::: आ दे श :::
( पारित दिनांक : 31/03/2015 )
आदरणीय अध्यक्षा , सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ती क्र.1 चे पती राजेश नारायण वाणी हे व्यवसायाने शेतकरी होते. दिनांक 10/08/2012 रोजी, तक्रारकर्तीचे पती हे मोटार सायकलवर जात असतांना, त्यांच्या गाडीला मोहगव्हान फाटयाजवळ अॅटो क्र. एमएच-37-बी-4479 चे चालकाने धडक दिली व त्या अपघातामध्ये ते मरण पावले. त्या अपघाताबद्दलची खबर दिनांक 10/08/2012 रोजी पोलीस स्टेशन, मंगरुळपीर येथे देण्यात आली व गुन्हा क्र. 121/2012 दाखल करण्यात आला.
तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे अर्ज केला होता. महाराष्ट्रातील शेतक-यांकरिता, महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. ही योजना दि. 15 ऑगष्ट 2011 ते 14 ऑगष्ट 2012 या कालावधी करिता होती. सदर योजनेचा हप्ता हा महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांच्या वतीने, महाराष्ट्र शासन हे स्वत: भरत असतात. या योजनेनुसार शेतकरी मरण पावल्यास रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई पोटी मिळत असतात. तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघाताचे काळात ही योजना चालू स्थितीत होती. त्यामुळे तक्रारदार या योजनेचे लाभार्थी आहेत. हया योजनेचा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्षांकडे रितसर अर्ज केले आहेत, परंतु कोणताही लाभ मिळालेला नाही.
विरुध्द पक्षांकडून विमा रक्कम मिळाली नाही. म्हणून, तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 18 % दराने व्याज ,तसेच
शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून मिळावेत, या व्यतिरिक्त योग्य ती दाद द्यावी, अशी विनंती केली. तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 12 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 1 - तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचा लेखी जबाब ( निशाणी-9) दाखल केला. त्यामध्ये नमुद केले की, शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, इ. नैसर्गिक अपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणा-या अपघाताकरिता शासनाने दिनांक 8/08/2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. 15/08/2011 ते 14/08/2012 या एक वर्षाच्या कालावधीकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती.
सदर योजने अंतर्गत मंदा राजेश वाणी रा. येडशी या अर्जदाराने विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव दिनांक 11/09/2012 रोजी सादर केला होता. सदर प्रस्ताव विमा कंपनीकडे मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांचेमार्फत पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये त्रुटीबाबत मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीने जा.क्र. 5837 दि. 04/12/2012 नुसार अर्जदार व त्यांचे कार्यालयास कळविले होते. या त्रुटीची पुर्तता अर्जदाराने परस्पर जि.अ.कृ.अ. कार्यालयास, आवश्यक कागदपत्रे सादर करुन, केली आहे. तेंव्हा शासन निर्णय दिनांक 8/08/2011 नुसार कार्यवाही करण्यात यावी.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 2 – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांचा लेखी जबाब ( निशाणी-10) दाखल केला. त्यामध्ये नमुद केले की, शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, इ. नैसर्गिक अपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणा-या अपघाताकरिता शासनाने दिनांक 8/08/2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. 15/08/2011 ते 14/08/2012 या एक वर्षाच्या कालावधीसाठी, चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती.
सदर योजने अंतर्गत, अर्जदाराने विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव, तालुका कृषी अधिकारी, मंगरुळपीर यांचेमार्फत त्यांच्या कार्यालयास सादर केला होता. सदर अर्जदाराचा विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव त्यांचे कार्यालयाने दिनांक 18/10/2012 रोजी विमा सल्लागार कबाल इन्शुरन्स कं. लि. अमरावती यांचे मार्फत दि. न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि. मंडल कार्यालय, मुंबई या विमा कंपणीस सादर करण्यात आला होता. विरुध्द पक्षाचे कार्यालयास दि. 29/11/2012 रोजी कबाल इन्शुरन्स, अमरावती च्या पत्रान्वये सदर विमा प्रस्तावामध्ये काही कागदपत्र कमी असल्याचे विमा सल्लागार व विमा कंपणीचे पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या होत्या. सदर त्रुटीबाबत त्यांचे कार्यालयाचे पत्र क्र. 5837 दिनांक 04/12/2012 अन्वये तालूका कृषी अधिकारी, मंगरुळपीर व अर्जदार यांना, सदरचे प्रस्तावामध्ये काही कागदपत्रे कमी असल्याचे कळविण्यात आले होते. विमा सल्लागार व विमा कंपणीचे पत्राच्या प्रती सोबत जोडलेल्या आहेत.
सदर अर्जदाराने अत्यंत उशिराने 27 डिसेंबर 2013 रोजी विरुध्द पक्षाचे कार्यालयाकडे कागदपत्र सादर केले होते. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, विरुध्द पक्ष कार्यालयाचे पत्र क्र. 289 दिनांक 16/01/2014 रोजी कबाल इन्शुरन्स, अमरावती यांचे प्रतिनिधी मार्फत विमा कंपनीस सादर करण्यात आले आहे. परंतु विमा कंपनीने सदर प्रस्ताव अपघातग्रस्ताच्या नावात फरक राजू/राजेश व मृतकाचा 7/12, 2011-12 हया वर्षाचा न दिल्यामुळे दिनांक 26/05/2014 च्या पत्रान्वये ( विरुध्द पक्ष कार्यालयास प्राप्त 1/7/2014 ) नामंजुर केला आहे. सोबत तीन कागदपत्रांच्या प्रती जोडलेल्या आहेत.
4) विरुध्द पक्ष क्र. 3 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 3 – दि न्यु इंडिया एशुरंन्स कंपनीने त्यांचा लेखी जबाब )निशाणी 14) दाखल करुन, तक्रारकर्त्यांचे बहुतांश कथन नाकबूल केले व पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, विरुध्द पक्ष क्र. 3 ने तक्रारकर्तीचा दावा हा हेतुपूरस्सरपणे नाकारलेला नाही. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 तसेच कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस यांना 3 एप्रिल 2013, 08 नोव्हेंबर 2013 रोजी पत्र देवून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याविषयी तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना सुचित केले होते व सदरहू कागदपत्रांची पुर्तता न झाल्यास कंपनीच्या अटी व शर्तीनुसार नाईलाजास्तव दावा बंद करणे भाग पडेल, असे कळविले होते. परंतु तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वेळेत कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 ला तक्रारकर्तीचा दावा बंद करावा लागला. तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2012 रोजी आयुक्त, कृषि विभाग यांना व्हीसेरा रिपोर्ट पाठविण्याबाबत पत्र दिले होते. दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये शवविच्छेदन अहवालामध्ये ( पी.एम.रिपोर्ट ) मृत्यूचे नेमके कारण नमुद नव्हते, त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी व दावा निकाली काढण्याकरिता व्हीसेरा रिपोर्टची आवश्यकता असल्याबाबत पत्र दिले होते व त्यावरुन तक्रारकर्तीने दिनांक 13/12/2012 रोजी व्हीसेरा रिपोर्ट येताच त्याची प्रत विरुध्द पक्ष क्र. 3 यांना देण्यात येईल, असे नमुद केले. त्यानंतर त.क.ने दाखल केलेल्या 7/12 मध्ये मृत्यूसमयी सदरहू शेती ही मृतकाचे नांवाने असणे आवश्यक आहे. त्यानुसार त.क.ने सन 2011-12 या वर्षाचा 7/12 विरुध्द पक्ष क्र. 3 यांना वेळोवेळी मागणी करुन सुध्दा दाखल केला नाही. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दिनांक 3 एप्रिल 2013 रोजी याबाबतचे पत्र सुध्दा दिले होते. तसेच दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये व मृतकाच्या नावामध्ये फरक आढळून आला, त्याबाबतचे स्पष्टीकरण सुध्दा त.क.ला मागीतले, परंतु त.क.ने त्याची सुध्दा पुर्तता केली नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने दिनांक 26/05/2014 रोजी वरीलप्रमाणे कागदपत्रांची विहीत मुदतीमध्ये पुर्तता न केल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 ला नाईलाजास्तव दावा बंद करणे भाग पडले.
यावरुन त.क.ने हेतुपूरस्सरपणे विरुध्द पक्षाला त्रास देण्याचे उद्देशाने, बदनामी करण्याचे उद्देशाने खोटी व खोडसाळपणाची तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्द पक्षाने सेवेत कोणतीही न्युनता दर्शविलेली नाही, म्हणून तक्रारदारांची तक्रार रुपये 5,000/- खर्चासह खारिज करण्यांत यावी.
5) का र णे व नि ष्क र्ष :::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1, 2 व विरुध्द पक्ष क्र.3 यांचे स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 3 ची पुरसिस, तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष क्र. 3 यांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास असे निदर्शनास येते की, . . .
उभय पक्षात याबद्दल वाद नाही की, मयत राजेश नारायण वाणी हे शेतकरी होते व विरुध्द पक्षाच्या ‘ शेतकरी अपघात विमा योजनेचे ’ ते लाभार्थी होते. तसेच त्यांचे दिनांक 10/08/2012 रोजी, अॅटो अपघातात निधन झाले होते.
विरुध्द पक्ष क्र. 3 / विमा कंपनी यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यांनी तक्रारकर्ते यांचा दावा हेतुपूरस्सरपणे नाकारलेला नाही. कारण त्यांनी तक्रारकर्ते यांना वारंवार आवश्यक ती कागदपत्रे पत्रव्यवहार करुन मागवलेली होती. परंतु सदर कागदपत्रांची पुर्तता तक्रारकर्ते यांनी केली नाही. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केल्यास असे आढळते की, विमाधारक राजेश नारायण वाणी हे दिनांक 10/08/2012 रोजी, अॅटो अपघातात मरण पावले होते. ज्याची नोंद पोलीस स्टेशन, मंगरुळपीर येथे दाखल असलेल्या FIR वरुन माहित होते. तसेच रेकॉर्डवर पोष्ट मार्टम रिपोर्टची प्रत दाखल आहे, त्यावरुनही हे माहिती होते की, राजेश नारायण वाणी हे ‘‘ May due to head injury ’’ मुळे मरण पावल्याचा स्पष्ट अभिप्राय नमुद आहे. तसेच रेकॉर्डवर दाखल असलेल्या पोलीस स्टेशन कडील इतर दस्तऐवजांवरुन असा बोध होतो की, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, मंगरुळपीर जिल्हा वाशिम यांनी मृतक राजेश नारायण वाणी यांचा व्हिसेरा केमीकल अॅनालायझर येथे पाठविणे जरुरी नसल्यामुळे त्यांनी तो नष्ट केला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले पोष्ट मार्टम रिपोर्टच फायनल ठरले होते. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या शेतकी दस्तांवरुन असा बोध होतो की, मृतक राजेश नारायण वाणी हे शेतकरी होते व सर्व तक्रारकर्ते हे त्यांचे वारस आहेत. रेकॉर्डवर दाखल असलेल्या दस्तऐवजांवरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी काही कागदपत्रांबद्दल त्रुटी काढल्या होत्या, परंतु त्याची पुर्तता सुध्दा तक्रारकर्ते यांनी केली आहे. सबब रेकॉर्डवर दाखल असलेल्या सर्व दस्तऐवजांवरुन तक्रारकर्ते / वारसदार हे मृतक राजेश नारायण वाणी यांच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार रुपये 1,00,000/- विरुध्द पक्ष क्र. 3 कडून सव्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दाखल असलेल्या पोष्ट मार्टम रिपोर्ट वरुनच ही विमा रक्कम तक्रारकर्ते यांना अदा करावयास पाहिजे होती. परंतु ती रक्कम न दिल्याने ही त्यांच्या सेवेतील न्युनता ठरते व म्हणून त्याबद्दलची नुकसान भरपाई प्रकरण खर्चासहीत रुपये 10,000/- देण्यासही विरुध्द पक्ष क्र. 3 बाध्य ठरतात, असे मंचाचे मत आहे.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची जबाबदारी येत नसल्यामुळे, त्यांच्याविरुध्द तक्रार अमान्य करण्यांत येते.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
- अं ति म आ दे श -
- तक्रार अर्ज विरुध्द पक्ष क्र. 3 -विमा कंपनी विरुध्द अंशतः मान्य करण्यांत येतो. तर, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द अमान्य करण्यांत येतो.
- विरुध्द पक्ष क्र. 3 - विमा कंपनीने तक्रारकर्ते / वारसदार यांना शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/- ( अक्षरी - रुपये एक लाख ) ही दरसाल, दरशेकडा 8 टक्के व्याजदराने प्रकरण दाखल दिनांक 08/08/2014 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच सेवेतील न्युनतेबद्दल नुकसान भरपाई पोटी व प्रकरण खर्चासहीत एकत्रीत रक्कम रुपये 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) द्यावी.
- विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svgiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).