत सदर रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 3 यांची आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या मार्फत सदरचे प्रस्ताव सादर करण्यात येतात. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू दि. 08/09/2006 रोजी म्हणजेच, सदर योजनेच्या कालावधीत झालेला आहे.
04. तकाररदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी संपुर्ण कागदापत्रांची पुर्तता करुन विमा दावा सादर केला. मात्र सामनेवाला क्र. 3 यांनी त्यावर काहीही कारवाई न करता आजतागायत विमादावा मंजूर केलेला नाही. सदर बाब सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे विमा रक्कमेचे रू. 1 लाख, द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह व मानसिक शारीरीक त्रासापोटी रू 25,000/- मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
05. तक्रारदार यांनी पुराव्याच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि. 15-अ, लगत एकूण 7 दस्त व नि. 2 ला पुराव्याचे शपथपत्र, इ. कागदपत्रे, दाखल केलेली आहेत.
06. सामनेवाला यांना नोटीस काढली असता सामनेवाला नं. 3 यांनी जबाब नि. 21 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदाराने त्यांच्याकडे कोणताही विमा दावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या वारस दाखल्यावरुन तो मयत शेतकरी आहे. 2 मुले व 1 मुलगी असे वारस असतांना त्यांना प्रस्तुत केस मध्ये तक्रारदार म्हणून दर्शविलेले नाही. त्यामुळे तक्रार अर्जास ‘मिस जॉंईन्डर ऑफ नेसेसरी पार्टी’ या तत्वाची बाधा आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा गैरफायदा तक्रारदार घेण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
07. सामनेवाला क्र. 1 यांच्या विरुध्द नोटीस मिळुनही ते गैरहजर राहीले म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा, असे आदेश करण्यात आले. सामनेवाला क्र. 2 यांनी जबाब नि. 13 दाखल केला. त्यात त्यांनी त्यांची भुमिका कागदपत्रे गोळा करुन विमा कंपनीकडे पाठवीणे, इतक्या मर्यादीत स्वरुपाची आहे. शिवाय त्या कामाचा ते मोबदला देखील घेत नाहीत. त्यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव दि. 18/01/2007 रोजी, सामनेवाला क्र. 3 यांच्या कडे पाठविला होता. त्यामुळे त्यांच्या विरुध्द आदेश करु नयेत अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
08. उभयपक्षांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आलेत.
09. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.]
निष्कर्ष मुद्ये
1. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? सा.क्र. 3 च्या
बाबतीत होय
2. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता सा.क्र. 3 च्या
केली काय ? बाबतीत होय
3. आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 बाबत
10. तक्रारदारांनी त्यांची तक्रार व प्रतिज्ञापत्र नि. 02 मध्ये दावा केला की, त्यांचे पती मृत्यु समयी शेतकरी होते. त्यांचा शेतकरी विमा योजने अंतर्गत शासनाने विमा रक्कम भरलेली होती. ती रक्कम सामनेवाला क्र. 3 यांच्या कडे भरलेली असल्याने त्या त्यांच्या ग्राहक आहेत. तक्रारदाराने नि. 15-अ लगत अनु.क्र. 7 ला दाखल केलेला 7/12 उतारा दर्शवितो की, पाडसे शिवारातील गट क्र. 22 ही शेत जमिन तक्रारदारांचे पती विठठल कोळी यांच्या नावे होती. त्यामुळे तक्रारदारांचे पती शेतकरी होते, ही बाब शाबीत होते. शेतकरी अपघात योजने अंतर्गत शासनातर्फे प्रत्येक शेतक-याचा विमा काढण्यात येतो. प्रस्तुत केस मध्ये तो सामनेवाला क्र. 3 याच्याकडून काढण्यात आलेला होता. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 3 यांच्या ग्राहक आहेत, ही बाब शाबीत होते. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 3 च्या बाबतीत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
11. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा आपल्या पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह दिला नाही, त्यामुळे आम्ही तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केली नाही, असा मुदा सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 21 मध्ये उपस्थित केलेला आहे. मात्र सामनेवाला क्र. 2 यांनी त्यांचा जबाब नि. 13 मध्ये तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी, अमळनेर यांच्या मार्फेत पाठविलेला विमा दावा त्यांनी दि. 18/01/2007 रोजी, सामनेवाला क्र. 3 यांचया कडे पाठविलेला होता असे नमूद केलेले आहे. शिवाय सामनेवाला क्र. 3 यांनी दस्तऐवज यादी नि. 26 लगत तक्रारदाराचा क्लेम क्र. 260600/47/07/9690000315 च्या संदर्भात तक्रारदारांकडून 7/12 उतारा, 6 क चा दाखला तसेच व्हिसेरा रिपोर्ट इ. कागदपत्रांच्या मागणी करणा-या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की, तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला क्र. 3 ला मिळालेला आहे. मुळात तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फेत पाठविलेला विमादावा आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता झाल्या शिवाय पाठविता येत नाही. असे असतांना सामनेवाला क्र. 3 यांनी दि. 17/06/2008 रोजी अनावश्यक माहिती व कागदपत्रे मागून व ती मिळालेली नाहीत या कारणास्तव विमा दावा मंजूर किंवा नामंजूर ना करणे ही सेवेतील कमतरता आहे, असे स्पष्ट होते. यास्तव मुदा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 3 च्या बाबतीत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
12. मुदा क्र. 1 ते 3 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार या सामनेवाला क्र. 3 यांच्या ग्राहक आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या मार्फेत विमा दावा व त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र. 3 यांच्या कडे पाठवूनही त्यांनी तक्रारदाराचा विमा दावा आजतागायत मंजूर किंवा नामंजूर करुन सेवेत कमतरता केलेली आहे. परिणामी प्रस्तुत तक्रार अर्ज मंजूर करण्यास पात्र आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु. 1,00,000/-, तक्रार दाखल केल्याच्या दिनांका पासून म्हणजेच दि. 10/08/2010 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजाने अदा करण्याचा आदेश न्यायोचित ठरेल. त्याचप्रमाणे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांना काही कारण नसतांना इतके दिवस विमा हक्का पासून वंचित केले, त्यामुळे त्यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व प्रस्तुत अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- अदा करण्याचा आदेश न्यायसंगत ठरेल. यास्तव मुदा क्र. 3 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
आदेश
- सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु. 1,00,000/- दि. 10/08/2010 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्जा खर्चापोटी रु. 5,000/- अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 1 व 3 यांच्या विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- निकालाच्या प्रति उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगांव.
दि. 26/03/2014
(श्री.सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.