निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 06/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 12/10/2011 कालावधी 05 महिने. 22 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शुभांगी भ्र.बाळासाहेब ढगे. अर्जदार वय 22 वर्ष.धंदा.घरकाम. अड.अरुण. डी.खापरे. रा.पिंपळगाव ठोंबरे.ता.जि. परभणी. विरुध्द 1 मा.तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार. तालुका कृषी कार्यालय,परभणी. स्वतः ता.जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर. सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडिया. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन क्रमांक 19. तिसरा मजला,धर्मपेठ. एक्सटेन्शन, शंकरनगर चौक,नागपूर. 440 010. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार मौजे पिंपळगाव ठोंबरे ता.जि.परभणी येथील रहिवासी असून तीचा पती मयत बाळासाहेब नारायण ढगे हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 318 शेतजमिन आहे. दिनांक 05/04/2010 रोजी अर्जदारच्या पतीचा वाहन अपघातात मृत्यू झाला. दैठणा पोलिस स्टेशनला अपघाताची खबर दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवुन घटनास्थळाचा व मरणोत्तर पंचनामा केला.व सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. त्यानंतर अर्जदारने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह 26/04/2010 रोजी क्लेम दाखल केला.त्यांनी मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवले त्यानंतर अर्जदारला गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आणखी काही अपुरी कागदपत्रे पाठवण्या विषयी कळवले.त्याही कागदपत्रांची अर्जदारने पुर्तता दिनांक 04/11/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत केली.त्यानंतरही गैरअर्जदार यांनी क्लेम मंजुरी बाबत काहीच कळविले नाही.अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत एकूण 27 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 30/05/2011 रोजी लेखी म्हणणे(नि.8) सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फता पाठविलेला लेखी जबाब प्रकरणात नि.9 ला समाविष्ट करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपला लेखी जबाब प्रकरणात दिनांक 30/07/2011 रोजी ( नि.15) वर समाविष्ट केला. नि.8 वरील लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 1 ने असे म्हंटले आहे की,अर्जदारचा मयत पती बा.ना.ढगे यांचा विमा नुकसान भरपाई परिपूर्ण प्रस्ताव सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन संबंधीत विमा कंपनीकडे सादर केला आहे.त्यानंतर क्लेम मंजूरी/नामंजुरी बाबत त्यांनी काहीच कळवलेले नाही.कागदपत्रे व प्रस्ताव पाठवण्याची सर्व कार्यवाही विहित मुदतीत केली आहे.सबब प्रस्तुत प्रकरणात त्यांना दोषी धरु नये अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्यांच्या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत. किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत बाळासाहेब ढगे याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 21.06.2010 रोजी मिळाली, मंजूरीसाठी तो क्लेम विमा कंपनीकडे तारीख 19/11/2010 पाठवला आहे.सबब त्यांना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपले लेखी जबाबात (नि.15) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत बाळासाहेब ढगे याचा शेतकरी विमा हप्ता कंपनीकडे जमा झालेला नाही.त्यामुळे कंपनीचा तो ग्राहक नाही व अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.अर्जदारने विमा कंपनी विरुध्द खोटी व निरर्थक तक्रार दाखल केली आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.अर्जदारने दाखल केलेल्या कागदपत्रात मयताचे ड्रायव्हींग लायसेंन्स शिकाऊ प्रकाराचे आहे त्यामुळे अपघाताचे वेळी मयताकडे कायदेशिर व इफक्टीव्ह ड्रायव्हींग लायसेंन्स नसल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही म्हणून तारीख 31/12/2010 चे पत्र पाठवुन अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला असल्याचे कळवले आहे.सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि. 16) दाखल केले आहे.व नि.18 लगत विमा पॉलिसी दाखल केली आहे. पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रु.1,00,000/- मंजूर करण्याच्या बाबतीत गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीकडून सेवात्रुटी झाली आहे काय ? होय. 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत बाळासाहेब नारायण ढगे रा.पिंपळगाव ठोंबरे हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत सादर केलेल्या महसूल रेकॉर्डच्या कागदपत्रावरुन आणि नि.4/9 वरील विमा क्लेमफॉर्म मधील तलाठयाचे प्रमाणपत्रा वरुन शाबीत झाले आहे. दिनांक 05.04.2010 रोजी अर्जदारचा पती मोटार सायकल क्रमांक एम.एच.22/जे 7946 वरुन जात असतांना ऊमरी ते भारस्वाडा रोड वर समोरुन येणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा अपघातात मृत्यू झाला होता ही वस्तूस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि. 4/21 वरील दैठणा पोलिस स्टेशन गु.रजि.नं. 05/10 मधील एफ.आय.आर, नि.4/23 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/24 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट व नि.4/22 वरील घटनास्थळ पंचनामा या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. मयत बाळासाहेब ढगे हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळणेसाठी अर्जदाराने वर नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी परभणी यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 ला मिळालेली होती व नुकसान भरपाई मंजुरीसाठी क्लेम विमा कंपनीकडे तारीख 19/11/2010 रोजी पाठवला होता अशी वस्तुस्थिती असतांनाही लेखी जबाबत विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीचा विमा हप्ता कंपनीकडे जमा झालेला नाही तो ग्राहक नाही असा बचाव घेवुन पुन्हा त्या बचावाला पुढे असा विसंगत खुलासा केला आहे की, कंपनीकडे पाठवलेल्या कागदपत्रातून असे आढळून आले आहे की, अपघाताचे वेळी मयताकडे मोटार सायकल चालवण्याचा शिकाऊ परवाना ( लर्निंग लायसेंस) होते ते कायदेशिर व इफेक्टीव्ह नसल्यामुळे तारीख 31/12/2010 चे पत्र पाठवुन अर्जदारचा विमा क्लेम नामंजूर केला असल्याचे कळवले आहे.यावरुन अर्थात मयत बाळासाहेब ढगे याच्या क्लेमची कागदपत्रे विमा कंपनीला मिळालेली होती व मयत हा त्यांचा लाभार्थी ग्राहक होता हे विमा कंपनीच्याच निवेदनातून सिध्द झाले आहे.आता प्रश्नच एवढाच उरतो की,अपघताचे वेळी मयताकडे दुचाकी वाहन चालवण्याचे शिकाऊ लायसेंस होते ते नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत कायदेशिर व इफक्टीव धरले जाता येईल का ? या संदर्भात अर्जदार तर्फे अड खापरे यांनी युक्तिवादाचे वेळी रिपोर्टेड केस 2011 (2) सी.पी.आर.पान 42 (आंध्रप्रदेश राज्य आयोग ) चा संदर्भ दिला आहे.त्यामध्ये मा.राज्य आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, A learners licence is also licence within the meaning of the provisions of the Act. याखेरीज अड खापरे यांनी आणखी एक रिपोर्टेड केस 2006 A.C.J. 2825 (सुप्रिमकोर्ट)चा संदर्भ दिला आहे.त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, M.V.Act, 1988, section 149 (2) (a) (ii)---- Motor insurance ---- Driving licence ---- Learner’s licence ---- Liability of insurance company ---- Whether the insurance company is liable when offending vehicle is driven by a person holding learner’s licence---- Held : Yes. याउलट गैरअर्जदारतर्फे अड.दोडीया यांनी युक्तिवादाचे वेळी रिपोर्टेड केस 2005 –EQ(BOM)-0-1071 युनायटेड इंडीया इन्शु.कंपनी विरुध्द लिलाबाई रमेश मराठे चा संदर्भ दिला आहे.त्यामध्ये मा.मुंबई उच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, अपघाताचे वेळी वाहन चालकाकडे शिकाऊ ड्रायव्हींग लायसेंन्स असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. अड.दोडीया यांनी दिलेल्या रिपोर्टेड केसच्या संदर्भातील मत मा.सर्वोच्च न्यायालयाच्या रिपोर्टेड केस मध्ये ते मत खोडून टाकलेले असल्यामुळे अड खापरे यांनी सादर केलेल्या मा.सुप्रीम कोर्टाचे रिपोर्टेड केस मधील मत विचारात घ्यावे लागेल त्यामुळे अपघाताचे वेळी मयत बाळासाहेब ढगे याच्याकडे शिकाऊ ड्रायव्हींग लायसेंस असले तरी गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीला विमा पॉलिसीची नुकसान भरपाई देण्याचे मुळीच टाळता येणार नाही. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन अर्जदारला नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले असल्याचे पुराव्यातून ही बाब सिध्द झालेली असल्यामुळे केवळ नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच केले असले पाहीजे यापेक्षा वेगळा निष्कर्ष निघूच शकत नाही. प्रस्तूत प्रकरणात ही आपल्या लेखी जबाबात खोटा व चुकीचा बचाव घेवून मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्जदाराने पुराव्यात दाखल केले प्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे क्लेम मंजुरीसाठी दिलेली असताना गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या विमा क्लेम तारीख 30/12/2010 च्या पत्रातून बेकायदेशिररित्या नामंजूर करुन अर्जदाराचे आर्थिक नुकसान करुन तीचेवर अन्याय केलेला आहे. याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 3 कडून निश्चितपणे सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने मंचात प्रकरण दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 06.04.2011 पासून व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |