निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 25/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 10/09/2013
कालावधी 11 महिने. 16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
तुफानसिंग पिता रणजिंतसिंग टाक. अर्जदार
वय 30 वर्षे. धंदा.शेती. अॅड.अरुण डी.खापारे.
रा.गुरु गोविंदसिंग नगर,परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,परभणी ता.जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर,बिग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक,औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशुरन्स कं लि.
यशोदिप बिल्डींग नानलपेठ,परभणी.
4 विभागीय व्यवस्थापक,
न्यु इंडीया अॅशुरन्स कं.लि.
विभागीय कार्यालय क्रं. 153400,
सावरकर भवन शिवाजी नगर,कॉंग्रेस हाउस रोड पुणे 422005.
___________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा देण्याचे टाळून सेवत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराचे वडील दिनांक 10/06/2011 रोजी लग्नाला जात असतांना जिप व ट्रकचा अपघात होवुन मृत्यू झाला व सदर घटने बाबत हिंगोली पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर संबंधीत पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा करुन साक्षीदारांचे जबाब घेतले, व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला तसेच अर्जदाराच्या मयत वडीलांचे पोस्टमार्टेम सिव्हील हॉस्पीटल हिंगोली येथे करण्यात आले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे मयत वडीलांच्या नावे शेत मौजे पोखर्णी (नृसिंह) येथे गट क्रमांक 924 मध्ये शेत जमीन आहे व अर्जदाराचे मयत वडील हे अपघाताच्या वेळी शेतकरी होते. व शासनाच्या नियमा प्रमाणे अर्जदाराने दिनांक 09/09/2011 रोजी सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादावा दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरचा अर्जदाराचा विमादावा जिल्हा कृषी अधिक्षककडे पाठविला व संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे संपूर्ण कागदपत्रांसह सादर केला. व सदर विमा बाबत अर्जदाराने गैरअर्जदारास विचारले असता तुमचा विमादावा मंजुरीसाठी पाठवला आहे आल्यावर आम्ही तुम्हांला कळवू असे उत्तर दिले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 ने अर्जदाराच्या वडीलांचा विमादावा विनाकारण प्रलंबीत ठेवुन सेवेत त्रुटी दिली आहे. कारण गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या मार्फत विहित मुदतीत दावा दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मंजुरीस पाठविल्यानंतर जाणून बुजून विमा दाव्याची रक्कम लांबविण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2, 3, व 4 संगणमत करुन अर्जदारास काही कागदपत्रे मागीतली त्यानंतर गैरअर्जदारांनी गाव नमुना क्रमांक 6 ड ची कॉपी आम्हाला दिलेली नसल्यामुळे तुमचा विमादावा बंद करण्यात येते असे अर्जदारास पत्राव्दारे कळविले.यानंतर अर्जदाराने आर.पी.ए.डी. व्दारे गैरअर्जदार क्रमांक 4 यांना 6 ड चे प्रमाणपत्राची नक्कल पाठवुन बंद केलेला विमादावा पुन्हा विचारात घेवुन नुकसान भरपाई अदा करावी अशी विनंती केली होती.त्याचा काहीही उपयोग झाला नाही.त्यामुळे विमा कंपनीने सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर होवुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, अर्जदाराला 1,00,000/- रुपये मृत्यू तारखे पासून द. सा. द. शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी जनता अपघात विमा योजना अंतर्गत द्यावेत. तसेच गैरअर्जदारांनी अर्जदाराला मानसिक व शारीरिकत्रासापोटी 25,000/- रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- रुपये देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 24 कागदपत्रांच्या यादीसह 24 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये क्लेम फॉर्म भाग 3, क्लेमफॉर्म भाग 1, क्लेमफार्म भाग 1 चे सहपत्र, प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा गट क्रमांक 207, गाव नमुना नंबर 8, फेरफार, गाव नमुना 6 (क), मृत्यू पत्र, बॅंक पासबुक, मतदार ओळखपत्र, ओळखपत्र मयताचे, मयताचे मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, शव परिक्षा अहवाल, मरणोत्तर पंचनामा, अर्जदाराचे विमा कंपनीला पत्र, विमा कंपनीचे पत्र, फेरफार 6 ड, पोचपावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्यावर, गैरअर्जदार क्रमांक1 यांना नोटीस तामिल होवुनही मंचासमोर गैरहजर त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यांत आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही, आम्ही फक्त मध्यस्थी म्हणून काम करतो, फक्त विमा दावा स्वीकारुन तो विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविणे एवढेच आमचे काम आहे.तसेच सदरच्या प्रकरणातून आम्हाला मुक्त करण्यात यावे. असे गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात म्हंटलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि. क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे. आहे.व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक नाही. त्यामुळे सदरची तक्रार चालवण्याचा मंचास अधिकार नाही व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने हप्त्यापोटी गैरअर्जदाराकडे कोणत्याही प्रकारची रक्कम जमा केलेली नाही, त्यामुळे तो गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक होत नाही, व तसेच ट्रायपार्टी अॅग्रीमेंट कारणाने शेतक-यास सदरची तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द दाखल करण्याचा काही एक कायदेशिर अधिकार नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास 6 ड चे प्रमाणपत्र दाखल करण्यास सांगीतले होते, परंतु सदरचे कागदपत्र अर्जदाराने आजपर्यंत दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा मंजूर केला नाही, त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रटी दिली नाही, व सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अशी मंचास विनंती केली आहे. नि.क्रमांक 15 वर गैरअर्जदार विमा कंपनीने आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनी क्रमांक 4 ने अर्जदाराचा
विमादावा 6 ड चे कागदपत्र मागुन अर्जदाराचा विमादावा
बंद करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे अपघात विमादावा दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1, 4/2, व 4/3 वरील कागदपत्रा वरुन सिध्द होते.तसेच
सदरचा विमादावा दाखल करतांना अर्जदाराने 6 ड चे प्रमाणपत्र देखील लावले होते ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराचे मयत वडील नामे रनजितसिंग जगजितसिंग टाक हे शेतकरी होते ही बाब नि.क्रमांक 4/6 वरील दाखल केलेल्या 7/12 वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराचे मयत वडीलांचा दिनांक 10/06/2011 रोजी अपघात झाला होता ही बाब नि.क्रमांक 4/16 वरील एफ.आय.आर. कॉपीवरुन व 4/17 वरील घटनास्थळ पंचनाम्यावरुन सिध्द होते. तसेच सदरच्या अपघाता मध्ये अर्जदाराच्या वडीलाचा मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 4/18 वरील दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा गाव नमुना नंबर 6 ड ची प्रत मागून प्रलंबीत ठेवला व नंतर 7 दिवस पूर्ण झाल्यामुळे अर्जदाराचा विमादावा बंद केला ही बाब देखील नि.क्रमांक 4/2 वरील दाखल केलेल्या गैरअर्जदार विमा कंपनीचे पत्रावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने सदरचे कागदपत्र गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमादावा दाखल करतांनाच दिले होते ही बाब दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/21 वरील अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे केलेल्या अर्जावरुन सिध्द होते. कारण सदरची बाब गैरअर्जदार विमा कंपनीने नाकारली नाही व त्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/23 वर 6 ड प्रमाणपत्रा वरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचे मयत वडीलांच्या नावे फेर क्रमांक 3374 अन्वये 1999 पासून जमीन आहे ते मयत तारखे पर्यंत जमीन आहे.याचाच अर्थ हा होतो की, अर्जदाराचे मयत वडील अपघाताच्या दिवशी शेतकरी होते. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा बंद करुन निश्चितपणे सेवेत त्रुटी दिली आहे. राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. विमा कंपनीस पॉलीसी हमी प्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही. अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीकडून 1,00,000/- रुपये मिळवण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
अर्जदारास अपघात विमा नुकसान भरपाई 1,00,000/- फक्त (अक्षरी रु.एकलाख
फक्त) द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- फक्त (अक्षरी
रु.तीनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.