(द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष.) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती राजधर त्र्यंबक पाटील हे शेतकरी व शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. दिनांक 14/1/2009 रोजी अंतुर्ली ते लोहटार या गावाच्या दरम्यान मोटार सायकलचा अपघात झाला व ते त्याच दिवशी मयत झाले. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा, एफआयआर व पीएम करण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 16/3/2009 रोजी तहसिलदार कन्नड यांच्याकडे सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म दाखल केला. तहसिलदार यांनी सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिली. त्यानंतर दिनांक 13/7/2009 रोजी तालुका कृषी अधिकारी यांनी कांही कागदपत्रे मागविली. तक्रारदाराने त्या कागदपत्रांची पूर्तता करुनही गैरअर्जदारांनी अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून विम्याची रक्कम रु 1,00,000/- 15 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई म्हणून रु 25,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराच्या पतीचा मृत्यु दिनांक 14/1/2009 रोजी झाला असून तक्रारदाराने दिनांक 13/7/2009 रोजी कागदपत्रासहीत विम्यचा क्लेम त्यांच्याकडे दाखल केला. परंतु कांही आवश्यक कागदपत्रे तक्रारदाराने जोडलेली नव्हती . म्हणून तक्रारदारास कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याबाबत दिनांक 15/8/2009 व 25/8/2009 रोजीच्या पत्राने कळविले. तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी ठेवली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती ते करतात. गैरअर्जदाराने कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स कंपनीने त्यांचा लेखी जवाब पोष्टाद्वारे दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तक्रारदाराचा क्लेम दिनांक 10/8/2009 रोजी प्राप्त झाला आणि त्यांनी तो रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 27/11/2009 रोजी पाठवून दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार क्लेमची रक्कम तक्रारदारास थोडयाच दिवसात मिळून जाईल. गैरअर्जदार क्रमांक 3 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने मयत राजेंद्र पाटील यांचे ड्रायव्हिंग लायसन्स सर्व कागदपत्रासोबत दिलेले नाही. शासनाचे परिपत्रक दिनांक 29/5/2009 नुसार ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार आमन्य करावी अशी विनंती ते करतात. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. एफआयआर व घटनास्थळ पंचनामानुसार मयत शेतकरी राजेंद्र पाटील हे अपघाताच्या दिवशी मोटार सायकल सुझूकी मॅक्स चालवित होते आणि पाठीमागे राजेंद्र हरचंद परदेशी बसलेले होते. सदरील अपघात हा मयत राजेंद्र यांची गाडी स्लीप झाल्यामुळे झाला असे घटनास्थळ पंचनाम्यामध्ये नमूद आहे. तक्रारदाराने त्यांचा क्लेम सर्व कागदपत्रासहीत दाखल केलेला आहे परंतु राजधर पाटील यांचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र 3 रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने सुध्दा त्यांच्या लेखी जवाबात तक्रारदाराकडून ड्रायव्हिंग लायसन्स दिले नाही असे म्हटले आहे. म्हणून मंच तक्रारदारास असा आदेश देतो की, त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी कन्नड यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स द्यावे. आदेश तक्रारदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 2 आठवडयाच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे मयत राजेंद्र त्र्यंबक पाटील यांचे ड्रायव्हिंग लायसन्स द्यावे. कृषी अधिकारी कन्नड यांनी ड्रायव्हिंग लायसन्स, रिलायन्स इंन्शुरन्स कंपनीकडे लगेचच पाठवावे. रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने, ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त झाल्यावर 4 आठवडयाच्या आत तक्रारदाराचा क्लेम सेटल करावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |