निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 21/11/2013
कालावधी 02वर्ष. 01महिने. 29 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बेबीबाई भ्र.छत्रपती लोखंडे. अर्जदार
वय 42 वर्षे. धंदा. घरकाम. अॅड.राजेश.बी.चव्हाण.
रा. सातेफळ ता.पुर्णा जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी,पुर्णा. गैरअर्जदार
ता.पुर्णा जि.परभणी. स्वतः
2 दि न्यु इंडीया अशुरन्स कंम्पनी, अॅड.जी.एच.दोडीया.
यशोदीप,शिवाजी चौक,परभणी.
3 डेक्कन इन्शुरन्स कंम्पनी अॅन्ड रिइंन्शुरन्स ब्रोकर प्रा.लि. स्वतः
6 प्रखड बिल्डींग भानुदार नगर,बिग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे टाळून त्रुटीची सेवा दिली, म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार मौजे सातेफळ ता.पुर्णा जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविला होता, त्या पॉलिसीचा अर्जदाराचा मयत पती छत्रपती लोखंडे हा देखील लाभार्थी होता, अर्जदाराचे म्हणणे आहे की, तिचे पती छत्रपती दशरथ लोखंडे हे मोटार अपघातात दिनांक 06/01/2011 रोजी मयत झाले. सदर घटनेची खबर पोलीस ठाणे पुर्णा येथे दिली ज्याचा गुन्हा क्रमांक 01/2011 असा नोंदविण्यात आला, या प्रकरणी पोलीसांनी घटना स्थळ पंचनामा तसेच शासकीय वैद्कीय महाविद्यालयातून पोस्टमार्टेम तसेच साक्षीदारांचे जबाब घेतले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक त्या कागदपत्रांसह नुकसान भरपाई क्लेम दाखल केला, परंतु आजतागयत पर्यंत गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही. अशा रितीने गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत सेवात्रुटी करुन मानसिक त्रास दिला, म्हणून ग्राहक मंचात त्याची दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे, आणि गैरअर्जदाराकडून पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.1,00,000/- व मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराकडून मिळावी अशी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. व नि.क्रमांक 4 वर 2 कागदपत्रे दाखल केली, ज्यामध्ये तालुका कृषी अधिकारीला केलेला अर्ज व एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता व सदरचा प्रस्ताव परीपूर्ण नसलेमुळे प्रस्ताव परिपूर्ण करुन या कार्यालयास सादर करावे असे अर्जदारास सुचविले होते, व सदरचा प्रस्ताव अर्जदारास 07/07/2011 रोजी जा.क्रमांक 1697/11 अन्वये परत केला. तेव्हापासून अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेला नाही, असे गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 18 वर आपला लेखी जबाब दाखल केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व तसेच अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक नाही व त्यानी हप्त्याच्या स्वरुपात 1 रु देखील विमा कंपनीकडे भरला नाही, त्यामुळे C.P. Act प्रमाणे सदरची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही व खारीज होणे योग्य आहे व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे की, सदरील प्रस्तावा बद्दल पूणे शाखेस चौकशी केले असता हे निष्पन्न झाले की, अर्जदाराने विमा कंपनीकडे कोणताही प्रस्ताव दाखल केलेला नाही, त्यामुळे विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 19 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 मंचासमोर हजर व नि.कमांक 12 वर आपले लेखी निवेदन सादर केले. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांची संस्था विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते.सदरच्या तक्रारीचा विचार करता तक्रारदाराने आमचे विरुध्द केलेली तक्रार ही
अपु-या माहितीवर गैरसमजाने व चुकीने केलेली आहे. सन 2011/12 यांचे अंतर्गत दावेदाराने माझे संस्थेवर केलेल्या कोणत्याही दाव्यातून मुक्त करण्यात यावे, म्हणून विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील
प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून अर्जदाराचा विमा क्लेम
मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी झाली आहे काय ? नाही.
2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराचा पती मयत छत्रपती दशरथ लोखंडे याचा दिनांक 06/01/2011 रोजी मोटार अपघातात मृत्यू झाला होता हे पुराव्यात दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वरील एफ.आय.आर. कॉपी वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर कायदेशिर वारस म्हणून अर्जदाराने नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे अर्ज केला व गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरचा प्रस्ताव अपु-या कागदामुळे अर्जदारास परत केला होता ही बाब नि.क्रमांक 11/1 वरील कागदपत्रावरुन व लेखी जबाबावरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या जबाबात म्हंटल्या प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन परत प्रस्ताव दाखल केला नाही, असे दिसते कारण सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे कागदपत्राची छाननी करुन प्रस्ताव जातो व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे की, अर्जदाराचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला नाही, हे मंचास योग्य वाटते. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही, अर्जदाराने मंचासमोर फक्त दोनच कागदपत्रे दाखल केली आहे, म्हणून अर्जदाराने सबळ कागदपत्रासह त्याचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल करणे आवश्यक आहे. असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे तिच्या मयत पतीचा अपघात विमादावा
संपूर्ण कागदपत्रासह आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दाखल करावा व
गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरचा अर्जदाराचा विमादावा संपूर्ण कागदपत्रांसह प्राप्त
झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तो गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवावा व
गैरअर्जदार क्रमांक 3 ने सदर विमादावा प्राप्त झाल्यानंतर 8 दिवसांच्या आत
तो गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावा व गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराचा
विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडून प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत
निकाली काढावा.
2 पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.