निकाल
दिनांक- 13.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्या)
1. तक्रारदार श्रीमती विमलबाई संतराव नरवटे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
2. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्याची सेवा देण्यास सामनेवाले यांनी कसूर केल्याबाबत व नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार या मयत संतराम आश्रुबा नरवटे यांच्या पत्नी आहेत. तक्रारदार यांचें पती नामे संतराम हे निमला ता.धारुर जि.बीड येथे राहतात. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे शेत जमिन नोंदलेली आहे. मयत संतराम हे चाकरवाडी येथे माऊलीचे समाधी दर्शन करुन धारुर येथे गेले व त्यानंतर गावी जाणे कामी धारुर येथून तेलगांवकडे जीप क्र.एम.एच.-21-सी-1093 मध्ये बसून रात्री साडेआठ वाजता धारणवाडी फाटयाजवळ चौरांबा शिवारात जीप व ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक झाली व अपघात झाला. त्या अपघातात संतराम यांस गंभीर इजा झाल्या. संतराम यांस एस.आर.टी.आर.मेडीकल कॉलेज अंबाजोगाई येथे शरीक केले असता ते मृत्यू पावले होते. त्यांच्या मृत्यू बाबत पोलिस स्टेशन कडे खबर देण्यात आली. पोलिस स्टेशन यांनी आकस्मात मृत्यू नंबर 79/2009 कलम 279,337,335,304 (ए) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळ पंचनामा, आकस्मात मृत्यू रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्र जोडली आहेत.
4. महाराष्ट्र शासना तर्फे प्रत्येक शेतक-यांचा विमा शासन आदेशानुसार काढण्यात आलेला असून शेतक-यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांना विमा रक्कम देण्याची तरतुद आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे रितसर अर्ज दिला. तो अर्ज सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग कंपनी कडे पुढील कार्यवाही साठी पाठविला. सामनेवाले क्र.2 चे पत्रानुसार तक्रारदाराने दि.5.4.2010 रोजी कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाले क्र.3 यांचेकडे सदरील प्रस्ताव पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी दि.31.12.2010 रोजी च पत्रानुसार अपूर्ण कागदपत्रामुळे नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे पत्र दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.13.09.2011 रोजी कृषी आयूक्त यांचेकडे तक्रारदार यांचा क्लेमचा पुर्नविचार होणे बाबत विनंती पत्र कुरिअर द्वारे पाठविले, परंतु सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्राची पूर्तता केली असतानाही सामनेवाले क्र.3 यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे. सबब, तक्रारदार यांनी शेतकरी वैयक्तीक जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवांले यांचेकडून मिळावे तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाबददल व तक्रारीच्या खर्चाबददल रक्कम मिळावी अशी विनंती केली आहे.
5. सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी धारुर यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे.सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना त्यांचेकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता ही बाब मान्य केली आहे.सामनेवाले क्र.2 यांनी सदर प्रस्तावामध्ये चार त्रूटी काढल्या होत्या बाबत पुर्तता करणेसाठी या कार्यालयाचे पत्र क्र.116 दि.8.2.2010 रोजी मयताचे मुलास कळविले होते. तसेच स्मरण पत्र दि.8.3.2010 व 8.6.2010 रोजी देण्यात आले होते. तक्रारदाराने दि.9.6.2010 रोजीच्या पत्रान्वये त्रुटीची पुर्तता करुन कागदपत्र दाखल केली होती. ती सदर कार्यालयाने दि.14.6.2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविले होते.सामनेवाले क्र.2 यांनी परत मयताचा शवविच्छेदन अहवाल पोलिस अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेला मागितला तो सुध्दा तक्रारदाराने दिल्याचे दि.3.12.2011 रोजी कळविले आहे. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे.
6. सामनेवाले क्र.2 कबाल ब्रोकींग इन्शुरन्स कंपनी यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले की, त्यांना शेतक-याकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी करुन संपुर्ण कागदपत्राची पुर्तता करुन तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविण्याचे ते काम करतात.त्यांचे काम फक्त कागदपत्र पुर्ण आहे किंवा नाही हे पाहणे व काही त्रुटी असल्यास त्याबाबत तहसीलदार अगर कृषी अधिकारी यांना कळविणे व कागदपत्राची पुर्तता करुन घेणे एवढे आहे. सामनेवाले क्र.2 यांचे पुढे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम त्यांना दि.27.11.2009 रोजी मिळाला. त्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रे अपुर्ण होते. त्यांमुळे त्यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून पुर्तता करण्यास सांगितले. त्यासंबंधी स्मरणपत्रही पाठविले.तक्रारदार यांनी मुदतीत कागदपत्र हजर न केल्यामुळे त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम दि.21.12.2010 रोजी इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. तदनंतर इन्शुरन्स कंपनीने तो क्लेम नाकारला. सामनेवाले क्र.2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तदनंतर त्यांना संपूर्ण कागदपत्र मिळाले ते कागदपत्र त्यांनी इन्शुरन्स कंपनीला मंजूरीसाठी पाठविले. त्यामुळे त्यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केली नाही.
7. सामनेवाले क्र.3 इन्शुरन्स कंपनी यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दि.14.11.2010 रोजी पर्यत कागदपत्राची पुर्तता केली नाही.तसेच तक्रारदार यांनी पॉलिसी कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांत सदर प्रस्ताव दाखल करणे आवश्यक होते. सदर प्रस्ताव मुदतीत दाखल नाही. तसेच तक्रारदार हिने मयताचा वयाचा पुरावा दाखल केला नाही. बँकेचे पासबूक, पोलिस पाटलाचा रिपोर्ट नाही, इत्यादी कागदपत्र दाखल नाही. तसेच तक्रारदाराने करार क्र.5 दि.26.11.2009 हा दाखल केला नाही. सबब, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराची तक्रार खर्चासह रदद करावी अशी विनंती केली आहे.
8. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र,लेखी युक्तीवाद, कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व सामनेवाले क्र.3 यांचे शपथपत्र व दाखल कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास यांना सेवा देण्यात
कसूर आहे काय ? होय.
2. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता
केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार नुकसान भरर्पा मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी गावचा नमुना अ, 7/12 तसेच फेरफार ची नक्कल नोंद दाखल केले. तसेच अपघात झाल्याप्रकरणी पोलिस जवाब, घटनास्थळ पंचनामा शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्र दाखल केले.
वर नमुद केलेले पत्र यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर मयत हा शेतकरी होता. पोलिसांचा जवाब यांच अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर मयत संतराव नरवटे हे जिप मध्ये बसून जात असताना मोटार अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांला अंबाजोगाई येथील आर.टी.आर. मेडीकल हॉस्पीटल मध्ये शरीक केले असता मृत्यू पावले. शवविच्छेदन अहवाल यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत संतराव नरवटे यांचे डोक्याला जबर मार लागल्यामुळे मृत्यू झाला त्यामुळे मयत हा अपघातात मरण पावला ही बाब सिध्द होते.
सामनेवाले क्र.1,2 व 3 हे हाजीर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन असे की, त्यांना तक्रारदाराकडून शेतकरी व्यक्तीगत विमा योजना अंतर्गत जी योजना आहे त्यांचा प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांना दि.11.11.2009 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. सामनेवाले क्र.2 यांचे कथनि असे की, सामनेवाले क्र.2 यांना दि.27.11.2009 रोजी विमा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रासह प्राप्त झाला. सदर त्रूटी असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारास कळविले. तक्रारदारांनी ते दाखल केले नाही. म्हणून सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.3 यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव दि.31.12.2010 रोजी नाकारला.
सामनेवाले क्र.3 यांचे कथन असे की, अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे कागदपत्र मुदतीत न दिल्यामुळे सदर प्रस्ताव नाकारला आहे.
तक्रारदाराचे शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे मुदतीत प्रस्ताव पाठविला तसेच सामनेवाले क्र.1 यांनी ते सामनेवाले क्र.2 यांच्याकडे पाठविला. सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांनी छाननी केल्यानंतर काही कागदपत्रांची त्रुटी आढळली व त्याबाबत तक्रारदारांस कळविले. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 यांच्याकडे कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाले क्र.2 यांनी सदर कागदपत्र सामनेवाले क्र.3 यांच्याकडे पाठवली परंतु तत्पूर्वीच सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव नाकारला. तक्रारदारांनी दि.13.09.2011 रोजी सामनेवाले क्र.3 यांना पत्र पाठवून विमा प्रस्तावावर पुर्नविचार करावे. तसेच त्याबाबत पत्रे कृषी आयुक्तालय पुणे यांनी सुध्दा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठविले आहे. त्यांच्यात स्पष्ट उल्लेख केलेले आहे की, तक्रारदारास लाभ मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.3 यांना पत्र देऊन विनंती केली परंतु त्यां विनंतीची सामनेवाले क्र.3 यांनी कोणतीही दखल घेतली नाही व टाळाटाळ केली. सामनेवाले क्र.3 यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे असे मंचाचे मत आहे.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही शेतक-याच्या हितासाठी आहे व शेतक-याला त्यांचा लाभ मिळावा म्हणून ही योजना कार्यान्वीत आहे. त्यावर सामनेवाले क्र.3 यांनी पुरेपूर विचार करावा. परतु सामनेवाले क्र.3 यांनी तसे केले नाही. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे म्हणून तक्रारदार विमा रक्कम रु.1,00,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारदारास तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारीचा खर्च रु.2500/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
सबब, मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व त्यावर तक्रार दाखल दि.15.02.2012 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावे.
3. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.