निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 09/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 29/10/2012 कालावधी 01वर्ष,01महिना,20दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
मनकर्णा भ्र.विलासराव टाके. अर्जदार
वय वर्षे.धंदा. घरकाम. अड.अरुण डी.खापरे.
रा.चिखलठाणा खु.ता.सेलु जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,सेलु
ता.सेलु जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर
सिडको,औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
युनाइटेड इंडीया इन्शुरंस कं लि.
मंडल कार्यालय, क्रं 2, अंबिका हाउस,
शंकर नगर चौक, नागपुर 400 010
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांचे पती श्री.विलासराव शेषराव टाके यांच्या मालकीची शेतजमिन गट नं.22 मौ.चिखलठाणा खु.सेलु तलाठी सज्जा चिखलठाणा खु.सेलु येथे असून याची नोंद
7 x 12, 8 अ, 6 ड, 6 क, मध्ये झाली आहे.
दुर्देवाने ता.02/10/2009 रोजी तक्रारदारांच्या पतीच्या डाव्या पायाला इलेक्ट्रीक शॉक लागुन मृत्यू झाला. सदर घटनेची खबर पोलीस स्टेशन सेलु येथे दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला, साक्षीदारांचे जबाब घेतले मयताचे प्रेताचे शासकीय रुग्णालय सेलु येथे शवविच्छेदन केले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार 1 यांच्याकडे दाखल केला तक्रारदारांच्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदर कागदपत्रांची पुर्तता करुन शेवटी प्रस्ताव पुन्हा गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे ता.19/10/2010 रोजी पाठवला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अनेक वेळा त्याच कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवले. तक्रारदारांनी प्रत्येक वेळी कागदपत्रांच्या मागणी प्रमाणे पुर्तता केलेली असूनही अद्याप पर्यंत तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवला अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 हजर झाले असून लेखी म्हणणे ता. 19/11/2011 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दाखल केलेला प्रस्ताव ता. 28/09/2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे पाठवला. त्यानंतर ता.04/10/2010 रोजी व 13/10/2010 रोजी सदर प्रस्तावामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीची पुर्तता करुन प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे ता. 13/10/2010 रोजी पाठवला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव ता.23/11/2009 रोजी प्राप्त झाला सदर पत्रामध्ये 6 क, 6 ड चा उतारा व वयाचे प्रमाणपत्राची त्रुटी असल्यामुळे वेळोवेळी मागणी करुनही पुर्तता न केल्यामुळे “ अपुर्ण प्रस्ताव ” गैरअर्जदार विमा कंपनीकडे ता. 21/12/2010 रोजी पाठविण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार 6 क, 6 ड चा उतारा व वयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची मागणी करुनही पुर्तता झाली नाही त्यामुळे कागदपत्रांच्या अभावी ता.21/12/2010 रोजी तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचा लेखी जबाब यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री अरुण खापरे आणि गैरअर्जदार 3 यांचे विव्दान वकील श्री गोपाल दोडीया यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री विलासराव शेषराव टाके इलेक्ट्रीक शॉक लागुन झालेल्या अपघातात मृत्यू पावले तक्रारदारांनी पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दाखल केला सदर प्रस्तावामध्ये 6 ड, 6 क, चा उतारा व वयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे सदर कागदपत्रांची पुर्तता करुनही तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता ता.24/02/2011 रोजीच्या प्रत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे 6 क, वयाचा पुरावा ही कागदपत्रे पाठविल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी ता.09/02/2011 रोजी 6 ड चा उतारा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केल्याचे दिसून येते, गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबात तक्रारदारांच्या विमा प्रस्तावामध्ये 6 क, 6 ड, व वयाचा पुरावा या कागदपत्रांची त्रुटी असल्या बाबत नमुद केले आहे. तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार सदर कागदपत्रांची पुर्तता झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांच्या कुटूंबाकरीता कल्याणकारी योजना राबवलेली आहे. शेतक-यांचे प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटीची पुर्तता करुनही नुकसान भरपाईची रक्कम विहीत मुदतीत गैरअर्जदार यांनी अदा केलेली नाही. गैरअर्जदार यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारीतील दाखल कागदपत्रावरुन तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने तक्रारदारांना सदर योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- देणे न्यायोचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही नुकसान भरपाईची रक्कम विहीत मुदतीत गैरअर्जदार यांनी दिली नाही, त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिकत्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली.त्यामुळे गैरअर्जदार कमांक 3 विमा कंपनीने तक्रारदारांना मानसिकत्रासाची रक्कम रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- देणे योग्य होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात देण्यात यावी.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.1,000/- ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) व तक्रारीचा खर्च रु.1,000/- ( अक्षरी रु.एकहजार फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात देण्यात यावी.
3 वरील आदेश क्रमांक 1 व 2 मधील रक्कमा विहीत मुदतीत अदा न केल्यास
द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदरासहीत देण्यात याव्यात.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.