जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 32/2012 तक्रार दाखल तारीख – 15/02/2012
तक्रार निकाल तारीख– 30/04/2013
राहूल पिता श्रीमंतराव जामकर,
रा.वडगांव ता.जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) तालुका कृषी अधिकारी,
बीड ता.जि.बीड.
2) विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विस प्रा.लि.,
शॉप नं.1 दिशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन
सेंटर, सिडको औरंगाबाद.
3) शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
अंबिका भवन क्र.19, तिसरा मजला,
धरमपेठ इक्सटेंनशन, शंकर नगर, नागपूर
नोटीस बजावणीसाठी पत्ता- छत्रपती संकुल,
सुभाष रोड बीड ता.जि.बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
अर्जदारातर्फे अड.आर.बी.धांडे,
गैरअर्जदार क्र.1 तर्फे एकतर्फा,
गैरअर्जदार क्र.2 तर्फे कोणीही हजर नाही,
गैरअर्जदार क्र.3 तर्फे अड.ए.पी कुलकर्णी.
---------------------------------------------------------------------------------------
(2) त.क्र.32/12
निकाल
दिनांक- 30.04.2013
(द्वारा- श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराची आई द्वारकाबाई या शेतकरी होत्या त्यांच्या नावे वडगाव येथे गट नं.314, 468, 469 मध्ये शेतजमीन होती. त्यांचा दि.03.07.10 रोजी रस्ता अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद नातेवाईकांनी दिली. मरणोत्तर पंचनामा व जबाब झाले, शवविच्छेदन झाले व मयताचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला असा अहवाल प्राप्त झाला.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाने सन 2009-2010 पर्यंतचा प्रिमिअम गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे भरला आहे. तक्रारदाराने या योजनेअंतर्गत आवश्यक ती कागदपत्रे घेऊन दि.25.05.11 रोजी विमा प्रस्ताव दाखल केला. सदरचा दावा कबाल इन्शुरन्स कंपनीकडे दि.21.06.11 ला पोहोचला, तर गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दि.30.06.11 ला पोहोचला. तो गैरअर्जदार क्र.3 यांनी मुदतीच्या बाहेर असल्यामुळे नाकारला म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. या अंतर्गत त्याने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.एक लाख एवढी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्यात आली. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे मंचासमोर हजर झाले, त्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. कबाल इन्शुरन्सच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना दावा दि.21.06.11 ला मिळाला व तो त्यांनी दि.29.06.11 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला पाठवला.
गैरअर्जदार क्र.3 यांचे लेखी जबाबानुसार पॉलिसीच्या अटीनुसार विमा दावा इन्शुरन्स कंपनीकडे पॉलीसीचा कालावधी संपण्याआधी किंवा तो कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंतच पाठवले गेले पाहीजे, सदरचा दावा त्यांना दि.30.06.11 रोजी पोहोचला म्हणून त्यांनी दि.01.07.11 रोजी तक्रारदाराला पत्र पाठवून तो विमा प्रस्ताव नाकारला. सदरच्या गैरअर्जदाराला मुदतीत विमा प्रस्ताव कोणाकडूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रारदाराला सदरची तक्रार दाखल करण्याचा काही एक अधिकार नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी.
(3) त.क्र.32/12
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.धांडे व गैरअर्जदार क्र.3 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांच्या वकीलांनी सांगितले की, मयताचा मृत्यू दि.03.07.10 रोजी झाला व विमा प्रस्ताव दि.25.05.11 ला दाखल केला. मा.राष्ट्रीय आयोगाच्या लक्ष्मीबाई विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड या खटल्यातील निकालाचा त्यांनी दाखला दिला. त्या अंतर्गत परिच्छेद 13 (2) नुसार घटनेपासून दोन वर्षाच्या आत विमा प्रस्ताव नोडल ऑफीसरकडे अथवा इन्शुरन्स कंपनीकडे पोहोचला असेल आणि तो निकाली निघाला नसेल तर दाव्याचे कारण विमा प्रस्ताव नाकारला अथवा मंजूर केल्या दिवसापर्यंत चालूच राहील. त्याचप्रमाणे त्यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या 7 व्या परिच्छेदाकडे लक्ष वेधले, ज्या अंतर्गत “विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांना प्राप्त होईल त्या दिनांकास तो विमा कंपनीस प्राप्त झाला असे समजण्यात येईल” असे लिहीले आहे. नंतर अर्जदाराच्या वकीलांनी दि.29 मे 2009 च्या शासन परिपत्रकाकडे मंचाचे लक्ष वेधले व त्यातील सुधारीत कलम 23(इ) (2) नुसार विमा रकमेवर व्याजाची मागणी केली.
