(मंचाचे निर्णयान्वये, अधि. वर्षा जामदार, मा. सदस्या) (पारीत दिनांक :15.07.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार ही मौजा चिचबोडी, मोखाळा, तह.सावली, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून मय्यत इंशुअर्ड वन्नु धोंडूंजी मेडीवार याची पत्नी आहे. सदर मय्यतचा अपघात दि.27.6.10 रोजी अंगावर अकस्मात वीज पडून झाला. मय्यत मेंढ्या चारण्याकरीता चिचबोडी जंगल शिवारात गेले असता, विजेचा कडकडाट होऊन पाऊस पडला व मय्यतावर विज पडली. सदर मय्यताचे अपघाती मृत्युमुळे अर्जदारानी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सर्व कागदपञासह दोन प्रतीत अर्ज/क्लेम फार्म 1 ते 4 मार्फत दि.15.12.2010 ला गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केला. मय्यताचे नावाने शेती असून ते सदर शेत जमीनीतून उत्पन्न घेत होते. मय्यत महाराष्ट्रातील खातेदार शेतकरी असून वरील योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी यांचा शेतकरी अपघात विमा काढलेला होता व प्रिमियमची सर्व रक्कम सरकारने इंशुरंन्स कंपनीकडे भरलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 कडे, अर्जदाराने क्लेम फार्म सादर केल्यानंतर गैरअर्जदार क्र.3 कडून एका महिन्याच्या आंत विमा रक्कम देणे बंधनकारक आहे. परंतु, ते न मिळाल्याने अर्जदार मंचासमोर दाद मागत आहे. सर्व गैरअर्जदारांनी, अर्जदारास सेवा व विमा रक्कम देण्यास ञुटी केली आहे. करीता, योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/- क्लेम फार्म सादर केल्यापासून 24 % द.सा.द.शे. व्याजाने अर्जदाराच्या हातात रक्कम पडेपर्यंत गैरअर्जदार क्र.3 ने द्यावे. तसेच, अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञास व इतर किरकोळ खर्च, तक्रार खर्च, अर्जदाराला देण्याची मागणी केली आहे. 2. अर्जदाराने निशाणी क्र.4 नुसार 21 दस्तऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हजर होऊन निशाणी क्र.7 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश दि.3.6.11 ला पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 ने निशाणी क्र.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले कि, अर्जदार यांनी स्वतः विमा प्रस्ताव दि.15.12.2010 रोजी सादर केला. सदर प्रस्तावाची छाननी करुन या कार्यालयाचे पञ क्र.जा.क्र./ताकृअ/तां/ज.अ.वि./2007/2010, दि.16.12.2010 अन्वये खुद अर्जदार श्रीमती मिराबाई वन्नु मेडीवार यांचेमार्फत एक मुळ प्रत व एक सांक्षाकित प्रत मा.जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आले. शेती व्यवसाय करतांना होणारे रस्त्यावरील अपघात, विज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश व वाहन अपघात, तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, त्यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यु ओढावतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या सदर अपघातामुळे कुंटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने अशा अपघाग्रस्त शेतक-यांचे त्यांच्या कुंटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शेतकरी अपघात विमा योजना दि.10 जानेवारी 2005 पासून सुरु केली आहे. राज्यातील 12 ते 75 वयोगटातील नोंदणीकृत शेतक-यांना अपघाती मृत्यु आल्यास रुपये 1,00,000/- किंवा अपंगत्व आल्यास प्रकरण परत्वे रुपये 50,000/- ते 1,00,000/- पर्यंत नुकसान भरपाई अदा करण्यात येते. तक्रारदार यांनी, तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे तिचे पती मय्यत वन्नु धोंडूजी मेडीवार यांचा दि.27.6.10 रोजी विज पडून मृत्यु झाला असल्याने, मय्यत वन्नुजी धोंडूजी मेडीवार याचा विमा प्रस्ताव सन 2009-10 या कालावधीत येतो. या कालावधीसाठी शासनाने नागपूर विभागासाठी युनायटेड इन्सुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे नागपूर महसूल विभागातील नोंदणीकृत शेतक-यांना शासन निर्णय क्र.