निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 25/10/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 01/11/2013 तक्रार निकाल दिनांकः- 02/04/2014
कालावधी 05 महिना. 01 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
ज्ञानेश्वर पिता शामराव थोरात, अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.शेती. अॅड.ए.डी.खापरे.
रा.नांदगांव, पोष्ट बारकीनी, ता.सेलू.जि.परभणी.
विरुध्द
1 तालूका कृषी अधिकारी, गैरअर्जदार. कार्यालय, जिंतुर.
2 डेक्कन इन्शूरन्स अॅण्ड रिइन्शूरन्स ब्रोकर स्वतः
प्रा.लि. फारकडे भवन, भानुदास नगर,
बीग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
3 दि न्यू इंडिया अॅशोरन्स कंपनी लि, पुणे. अॅड.जी.एच.दोडीया.
शाखा कार्यालय, मॅनेजर, यशोदीप बील्डींग,शिवाजी रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत आईचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो मौजे नांदगांव ता.सेलु येथील रहिवाशी असून तिची आई नामे मथुराबाई शामराव थोरात दिनांक 17/06/2012 रोजी पंढरपूर यात्रेसाठी दिंडी मध्ये जात असतांना भरधाव टँकरने धडक दिल्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला. सदरचा अपघात हा मौजे जावजीबुवाची वाडी ता.दौंड जि.पूणे येथे झाला. सदरच्या अपघाता बद्दल पोलीस स्टेशन यवतला माहिती दिली. त्याप्रमाणे संबंधीत टँकरच्या चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. सदर अपघातानंतर पोलीसानी अर्जदाराच्या मयत आईचा मृतदेह ग्रामिण रुग्णालयत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. व स्थळ पंचनामा करण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की, मयत आईच्या नावे मौजे देवगांव ता.सेलु येथे गट क्रमांक 275 मध्ये 1 हेक्टर 09 आर जमीन होती व ती हयात असताना सदरची शेती कसून खात होती. याबद्दल अर्जदाराच्या आईचे नांव 7/12, 8 (अ), 6 (क), 6 (ड) या प्रमाणपत्रावर आलेले आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिची आई शेतकरी अपघात विमा योजना 2011-12 ची लाभार्थी होती. म्हणून अर्जदाराने तिच्या आईच्या सदर अपघात मृत्यूनंतर विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून मयत आईचा विमादावा सर्व त्या आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला. सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 याने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरचा विमादावचा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या विमादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यास चौकशी केली असता, त्यानी अर्जदारास सांगीतले की, विमा कंपनीने आईचे वय मृत्यू समयी 75 वर्षा पेक्षा जास्त असल्यामुळे नामंजूर केला आहे. सदरचे विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन दावा नामंजुर केला व सेवेत त्रुटी दिली. वास्तविक आईचे मृत्यू समयी वय 65 वर्ष होते, याबाबत संबंधीत डॉक्टरने देखील आर्इचे पोस्ट मार्टेम करते वेळी वय 65 वर्ष लिहिले आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन सेवेत त्रुटी दिल्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश द्यावा की, आईच्या विम्या दाव्यापोटी 1 लाख रु. द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे अर्जदारास द्यावेत तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 18 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये क्लेमफॉर्म भाग -3, क्लेमफॉर्म भाग 1, संस्थानचे शिफारस पत्र, 7/12, 8 (अ), फेरफार, 6 (क), क्लेमफॉर्म भाग 2, प्रतिज्ञापत्र, फिर्यादीचा जबाब, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू व वयाचे प्रमाणपत्र, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मतदार यादी, स्टेटस रिपोर्ट, इ. कागदपत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवनुही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधीकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. अर्जदाराने केलेल्या तक्रारीचा विचार करता अर्जदाराने आमच्या विरुध्द केलेली तक्रार ही अपु-या माहितीवर व गैरसमजाने केलेली आहे. या नेमणुकीसाठी आमच्या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही. अर्जदाराच्या मयत आईचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराची आईचे वय मृत्यू समयी 75 वर्षां पेक्षा जास्त असल्यामुळे विमादावा दिनांक 01/01/2013 रोजीच्या पत्राव्दारे फेटाळला आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही, म्हणून सदर प्रकरणातून आम्हांस मुक्त करावे. असे म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदार आमचा ग्राहक नाही या कारणास्तव प्रकरण खारीज करणे योग्य आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदाराच्या मयत आईचा विमादावा त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर कागदपत्राची पहाणी केले असता, असे निदर्शनास आले की, अर्जदाराच्या मयत आईचे दिनांक 01/01/1994 रोजी 60 वर्ष वय होते. याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराच्या आईचे मृत्यू समयी 78 वर्ष वय होते व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे जे शेतकरी 12 ते 75 वर्षाचे आहेत, त्यांनाच सदर विम्याचा लाभ घेता येता, परंतु अर्जदाराची आई मरते वेळी 78 वर्षाची असले कारणाने विमा कंपनीने सदर पॉलिसीच्या नियमा प्रमाणे विमादवा दिनांक 01/01/2013 रोजीच्या पत्राव्दारे नामंजूर केला आहे. ते योग्यच आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 14 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 16 वर तिन कागदपत्राच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये ओळखपत्र, Repudiation Letter, पॉलिसी कागदपत्रे दाखल केले आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत
आईचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत
विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराची आई नामे मथुराबाई शामराव थोरात यांना मौजे देवगांव ता.सेलु येथे जमीन गट क्रमांक 275 मध्ये 1 हेक्टर 09 आर शेतजमीन होती व ती शेतकरी अपघात विमा योजनेची लाभार्थी होती. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/5 वरील 7/12 उतारा वरुन व तसेच नि.क्रमांक 4/7 वर दाखल केलेल्या गाव नमुना नं. 8 (अ) व तसेच नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेल्या फेरफारच्या रेव्हेन्यु रेकॉर्डवरुन सिध्द होते.
अर्जदाराची आई नामे मथुराबाई शामराव थोरात यांचा जावजीबुवाची वाडी ता. दौंड जि.पुणे येथे दिनांक 17/06/2012 रोजी दिंडी मध्ये पायी जात असतांना कंटेनर ट्रकच्या ड्रायव्हरने वाहन निष्काळजीपणे चालवुन अर्जदाराच्या आईस जोरात धडक दिली व सदर अपघातात अर्जदाराच्या आईचा मृत्यू झाला होता. ही बाब नि.क्रमांक 4/16 वर दाखल केलेल्या यवत पोलीस ठाणेच्या एफ.आय.आर. नं. 131/12 च्या एफ.आय.आर. प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 4/22 वरील मरणोत्तर पंचनाम्याच्या प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 4/26 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेमच्या रिपोर्टवरुन सिध्द होते.
मयत मथुराबाई शामराव थोरात यांचा अर्जदार हा वारस आहे. ही बाब नि.क्रमांक 4/11 वर दाखल केलेल्या वारसा प्रकरणाची नोंदवहीच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या आईच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याचा लाभ मिळावा म्हणून मयत आईचा विमादावा सर्व त्या आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 कडें दाखल केला होता. ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील क्लेमफॉर्म भाग 3 च्या प्रतीवरुन तसेच नि.क्रमांक 4/2 वरील क्लेमफॉर्म भाग 1 च्या प्रतीवरुन व नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग 2 च्या कागदपत्रवरुन सिध्द होते.
सदरचा अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने दिनांक 01/01/2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराच्या आईचे वय मृत्यू समयी 75 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे कारण दाखवुन विमादावा नामंजूर केला होता. ही बाब नि. क्रमांक 16/2 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते. विमा कंपनीचे अर्जदाराच्या आईचा विमादावा फेटाळण्याचे कारण मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराची आई नामे मथुराबाई शामराव थोरात ही मृत्यू समयी 65 वर्षाची होती. ही बाब नि.क्रमांक 4/24 वर दाखल केलेल्या मेडीकल ऑफीसर दौंड यांनी दिनांक 17/06/2012 रोजी दिल्या प्रमाणपत्राच्या प्रतीवरुन सिध्द होते. व तसेच अर्जदाराची आई मृत्यू समयी 65 वर्षाची होती, ही बाब देखील नि.क्रमांक 4/26 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्टवरुन सिध्द होते. तसेच मयताचे वय किती होते, हा सांगणारा फक्त डॉक्टरच्या योग्य रितीने सांगु शकतो असे मंचाचे मत आहे. तसेच अर्जदाराच्या आईचे वय 68 वर्ष होते ही बाब नि.क्रमांक 4/32 वर दाखल केलेल्या मतदार यादीच्या प्रतीवरुन दिसून येते.
याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराची आई मरतेवेळी 65 वर्षाचीच होती. व निश्चितच ती 75 वर्षाच्या आतच होती. गैरअर्जदार विमा कंपनीने अत्यंत चुकीच्या पध्दतीने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता अर्जदाराचा मयत आईचा विमादावा फेटाळला आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या आईचे वय मरते वेळी 75 वर्षांपेक्षा जास्त होते. याबद्दल कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. निश्चितच गैरअर्जदार विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन अर्जदाराच्या मयत आईचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत आईच्या विमा
दाव्यापोटी रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) अर्जदारास
द्यावेत.
3 तक्रार अर्ज खर्चापोटी गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आदेश मुदतीत
रु.1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.