ग्राहक तक्रार क्र. : 149/2014
दाखल तारीख : 16/09/2014
निकाल तारीख : 05/09/2015
कालावधी : 0 वर्षे 11 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. रामहरी भिमराव ठोसर,
वय - 30 वर्षे, धंदा – शेती व ड्रायव्हींग,
रा.अंतरवली ता. भुम, जि. उस्मानाबाद.
2. आविदाबाई भिमराव ठोसर,
वय – 65 वर्षे, धंदा – शेती व घरकाम, रा. वरीलप्रमाणे. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. तालूका कृषि अधिकारी, भुम,
ता. भुम, जि. उस्मानाबाद.
2. मा. व्यवस्थापक,
फिक्चर जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
कार्पारेट ऑफिस, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर,
टॉवर 3, 6 वा मजला, सेनापती बापट मार्ग,
एलिफिनस्टोन डब्ल्यू, मुंबई -400013
3. डेक्कन इन्शूरंन्स आणि रेलअॅसुरंन्स ब्रोकर प्रायव्हेट लि.,
कंपनी ऑफीस 6 वा मजाला,
न्यु. एक्सेलसिअर बीज वालाक्स स्ट्रीट फोर्ट- मुंबई-400001. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी.यादव.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
भिमराव ठोसर अंतरवली तालुका भूम चा शेतकरी होता. तो अपघातात मयत झाल्यानंतर विरुध्द पक्षकार (विप) 2 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ते (तक) मुलगा व बायको यांनी भरपाई मिळणेसाठी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे
1) भिमराव याची अंतरवली येथे सर्वे नं.13 मध्ये 4 एकर जमीन आहे. त्यामुळे त्याचा विप क्र. 2 कडे शेतकरी अपघात विमा उतरलेला होता. दि.27.09.2013 रोजी भिमराव संध्याकाळी खरडयावरुन अंतरवलीला पायी येत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत पडून त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्याबददल पोलीस स्टेशन आंबी यांना कळविण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नं. 274/13 नोंदवून पंचनामा वगैरे करण्यात आला. तक क्र.1 भिमरावचा एकच मुलगा आहे. तो संतोष नलगे याचे ट्रकवर ड्रायव्हर आहे. त्याला सुटी न मिळाल्यामुळे पाच महिन्याने गावी आल्यावर विप क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघात विमा मिळणेचा अर्ज दि.15.05.2014 रोजी दिला. विप क्र.2 यांनी अर्ज मुदतबाहय असल्यामुळे फेटाळल्याचे दि.10.06.2014 रोजी पत्राने कळवले. विप क्र.2 ने अयोग्यपणे विमा दावा फेटाळला आहे. म्हणून विम्याची रक्कम तसेच तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून तक ने ही तक्रार दि.16.07.2014 रोजी दाखल केलेली आहे.
2) तक ने तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, सहपत्र, तलाठयाचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा, फेरफार उतारा, प्रतिज्ञापत्र, 174 सी.आर.पी.सी. खालील शवविच्छेदनाबद्दल पत्र, अपघाती मृत्यूचा जबाब, घटनास्थळ पंचनामा, शवचिकीत्सा अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3) विप क्र. 1 यांनी लेखी म्हणणे दि.04.09.2013 रोजी दाखल केले आहे. त्याप्रमाणे विप क्र.1 ला प्रस्ताव दि.15.05.2014 रोजी मिळाला व तो जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आला. कृषी पर्यवेक्षक यांना दि.24.06.2014 रोजी कागदपत्राच्या पुर्ततेबाबत कळविण्यात आले होते.
4) विप 2 यांनी दि.14.07.2015 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. या विप ने तक चा पोलीस जबाब याचा उल्लेख केला असून भिमराव ठोसर याला दारुचे व्यसन होते, तो दारु पिवून खरडयावरुन गावाकडे परत येत असताना वाटेवरील विहीरीत पडला. भिमराव याचा दारु पिल्यामुळे अपघात झाल्यामुळे विप भरपाई देण्यास जबाबदार नाही. तक चा दावा मुदतीनंतर आल्यामुळे विप भरपाई देण्यास जबाबदार नाही.
5) विप क्र.3 यांनी दि.27.04.2015 रोजी लेखी म्हणणे दिलेले आहे. विप क्र.3 चे म्हणणे आहे की, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यानी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव उशिरा आल्यामुळे विमा कंपनीने तो नामंजूर केला. याबद्दल विप क्र.3 कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
6) तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे, व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र. 1 व 2 -
7) विप क्र.2 चे दि.10.06.2014 चे पत्र असे दर्शवते की, दावा दाखल करायची मुदत दि.26.02.2014 होती. दावा दि.30.05.2014 रोजी मिळाल्यामुळे तो फेटाळण्यात आला. तसेच पुर्ण कागदपत्रे प्राप्त झाली नव्हती. हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्या मुदतीत दावा केला पाहिजे ती मुदत योग्य कारण दाखवल्यास वाढवता येते. तक याने त्याबद्दल शपथपत्र दिल्याचे दिसून येत आहे. तक हा मयताचा एकच मुलगा आहे व तो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे रजेअभावी लवकर दावा करु शकला नाही. तक 2 ही ग्रामीण भागातील वृध्द स्त्री आहे. त्यामुळे विप यांनी तक चे दाव्याचा विचार करणे जरुर होते.
8) आता विप क्र.2 तर्फे असा बचाव घेतला की, मयत हा दारुच्या अंमलाखाली असताना त्याचा अपघात झाल्यामुळे विप क्र.2 जबाबदार राहू शकत नाही. हे खरे आहे की, तक क्र.1 ने पोलीसांना अर्ज दिला, त्याप्रमाणे भिमराव हा रोज खरडयाकडे जात होता व रात्री परत येत होता. दि.01.10.2013 रोजी तो परत आला नाही. त्याचा शोध घेतांना पायवाटेच्या बाजूस असलेल्या भूईसपाट विहीरीत बूडून मरण पावल्याचे त्याचे प्रेतावरुन कळाले. भिमराव हा दारु पिण्याचे सवयीचा होता दारु पिवून परत येतांना तो विहीरीत पडून मरण पावला. तक क्र.2 हिचा पण जबाब त्याच पध्दतीने घेतल्याचे दिसते. शवचिकित्सा अहवालामध्ये पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला असे म्हटलेले आहे.
9) विप ने विमा कराराकडे आमचे लक्ष वेधले आहे. त्याप्रमाणे दारुच्या अंमलाखाली अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनी जबाबदार नाही. हे खरे आहे की, दोन्ही तक च्या जबाबाप्रमाणे भिमराव याला दारुचे व्यसन होते. रोज तो खरडा येथे 5 किलोमीटर दारु पिण्यास जात होता. मात्र अपघाताचे दिवशी त्याने खरडा येथे दारु पिली हे सांगणारा दारु दुकानदार अगर सोबतचा मित्र असा कोणताही पुरावा नाही. भिमराव त्या दिवशी दारु पिण्यासाठी खरडा येथे पोहचला होता हे दाखवण्यास कोणताही पुरावा नाही. भिमराव याचा खरडा येथे जातानाच विहीरीत पडून मृत्यू झाला नाही हे दाखवण्यास कोणताही पुरावा नाही. त्यामुळे भिमराव हा खरडयाहून अंतरवलीला परत येतानाच विहीरीत पडला हे निश्चित नाही. त्यामुळे खरडा येथे दारु पिवून गावाकडे परत येतानाच भिमराव विहीरीत पडला व त्याचा अपघात दारुच्या अंमलाखाली असताना झाला हे दाखवण्यास पुरेसा पुरावा नाही. त्यामुळे विप क्र.2 विमा कंपनी जबाबदार नाही असे म्हणता येणार नाही. प्राप्त पुराव्यावरुन भिमराव याचा अपघाती मृत्यू झाला हे उघड होत आहे. विमा दावा नाकारुन विप क्र.2 ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
2) विप क्र.2 यांनी तक क्र.1 व 2 यांना समप्रमाणात रक्कम मिळणेसाठी विम्याची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 दराने व्याजासह 30 दिवसाचे आत द्यावी.
3) विप क्र.2 यांनी तक यांना या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.