गैरअर्जदार क्र.3 चे वकीलांनी युक्तीवादात सांगितले की, घटना दि.03.07.10 रोजी झाली. पॉलीसीचा कालावधी दि.15.08.09 ते 14.08.10 असा होता. विमा दावा त्यांना जास्तीतजास्त 14.11.10 पर्यंत मिळायला हवा होता परंतू प्रत्यक्षात त्यांना विमा प्रस्ताव दि.30.06.11 ला पोहोचला म्हणून त्यांनी दि.01.07.11 रोजी पत्र पाठवून विलंबाच्या मुद्यावर नाकारला.
वरील विवेचनावरुन खालील मुददे मंचाने विचारात घेतले.
मुददे निष्कर्ष
1) तक्रारदाराने त्यांचा विमा प्रस्ताव मुदतीत
आहे, हे सिध्द केले आहे का? होय.
2) तक्रारदाराने तो शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजनेअंतर्गत विमा रकमेस पात्र आहे,
हे सिध्द केले आहे का? होय.
3) तक्रारदाराने तो 20 मे 2009 च्या शासन
परिपत्रकाप्रमाणे व्याज रकमेस पात्र आहे,
हे सिध्द केले आहे का? नाही.
(4) त.क्र.32/12
2) काय आदेश? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ः- तक्रारदाराच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार त्यांनी विमा प्रस्ताव दि.25.05.11 ला दाखल केला. त्यांनी दिलेल्या लक्ष्मीबाई विरुध्द आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड या दाखल्यानुसार व शासन परिपत्रक 10 ऑगस्ट 2010 च्या 7 व्या
परिच्छेदानुसार त्यांनी दाखल केलेला विमा प्रस्ताव घटनेपासून दोन वर्षाच्या आत म्हणजे मुदतीतच आहे. म्हणून मंच मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुददा क्र.2 ः- मयत द्वारकाबाई यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाला ती मोटार सायकलवरुन प्रवास करत असताना गाडी स्लीप झाली, त्यांच्या डोक्याला मार लागून त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या संदर्भात प्रथम खबर, साक्षीदाराचे जबाब, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत. त्यावरुन त्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाला हे स्पष्ट होते. 7/12 चा उतारा, 8अ उतारा, इत्यादी कागदपत्रांवरुन मयत शेतकरी होती हे सिध्द होते. तिचे वय 40 वर्षे होते असे दाखल कागदपत्रांवरुन दिसते. तक्रारदार हा मयताचा मुलगा आहे. वरील विवेचनावरुन मंच मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुददा क्र.3 ः- दाखल कागदपत्रांवरुन दिसते की, तक्रारदाराने विमा प्रस्ताव दि.25.05.11 रोजी कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केला आणि गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनी यांनी तो दि.01.07.11 रोजी नाकारला. वरील तारखांवरुन विमा प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत निकाली निघाला आहे हे स्पष्ट होते. सबब मंच मुददा क्र.3 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र.3 युनायटेड इन्शुरन्स कंपनी यांना आदेश देण्यात येतो
की, आदेश प्राप्तीपासून साठ दिवसांच्या आत त्यांनी तक्रारदाराला
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.एक लाख
द्यावेत.
(5) त.क्र.32/12
3) गैरअर्जदारांनी सदरची रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास रक्कम
देय असलेल्या तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9%
व्याजदरासहीत रक्कम द्यावी.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड