निकालपत्र
निकाल तारीख - 16/04/2015
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे सावरी येथील रहिवाशी असून, त्याचा मुलगा नामे सुधीर प्रल्हाद डोंगरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सभासद होता. अर्जदाराचा मयत मुलगा दि. 24/05/2010 रोजी देवदर्शनावरुन परत येत असताना अपघात झाला. सदर अपघातात अर्जदाराचा मुलगा मयत झाला.अर्जदाराचा मयत मुलगा हा शेतकरी असल्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांना सदर अपघाताची माहिती दिली. व त्याच्या मार्फत विमा कंपनीस विमा प्रस्ताव पाठविला. गैरअर्जदार क्र. 1 ने सदरचा विमा प्रस्ताव लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा – सावरी यांना दिला. अर्जदाराने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ठरावासह व कागदपत्रासह विमा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे दाखल केला. अर्जदाराने ठरावाची प्रत बँकेचे पत्र व इतर कागदपत्रासह सदरचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र; 1 यांचेकडे जुलै – 2010 मध्ये दाखल केला. अर्जदारास विमा रक्कम मिळाली नाही म्हणून दि; 06/02/2012 रोजी गैरअर्जदार क्र; 1 ते 4 यांना नोटीस दिली. अर्जदारास विमा प्रस्ताव नामंजुर केल्याचे विमा कंपनीने तोंडी सांगितले. अर्जदाराने तक्रारी अर्जात विमा रक्कम शेतकरी अपघात योजनेनुसार व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- देण्याची मागणी केली.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे. एकुण – 06 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 4 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराचा तक्रारी अर्ज दंडासह खारीज करण्यात यावा. सदरची तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. अर्जदाराने सिध्द करावे की, त्याचा मयत मुलगा नामे सुधीर डोंगरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सभासद होता. अर्जदाराने सिध्द करावे की, दि. 20/06/10 रोजी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँके मार्फत विमा प्रस्ताव विमा कंपनीस दिला. अर्जदाराने योग्य त्या गैरअर्जदाराकडे माहिती व विमा प्रस्ताव दिला नाही.सदरची तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. अर्जदाराची तक्रार मुदतीत नाही. सदरचा करार हा गैरअर्जदार व महाराष्ट्र शासन यांच्यात झालेला आहे. लातुर जिल्हा मध्यवर्ती बॅंक व गैरअर्जदार यांच्यात झालेला करार हे दोन्ही करार वेगवेगळे आहेत. अर्जदाराने विमा नुकसान भरपाई कोणाकडुन पाहिजे. सदर योजनेबाबत कोणास नुकसान भरपाई मागता येते. सदरची तक्रार योग्य नसल्यामुळे खारीज करण्यात यावी. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराचा विमा प्रस्ताव मुदतीत दिला नाही. अर्जदाराचा विमा प्रस्ताव मुदत कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांनी दाखल झाला असल्यामुळे सदरचा विमा प्रस्ताव नामंजुर करण्यात येत आहे.
गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी म्हणणे दि. 26/11/2010 रोजी सदरचा विमा प्रस्ताव जा.क्र.2157 वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. वरिष्ठ कार्यालयाने दि. 15/02/2011 रोजी विमा प्रस्ताव विमा कंपनीस पाठविला आहे. सदरील विमा प्रस्ताव मुदत बाहय म्हणून नामंजुर केलेला आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराचा मयत मुलगा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील संपुर्ण शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा मोबदला देवून विमा कंपनीकडुन काढला आहे. सदरचा मोबदला विमा कंपनीने स्विकारल्यामुळे अर्जदार हा वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक या संज्ञेत येतो, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचा मयत मुलगा दि. 25/09/2010 रोजीच्या अपघात मयत झाला आहे. अर्जदाराचे मयत मुलास गट क्र. 122/अ मध्ये 1 हेक्टर 42 आर शेतजमीन असल्याचे 7/12 च्या उता-यावरुन दिसुन येते. अर्जदाराच्या मयत मुलाच्या मृत्यूचे कारण डोक्यास जखमा आणि अवयवास मेंदुस व हाडास जखमा होवून झाल्याचे शवविच्छेदन अहलवालावरुन सिध्द होते. अर्जदाराने सदरचा विमा प्रस्ताव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडे दाखल केला असल्याचे दि. 20/06/2010 रोजीच्या सोसायटीच्या ठरावाच्या पत्रावरुन दिसुन येते. अर्जदाराने तक्रारी अर्जात कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक यांना गैरअर्जदार म्हणून पार्टी केली आहे. सदरचा विमा प्रस्ताव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोयायटीकडुन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत गेला असल्याचे दिसुन येते. शेतकरी अपघात विमा योजना व जनता अपघात विमा योजना या दोन्ही वेगवेगळया पॉलीसी आहेत. अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेची मागणी केली आहे, पुरावा व विमा प्रस्ताव तक्रारी अर्जातील म्हणण्यानुसार जनता अपघात विमा योजनेला दिल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराचा तक्रारी अर्ज व दाखल केलेला पुरावा व विमा रक्कमेची मागणी योग्य त्या गैरअर्जदाराकडे केले नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे मुद्दा क्र; 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराचे मयत मुलाचा मृत्यू अपघाती असल्यामुळे अर्जदार हा अनुतोष मिळण्यास पात्र आहे. परंतु अर्जदाराने योग्य त्या गैरअर्जदारास पार्टी करणे न्यायाचे व योग्य असल्यामुळे, अर्जदाराने योग्य त्या गैरअर्जदाराकडे विम्याच्या रक्कमेची मागणी केली नसल्यामुळे सदरचे प्रकरण नामंजुर करण्यात येत आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.