विलंब माफीच्या अर्जावर आदेश
दिनांक- 04.09.2013
(द्वारा- श्री विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील अर्ज तक्रार दाखल करण्यास दोन वर्षाचा विलंब झाला तो माफ करुन मिळावा व तक्रार दाखल करण्यास परवानगी मिळावी म्हणून दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या अर्जाचे मजकुराचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी निवेदनाचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी तक्रार दाखल करण्यास जो विलंब
केला आहे त्यासाठी योग्य व वाजवी कारण दिलेले
आहे काय ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे मते त्यांची पती दि.24.04.2008 रोजी सायकांळी 6 वाजेच्या सुमारास ट्रक चालवित असताना फुलसांगवी ते महागाव रोडवर त्यांचे ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला व त्यामध्ये ते मयत झाले. सदर घटनेची माहीती पोलिस स्टेशनला देण्यात आली. मयत अनंत यांचे विरुध्द सदरील ट्रक निष्काळजीपणने व हलगर्जीपणाने चालवून अपघातास कारणीभुत झाले व लोकांचे मृत्यू कारणीभुत झाले याबददल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांचे मते ते अज्ञान व अशिक्षीत असून त्यांना कायद्याचे ज्ञान नाही. त्यामुळे तक्रार मुदतीत दाखल करावी या बाबत माहीती नसल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. सबब, तक्रारदार यांची विंनती की, तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावा व तक्रार दाखल करण्यास परवानगी मिळावी.
सामनेवाला यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदाराचा विलंब माफ करण्यास कोणतेही संयूक्तीक कारण नाही. केवळ तक्रारदार अडाणी आहेत या कारणास्तव विलंब माफ करता येत नाही. सदरील अपघात हा पतीच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे व त्याबददल त्याचेवर गुन्हाही दाखल झालेला आहे. सबब, विलंब माफीचा अर्ज नाकारण्यात यावा.
तक्रारदार यांनी अर्जात कथन केलेल्या बाबीचे अवलोकन केले असता या मंचास असे आढळून आले की, तक्रारदार यांनी सदरील तक्रार मुदतीत दाखल करावी लागते यांचे संपूर्ण ज्ञान होते. कारण त्यांनी क्लेमचे कागदपत्राची पुर्तता करुन ते सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविले होते. तक्रारदार यांनी सदरील तक्रार अर्ज विलंबाने का दाखल केला या बाबत कोणतेही संयूक्तीक व वाजवी कारण दिलेले नाही. कायदयाचे ज्ञान हा माफीस पात्र नाही. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेला विलंब माफीचा अर्ज रदद होण्यास पात्र आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज रदद करण्यात येतो व त्याअनुषंगाने
तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.