निकाल
दिनांक- 20.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार श्री.अंकुश शंकर बावणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची सेवा देण्यास सामनेवाला यांनी कसूर केल्याबाबत.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार अंकुश शंकर बावणे हे गेवराई जिल्हा बीड येथील रहिवाशी असून शेती करुन स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. हे की, मयत पुष्पा अंकुश बावणे हया अर्जदाराच्या पत्नी होत्या. दि.19.01.2011 रोजी पाली येथून बीड मार्गे आम्ला या गावी येत असताना पाली जवळील पुलाजवळ रोडवरील खडयात गाडी गेल्याने पुष्पा अंकुश बावणे गंभीर जखमी झाल्या व इलाजाकामी औरंगाबाद येथे घेऊन जात असतांना त्यांचा गेवराई जवळ रस्त्यावरच मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अर्जदार व त्यांची पत्नी मोटार सायकलवर बसून त्यांच्या गावी परत येत होते. सदर घटनेची माहिती कैलास दिगांबर भावणे यांनी पोलीस बीड ग्रामीणला कळविली. पोलीसांनी वरील घटनेची चौकशी करुन मृत्यूची नोंद केली. मयताचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिका-यांकडे सुपूर्द केले.
अर्जदाराची पत्नी हया व्यवसायाने शेतकरी होत्या. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांसाठी कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली सामनेवाला यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा विमा काढलेला आहे. विमा योजनेची कार्यवाही महाराष्ट्र शासनातर्फे संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी विभागाचे ब्रोकींग इन्शुरन्स सर्व्हिस लिमिटेड व विमा कंपनी यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावयाची आहे. दि.30.09.2011 रोजी अर्जदार यांनी मयत पुष्पा अंकुश बावणे यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा दावा तालुका कृषी अधिकारी गेवराई जि.बीड यांच्या मार्फत सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्याकडे केला आहे. मयत हया शेतकरी असल्याबाबतचा पुरावा म्हणून गट क्रमांक 278 चा 7/12, 8अ, 6क, तलाठी प्रमाणपत्र सादर केले आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत या वर्षी साठीचा औरंगाबाद महसूल विभागाचा वरील योजनेचा संबंधित प्रिमियम युनाईटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे जमा केलेला आहे. सदर पॉलीसी सुरु झालेल्या कालावधीत शेतक-यांचा अपघात सदर विमा योजनेअंतर्गत त्याचया कुटूंबासाठी अथवा त्यास द्यावयाची रक्कम विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत विमा कंपनीने अदा करणे बंधनकारक राहील.
हे की, विमा दावा सामनेवाला क्र.2 यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी, कार्यालयामार्फत सर्व कागदपत्रे साक्षांकित करुन पाठविण्यात आलेला आहे. परंतू सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वरील विमा दावा आजपर्यंत मंजूर केलेला नाही. सामनेवाला कंपनीने अर्जदाराला सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून सामनेवाला कंपनीने अर्जदाराला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व दाव्याचा खर्च रु.2,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 तालुका कृषी अधिकारी, गेवराई जिल्हा बीड यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार श्री.अंकुश बावणे यांच्याकडून तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई यांच्याकडे मयत पुष्पा अंकुश बावणे यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा दावा मिळण्याचा प्रस्ताव दि.30.09.2011 रोजी प्राप्त झालेला आहे. सदर प्रस्तावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या अनुदानाबाबतच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालील त्रुटी आढळून आल्या.
1) 6 क उतारा,
2) 6 ड उतारा (फेरफार नक्कल),
3) जन्म तारखेचा दाखला,
4) एफ.आय.आर.प्रत,
5) पोस्टमार्टम अहवाल,
6) बँक पासबुक झेरॉक्स
7) 20/- रु.स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.
इत्यादी कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन कार्यालयास पाठवावा असे स्मरणपत्र दि.10.10.2011 रोजी अर्जदार श्री.अंकुश बावणे यांना पाठविले आहे. सोबत लाभार्थी प्रत पाठविल्याचे पत्र व अर्जदारास प्रस्ताव परत मिळाल्याबाबतची पोहच पावती दाखल केलेली आहे. आजपावेतो अर्जदाराकडून वरील कागदपत्राची पुर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास परत दिलेला नाही. तसेच या प्रकरणामध्ये कार्यालयाने कोणतीही अनियमितता व टाळाटाळ केलेली नसून अर्जदारास सेवा देण्यास कसूर केला नाही. त्यामुळे सदर दाव्यातून तालुका कृषी अधिकारी यांना वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.3 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिस कंपनी यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला 3 यांचे कथन असे की, त्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी करुन संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करुन तो प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविण्याचे ते काम करतात. कागदपत्राची काही त्रुटी असल्यास त्याबाबत तहसिलदार अगर कृषी अधिका-यांना कळविणे व कागदपत्राची पुर्तता करुन घेणे एवढे आहे. परंतू सदर तक्रारीत अर्जदाराने मयत पुष्पा अंकुश बावणे यांच्या नावे केलेला प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. सबब त्याबददल कोणतेही असे स्पष्ट कारण देऊ शकत नाही.
