निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/10/2013
कालावधी 01 वर्ष. 09महिने.16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सुनिता भ्र.पिंटु उर्फ पांडुरंग गादेकर. अर्जदार
वय 30 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.ए.डि.खापरे.
रा.भोगाव देवी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, जिंतूर. गैरअर्जदार.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,जिंतूर,
ता.जिंतुर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स बोकर्स प्रा.लि..
फारकडे भवन,भानुदास नगर,बी बाजार मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि.
अॅड.शर्मा यांचा वरचा मजला,
नानल पेठ,शिवाजी चौक, परभणी.
4 विभागीय व्यवस्थापक.
न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि.विभागीय कार्यालय क्रं. 153400,
सावरकर भवन,शिवाजी नगर, कॉंग्रेस हाऊस रोड, पुणे – 422005.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमादावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीचा दिनांक 27/02/2011 रोजी ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. अर्जदाराचे पती हे शेत गट क्रमांक 539, 223 मौजे भोगाव देवी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील शेतीचे मालक व कब्जेदार होते, त्याप्रमाणे 7/12 उतारा, 8 अ, 6 ड व 6 क प्रमाणपत्रा मध्ये त्यांचे नावे आलेले आहेत. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर पी.एम. करण्यासाठी सरकारी दवाखान्यात पाठविले व सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन जिंतूर येथे दिली. अर्जदाराने तीच्या पतीच्या मृत्य नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 24/06/2011 रोजी सर्व कागदपत्रांसह विमादावा सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सदरचा विमादावा सादर केला. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर विमा दाव्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वारवार चौकशी केली असता, तुमचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला आहे, व अजून मंजूर होवुन आला नाही मंजूर होवुन आल्यानंतर कळवितो. असे उत्तर देवुन अर्जदारास पाठविले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने विमादावा सादर केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या मयत पतीची शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गतची नुकसान भरपाई अर्जदारास जाणून बुजून मंजूर करुन दिली नाही व नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी संगणमत करुन अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवला आहे म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पडले व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश व्हावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास 1,00,000/- रुपये नामंजूर तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत. व मानसिक व शारीरिक त्रासापोटी 25,000/- द्यावेत. व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- रुपये देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर 18 कागदपत्रांच्या यादीसह 18 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांना केलेला अर्ज, गैरअर्जदार क्रमांक 1 यांची पोच, क्लेमफॉर्म भाग क्रमांक 2, प्रतिज्ञापत्र, 7/12 उतारा गट क्रमांक 223, 7/12 उतारा गट क्रमांक 539, गाव नमुना नंबर 8, गांव नमुना नंबर 6 क, फेरफार पत्रक, मतदान ओळखपत्र, बँकेचे पासबुक, मृत्यू नोंद प्रमाणपत्र, एफ.आय.आर. घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, आर.सी. बुक, मृत्यूचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांनात्यांचे लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी मंचाची नोटीस तामिल होवुनही गैरहजर त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर व आपला लेखी जबाब नि.क्रमांक 15 वर दाखल केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक होत नाही, त्यामुळे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत सदरच्या मंचासमोर चालवणे योग्य नाही. म्हणून खारीज करणे योग्य आहे व गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 चे असे म्हणणे आहे की, सदरचा करार हा ट्रायपार्टी अॅग्रीमेंट असल्यामुळे शेतक-याला विमा कंपनी विरुध्द कोणताही दावा करता येत नाही, म्हणून सदरची तक्रार चालवणे योग्य नाही. सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात आहे, म्हणून चालू शकत नाही व खारीज होणे योग्य आहे. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारची पॉलिसी दिलेली नाही. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांचे असे म्हणणे आहे की, पोलीस पेपर्स एफ.आय.आर. स्पॉट पंचनामाची प्रत पाहिली असता ती योग्य नाही, कारण अर्जदाराचा मयत पती सदरची मोटार सायकल चालवत होता की, नाही या बाबत कोणताही उल्लेख एफ.आय.आर. मध्ये केलेला नाही व तसेच अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसेंस दाखल करणे आवश्यक होते व गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 12/10/2011 रोजी व 18/01/2012 रोजी सदरची संपूर्ण माहिती अर्जदारास मागीतली होती, परंतु अर्जदाराने त्या कागदपत्रांची कोणतीही पुर्तता विमा कंपनीकडे केलेली नाही, यावरुन असा अर्थ निघतो की, अर्जदाराचे मयत पती हे अपघातावेळी सदरची मोटार सायकल चालवत होता व त्यामुळे मयताचे ड्रायव्हींग लायसेंस अर्जदाराने विमा कंपनीच्या पॉलिसी नियमा प्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल करणे आवश्यक होते व ते केले नसल्यामुळे अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने मंजूर केला नाही, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
नि.क्रमांक 16 वर गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 19 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत, ज्यामध्ये राहूलदेव देवपुरकर यांचा चौकशी अहवाल, कृष्णकांत यांचा तपास टिपण, राधाबाई यांचा तपास टिपण, धोडींबा यांचा तपास टिपण, सकुबाई यांचा तपास टिपण, म्हैशानंद यांचा तपास टिपण, रवि पांडव यांचा तपास टिपण, तसेच दिनांक 18/01/2012 चे गैरअर्जदार विमा कंपनीचे अर्जदारास आलेले पत्र, 12/10/2011 चे गैरअर्जदार विमा कंपनीचे अर्जदारास आलेले पत्र, ईत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. व तसेच विमा कंपनीने नि.क्रमांक 21 वर पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने ( 3 व 4 ) ने अर्जदाराचा प्रस्ताव
योग्य त्या कारणास्तव बंद केलेला आहे काय ? नाही.
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 27/02/2011 रोजी अपघाती मृत्यू झाला अर्जदाराचा पती हा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. त्याच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे विमादावा दाखल केला, तदनंतर वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील अर्जदारास विमा दाव्याची रक्कम मिळाली नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन म्हणजे एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा यावरुन मयत हा अपघाताच्या वेळी सदरचे वाहन चालवित होता अथवा नाही हे स्पष्ट होत नाही, जर मयत हा वाहन चालवित होता तर अशा परिस्थिती मध्ये त्याचे ड्रायव्हिंग लायसेन्स गैरअर्जदाराकडे दाखल करणे गरजेचे होते, गैरअर्जदाराने त्या संबंधीचा खुलासा अर्जदाराकडे मागीतला होता, परंतु अर्जदाराने उपरोक्त बाबीचा खुलासा केलेला नाही अथवा ड्रायव्हिंग लायसेन्स देखील गैरअर्जदाराकडे दाखल केलेले नसल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते, सबब योग्य त्या कारणास्तव अर्जदारास विमादाव्याची रक्कम देण्यात आलेली नाही. अर्जदाराने नि. क्रमांक 4 व नि.क्रमांक 24, 25 व गैरअर्जदाराने नि.क्रमांक 19 व नि.क्रमांक 21 वर मंचासमोर दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपत्रांची पहाणी केली असता, समोरुन भरधाव वेगाने येणा-या ट्रकने सदरच्या वाहनास जोराची धडक दिल्याने अपघात झाला व त्यात विमा धारकाचा दिनांक 27/02/2011 रोजी अपघाती मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. महत्वाचा मुद्दा असा आहे की, अपघाता समयी विमाधारक हा सदरचे वाहन चालवित होता किंवा नाही ? गैरअर्जदाराने नि.क्रमांक 19 वर राहुलदेव देवपुरकर यांचा चौकशी अहवाल व कृष्णकांत, राधाबाई, धोंडीबा, सकुबाई, म्हैशानंद, रवि पांडव या साक्षीदाराचे जबाब मंचासमोर दाखल केलेले आहे. यात रवि पांडव हा प्रत्यक्षदर्श ( Eye witness ) साक्षीदार आहे. कारण अपघात समयी तो विमा धारकांच्या समवेत सदर वाहना वर बसून प्रवास करीता होता. व या अपघातात तो देखील जखमी झालेला होता, म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून त्याचा जबाब कायद्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याने आपल्या जबाबत मयत विमाधारक हा अपघाता समयी वाहन चालवित असल्याचे नमुद केले आहे, परंतु शपथपत्र नि.क्रमांक 24 देवुन त्याने त्याचे म्हणणे स्वतःच खोडून काढले आहे व अपघाता समयी मयत विमाधारक हा सदरचे वाहन चालवित नव्हता तर पिराजी अडगळ हा सदर वाहन चालवित असल्याचे शपथपत्रात नमुद केले आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये अपघाता समयी मयत विमा धारकच सदरचे वाहन चालवित होता हे ठोसपणे शाबीत होत नाही. तसेच अपघाता समयी वाहन कोण चालवित होते आणि वाहन चालवितांना मागच्या सिटवर कोण बसले होते या बाबतची सविस्तर माहिती अर्जदाराने गैरअर्जदारास न पाठविल्याच्या कारणास्तव गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा बंद केल्याचे दिसते. म्हणजे अपघाता समयी अर्जदाराचा पतीच सदर वाहन चालवित होता असे खात्रीशिररित्या गैरअर्जदार देखील मानत नसल्याचे यावरुन स्पष्ट होते कारण मयत विमा धारकाचे ड्रायव्हिंग लायसेन्स नसल्याच्या कारणास्तव गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव नामंजूर केलेला नाही. वास्तविक पाहता उपरोक्त योजना महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या कल्याणासाठी जाहिर केलेली योजना आहे. या अनुषंगाने गैरअर्जदार विमा कंपनीने उदार दृष्टीकोन ठेवणे अपेक्षीत आहे. इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदाराने मंजूर करावायास हवा होता असे मंचाचे मत आहे. तसेच अर्जदाराने मा.मंचासमोर दाखल केलेले न्यायनिवाडे मा.उच्च न्यायालय बॉम्बे खंडपीठ औरंगाबाद 2009 (3) All MR 887 व मा.राज्य आयोग मुंबई 2008 (2) All MR ( Journal) 13 मध्ये व्यक्त केलेल्या मताचा ही या प्रकरणात आधार घेण्यात आलेला आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या आंत
वैयक्तिकरित्या वा संयुक्तिकरित्या विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- फक्त
( अक्षरी रु.एकलाख फक्त) अर्जदारास द्यावी.
3 गैरअर्जदार विमा कंपनीने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- फक्त (अक्षरी
रु.एकहजार फक्त ) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,500/- फक्त (अक्षरी
रु.एकहजार पाचशे फक्त ) आदेश मुंदतीत अर्जदारास द्यावी.
4 दोन्ही पक्षांनाआदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.