निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 22/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 16/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 20/12/2013
कालावधी 08 महिने. 04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सावित्रीबाई भ्र. दगडुबा तिगोटे. अर्जदार
वय 32 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.ए.डी.खापरे.
रा. बोर्डा ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
कृषी कार्यालय,गंगाखेड.ता.गंगाखेड.जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
राज अपार्टमेंट जी सेक्टर,प्लॉट नं 29,
रिलायंन्स फ्रेशच्या पाठीमागे, टाउन सेंटर,
सिडको औरंगाबाद.
3 युनायइटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. नागपूर. अॅड.जी.एच.दोडीया. शाखा कार्यालय,शाखा व्यवस्थापक,
दयावान कॉम्पलेक्स, स्टेशन रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमादावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पती नामे दगडुबा दशरथ तिगोटे हे दिनांक 19/08/2009 रोजी अॅटोमधून जात असतांना समोर भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती नामे दगडुबा हे हयात असतांना मौजे बोर्डा ता.गंगाखेड जि.परभणी येथील गट क्रमांक 212 मध्ये त्यांच्या मालकीच्या शेतात शेती करत होते व त्याबद्दलची नोंद 7/12 उतारा, नमुना नं. 8 (अ), 6 (ड), 6 (क) प्रमाणपत्रा मध्ये आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या सदरील घटने नंतर गंगाखेड येथे मरणोत्तर पंचनामा करण्यात आला व त्यानंतर गंगाखेड येथे तिच्या मयत पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संबंधीत पोलीसांनी जबाब घेवुन ट्रक चालकावर 304 A प्रमाणे गुन्हा दाखल केला.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सर्व कागदपत्रांसह विमादावा दाखल केला, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरचा विमादावा जिल्हा कृषी अधिक्षक परभणी यांचेकडे पाठवला व त्यांनी तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठविला व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीकडे पाठविला.
त्यानंतर अर्जदाराने विमा दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता त्यांने असे कळविले की, आपल्या विम्यादाव्या मध्ये कांही कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्याची पुर्तता करा असे सांगीतले, त्याप्रमाणे अर्जदाराने मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्ण पुर्तता केली.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने दाखल केलेल्या विम्या दाव्याबाबत परत गैरअर्जदार 1 ला चौकशी केली त्याने उत्तर दिले की, तुमचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजी बंद केला आहे, म्हणून सदरची तक्रार करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करण्यात यावी व गैरअर्जदारांना असा आदेश देण्यात यावा की, अर्जदाराला 1 लाख रु. द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमायोजने अंतर्गत द्यावेत व तसेच गैरअर्जदाराना असा आदेश द्यावा की, त्यांनी मानसिक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. अर्जदाराना देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 17 कागदपत्रांच्या प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 चे पत्र, क्लेमफॉर्म, होल्डींग प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, 7/12 उतारा, नमुना नं. 8 अ, गाव नमुना नं. 6 क, वारसाचे प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, फिर्याद, पोस्टमार्टेम रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, मतदान ओळखपत्र, प्रतीज्ञापत्र, गैरअर्जदार क्रमांक 3 चे पत्र, डाटा 2009-10, पॉलिसीची प्रत. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुन ही (नि.क्रमांक 6 पोचपावती) गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.गैरअर्जदार क्रमांक 2 यास मंचाची नोटीस तामील होवुनही ( नि.क्रमांक 16 वर पोचपावती) मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. सदरचा आदेश दिनांक 03/09/2013 ला पारीत झाल्यानंतर उशिरा गैरअर्जदार क्रमांक 2 ने टपालाव्दारे आपले फक्त लेखी निवेदन पाठविले व ते मंचास दिनांक 26/09/2013 रोजी प्राप्त झाले, म्हणून त्यांचा लेखी जबाबदावा मंचाने ग्राहय धरला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे, व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, अर्जदार हा आमचा ग्राहक नाही, त्याने आमच्या विमा कंपनीकडे हप्त्यापोटी रक्कम देखील भरलेली नाही व सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही, ट्रायपार्टी अॅग्रीमेंट प्रमाणे शेतकरी विमा कंपनी विरुध्द सदरची तक्रार दाखल करुन शकत नाही. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे की, सदरची पॉलिसी ही परभणी शाखेने जारी केलेली नाही व ती पॉलिसी नागपूर शाखेने जारी केलेली आहे. व नागपूर शाखा ही प्रस्तुत प्रकरणात आवश्यक पार्टी आहे व अर्जदाराने नागपूर शाखेस पार्टी केलेली नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, त्याने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही,म्हणून प्रस्तुतची तक्रार चालवणे योग्य नाही. व तसेच त्यांचे म्हणणे आहे की,त्याने नागपूर शाखेशी चौकशी करुन व कागदपत्राची पहाणी करुन हे दर्शविते की, अर्जदाराने विमा कंपनीकडे कोणताही विमादावा दाखल केलेला नाही व अर्जदाराचा विमादावा हा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसानंतर मिळाला व पॉलिसीच्या अटी प्रमाणे सदरचा विमादावा हा 90 दिवसांच्या आत विमा कंपनीकडे मिळणे आवश्यक होते, त्यामुळे अर्जदाराचा विमादावा विमा कंपनीने विचारात घेतला नाही व विमादावा सदरील कारणास्तव फेटाळला गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या पतीच्या अपघाताची घटना ही 2009 साली घडली आहे व अर्जदाराने मंचासमोर चार वर्षांनंतर सदर तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे मुदतीच्या कारणास्तव खारीज होणे योग्य आहे.
व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत
पतीचा शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई देण्याचे
नाकरुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा मयत पती नामे दगडुबा दशरथ तिगोटे हा शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.क्रमांक 4/7 वरील 7/12 उतारा, नि.क्रमांक 4/8 वरील गाव नमुना नं. 8 अ चा उतारा, नि.क्रमांक 4/9 वरील गाव नमुना सहा क चा उतारा या महसुल कागदपत्रावरुन सिध्द होते.
मयत दगडुबा दशरथ तिगोटेचा अर्जदार ही वारसदार (पत्नी ) आहे ही बाब नि.क्रमांक 4/10 वरील संबंधीत ग्रामसेवकाने दिलेल्या वारस प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 19/08/2009 रोजी अॅटो मध्ये बसून जात असतांना ट्रक क्रमांक एम.एच.-31-6964 ने समोरुन धडक देवुन गंभीर जखमी होवुन अर्जदाराचे मयत पती नामे दगडुबा दशरथ तिगोटे यांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/11 वरील गंगाखेड पोलीस स्टेशन गुन्हा रं.नं. 143/09 मधील एफ.आय.आर. कॉपीवरुन व घटनास्थळ पंचनामाच्या प्रती वरुन सिध्द होते व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/15 वरील पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन दिसून येते.
मयत दगडुबा तिगोटे हा शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी) विम्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमादावा गैरअर्जदार नं 1 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील, गैरअर्जदार क्रमांक 2 च्या पत्रावरुन, नि.क्रमांक 4/2 वरील क्लेमफॉर्म भाग 1 वरुन व तसेच नि. क्रमांक 4/4 वरील भाग -4 कागदपत्रावरुन सिध्द होते.
सदरचा अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीच्या नागपूर शाखेकडे पाठवला व तो त्याने दिनांक 24/03/2011 रोजीच्या पत्राव्दारे “ करारानुसार आपण क्लेम संबंधीत कागदपत्रे पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिलेमुळे आम्ही तुमचा नुकसान दावा देता येत नाही ” असे कारण दाखवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला होता ही बाब नि.क्रमांक 17 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते.
अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, अर्जदाराने आपला विमादावा मुदतीत दाखल केले. गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, सदरची तक्रार मुदतबाहय आहे, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजीच्या पत्राव्दारे फेटाळला व याचाच अर्थ असा होतो की, अर्जदारास दावा लावण्याचे कारण 24/03/2011 रोजी घडले व अर्जदाराने सदरची तक्रार 22/03/2013 रोजी मंचासमोर दाखल केली आहे व ग्राहक संरक्षण्या कायद्या प्रमाणे दावा दाखल करणेच्या कारणापासून दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे व प्रस्तुतची तक्रार ही मुदीतीत आहे, असे मंचाचे ठाम मत आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने दर्शविलेले सदर कारण योग्य नाही. असे मंचाचे ठाम मत आहे. कारण पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राहक धरता येणार नाही.कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते.
म्हणून सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
अर्जदारास तिच्या मयत पतीचा डेथक्लेम नुकसान भरपाई विमा दाव्यापोटी
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/-फक्त (अक्षरी रु.एकलाख
फक्त ) द्यावेत.
3 तसेच गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च म्हणून अर्जदारास रु.1,000/- फक्त.
अक्षरी रु. एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.