निकाल
दिनांक- 13.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
1. तक्रारदार श्रीमती मंगल कुंदन खोमणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
2. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्याची सेवा देण्यास सामनेवाले यांनी कसूर केल्याबाबत व नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार या मयत बाळू ऊर्फ कुंदन खोमणे यांच्या पत्नी आहेत. तक्रारदार यांचें पती नामे बाळासाहेब ऊर्फ बाळू ऊर्फ कुंदन पि. नारायण खोमणे हे खोमणेवाडी ता.केज जि.बीड येथे राहतात. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे शेत जमिन नोंदलेली आहे. आपली शेती करुन ते आपला व कूटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दि.07.04.2010 रोजी तक्रारदार यांचे पती शेतात काम करीत असताना त्यांना संर्पदंश झाला. त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचे तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. दि.18.04.2010 रोजी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू बाबत पोलिस स्टेशन कडे खबर देण्यात आली. पोलिस स्टेशन केज यांनी आकस्मात मृत्यू नंबर 38/2010 कलम 174 सी.आर.पी.सी. अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद केली. तसेच घाटी रुग्णालय येऊन मरणोत्तर पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारदार यांचे पती शेतात काम करीत असताना संर्पदंश झाल्यामुळे मरण पावले आहेत.
4. महाराष्ट्र शासना तर्फे प्रत्येक शेतक-यांचा विमा शासन आदेशानुसार काढण्यात आलेला असून शेतक-यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांना विमा रक्कम देण्याची तरतुद आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे रितसर अर्ज दिला. तो अर्ज सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग कंपनी कडे पुढील कार्यवाही साठी पाठविला. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना काही कागदपत्राची पुर्तता करण्याचे सुचविले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे सर्व कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाले क्र.3 यांचेकडे सदरील प्रस्ताव पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी तो प्रस्ताव दि.31.12.2010 रोजी नामंजूर केला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 कृषी आयूक्त यांचेकडे तक्रारदार यांचा क्लेमचा पुर्नविचार होणे बाबत विनंती पत्र पाठविले, परंतु सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्राची पूर्तता केली असतानाही सामनेवाले क्र.3 यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे. सबब, तक्रारदार यांनी शेतकरी वैयक्तीक जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवाले क्र.3 यांचेकडून मिळावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाबददल व तक्रारीच्या खर्चाबददल रक्कम मिळावी अशी विनंत केली आहे.
5. सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी केज यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांचेकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, त्यांनी संपूर्ण कागदपत्र हे सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठविली होती. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे. सामनेवाले क्र.1 यांनी हे ही मान्य केले आहे की, खातेदार शेतक-यांचा शेतकरी वैयक्तीक जनता विमा त्या कालावधीसाठी भरला होता. तक्रारदार यांचे पती संर्पदंशामुळे मयत झाले ही बाब त्यांनी मान्य केली आहे. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी असे कथन केले की, संपुर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे.
6. सामनेवाले क्र.2 कबाल ब्रोकींग इन्शुरन्स कंपनी यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले की, त्यांना शेतक-याकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी करुन संपुर्ण कागदपत्राची पुर्तता करुन तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविण्याचे ते काम करतात.त्यांचे काम फक्त कागदपत्र पुर्ण आहे किंवा नाही हे पाहणे व काही त्रुटी असल्यास त्याबाबत तहसीलदार अगर कृषी अधिकारी यांना कळविणे व कागदपत्राची पुर्तता करुन घेणे एवढे आहे. सामनेवाले क्र.2 यांचे पुढे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम त्यांना दि.26.08.2010 रोजी मिळाला. त्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रे अपुर्ण होते. त्यांमुळे त्यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून पुर्तता करण्यास सांगितले. त्यासंबंधी स्मरणपत्रही पाठविले.तक्रारदार यांनी मुदतीत कागदपत्र हजर न केल्यामुळे त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम दि.21.12.2010 रोजी इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. तदनंतर इन्शुरन्स कंपनीने तो क्लेम नाकारला. सामनेवाले क्र.2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तदनंतर त्यांना संपूर्ण कागदपत्र मिळाले ते कागदपत्र त्यांनी इन्शुरन्स कंपनीला मंजूरीसाठी पाठविले. त्यामुळे त्यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केली नाही.
7. सामनेवाले क्र.3 इन्शुरन्स कंपनी यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दि.14.11.2010 रोजी पर्यत कागदपत्राची पुर्तता केली नाही त्यामुळे त्यांनी तक्रारदार यांचा अर्ज दि.31.12.2010 रोजी नामंजूर केला.तक्रारदार यांचा क्लेम केवळ कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे नामंजूर करण्यात आला. सामनेवाले क्र.3 यांचे पूढे कथन की,तक्रारदार यांनी मागणी व कागदपत्र मुदतीत न दिल्यामुळे त्यांना त्या बाबत चौकशी करता आली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.3 हे तक्रारदार यांचे पती कसे मयत झाले व ते क्लेम मिळण्यास पात्र आहेत किंवा नाही याबाबत चौकशी करता आली नाही. सबब, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराची तक्रार रददची विनंती केली आहे.
8. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्राची अवलोकन केले. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व सामनेवाले क्र.1 व 3 यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी मयत कुंदन हे शेतकरी होते व ते
शेती काम करीत असताना त्यांना संर्पदंश झाल्यामुळे
त्यांचा मृत्यू झाला ही बाब सिध्द केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे संपुर्ण कागदपत्राची
पुर्तता केली ही बाब सिध्द केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांना सेवा देण्यास कसूर
केला आहे ही बाब सिध्द केली आहे काय ? होय.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
9. तक्रारदार यांचे शपथपत्राचे अवलोकन केले, तसेच तक्रारदार यांनी गावनमुना 8-अ चा उतारा, गावनमुना 7-अ 12 चा उतारा, फेरफार नक्कल दाखल केली. सदरील कागदपत्राचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की,मयत कूंदन हा शेतकरी होता व त्यांचे नांवे नांदूरघाट येथे शेत जमिन आहे. पोलिस पेपरचे अवलोकन केले असता व त्या कामी जाबजवाब घेतले त्यांचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की, मयत हा आपल्या शेतात काम करीत असताना त्यांला सापाने दंश केला. तदनतर त्यांला प्रथम बीड येथील सरकारी रुग्णालय बीड येथे दाखल केले तेथून त्यांला घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे भरती केले व तो उपचार घेत असताना मृत्यू पावला. शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा मृत्यू हा संर्पदंशामूळे झाला आहे ही बाब स्पष्ट नमूद केली आहे. सामनेवाला यांनी मयत कूंदन यांचा मृत्यू संर्पदंशाने झाला ही बाब नाकारली नाही. सबब, मयत कूंदन हा शेतकरी होता व तो शेतात काम करीत असताना त्यांला संर्पदंश झाला व त्यामुळे तो मृत्यू झाला ही बाब सिध्द होते.
10. तक्रारदार यांनी त्यांचे शपथपत्रामध्ये कथन केले की, त्यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे दि.11.08.2010 रोजी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. तसेच तक्रारदारांनी दि.31.12.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांना पाठविलेले पत्र प्राप्त झाले. त्याप्रमाणे त्यांनी संपुर्ण कागदपत्र हजर केले. संपुर्ण कागदपत्राची पूर्तता करुनही सामनेवाले क्र.3 यांनी कोणतीही संयूक्तीक कारणाविना मागणी मुदतीत नाही म्हणून निकाली काढली. तक्रारदार यांनी पुर्नविचार करण्यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा केला परंतु सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. सबब, तक्रारदार यांचे मते सामनेवाले यांनी सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे.
11. सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे शपथपत्रामध्ये तक्रारदार यांचेकडून प्रस्ताव मिळाल्या बाबत व तो प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविल्या बाबत म्हटले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात कथन केले आहे की, त्यांना दि.26.8.2010 रोजी तक्रारदार यांचा प्रस्ताव मिळाला, त्यामध्ये काही कागदपत्राची अपूर्णता होती म्हणून त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी कळविले. तक्रारदार यांनी कागदपत्र हजर केले नाही. म्हणून त्यांनी दि.21.12.2010 रोजी प्रस्ताव सामनेवाले क्र.3 कडे पाठविले. दि.31.12.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा अर्ज निकाली काढला. पुढे असे नमूद केले आहे की,तक्रारदारांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केली ते सर्व कागदपत्र त्यांनी सामनेवाले क्र.3 कडे सूर्पूद केले. सामनेवाले क्र.3 यांनी त्यांचे शपथपत्रात नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी मूदतीत सर्व कागदपत्र दाखल केले नाही म्हणून तो प्रस्ताव त्यांनी दि.31.12.2010 रोजी नामंजूर केला.
12. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करता त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे मूदतीत प्रस्ताव दाखल केला व तो प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांचेकडे सामनेवाले क्र.1 यांनी पाठविला ही बाब निष्पन्न होते. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना काही कागदपत्राची पुर्तता करण्याकामी कळविलेले होते. त्याअनुषंगाने पत्रही पाठविले आहे. तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता सामनेवाले क्र.2 यांचेकडे केली. सामनेवाले क्र.2 यांनी सर्व कागदपत्र सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविले. परंतु तत्पुर्वीच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा प्रसताव नामंजूर केला. तक्रारदार यांनी पुन्हा तो प्रस्ताव फेरविचार करावा या बाबत सामनेवाले क्र.3 यांचेकडे विनंती केली पंरतु सामनेवाले क्र.3 यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
13. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेचा मुख्य उददेश हा शेतकरी अपघातात मयत झाल्यास त्यांचे वारसांना नुकसान भरपाई मिळावी हा आहे. सदरील बाब ही समाजाच्या कल्याणासाठी राबविली जाते. सामनेवाले क्र.3 यांनी खुप ताठर भुमिका घेऊन असे प्रकरण तांत्रिक कारणावर नाकारु नये तसेच विमा कंपनीने काही कागदपत्र अपूर्ण असल्यास तक्रारदार यांना त्या बाबत सुचना करणे गरजेचे होते. असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यास अति घाई केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांचेकडे सामनेवाले क्र.2 मार्फत सर्व कागदपत्र पाठविले असतानाही व ते कागदपत्र दि.10.10.2010 रोजी पाठविले होते. तसेच काही कागदपत्र दि.24.11.2010 रोजी पाठविले आहेत. त्या बाबत तक्रारदार यांनी इन्शुरन्स कंपनीला नोटीस देऊन कळविले आहे. सदरील बाबतचा प्रर्कषाने विचार करणे व योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 वर होती. कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे ही अर्ज दिला होता व त्यांनी इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचे अर्जावर पुर्नविचार करण्या बाबत योग्य निर्देश दिला होते त्यांचीही इन्शुरन्स कंपनीने दखल घेतली नाही. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे. म्हणून तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/-मिळण्यास पात्र आहेत. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी सेवेत कसूर केल्यामुळे सदरील रक्कमेवर तक्रार दाखल दिनांकापासून 9 टक्के व्याज मिळण्यास ते पात्र आहेत. तसेच झालेल्या मानसिक त्रासापोटी रककम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- मिळण्यास पात्र आहेत.
14. सबब, मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
15. सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व त्यावर तक्रार दाखल दि.15.02.2012 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावे.
3. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.