शे.व.वि.2009/प्रक्र-268/11 अ, दि.12 ऑगष्ट 2009 अन्वये विमा पॉलिसी उतरवून सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसर विमा संरक्षण देणे होते. तक्रारदार याचा विमा प्रस्ताव हा सन 2009-10 या कालावधीत येत असल्याने विमा दाखल सादर करण्याची अंतिम तारीख 14.8.10 होती. त्यानंतर, शेवटच्या दिवसात अपघात झाल्यास 90 दिवसाची मुदत वाढवून म्हणजेच 14.12.10 पर्यंत विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. परंतु, अर्जदाराने विमा प्रस्ताव विलंबाने दि.15.12.10 ला कार्यालयास सादर केलेला आहे. प्रस्ताव मंजूर व नामंजूर करण्याचे अधिकार इन्शुरन्स कंपनीला आहे. विमा प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही अत्यल्प कालावधीत झाली असल्याने अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञास झाला असे म्हणता येत नाही. विमा प्रस्ताव तयार करणेसाठी आवश्यक कागदपञ गोळा करणे, प्रस्तावाच्या दुय्यम प्रती तयार करणे, यासाठी येणारा किरकोळ खर्च स्वतः लाभार्थीनी करावयाचा आहे. त्यामुळे सदर खर्च गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदारास देणे शक्य नाही. 4. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले कि, अर्जदाराकडून दि.10.1.11 रोजी क्लेम फार्म सादर करण्यांत आला, परंतु, पालिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे अर्जदाराचे क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला. सदर प्रकरणात “ रेपुडिएशन ” क्लेम नामंजूर करण्याचे मुख्य कारण कि, ञिसदस्यीय पॉलिसी अग्रीमेंट नुसार मान्य व कबूल केलेल्या अटी व शर्ती आहेत. गैरअर्जदार ही पब्लीक सेक्टर कंपनी आहे. पब्लीक मनीचा गैरवापर होऊ नये म्हणूनच पॉलिसीच्या अटी व शर्तीचे अधिन राहून संपूर्ण कामकाज सुचारु पध्दतीने केल्या जाते. पॉलिसीमधील लिमिटेशन क्लॉज हा महत्वपूर्ण असून तो सर्वांवर बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील कोणताही कास्तकार/शेतकरी जातीने स्वतः कधीच प्रिमियमची रक्कम विमा कंपनीकडे भरणा करीत नाही. त्यामुळे, त्याचे वारसांना सकृतदर्शनी नुकसान भरपाई फक्त विमा कंपनी कडून मागण्याचा हक्क व अधिकार नाही. सबब, अर्जदाराची तक्रार ही मुळतः नियमबाह्य असल्यामुळे खारीज होण्यास पाञ आहे. सबब, तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.3 ने केली आहे. गैरअर्जदार क्र.3 ने निशाणी क्र.17 नुसार 1 दस्तऐवज दाखल केला आहे. 5. अर्जदाराने नि.13 नुसार दाखल केलेली तक्रार अर्जदाराचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदार क्र.3 यांनी निशाणी क्र.18 नुसार पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज, लेखी बयान व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 6. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडे दि.15.12.2010 रोजी विमा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर, त्याची छाननी करुन सदर प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला. अर्जदाराचे पति मय्यत वन्नुजी धोंडूजी मेडीवार यांचा मृत्यु दि.27.6.2010 रोजी झाला असल्याने विमा दाव्याचा काळ 2009-2010 आहे व या काळामध्ये नागपूर विभागासाठी गैरअर्जदार क्र.3 ला शेतक-यांना विमा देण्याची जवाबदारी देण्यात आली होती. अर्जदाराने तलाठ्या कडे शेतीचे दस्ताऐवज दाखल करुन मय्यत वन्नुजी धोंडूजी मेडीवार यांचे वारस असून क्लेम फार्म भाग-2 अंतर्गत प्रमाणपञ प्राप्त केले, हे प्रमाणपञ अर्जदाराला दि.7.12.2010 ला प्राप्त झाले. म्हणजे दि.7.12.2010 पूर्वीच अर्जदाराने विमा दाव्या संबंधी कार्यवाही सुरु केली होती, त्यामुळेच दि.7.12.2010 ला तसे प्रमाणपञ तलाठी यांनी अर्जदाराला दिले. त्यानंतरच, अर्जदार हा विमा दावा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे दाखल करु शकला. गैरअर्जदार क्र.3 चे म्हणणे नुसार अर्जदाराने मुदतीत विमा दावा दाखल केला नाही. त्यामुळे, दि.31.12.2010 रोजी निशाणी क्र.4 अ-21 नुसार कागदपञे दि.14.11.2010 पर्यंत न दिल्यामुळे विमा दावा निरस्त करण्यात आला. अर्जदाराला विमा दावा दि.14.12.2010 पर्यंत दाखल करायला हवा होता. ही बाब, गैरअर्जदार क्र.1 ने ही मान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.3 ने निशाणी क्र.17 ब-2 नुसार ञिपक्षीय कराराची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये, Clause (IX) मुदती संदर्भातील तरतुदीत स्पष्ट म्हटले आहे कि, विमा कंपनी योग्य कारणास्तव झालेला उशीर माफ करुन विमा दावा मान्य करु शकते. करारानुसार अर्जदाराला दि.14.12.2010 पर्यंत विमा दावा सादर करणे गरजेचे जरी होते, तरी गैरअर्जदार क्र.1 कडे विमा दावा दि.15.12.2010 ला पोहोचला आहे. म्हणजे फक्त 1 दिवसाचा उशीर कराराप्रमाणे झाला आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत निशाणी क्र.4 अ-16 व अ-17 वर शपथपञे दाखल केली आहे. त्या शपथपञांमध्ये अर्जदाराने विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज सादर केला असल्याचे म्हटले आहे. सदर शपथपञ दि.7.12.2010 व दि.8.12.2010 चे आहेत. ही शपथपञे गैरअर्जदार क्र.3 ने नाकारली नाहीत. अर्जदार ही अशिक्षीत आहे हे तिने दाखल केलेली तक्रार व शपथपञावरुन दिसून येते. कारण, तिने कुठेही सही केलेली नसून अंगठा लावलेला आहे. त्यामुळे, मुदतीमध्ये विमा दावा कोणत्या अधिका-या कडे करायचा ह्याचे तिला पूर्ण ज्ञान असणे अभिप्रेत नाही. तरी ही अर्जदाराने दि.7.12.2010 पूर्वीच विमा दाव्याचा अर्ज तलाठी कडे केला होता, ही बाब स्पष्ट होते. त्यानंतर, सर्व दस्तऐवजा सह विमा दावा दि.15.12.2010 ला सादर केलेला असून, गैरअर्जदार क्र.3 ने दि.31.12.2010 ला नाकारला आहे. परंतु, त्यापूर्वी गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराकडून कागदपञाची मागणी केली असल्याचा एकही दस्ताऐवज रेकॉर्डवर नाही. ह्या सर्व कारणावरुन, अर्जदाराला जरी गैरअर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे 1 दिवसाचा उशीर झाला असला तरी त्यामागची कारणे योग्य होती. गैरअर्जदार क्र.3 ने ती कारणे गृहीत न धरता विमा दावा नाकारुन ञृटीपूर्ण सेवा अर्जदाराला दिलेली आहे, हे सिध्द होते. अर्जदार अशिक्षीत असतांना, तिने पूर्ण प्रयत्न मुदतीत दावा दाखल करण्यासाठी केलेले आहेत. त्यामुळे, गैरअर्जदाराने दिलेली सेवा ही अनुचित व्यापारात मोडत असून, ज्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे तो उद्देश धाब्यावर ठेवल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.2 ला तक्रारीत समन्स मिळून ही हजर झाले नाही व आपली बाजू मांडली नाही. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द कोणतीही मागणी केली नाही. सदर योजने मध्ये विमा रक्कम देण्याची जवाबदारी ही इन्शुरंस कंपनीची असते. गेरअर्जदार क्र.1 ने त्याचेकडे विमा दावा आल्यावर लगेचच कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत सेवेत न्युनता झाल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराला विमा दावा रुपये 1,00,000/- न दिल्यामुळे नाहक शारिरीक, आर्थिक व मानसिक ञास सोसावा लागला. त्यासाठी, गैरअर्जदार क्र.3 जवाबदार आहे, ह्या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असून, खालील आदेश पारित करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदाराला दि.15.12.2010 पासून 9 % व्याजासह रुपये 1,00,000/- ही रक्कम, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावी. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द तक्रार खारीज. (3) गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 500/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |