निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 11/12/2013
कालावधी 08 महिने. 09दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
कोंडीबा मोतीराम सानप. अर्जदार
वय 40वर्षे. धंदा. शेती. अॅड.ए.डी.खापरे.
रा. शेवडी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषि अधिकारी कार्यालय,जिंतूर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स ब्रेाकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7, सेक्टर ई 1,
टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि. नागपूर.
शाखा कार्यालय, दयावान कॉम्प्लेक्स,
स्टेशन रोड, परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे शेवडी ता.जिंतूर जि परभणी येथील रहिवाशी असून त्याच्या मयत पत्नीच्या नावे मौजे शेवडी ता.जिंतूर जि. परभणी येथे गट नं. 256 मध्ये शेती आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराची पत्नी दिनांक 25/06/2010 रोजी स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका उडून अपघात झाला. पोलीसांनी अर्जदाराची पत्नी हॉस्पीटल मध्ये अॅडमीट असतांना अर्जदाराच्या पत्नीचे मृत्यूपूर्व जबाब घेतला. अर्जदाराच्या पत्नीचा ससुन हॉस्पीटल पूणे येथे उपचारा दरम्यान दिनांक 30/06/2010 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर पोलीसांनी मयताच्या प्रेताचा मरणोत्तर पंचनामा केला व ससुन जनरल हॉस्पीटल वैद्कीय महाविद्यालय पूणे येथे शवविच्छेदन करण्यात आले.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यू नंतर सर्व गोष्टीची चौकशी करुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 01/12/2010 सर्व कागदपत्रासहीत विमादावा दाखल केला, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 याने जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी यांचेकडे अर्जदाराचा विमादावा सादर केला. जिल्हा कृषी अधिका-याने सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे सादर केला.
गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 28/02/2011 रोजी विमादावा पाठविला गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे मंजुरीसाठी पाठविला.त्यानंतर अर्जदाराने आपल्या विमादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता, त्याने गैरअर्जदार क्रमांक 3 याने तुमचा विमादावा 90 दिवसाच्या कालावधी मध्ये दाखल केला नाही, म्हणून नामंजूर केला आहे असे सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचा विमादावा दिनांक 24/03/2011 रोजी नाकारला व सदरची तक्रार ही मुदतीत आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची सदरची तक्रार मंजूर करण्यात यावी, गैरअर्जदारास असा आदेश द्यावा की, त्याने अर्जदाराला 1 लाख रु. मृत्यू तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावे व तसेच गैरअर्जदाराना असा आदेश करावा की, त्याने मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्जखर्चा पोटी 5000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश करावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
नि.क्रमांक 4 वर 23 कागदपत्राच्या यादीसह 23 कागदपत्रे अर्जदाराने पुराव्या बाबत दाखल केले आहे. ज्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पत्र, क्लेमफॉर्म भाग 1, 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, जमिनीचा नकाशा, वारस फेरफार प्रमाणपत्र, 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, शेताचा नकाशा, गाव नमुना 6 क, क्लेमफॉर्म भाग -2, प्रतीज्ञापत्र, मयताचे मतदान कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, शव फॉर्म, घटनास्थळ पंचनामा, मृत्यू जबाब, बँकेचे पासबुक, पोस्टमार्टेम रिपोर्ट, इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुन ही
( नि.क्रमांक 8 वर पोच पावती ) मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हे आमचे ग्राहक होवु शकत नाहीत, परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा हप्ता स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे त्यांचेच ते ग्राहक होवु शकतात आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोंत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे आहे की, आम्ही फक्त शेतक-याकडून विमादावा विना मोबदला स्विकारतो व प्राप्त झालेल्या विमा दाव्याची छाननी करुन व योग्य ते कागदपत्रे मिळाल्यानंतर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवुन देतो व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसास देणे एवढेच आहे व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, मयत विमल कोंडीबा सानप गाव शेवडी ता.जिंतूर जि. परभणी अपघात दिनांक 30/06/2010 सदरील प्रस्ताव हा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून प्राप्त झाला तो प्रस्ताव त्याने दिनांक 13/05/2011 ला गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवला असता गैरअर्जदार विमा कंपनीने सदर प्रस्ताव दिनांक 01/07/2011 रोजी दावा नामंजूर केल्याचे वारसदारास कळविण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 2 याने मंचास विनंती केली की, प्रस्तुत तक्रारी मधून त्यांना पूर्णपणे मुक्त करण्यात यावे.
गैरअर्जदार क्रमांक 2 याने नि.क्रमांक 14/1 वर सदर लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपले लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची संपूर्ण तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार हा आमचा ग्राहक नाही, त्यामुळे सदरची तक्रार चालवण्याचा मंचास अधिकार नाही व तसेच विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने विमा हप्त्यापोटी 1 रु. देखील गैरअर्जदार विमा कंपनीकडे भरलेला नाही. व तसेच Tri-Parte करारा प्रमाणे शेतकरी गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करु शकत नाहीत. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीच्या परभणी शाखेने अर्जदारास पॉलिसी दिलेली नाही व ती नागपूर शाखेच्या गैरअर्जदार विमा कंपनीने दिले आहे व त्यामुळे सदरच्या मंचास तक्रार चालवण्याचा अधिकार नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणने आहे की, त्याने नागपूर येथील विमा शाखेकडून माहिती मिळवली असता व Record ची पहाणी केली असता अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आपला विमादावा दाखल केलेला नाही, त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या
पत्नीचा शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत
विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत
त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराची मयत नामे विमल कोंडीबा सानप ही पत्नी होती ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/12 वरील तलाठ्याच्या वारस प्रमाणपत्रा वरुन क्लेम फॉर्म भाग – 2 वरुन सिध्द होते.
अर्जदाराची मयत पत्नी नामे विमल कोंडीबा सानप यास मौजे शेवडी ता.जिंतूर जि. परभणी येथे गट क्रमांक 256 मध्ये 1 हेक्टर 61 आर जमीन होती ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील दाखल केलेल्या 7/12 उता-यावरुन व तसेच नि.क्रमांक 4/5 वरील होल्डींग प्रमाणपत्रा वरुन, नि.क्रमांक 4/11 वरील नमुना नं. 6 क या कागदपत्रावरुन सिध्द होते व सदरील सर्व कागदपत्रा वरुन अर्जदाराची पत्नी मृत्यू समयी शेतकरी होती निदर्शनास येते.
अर्जदाराची पत्नीचा दिनांक 25/06/2010 रोजी स्वंयपाकाचे कामात असतांना स्टोव्हचा भडका उडून अपघात झाला होता ही बाब नि.क्रमांक 4/16 वरील संबंधीत पोलीसाने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पूणे यास रिपोर्ट केलेले कागदपत्रावरुन दिसून येते व तसेच अर्जदाराच्या पत्नीचा उपचारा दरम्यान दवाखान्यात 30/06/2010 रोजी मरण पावली ही बाब देखील सदरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच नि.क्रमांक 4/23 वरील पोस्टमार्टेम रिपोर्टच्या कागदपत्रावरुन देखील सिध्द होते.
तसेच अर्जदाराने तिच्या पत्नीच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे दाखल केला होता व गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला होता ही बाब नि.क्रमांक 4/1, क्लेमफॅार्म भाग -3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, व तसेच सदर बाब नि.क्रमांक 4/2 वरील क्लेमफॉर्म भाग – 1 वरुन देखील सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात म्हंटले आहे की, अर्जदाराचा कोणताही विमादावा त्यांच्या कार्यालयास दाखल केला नाही हे विमा कंपनीचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात स्पष्टपणे म्हंटले आहे की, मयत विमल कोंडीबा सानप याचा प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी परभणी मार्फत त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाला, त्यानंतर तो प्रस्ताव दिनांक 13/05/2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीस पाठवला असता गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 01/07/2011 रोजीच्या पत्राव्दारे दावा नामंजूर केल्याचे वारसदारास कळविले आहे. असे म्हंटले आहे व त्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुराव्यासाठी नि.क्रमांक 12/2 वर गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 01/07/2011 रोजी अर्जदारास पाठविलेले Repudiation Letter चे अवलोकन केले असता गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिल्यामुळे त्रिपक्षीय करारानुसार तुमचा नुकसान दावा देवु शकत नाही, म्हणून अर्जदाराचा विमादावा फेटाळला हे सिध्द होते. गैरअर्जदार विमा कंपनीचे सदरचे कारण योग्य नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्राका मध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहिजे, ही अट मुळीच बंधनकारक नाही. मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलिसीचा खर्च लाभार्थी शेतक-याच्या अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवु नये, या उदात्त हेतुने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतांनाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही, हे तांत्रिक कारण दाखवुन अर्जदाराचा क्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन निश्चितच या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Journal) Page No. 13 I C I Lombard V/s Sindhutai Khairnar या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला. ही अट मुळीच बंधनकारक नाही, हे मत प्रस्तुत प्रकरणालाही लागु पडते. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्याचा विमादावा फेटाळून निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. अर्जदार निश्चितच 1,00,000/- रु. मिळवणेस पात्र आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास मयत पत्नीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त) आदेश तारखे पासून 30
दिवसाच्या आत द्यावीत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.