(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 20 जुलै, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं- 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, तिचे पती मृतक श्री प्राणहंस केवळराम अहिर हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचे मालकीची मौजा मांडवी तालुका- जिल्हा- भंडारा येथे तलाठी साझा क्रं-19, खाते क्र-195, भूमापन/गट क्रं- 524, आराजी-0.83 हेक्टर आर ही शेत जमीन असून त्यावर त्यांचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं- 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-1) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सन-2015-2016 वर्षा करीता तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडे काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती मृतक श्री प्राणहंस केवळराम अहिर हे दिनांक-06/11/2016 रोजी आपले शेतावरुन गावाकडे ओळखीचे श्री वरकडे यांची मोटरसायकल क्रं-MH-31-AT-6101 वर मागे बसून मांडवी गावाकडे येत असताना समोरुन खमारी गावाकडून येणारा आयसर कंपनीचा ट्रक क्रं-MH-40-N-7411 चे वाहन चालकाने सदर वाहन वेगाने चालवून समोरुन येणा-या मृतकाचे मोटर सायकलला धडक दिल्याने व मोटर सायकल खाली पडल्यामुळे मोटर सायकलवर मागे बसलेले तक्रारकर्तीचे पती श्री प्राणहंस अहिर यांचे डोक्यावरुन सदर ट्रकचा मागील चाक गेल्यामुळे त्यांचा जागेवरच दिनांक-06.11.2016 रोजी अपघाती मृत्यू झाला. सदर अपघाती घटनेची माहिती पोलीस स्टेशन कारधा, तालुका जिल्हा भंडारा येथे देण्यात आली असता पोलीसानीं भा.दं.वि.चे कलम 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा क्रं-103/2016 नुसार दिनांक-06/11/2016 रोजी गुन्हयाची नोंद केली व घटनास्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा तयार केला.तक्रारकर्तीचे पती श्री प्राणहंस अहिर यांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी श्रीमती छाया प्राणहंस अहिर आणि मुली कु.मनिषा व कु.अनामिहा तसेच मुलगा पृथ्वीराज प्राणहंस अहिर असे कायदेशीर वारसदार आहेत. तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतरही बरेचदा तिने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे विमा दावा रक्कम मंजूर करण्या बाबत विनंती केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने दिनांक-19.07.2007 रोजी तक्रारकर्तीचे नावे पत्र देऊन त्याव्दारे पॉलिसी पिरेडच्या 90 दिवसा नंतर विमा दावा दस्तऐवज सादर केल्यामुळे विमा दावा नामंजूर केला. वस्तुतः तक्रारकर्तीने विहित कालावधीत विमा दावा सादर केलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्या परिपत्रका प्रमाणे 90 दिवसा नंतरचे विमा दावे सुध्दा स्विकारण्याची तरतुद आहे. अशी स्थिती असताना सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने खोटे कारण दर्शवून तिचा विमा दावा नामंजूर केला आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला दिलेली ही दोषपूर्ण सेवा असून त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तिने शेवटी प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/-अपघाती घटना घडल्याचा दिनांक-06.11.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो दरमहा दरशेकडा.-15% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी त्यांचे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 48 व 49 वर दाखल केले, त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारकर्तीचा तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दावा त्यांचे कार्यालयात आवक क्रं 506 दिनांक-04.03.2017 रोजी प्राप्त झाला, त्यांनी विमा दाव्याची तपासणी करुन पुढे तो विमा दावा प्रस्ताव जा.क्रं 611, दिनांक-10.03.2017 अन्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात सादर केला. तक्रारकर्तीचे पतीचा अपघात दिनांक-06.11.2016 रोजी तो मोटरसायकलवर मागे बसलेला असताना ट्रकने मोटरसायकला धडक दिल्याने झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. विमा दावा रक्कम मंजूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही विमा कंपनीची आहे, तयांचे कडून कोणतीही चुक अथवा विलंब झालेला नाही करीता त्यांना तक्रारीतून मुक्त करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 53 ते 55 वर दाखल केले. त्यांचे लेखी उततरात तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता व त्याचा विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये विमा काढलेला होता, विम्याचे वैध कालावधीत तो मोटरसायकलचे मागे बसला असताना ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्याने त्याचा जागेवरच अपघाती मृत्यू झाला, पोलीसांनी ट्रक चालका विरुध्द गुन्हा नोंदविला अशी तक्रार असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीचा विमा दावा त्यांनी पत्र दिनांक-19/07/2017 अन्वये स्पष्टपणे नमुद केले होते की, वारंवार स्मरणपत्र देऊन आवश्यक दस्तऐवजाची मागणी करण्यात आली होती तरी सुध्दा त्याची पुर्तता तक्रारकर्तीने न केल्यामुळे विमा दावा नामंजूर केलेला आहे. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह 90 दिवसात दाखल करणे बंधनकारक असताना तक्रारकर्तीने 90 दिवसांची मुदत संपल्या नंतर विमा दावा दाखल केल्यामुळे तिचे विमा दाव्याची फाईल बंद करण्यात आली व सदर कारणामुळे तिचा विमा दावा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नसलयाने ती खारीज करण्यात यावी. त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दाषपूर्ण सेवा दिलेली नाही वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ पृष्ठ क्रं- 11 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण-12 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये क्लेम फॉर्म भाग क्रं 1 ते 3 व क्लेम फॉर्म भाग 3 व 4 चे सहपत्र, शेतीचे 7/12 उतारे, फेरफारपत्रक, गाव नमुना सहा-क, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, घटनास्थळ पंचनामा, पोलीस अहवाल, शवविच्छेदन अहवाल, रेशन कॉर्ड, मृतकाचे आधारकॉर्ड व निवडणूक ओळखपत्र, तक्रारकर्तीचे बँक पासबुक तसेच निवडणूक ओळखपत्र आणि आधारकॉर्ड, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे विमा दावा मंजूरीचे पत्र अश्या दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 56 ते 58 वर तक्रारकर्तीचा शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पृष्ट क्रं-61 वर तक्रारकर्तीने लेखी युक्तीवादा संदर्भात पुरसिस दाखल केली.
06. विरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 53 ते 55 वर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-2 विमा कंपनीतर्फे पुराव्याचे शपथपत्र पृष्ठ क्रं- 60 वर दाखल केले. पृष्ट क्रं-62 वर विरुध्दपक्ष विमा कंपनीने लेखी युक्तीवादा संदर्भात पुरसिस दाखल केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे पान क्रं 65 वरील दस्तऐवज यादी नुसार शेतकरी अपघात विमा योजनेचे दिनांक-05.12.2017 रोजीचे परिपत्रकाची प्रत दाखल केली.
07. तक्रारकर्तीची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी यांचे उत्तर आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तर इत्यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. मौखीक युक्तीवादाचे वेळी विरुध्द पक्ष क्रं. 1 गैरहजर होते. तक्रारकर्त्याचे वकीलांचा तसेच विरुदपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
08. सदर प्रकरणात तक्रारकर्तीचा पती हा व्यवसायाने शेतकरी होता, त्याचा विम्याचे वैध कालावधीत दिनांक-06.11.2016 रोजी अपघाताने मृत्यू झाला या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्तीने विमा योजनेच्या अटी व शर्ती प्रमाणे विमा योजनेच्या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्यामुळे विमा दावा नामंजूर केला असे नमुद केले. तक्ररीकर्तीने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-19.07.2017 रोजीचे तक्रारकर्तीचे नावे असलेले दावा नामंजूरीचे पत्र पान क्रं 44 वर अभिलेखावर दाखल केले, त्यामध्ये पॉलिसी पिरेडच्या 90 दिवसा नंतर दावा पेपेर्स सादर केल्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात येईल असे नमुद आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीला वारंवार स्मरणपत्र देऊन आवश्यक दस्तऐवजाची मागणी करण्यात आली होती परंतु त्याची पुर्तता तक्रारकर्तीने न केल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्याचे नमुद केले परंतु विमा दावा नामंजूरीचे पत्रात मात्र विमा योजनेच्या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्याचे नमुद आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीला वारंवार स्मरणपत्र देऊन कोणत्या दस्तऐवजांची मागणी करण्यात आली होती या बद्दल कोणताही सक्षम पुरावा विरुध्दपक्षा तर्फे दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे मागणी केलेल्या दसतऐवजाची पुर्तता न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याचा विरुध्दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्तरात घेतलेला बचाव मान्य करता येणार नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-19.07.2017 रोजीचे पत्रात पॉलिसी पिरेडच्या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्यामुळे दावा नामंजूर करण्यात येईल हे एकच कारण विमा दावा नामंजूरी संबधाने नमुद केलेले आहे त्यामुळे या नामंजूरीचे कारणावर विचार होणे आवश्यक आहे.
09. तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्तावा सोबत शेतीचे आवश्यक दस्तऐवज तसेच तिचे पतीचा अपघाती मृत्यू झाल्या बाबत पोलीस दस्तऐवज जोडले असल्याची बाब दाखल विमा दावा प्रस्तावाचे प्रती वरुन सिध्द होते. शेतीचे दस्तऐवजावरुन तक्रारकर्तीचा मृतक पती हा शेतकरी होता ही बाब सिध्द होते. पोलीस दस्तऐवजावरुन विम्याचे वैध कालावधीत त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्तीने तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर विमा दावा प्रस्ताव आवश्यक दसतऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्तरात मान्य केलेली असून त्यांचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह त्यांचे कार्यालयास दिनांक-04.03.2017 रोजी प्राप्त झाला आणि त्यांनी पुढे तो विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्हणजे दिनांक-10.03.2017 रोजी सादर केल्याचे नमुद आहे. तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक-06.11.2016 रोजी अपघाताने मृत्यू झाला होता व तिने दिनांक-04.03.2017 रोजी विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला म्हणजेच अपघाती घटना घडल्याचे दिनांका पासून जवळपास 04 महिन्यात दाखल केला. महाराष्ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्हेंबर, 2015 परिपत्रका अनुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2015-2016 या वर्षा करीता राबविली होती आणि त्यामध्ये अपघाती मृत्यू आल्यास संबधित शेतक-याला रुपये-2,00,000/- विमा संरक्षण देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनीने स्विकारलेली होती.
10. तक्रारकर्तीचा पती हा अपघाताने दिनांक-06.11.2016 रोजी मृत्यू पावला होता आणि विमा योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा दाखल करणे आवश्यक आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्तीने सर्वप्रथमविमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-04.03.2017 रोजी दाखल केला आणि त्यांनी पुढे तो विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्हणजे दिनांक-10.03.2017 रोजी सादर केल्याचे नमुद आहे. महाराष्ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्हेंबर, 2015 चे परिपत्रकातील परिच्छेद क्र 5 प्रमाणे विमा दावा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखरेच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी, योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपलया नंतर 90 दिवसा पर्यंत, तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल. शिवाय समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्तव विमा कंपनीला विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीने पॉलिसी पिरेडच्या 90 दिवसा नंतर दावा पेपर्स सादर केल्यामुळे दावा नामंजूर करण्यात येईल असे जे दिनांक-19/07/2017 रोजीचे दावा नामंजूरीचे पत्रात दिलेले कारण हे उपरोक्त शासन निर्णयावरुन चुकीचे दिसून येते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा अस्सल विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे.
या मंचा तर्फे विमा दावा मुदती संबधात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयांवर भिस्त ठेवण्यात येते.
- Hon’ble Maharashtra State Disputes Redressal Commission, Mumbai-Appeal No.- A/15/580, Decided on- 25th April, 2018- “Futere Generali India Insurance Co.Ltd.-Versus- Mrs. Kalpana Rajendra Rajpure”
मंचा तर्फे सदर न्यायनिवाडयाचे वाचन केले असता आदरणीय राज्य ग्राहक आयोग यांनी असे नमुद केले की, मृतकाचे कायदेशीर वारसदारांनी विमा दावा दाखल करण्यास 05 महिन्याचा उशिर केला परंतु अशिक्षीत कुटूंबातील सदस्य असल्याने त्यांना विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे ज्ञान नसते. त्याच प्रमाणे सदर शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी व शर्ती मध्ये नमुद केलेले आहे उशिरा प्राप्त झालेल्या विमा दाव्यांची योग्य ती शहानिशा करुन विमा दावा मंजूर करावेत असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
*****
- Addl.D.C.D.R.F.Nagpur C.C. No.17/3 Decided on-18th August 2018 “Shri Ratiram Ramchandra Ukey and others-Versus-New India Assurance Company Ltd. And others.
सदर न्यायानिवाडया मध्ये सुध्दा समर्थनीय कारणास्तव 90 दिवसा नंतर सुध्दा विमा दावे स्विकारावेत अशी सुचना विमा कंपनीला शासन निर्णयात केलेली आहे.
*****
- Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.
उपरोक्त नमुद आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्याचे पत्र तक्रारकर्त्याला दिल्या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्याने सदर न्यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.
*****
- Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-3216 of 2016 Decided on-01st August, 2018-“National Insurance Company-Versus-Hukam Bai Meena and others.
उपरोक्त नमुद आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात विमा कंपनीने विमा दावा दाखल करण्यास का उशिर झाला याचे स्पष्टीकरण संबधितां कडून मागविण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
*****
(5). मंचाव्दारे मा. राष्ट्रीय आयोग, न्यु दिल्ली यांनी विम्याच्या संदर्भात दिलेल्या Landmark न्यायनिवाडयावर आपली भिस्त ठेवली आहे. त्याचा तपशिल असा आहे.
REVISION PETTTION NO. 3118-3144 OF 2010 Lakshmi Bai & Ors. ICICI Lombard General Insurance Dated 05 August, 2011
या न्यायनिवाडयामधील परिच्छेद क्रं. 13 मधील अनुक्रंमांक 2) Cases where claim is made to nodal officer or nodal officer has forwarded the claim to Insurance Company or claim has been directly filed with Insurance Company within 2 years of the death and the claim has remained undecided. In such a case the cause of action will continue till the day the Respondent/insurance Company pays or rejects the claim.
मंचा तर्फे आणखी स्पष्ट करण्यात येते की, वस्तुतः विमा योजनेचा कालावधी संपल्याचे दिनांका पासून 90 दिवसांचे आत विमा दावा दाखल करावा ही अट मार्गदर्शक (Directory) असून बंधनकारक (Mandatory) नाही तसेच 90 दिवसांची मुदत संपल्यावरही विलंबा नंतर समर्थनीय कारणांसह प्रस्ताव स्विकारावा असे शासन निर्णयात नमुद आहे.
11. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- सर्वप्रथम विमा दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्याचा दिनांक-04/03/2017 नंतर महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रकाप्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्हणजे दिनांक-04/05/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्तीविरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं क्रं 2 विमा कंपनी विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दिनांक-04/05/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.