सामनेवाला क्र.2 युनाईटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन असे की, अर्जदाराने तक्रारीत केलेले विधान अमान्य आहे. अर्जदार यांच्या पत्नी मयत पुष्पा अंकुश बावणे यांचा मृत्यू दि.19.01.2011 रोजी झाला त्यावेळेस विमा पॉलीसी ही अस्तित्वात नव्हती. म्हणून सामनेवाला क्र.2 हे कोणतीही नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. सबब, सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव नाकारला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र याचे अवलोकन केले.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, मयत
पुष्पा अंकुश बावणे हया शेतकरी होत्या? नाही.
2. तक्रारदार याने सामनेवाला यांच्याकडे संपूर्ण
कागदपत्राची पुर्तता केली ही बाब सिध्द
केली आहे काय ? नाही.
3. तक्रारदार यांनी, सामनेवाला क्र.2 यांनी सेवा
देण्यास कसूर केला आहे, ही बाब सिध्द केली काय? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, अर्जदाराची पत्नी मयत पुष्पा अंकुश बावणे यांचा दि.19.01.2011 रोजी अपघात झाला व त्यांना इलाजाकामी औरंगाबाद येथे घेऊन जात असतांना गेवराई जवळ रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला ही बाब सिध्द होते.
अर्जदार यांनी असे कथन केले की, त्यांची पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे दि.30.09.2011 रोजी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. त्या दाखल केलेल्या प्रस्तावात सामनेवाला क्र.1 यांना खालील त्रुटी आढळून आलेल्या आहेत.
1) 6 क उतारा,
2) 6 ड उतारा (फेरफार नक्कल),
3) जन्म तारखेचा दाखला,
4) एफ.आय.आर.प्रत,
5) पोस्टमार्टम अहवाल,
6) बँक पासबुक झेरॉक्स
7) 20/- रु.स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.
सदर आढळून आलेल्या त्रुटीबाबत सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदारास दि.10.10.2011 रोजी कागदपत्राची परिपूर्ण पुर्तता करण्यासाठी पत्र पाठविले होते, त्या पत्राच्या अनुषंगाने अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आजपर्यंत कागदपत्रे पाठविलेली नाहीत. तसेच अर्जदाराने कागदपत्राची पुर्तता केलेली आहे या बददलचे कोणतेही कागदपत्र किंवा पुरावा दाखल केला नाही. यावरुन अर्जदाराने कागदपत्राची परिपूर्णता केलेली नाही असे निष्पन्न होते.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 यांच्यातर्फे सामनेवाला क्र.3 यांनी कागदपत्राची परिपूर्णता करुन सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविण्यात येतो. सामनेवाला क्र.3 हे सदर प्रस्तावाची छाननी करुन व कागदपत्राची शहानिशा करुन सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविण्यात येतो. परंतू अर्जदार यांनी सदर प्रस्तावात मयत पुष्पा अंकुश बावणे हया शेतकरी होत्या, त्यांच्या नावे शेती होती, त्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब अर्जदाराची पत्नी मयत पुष्पा अंकुश बावणे हया शेतकरी होत्या ही बाब तक्रारदारास सिध्द करता आली नाही.
अर्जदाराने विमा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे दाखल केल्यानंतर सदर प्रस्तावात सामनेवाला क्र.1 कडून अर्जदारास प्रस्तावात आढळून आलेल्या त्रुटीची परिपूर्ण पुर्तता करण्यात यावी असे पत्र सामनेवाला क्र.1 यांच्याकडून मिळाल्यानंतरही अर्जदाराने सदर प्रस्तावाची परिपूर्णता सामनेवाला क्र.1 यांच्याकडे केली नाही व त्याबाबतचे कोणतेही स्पष्ट व ठळक असे कारण दिले नाही व मंचासमोर त्या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यास सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे, ही बाब सिध्द होत नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड